ब्राह्मणांचे कसब - चाल सातवी

हिंदुस्थानात ब्राह्मण सत्ताधारी होण्यापूर्वी या पुण्यक्षेत्री परशुरामाने महारांना महाअरीत पाताळी कसे घातले याविषयी हा पोवाडा.


पवाडा.
शुद्र जर्जर । चाले काठींवर ॥
तीन पायाचे पशु बनलें ॥
तगादे यम दारीं बसलें ॥
करी तळमळ ॥ बुद्विला बळ ॥
मन संसारीं अती रिझलें ॥
मायाजंजाळीं किती रुतले ॥
झाला घाबरा ॥ पडे पसारा ॥
लष्कर वैद्याचें हललें ॥
कैदी पडद्यामधीं केले ॥
नाडया पहाती ॥ मात्रा योजिती ॥
औषध किमतिचें दिलें ॥
पैसे धांदलिनें नेले ॥
वार्ता ऐकून ॥ आला धावून ॥
पंख कागाचे फडफडले ॥
सोंग भट्टाचें मधीं आलें ॥
चित्ता उडाला ॥ डाव मांडिला ॥
भडभड पुराण वाचिलें ॥
दानधर्मास सुरु केलें ॥
दुखणे जड ॥ मधीं बडबड ॥
ऐकतां कानठाळ बसले ॥
रोगी ऐकेना बोले ॥
दान मागे दान ॥ पशु गोदाना
अखेर जोडे घेतले ॥
तगादे यम दारीं बसले ॥१॥
स्त्री गरगर ॥ घार जसी फिरे ॥
अश्रुपातांचा लोट चाले ॥
ह्रदयीं काळीज होरपळे ॥
मानला खाई ॥ भिरभिर पाही ॥
पतिकडे नीट न्याहाळीलें ॥
जसें का आकाश कोसळलें ॥
उठे लवलाही ॥ पोराकडे जाई ॥
उचलून कडेवर घेतलें ॥
दुग्ध घाईनें पाजिलें ॥
सोडी झटकुन ॥ येई परतुन ॥
ब्राह्यण मधीं आडवे पडले ॥
बोलणे स्त्रीचें बंद केलें ॥
जीव तरफडे ॥ रोंख पतिकडे ॥
खालीं हनवटिला धरलें ॥
मुके बोटाला हाळूच दिले ॥
दान करुं द्या ॥ स्वस्थ मरुं द्या ॥
क्लेश संसार पुरे झाले ॥
आमंत्रण देवाचें आलें ॥
पुरे कर आतां ॥ खोटी ममता ॥
फुसफुस पुराण लाविलें ॥
व्यर्थ हें जन्म दवडिलें ॥
द्विज हयगई ॥ करतां सोई नाहीं ॥
कैक पाहा आधोगती गेले ॥
तगादे यम दारी बसले ॥२॥
अती व्यापिला ॥ प्राण त्यागिला ॥
वेटुळें ममतेचें पडलें ॥
भट्टाला मधीच कोंडिलें ॥
हळुच निघाला ॥ घरीं पोंहचला ॥
भोजन यथासांग केलें ॥
कारटे स्मशानी बनले ॥
मनीं योजून ॥ ग्रह धुंडून ॥
त्रिपादा शोधून काढलें ॥
मन भौताचे खचविले ॥
विधि सुरु केले ॥ मंत्र बोलिले ॥
पिठाचे पुतळे करविले ॥
दर्भ तीर्थानें स्थापिले ॥
द्रव्य घेवून ॥ अग्नि देऊन ॥
नाडून घरी परत गेले ॥
डोम कागानें अंतीं पिडले ॥
आह उरले ॥ स्वस्थ बसले ॥
बाईला समजाऊं लागले ॥
मुलानें पोटासी धरिलें ॥
कंवटी फुटली ॥ सर्व उठलीं ॥
कंबर बाईची खचली ॥
धरीं मित्रांनीं पोहचविली ॥
कारटा येई ॥ हळूच सुचवी ॥
बेत विधिचे ठरविले ॥
तगादे यम दारीं बसले ॥३॥
वडील पुत्राला ॥ जीन घातला ॥
गरुडपुराण नाचविले ॥
विधी नऊ दिवस करविले ॥
दाहावा दिवस ॥ जमवी सर्वास ॥
भाताचे ऊंडे मांडीवले ॥
कावळया भोजन देवविलें ॥
भांडी कुंडीं दान ॥ छत्री निदान ॥
मन काठीवर बसलें ॥
शेवटीं जोडयानें तृप्त झाले ॥
धूर्त अट्टल ॥ केला सट्टल ॥
भट्टाने शुद्रा ठकविलें ॥
ज्ञान सर्वांचे कसें खुंटलें ॥
कर्जबाजारी ॥ झाला बहुपरी ॥
धर्म थापिनें किती लुटले ॥
त्राण तेराव्या नाहीं उरलें ॥
भट्ट धनको ॥ शुद्र ऋणको ॥
कर्ज शेतावर काढिलें ॥
भोजन जातीला दिलें ॥
थोडया दिवसांत ॥ व्याज मुदलांत ॥
गहाणखत चोख नवें केलें ॥
मिराशी भट्ट वारस झाले ॥
निमकहरामी ॥ मोठा गुलामी ॥
चाकरी यजमाना ठेवलें ॥
तगादे यम दारी बसले ॥४॥
गवत काढिती ॥ मदत करिती ॥
बाईचे सुखसोहळे गेले ॥
वेळेला तुकडा ना मिळे ॥
वित्त उडालें ॥ दांत पडले ॥
कोरडी भाकरी ना गिळे ॥
मुलाकडे पाहून तळमळे ॥
पोटाने गेली ॥ मरुं घातली ॥
भट्टा भेटिला बोलिवले ॥
अती गरीबी म्हणोन त्यजिले ॥
बाई वारली ॥ शेतीं पुरली ॥
गरुडपुराण कोठें लपलें ॥
भट्टाने तोंड केलें काळें ॥
राणीबाई ॥ लक्ष देई ॥
दु:ख हे रडून गाईलें ॥
द्विजांनी शुद्रा गांजिलें ॥
शिकिव शुद्राला ॥ पंगु बंधुला ॥
दास ब्रह्यम्यानें मुळीं केलें ॥
ज्ञान देण्याचें बंद ठेवलें ॥
किर्ती ऐकून ॥ आलों धावुन ॥
जगामधीं दास सोडविले ॥
धडे त्वां कैकाला दिले ॥
राव जोतिचे ॥ मार फुलांचे ॥
ओळखून शत्रू झोडिले ॥
तगादे यम दारीं बसले ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 18, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP