काव्यरचना - स्वच्छता

आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.


१.
स्वच्छ होण्यासाठी स्नान तें करावें ॥ वस्त्रांनीं पुसावें ॥ लागलेंच ॥१॥
स्नानाचा कंटाळा पुळयांचे माहेर ॥ खरजुचें घर ॥ आदीपीठ ॥२॥
दांत खाऊनीयां बोलतां चालतां ॥ नित्य खाजवितां ॥ वेळ जाई ॥३॥
स्वकीय स्वच्छता मुळीं विसरला ॥ वैद्यानें नाडीला ॥ जोती म्हणे ॥४॥
२.
अंगवस्त्रें ज्यास धुण्याचा कंटाळा ॥ चोळी वेळोवेळां ॥ दोन्ही कांखा ॥१॥
दांत विचकूनी जांघास चोळी ॥ काढीतांच मळी ॥ गार वाटे ॥२॥
वस्त्रांतील उवा चिमटीनें धरी ॥ चोळूनियां मारी ॥ मुकाठयानें ॥३॥
अंगवस्त्रें स्वच्छ ठेऊं विसरतो ॥ निंदे पात्र होतो ॥ जोती म्हणे ॥४॥
३.
स्नान केल्यावर उल्हास मनास ॥ झटे उद्योगास ॥ आवडीनें ॥१॥
रुचीकर लागे जाडेभर्डे अन्न ॥ होईना अजीर्ण ॥ कधीं त्यास ॥२॥
स्पर्शरोग त्यास होण्याचा अभाव ॥ मनाचा संभव ॥ सर्व ठायीं ॥३॥
शरीरीं स्वच्छता ठेऊं विसरतो ॥ सुख ना भोगीतो ॥ जोती म्हणे ॥४॥
४.
वस्त्रें धुतल्यानें ज्यास्त तीं टिकती ॥ संतोषी ठेविती ॥ वापरणा-या ॥१॥
धुळीसह घाम वस्त्रें कुजविती ॥ दुर्गधी सोडीती ॥ प्राणेंद्रिया ॥२॥
दुर्गध येतांच किळस करती ॥ दुरुन वागती ॥ त्यांच्यासंगे ॥३॥
वस्त्राची स्वच्छता ठेऊं न जाणती ॥ रोगग्रस्तें होती ॥ जोती म्हणे ॥४॥
५.
निर्मीकें निर्मीलें मानव पवित्र ॥ कमीजास्त सुन्न ॥ बुद्वीमध्यें ॥१॥
पिढीजादा बुद्वी नाहीं सर्वामधीं ॥ शोध करा आधीं ॥ पुर्तेपणीं ॥२॥
सत्य सेवूनीयां चित्त करीं स्वच्छ ॥ मग मान तुच्छ ॥ मानवास ॥३॥
मनाची स्वच्छता नाहीं समजला ॥ भूमीभार झाला ॥ जोती म्हणे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 18, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP