काव्यरचना - आत्मपरीक्षण

आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.


१.
परा लाभ होतां संतोष मानीतो ॥ साह्य देतो घेतो ॥ सद्‍गुणाचें ॥१॥
विद्वान करीतो पंगु जगाप्रत ॥ पाळी सदा व्रत ॥ घरामध्यें ॥२॥
‘आपल्यावरुन जग ऒळखतो’ ॥ मानवा लेखी तो ॥ बंधुपरी ॥३॥
आत्मपरीक्षण करीतो जगांत ॥ धन्य मानवंत ॥ जोती म्हणे ॥४॥
२.
जगामाजी सर्व मजला असावें ॥ शेजा-या नसावें ॥ हेवा मुळ ॥१॥
स्वत: हितासाठीं तळमळ करी । झटे सर्वोपरी ॥ कीर्तीसाठी ॥२॥
खरा मतलबी सर्वांत वर्ततो ॥ निराशा करीतो ॥ बापडयांची ॥३॥
आत्मपरीक्षेला नाहीं जुमानीत ॥ झुरे विषादांत ॥ जोती म्हणे ॥४॥
३.
निर्मीकें निर्मीले मनुज सकळ ॥ दिलें बुद्विबळ ॥ कामजास्ती ॥१॥
बुद्विप्रामाण्याने उद्योगा लागती ॥ यश मिळविती ॥ धंद्यामध्यें ॥२॥
शिपायाचे धंदे आर्याजीनें केलें ॥ शुद्रास जिंकीलें ॥ शस्त्रेअस्त्रें ॥३॥
पिढीजादा त्यांचे दास बनविले ॥ सूड उगविल ॥ सर्व कामीं ॥४॥
शूर भिल्ल कोळी शरानें तोडीले ॥ हाकळून दिले ॥ रानींवनीं ॥५॥
मांग महाअरी केले बहु जेर ॥ शिक्षा खडतर ॥ आर्याजींची ॥६॥
वेदा मनु नाहीं आत्मपरीक्षण ॥ आर्यास दुषण ॥ जोती म्हणे ॥७॥
४.
आर्याजीनें सर्वा पदच्युत केलें ॥ गर्वानें फुगले ॥ शोधी वेद ॥१॥
निराशा शूद्रांची आजतागाईत ॥ गणिले दासांत ॥ त्याजपैकीं ॥२॥
आनंदले मनीं विद्याबंदी केली ॥ घेईना साऊली ॥ अंत्यजाचि ॥३॥
आर्ये धिक्कारिलें आत्मपरीक्षेला ॥ त्रास हा जिंकल्या ॥ जोती म्हणे ॥४॥
५.
आर्याजीचा हेवा प्रास जिंकिल्यास ॥ लुटा अज्ञान्यास ॥ सर्व कामीं ॥१॥
झाकल्या वेदाचा आधार दावीती ॥ श्रेष्ठत्व ओढीती ॥ स्वत:कडे ॥२॥
मानवांचे हक्क शुद्रा मुख्य दावा ॥ पुरे वेदकावा ॥ ब्रह्यकुट ॥३॥
किड लागो आर्य आत्मपरीक्षेला ॥ त्रास अंत्यजाला ॥ जोती म्हणे ॥४॥
६.
आर्ये कांहीं ग्रंथ तर्कानें रचीले ॥ नाहीं ईशा भ्याले ॥ स्वार्थासाठीं ॥१॥
शुद्रादीका घरीं पारायण केलें ॥ त्यास ठकविलें ॥ धर्ममिषें ॥२॥
धंदा न करिता सर्वांस भोंदीले ॥ भूदेव बनविलें ॥ त्यांचे हेच ॥३॥
आत्मपरीक्षेला आर्यानीं त्यागीलें ॥ धर्मलंड झाले ॥ जोती म्हणे ॥४॥
७.
शुद्रादीक सर्व आर्यानीं भॊंदीले ॥ फुंकोनीया खाल्ले ॥ उंद्रापरी ॥१॥
सर्व गोष्टीमध्यें अमर्यादा केली ॥ घेईना सावली ॥ जेवतांना ॥२॥
अशा वर्तनानें भिईना मनाला ॥ लाजेना मनाला ॥ मनीं दंड ॥३॥
सदा मनीं द्वेष अपराधी खळ ॥ नाहीं त्यास बळ ॥ सद्‍गुणाचे ॥४॥
आत्मपरीक्षण हद्दपार करी ॥ काळें पाणी जारी ॥ जोती म्हणे ॥५॥
८.
मांग आर्यामध्यें पाहूं जातां खूण ॥ एक आत्मा जाण ॥ दोघांमध्यें ॥१॥
दोघेही सारीखे सर्व खाती पीती ॥ इच्छा ती भोगीती ॥ सारखेच ॥२॥
मांग आर्य दोघे शोभा मानवांत ॥ दोघे वर्तनांत ॥ एकसहा ॥३॥
सर्व ज्ञानामध्यें आत्मज्ञान श्रेष्ठ ॥ कोणी नाहीं भ्रष्ट ॥ जोती म्हणे ॥४॥
९.
तेथे कैचा देश धर्म जातीभेद ॥ सर्वाची उमेद ॥ सुखासाठीं ॥१॥
सुखापोटीं मोह उत्पन्न तो झाला ॥ पिडी सर्वत्राला ॥ एकसहा ॥२॥
मानवाचा मोह हेवा खास झाला ॥ रक्तपाती झाला ॥ जगामाजीं ॥३॥
आपस्वार्थामध्यें आत्मज्ञान भ्रष्ट ॥ झाले बहु दुष्ट ॥ जोती म्हणे ॥४॥
१०.
मानवाचे हक्क सर्वास कळतां ॥ मग कोण त्राता ॥ आर्य भटा ॥१॥
विचारीते झाले सर्व कसे नीच ॥ आर्य कां रे ऊंच ॥ बळीस्थानीं ॥२॥
विषारी ते वेद अज्ञान्या डसती ॥ बिळांत पळती ॥ सर्पावत ॥३॥
भांडणें लागतां सर्वांचें वाटोळें ॥ पाखंडे सोहळे ॥ फेका दुर ॥४॥
येणारें अरिष्ट कसें तरी टाळा ॥ शुद्रादीक गळा ॥ पडा आतां ॥५॥
वेळ आली आत्मपरीक्षण करा ॥ निर्मीकास स्मरा ॥ जोती म्हणे ॥६॥
११.
भ्रष्ट आर्य तुम्ही सद्‍गुणी कां व्हाना ॥ म्लेच्छा कित्ता द्याना ॥ जगामाजी ॥१॥
आतां पुरें झालें सोंग भूदेवाचें ॥ धूर्त नट त्याचे ॥ जगीं छी: थू: ॥२॥
शरण जाऊनी त्यांची क्षमा मागा ॥ नाहीं दुजी जागा ॥ तुम्हांसाठीं ॥३॥
आत्मपरीक्षणा तुम्ही द्यावा थारा ॥ मत्सरा आवरा ॥ जोती म्हणे ॥४॥
१२.
स्वत:च्या न्युन्यता व्यंगें सुधारती ॥ सत्यानें वागती ॥ सर्वांसगें ॥१॥
माझ्याशी लोकांनी जसें बा वर्तावें ॥ तसें मी वर्तावें ॥ जगासंगें ॥२॥
त्यांत दुजाभाव नसावा अंतरीं ॥ मग मौजा मारीं ॥ जगामाजी ॥३॥
आत्मपरीक्षेंत असावें सावध ॥ जोती करी बोध ॥ धूर्त लोकां ॥४॥
१३.
जरी तुझी सुखालागीं तळमळ ॥ तरी पाठबळ ॥ सत्य घेई ॥१॥
धैर्यानें वागावें सत्य आळवून ॥ सुखी करा जन ॥ जगामाजीं ॥२॥
मग तुं अवघाची सुखरुप होशी ॥ तरुन तारशी ॥ दुस-यास ॥३॥
खरें हेंच ज्ञान आत्मपरीक्षण ॥ बुद्वीचें लक्षण ॥ जोती म्हणे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 18, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP