श्रीज्ञानेश्वरांची आदि - अभंग १ ते १०
संत नामदेवांनी संतांचा महिमा इतका रसाळ वर्णन केला आहे, तो एकमात्र त्यांनीच करू जाणे!
१
जगत्रयजीवन अंतर्निष्ठ ज्ञान । तरी संतासीं शरण रिघिजे भावें ॥१॥
हेचि भक्ति ज्ञान वैराग्याचे निधी । विवेकेंसीं बुद्धि नांदे माझी ॥२॥
हे श्रवणाचे श्रवण मननाचे मनन । हेचि निजध्यासन वैराग्याचे ॥३॥
म्हणोनि बैसलों संतांचे संगतीं । गोविंदा विश्रांति गहिनीनाथ ॥४॥
२
बैसोनि एकांतीं गुरुगम्य गोष्टी । वेदांत परिपाठी शास्त्र बोध ॥१॥
नित्यशुद्धबुद्ध निर्विकार पूर्ण । उमेसी जें ज्ञान शिव सांगे ॥२॥
तेंचि सच्चिदानंद साकार जीव प्राण । शरीर जाय क्षीण जयापरी ॥३॥
तेंचि हें सर्व विठोबाचें नाम । निराईस प्रेम गहिनीनाथीं ॥४॥
३
बैसलियां दोघें भ्रतारवल्लभें । उदरींचा गर्भें तेंचि ध्यान ॥१॥
भक्ति नवमास भरले पूर्ण दिवस । आलें वैराग्य डोळस मूर्तिमंत ॥२॥
विठ्ठल आवडी ठेवियेलें नाम । निराईस प्रेम गहिनीनाथीं ॥३॥
४
व्रतबंधदीक्षा उपद्श गायत्री । ॐकार मूळमंत्री स्वर सोळा ॥१॥
केलें वेदपठण काव्य आणि व्याकरण । जालासे निपुण शास्त्रवक्ता ॥२॥
मग पुष्करादि तीर्थें पाहावीं समस्तें । अनुताप चित्तें धरियेला ॥३॥
वैराग्यपुतळा ज्ञानगम्य मूर्ति । निघालासे भक्ति तीर्थाटणा ॥४॥
विठठलें वंदुनी मातापिता दोन्ही । मग तीर्थाटणीं मुहूर्त केला ॥५॥
५
आला द्वारावती पाहिली कृष्णमूर्ति । जे मोक्ष विश्रांति मुमुक्षूंची ॥१॥
धरी मछावतार केला शंखोद्वार । देव मुक्तिमाहेर पांथिकाचें ॥२॥
तेथोनि सत्वर आला पिंडारका । मंगळहडीहुनी द्वारका देखियेली ॥३॥
सुवर्णाची नगरी ब्राह्मणा दिधली । ते पुरी पाहिली सुदामयाची ॥४॥
मंडपाकार शोभे तो माधव । रुक्मिणी विवाहो जाला जेथें ॥५॥
संपादुनी गेला अवतारकृत्य । तें भालुकातीर्थ देखियेलें ॥६॥
पश्चिमे प्रभासलिंग देखियेलें । सोरटी वंदिलें सोमनाथा ॥७॥
मुचकुंडाची गुंफा काळ्यवन उभा । विश्रांती पद्मनाभा धवलपुरी ॥८॥
मार्गींचीं तीर्थं करुनी समस्तें । आला शक्ति जेथें सप्तशृंगा ॥९॥
अरुणा वरुणा प्राची गोदावरी । ते कपाळेश्वरी पूजा केली ॥१०॥
पुढें ज्योतिलिंग देखिलें त्र्यंबक । कुशावर्तीं उदक स्वीकारिलें ॥११॥
वंदूनिया गंगाद्वार सव्य ब्रह्मगिरि । मग भीमाशंकरी आनंदला ॥१२॥
देखोनियां भीमा आठवे पंढरी । विठठल अंतरीं पांडुरंग ॥१३॥
६
ऐसा नित्यानित्य चालतां सुपंथीं । पदोपदीं कीर्ति नामघोष ॥१॥
आला आळंकापुरीं इंद्रायणी-तीरीं । स्नानसंध्या करी देवपूजा ॥२॥
देखोनी सुब्राह्मण केलेंसे नमन । वंदिले चरण सिदोपंतीं ॥३॥
कोण तुमचा गांव आलेति कोठुन । काय अभिधान गमन कोठें ॥४॥
विठठलाचें नाम रामेश्वरी भाव । वृत्ति आपेगांव गोदातीरीं ॥५॥
मातापिता वृद्ध वसताती तेथें । द्वारकादि तीर्थें करुनी आलों ॥६॥
आजि धन्य भाग्य स्वामीचें आगमन । आश्रम पावन कीजे माझा ॥७॥
आणुनी मंदिरीं सारुनी भोजन । निद्रा करविली पूर्ण तया हातीं ॥८॥
तंव स्वप्न अवस्थेमाजी येउनि पंढरेनाथ । म्हणे कन्या सालंकृत द्यावी यासी ॥९॥
प्रातःकाळ जाला नित्यनेमु सारिला । मग नमस्कार केला सिदोंपतीं ॥१०॥
वंदोनियां चरण सांगितलें स्वप्न । कन्यापाणिग्रहण कीजे तुम्ही ॥११॥
हांसोनी उत्तर बोले पैं सारांशें । आज्ञा श्रीनिवासें केली नाहीं ॥१२॥
आजिचा सुदिन स्वस्थ करुनी मन । वंदिले चरण सिदोपंतीं ॥१३॥
ऐसे सुसंकल्प हेलावती मनीं । तुळसीवृंदावनीं निद्रा केली ॥१४॥
मग विश्वीं विश्वंभर व्यापुनियां स्थानीं । येऊनियां स्वप्नीं काय बोले ॥१५॥
भक्ति आणि ज्ञान वैराग्य आवडी । हे वसती उघडी तुझ्या अंगीं ॥१६॥
मूर्तिमंत चारी जन्मती इच्या उदरीं । म्हणोनि स्वीकारी आज्ञा माझी ॥१७॥
उठोनि विठठलें स्वप्न सांगितलें । हरुषें वंदिले सिदोपंतीं ॥१८॥
पाचारोनी जोशी घटितार्थ पाहिले । गुण उतरले छत्तीसही ॥१९॥
निर्धारिलें लग्न मिळाले ब्राह्मण । निर्विघ्न पूजन केलें आधीं ॥२०॥
देवकप्रतिष्ठा ब्राह्मणपूजन । घटिका जाली पूर्ण म्हणती द्विज ॥२१॥
कुळदेवस्मरण म्हणती सावधान । उभयतांचें मन पांडुरंगीं ॥२२॥
जालें पाणिग्रहण विधीसी अर्पण । वंदिले चरण सिदोपंतीं ॥२३॥
पांडुरंगक्षेत्रा मिळालीसे यात्रा । आले पंढरपुरा भक्तराज ॥२४॥
गरुडटके पताका मृदंग वाजती । वैष्णव गर्जती जयजयकारें ॥२५॥
गरुडपारीं उभे दाटी वैष्णवांची । उपमा वैकुंठीची पंढरीये ॥२६॥
राऊळभीतरीं प्रवेशलीं दोघें । देखियेले उभे पांडुरंग ॥२७॥
कायावाचामनीं पारुषले नयनीं । मस्तक चरणीं ठेवियेला ॥२८॥
विठठलासी ध्यान रामकृष्णमाळा । ह्रदयीं जिव्हाळा श्रीमूर्ति राया ॥२९॥
७
आश्रमविधि करावें पालन । परी विठठलाचें मन तीर्थाटणीं ॥१॥
जाणोनि अंतर म्हणे सिदोपंत । आपुले मनींचा हेत पुरता कीजे ॥२॥
जावें हो सत्वर यावें स्वस्ति क्षेम । पावले आश्रम सिदोपंत ॥३॥
विठठलें गमन केलें तेव्हां तीर्थाटणा । मुख्य मुख्य स्थाना अनुक्रमें ॥४॥
८
पाहिलें श्रीशैल्य निवृत्ती संगम । पापराशी भस्म देखतांचि ॥१॥
चालतां सुपंथीं ह्रदयीं विठठलमूर्ति । मुखीं नामकीर्ति गात चाले ॥२॥
अभोळ नरसिंह श्रीवासुदेव । सकळ देवराव व्यंकटाद्री ॥३॥
गेला अरुणाचळा करुनी नमन । चिदंबरा दक्षिणमथुरा कावेरी ॥४॥
वंदुनी जनार्दन गेला रामेश्वरा । हेत जाला पुरा विठठलाचा ॥५॥
९
जानकीची शुद्धी करावया गेला । हनुमंत उडाला जेथुनियां ॥१॥
आनंदभरित चालतसे मार्ग । ह्रदयीं अनुराग आवडीचा ॥२॥
तें स्थान वंदुनी पावला गोकर्ण । हाटकेश्वरीं स्नान करुनियां ॥३॥
आला कोल्हापुरा लक्षुमी दरुषणा । पंचगंगे स्नान करुनियां ॥४॥
प्रीतीचा संगम देखिला कर्हाटकीं । थोर जाला सुखी अंतरींचा ॥५॥
कृष्णोचिया स्नानें कृतकृत्य जाला । माहुली देखिला संगम डोळां ॥६॥
आला आळंकावती हर्षयुक्त चित्तीम । दिधलें सिदोपंतीं आलिंगन ॥७॥
विठठल अंतरीं मातापिता पाहावी । आज्ञा म्हणे द्यावी सिदोपंतां ॥८॥
१०
कुटुंबासहित जावें जी दरुषणा । केलीसे प्रार्थना सिदोपंतीं ॥१॥
सहज बोळवण संतांचें दरुषण । म्हण केलें मान्य शीघ्र चला ॥२॥
मग विठठलानें मातापिता वंदियेली । स्थिति सांगितली सिदोपंतीं ॥३॥
चिरंजीव नांदा म्हणती मातापिता । सुख आमुच्या चित्ता थोर जालें ॥४॥
वस्त्रें अलंकार सिदोपंता दिधले । मग गमन केलें सिदोपंतीं ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : January 02, 2015
TOP