काव्यरचना - फंड
महात्मा फुल्यांनी हे काव्य व्यक्तिमात्रास अनुलक्षुन लिहिले नसून फक्त उपमापर लिहून दिलगिरी व्यक्त केली.
१
ब्राह्मणाचीं मुले विद्येस टिकती ॥ आर्जव करीती ॥ इंग्रजाचा ॥१॥
गोर्या फुगवूनी कामगार होती ॥ शुद्रास नाडीती ॥ सर्व कामीं ॥२॥
तर्क धर्म मुढ शुद्रां शिकविती ॥ मत्सर करीती ॥ इंग्रजांचे ॥३॥
इंग्रजास तुम्ही करा आधीं जागे ॥ फंड लागे मार्गे ॥ जोती म्हणे ॥४॥
२
सार्यासह फंड शुद्र किती देती ॥ धूर्त आर्य खाती ॥ शाळाखातीं ॥१॥
शुद्रादीक त्यांनी किती शिकविले ॥ कामगार केले ॥ दावा आम्हां ॥२॥
शुद्रासाठीं गोरे मनांत झुरती ॥ भटा जागा देती ॥ जोखमीच्या ॥३॥
शुद्राजी थकले फंड देतां देतां ॥ भटांस पोशीतां ॥ जोती म्हणे ॥४॥
३
शाळा तपासाव्या गांवोगांर्वी सर्व ॥ आर्या झाला गर्व ॥ जगामाजी ॥१॥
मानव शिक्षक नेमा निर्विवाद ॥ आर्य भेदाभेद ॥ त्यागा सर्व ॥२॥
भट्टाचें शिक्षण खोटा धर्मसार ॥ कृत्नीमाचें घर ॥ मनुमत ॥३॥
शुद्रार्जीनीं फंड कोठवर द्यावे ॥ आर्यांस पोसावें ॥ जोती म्हणे ॥४॥
४
तरुण शुद्रांनी विद्या संपादावी ॥ चाकरी धरावी ॥ शाळाखातीं ॥१॥
शाळेमधीं कर्धी निवड नसावी ॥ मानवा शिकवी ॥ एकसहा ॥२॥
मुळीं जातीभेद खुळास त्यागावें ॥ आर्या लाजवावें ॥ सतकर्मी ॥३॥
शुद्रांच्या श्रमाचा लोकल तो फंड ॥ खाती आर्य भंड ॥ जोती म्हणे ॥४॥
५
गांवेगांव भट शाळागुरु होती ॥ शुद्रा शिकविती ॥ राजद्रोहा ॥१॥
मांग-म्हार मुला दूर बसविती ॥ फुकटचा खाती ॥ सर्वं फंड ॥२॥
ब्राह्मण पंतोजी गोर्या देती ॥ म्हारास पिडीती ॥ धर्मथापा ॥३॥
अंत्यजाचा आहे लोकल तो फंड ॥ त्यांचे कां हो भंड ॥ जोती म्हणे ॥४॥
६
आर्य शुद्र पोरा शाळेत छळीती ॥ चेष्टा करीती ॥ वर्गामध्यें ॥१॥
जातीचे ब्राह्मण गर्वे हंबरती ॥ तोरा मिरविती ॥ आम्हा श्रेष्ठ ॥२॥
यज्ञामध्यें भट गाया खाती ॥ बोकड वधीती ॥ इंग्रजींत ॥३॥
नाक चढवून इंग्रजा र्निदीती ॥ शुद्रास भोंदीती ॥ जोती म्हणे ॥४॥
७
आर्यं परिक्षक पक्षपाती होती ॥ भट पोरा देती ॥ गुण जास्त ॥१॥
शुद्र पोरावर डोळे वटारीती ॥ घाबरे करीती ॥ परिक्षेंत ॥२॥
जगद्वेष्टे आर्य जातीचे क्रमीन ॥ करी अपमान ॥ शुद्रांचा हो ॥३॥
पवित्न इंग्रज भटा बढविती ॥ मोकळे सोडीती ॥ जोती म्हणे ॥४॥
८
सरकारी शाळीं आधीं शुद्र भरा ॥ भटोबास थारा ॥ देऊं नका ॥१॥
भटावत तुम्ही शिक्षक बनादें ॥ त्यांना हटवावें ॥ सत्यामध्ये ॥२॥
विद्या शिकवूनी मग गप्पा ॥ मनुमत कापा ॥ तुम्ही सर्व ॥३॥
असें न करीतां फंडास मागतां ॥ शुद्रा लाजवितां ॥ जोती म्हणे ॥४॥
९
विद्या शिकोनीयां गांवोगांव फिरा ॥ उपदेश करा ॥ शुद्रादीकां ॥१॥
शुद्र शिक्षक ते सरकारा मागा ॥ आर्याजीस सांगा ॥ दान मागा ॥२॥
शुद्र मुलीमुलां शाळेत घालावें ॥ सुशील करावे ॥ सर्व कार्मी ॥३॥
शुद्राजींनीं फंड कोणा कोणा द्यावे ॥ धूर्तास पोसावे ॥ जोती म्हणे ॥४॥
१०
सरकारी शाळा आर्धी दिवे लावा ॥ उजेडा दाखवा ॥ शुद्रांदीकां ॥१॥
फंड नको तुम्हा कोणाची मदत ॥ दावा करामत ॥ शुद्र लोकां ॥२॥
असें न करीतां लोका त्नास देतां ॥ खापर फोडीतां ॥ माथ्यावर ॥३॥
इंग्रजांचे माना तुम्ही उपकार ॥ मनु हद्दपार ॥ जोती म्हणे ॥४॥
११
शुद्रां आर्यत्नास जपून शोधावे ॥ कामगार व्हावे ॥ सर्व खातीं ॥१॥
आर्य ठकबाज्या उघड्या कराव्या ॥ जगा दाखवाव्या ॥ वेळोवेळीं ॥२॥
मुढ शुद्रादीकां सत्यानें वागवीं ॥ त्याजला दाखवीं ॥ भट-कावा ॥३॥
शुद्रांचे वंशज तुम्ही खरी खास ॥ दावा जगतास ॥ जोती म्हणे ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : January 18, 2012
TOP