काव्यरचना - नीति

आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.


१.
निर्मीले बांधव स्त्रीपुरुषप्राणी ॥ त्यांत गोरे कोणी ॥ रंगवर्ण ॥१॥
त्यांचे हितासाठीं बुद्विमान केले ॥ स्वतंत्र ठेविले ॥ ज्या ज्या कामीं ॥२॥
कोणास न पिडी कमावलें खाई ॥ सर्वां सुख देई ॥ आनंदांत ॥३॥
खरी हीच नीती मानवाचा धर्म ॥ बाकीचे अधर्म ॥ जोती म्हणे ॥४॥
२.
माझें कांहीं कोणी घेऊं नये जनीं ॥ वसे ध्यानींमनीं ॥ मानवांच्या ॥१॥
माझ्या मनीं सर्व मजला असावें ॥ दुज्या कां नसावें ॥ जगामाजी? ॥२॥
आपल्यावरुन जग ओळखावें ॥ त्यांच्याशीं वर्तावें ॥ सत्य तेंच ॥३॥
मानवांचा धर्म सत्य नीती खूण ॥ करी जीवदान ॥ जोती म्हणे ॥४॥
३.
सत्यावीण नाहीं धर्म तो रोकडा ॥ जनांशीं वांकडा ॥ मतभेद ॥१॥
सत्य सोडूं जातां वादामध्यें पडे ॥ बुद्वीस वांकडे ॥ जन्मभर ॥२॥
सत्य तोच धर्म करावा कायम ॥ मानवा आराम ॥ सर्व ठायीं ॥३॥
मानवांचा धर्म सत्य हीच नीती ॥ बाकीची कुनीती ॥ जोती म्हणे ॥४॥
४.
आपहितासाठीं सत्यानें वर्तावें ॥ सुमार्गी लावावें ॥ भावंडास ॥१॥
तुझी वर्तणूक आधीं कर नीट ॥ दुर्गुणाचा वीट ॥ खरें सुख ॥२॥
मानवी सुखास वाटेकरी होती ॥ फळास भॊगीती ॥ सर्वांसह ॥३॥
मानवांचा धर्म सत्य खरी नीती ॥ बाकीची कुनीती ॥ जोती म्हणे ॥४॥
५.
तुझे हितासाठी जगीं सत्य धर ॥ निर्मीक आधार ॥ सर्व ठायीं ॥१॥
आपपर नाहीं देशधर्मकुट ॥ करवावा वीट ॥ सत्यासाठीं ॥२॥
मानवी भूषण तूंच होशी खास ॥ सर्वांचा पडोस ॥ जगामाजीं ॥३॥
मानवी नीती हीच धर्मनीती ॥ बाकीची कुनीती ॥ जोती म्हणे ॥४॥
६.
खॊटें बोलूनियां अज्ञान्या पिडणें ॥ लुटूनियां खाणें ॥ भावंडास ॥१॥
विश्वासघातानें मित्रास नाडणें ॥ नव्हेत लक्षणें ॥ सज्जनांचीं ॥२॥
धंदा कलालाचा कुटूंबा पोसणें ॥ मद्यपी करणें ॥ मुलींमुलां ॥३॥
मानवांचा धर्म सत्य खरी नीती ॥ बाकीची कुनीती ॥ जोती म्हणे ॥४॥
७.
प्रामाणिकपणा ज्याचे असे पोटीं ॥ दावितो सचोटी ॥ सर्व जना ॥१॥
कृतज्ञ होऊन मानवा संभळ ॥ निर्मीकाचें बळ ॥ तुजवरी ॥२॥
नम्र होऊनीयां रक्षा सौजन्यास ॥ झटा उद्योगास ॥ निशीदिनीं ॥३॥
मानवांचा धर्म सत्य सर्व नीती ॥ बाकी कुरापती ॥ जोती म्हणे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 18, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP