श्रीज्ञानेश्वरांची आदि - अभंग २१ ते ३१

संत नामदेवांनी संतांचा महिमा इतका रसाळ वर्णन केला आहे, तो एकमात्र त्यांनीच करू जाणे!


२१
हेंचि आम्हां श्रेष्ठ बोलिले परनिष्ठ । असतां दुर्घट परी सेव्य ॥१॥
पांडवांचें कुळ शोधितां निर्मळ । कुंड जार गोळ बुद्धिकांसी ॥२॥
भक्ति हे सरती जाति न सरती । ऐसी आत्मस्थिती स्वसंवेद्य ॥३॥
दुर्वास वसिष्ठ अगस्ति गौतम । हे ऋषि उत्तम कुळींचे कैसे ॥४॥
व्यास आणि वाल्मिक कोण कुळ तयांचें । तैसेंचि आमुचें सोपान म्हणे ॥५॥

२२
देऊनियां पत्र निघालीं सत्वर । करुनि नमस्कार सकळांसी ॥१॥
जाउनी राहिले भोगावती तीरीं । तीर्थयात्रा बरी संपादिली ॥२॥
अनाथें पतितें शरणागत दीनें । अनाथ करणेम कृपादृष्टि ॥३॥
केली ब्रह्मसभा बैसले वरिष्ठ । होतें तैसें स्पष्ट निवेदिलें ॥४॥
पत्र वाचुनियां सकळां जालें श्रुत । संन्याशाचे पुत्र कळों आलें ॥५॥
नाहीं प्रायश्चित्त उभयंता कुळभ्रष्ट । बोलियेले श्रेष्ठ पूर्वापार ॥६॥
या एक उपाय असे शास्त्रमतेम । अनन्यभक्तीतें अनुसरावें ॥७॥
तीव्र अनुतापें करावेम भजन । गो खर आणि श्वान वंदुनियां ॥८॥
वंदावें अंत्यज ब्रह्मभावनेसीं । ऐसे पद्धतीसी बोलियेले ॥९॥
ऐकोनि निवृत्ती संतोषला चित्तीं । धन्य तुमची वदंती तीर्थरुप ॥१०॥
ज्ञानदेव म्हणे सांगाल तें मान्य ।मुक्ताई सोपान आनंदिलीं ॥११॥

२३
ऐकोनि ऐसीं नांवें हासिन्नले ब्राह्मण । नामांचें अभिधान सांगा आम्हां ॥१॥
येक म्हणती नामापाशीं काय आहे । ज्ञाना वाहात आहे पखालीसी ॥२॥
ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा । वेगळिक आम्हां तया नाहीं ॥३॥
मारिती आसुड म्हैशियाचे पाठीं । तोचि वळ उठे ज्ञानदेवा ॥४॥
म्हणती द्विजवर अहो ज्ञानदेवा । यापासोनी उच्चारावा वेदध्वनी ॥५॥
तरीच तुमची समता आम्हां येईल कळों । नाहीं तरी बोलों नका कांहीं ॥६॥
ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद । ओंकार मूळशब्द प्रणवाचा ॥७॥

२४
मग वेदाचा आरंभ करिता जाला पशू । विधी उपन्यासू सांग पढे ॥१॥
करिती आश्चिर्य सकळ द्विजवर । हे तीहीं अवतार तीन देवांचे ॥२॥
आदिमाया मुक्ताई मुक्तपणें अवतरली । आम्हांपासुनि जाली थोर चुकी ॥३॥
कर्मठ अभिमानें ठकलों देहबुद्धि । गोवियेलों विधि निषेधाच्या ॥४॥
नेणों भक्तिज्ञान वैराग्याचा लेश । कुटुंबाचे दास होऊनि ठेलों ॥५॥
आणिकांसी सांगों आपण नाचरों । लटिकेच हुंबरों प्रतिष्ठेसी ॥६॥
धन्य यांचा वंश धन्य यांचे कुळ । धन्य पुण्यशील अवतार हे ॥७॥
सकळ द्विजवर करिती नमस्कार । आनंदें जयजयकार करिताती ॥८॥
ज्ञानदेव म्हणे तुमच्या पायांचा महिमा । सामर्थ्य हे आम्हां अंगीं नाहीं ॥९॥

२५
तुम्हीं वेदरुप भूदेव प्रत्यक्ष । दरुषणेंचि मोक्ष जडमूढा ॥१॥
सकळही तीर्थें तुमच्या वसती पायीं । तेथें आमुचे कायीं उरती दोष ॥२॥
धन्य दिवस आजी जालों कृतकृय । भेटलेती संतब्रह्मवृंद आम्हां ॥३॥
ज्ञानदेवा ध्यान ब्राह्मणाचे चरण । कलिमलछेदन निवृत्ति म्हणे ॥४॥

२६
जयाचें दरुषण होतांची दुरुनी । सर्व जाये पळोनी पाप ताप ॥१॥
तीर्थासी पावन कलिमलछेदन । देवाचें कल्याण जयाचेंनी ॥२॥
ते पाय सादृश्य देखिले आजि दृष्टी । याग सहस्त्र कोटी न तुकती ॥३॥
जयांच्या ह्रदयीं वेदांचा निवास । शास्त्रें रहिवास केला होय ॥४॥
जयांच्या वचनें देवपितर तृप्त । स्वाहा स्वधा होत ज्यांच्या मुखें ॥५॥
जोडोनियां कर विनवितो सोपान । निश्चयें वचन द्यावें आम्हां ॥६॥
शेष उच्छिष्टा करावेम विभागी । बटुपणालागी अधिकारी ॥७॥
अध्यात्मग्रंथ पाहती पैठणीं । गीतासंबोधिनी जवळी असे ॥८॥
भोगावतीं स्नान कालिका दरुषण । वेदांत व्याख्यान परिमिती ॥९॥
धन्य हा सोपान धन्य ज्ञानदेव । धन्य निवृत्तिराय ब्रह्मरुप ॥१०॥
सांगती पुराण रात्रीं हरिकीर्तन । पैठणींचे जन वेधियेले ॥११॥
तव कव्ययज्ञ जाला गृहस्थाचे घरीं । पितर मंत्रोच्चारीं आव्हानिले ॥१२॥
अवघे द्विजवर म्हणती धन्य धन्य । यासारिखे ब्राह्मण नाहीं कोणी ॥१३॥
उपनिष‌दभाग पढिन्नलों वेदांत । परि हें सामर्थ्य नाहीं आम्हां ॥१४॥
नाहीं ऐकिलें ना कोठें वर्तलें । सृष्टी तेंचि आजि दृष्टीं दाखविले ॥१५॥
पशुमुर्खे वेद दृश्य इतर लोक । थोर हें कवतुक दाखविलें ॥१६॥
मिळोनि समस्त सोडियेलें शास्त्र । विचारोनी पत्र लिहियेलें ॥१७॥
हें परलोकीचें तारु देवत्रय कोणी । प्रायश्चित्त काय द्यावें कोणी ॥१८॥
लिहोनियां पत्र दिधलें तया हातीं । सम्स्तांसी निवृत्ति नमस्कारिलें ॥१९॥

२७
घेऊनियां पत्र केली प्रदक्षिणा । साष्टांगी ब्राह्मणां नमन केलें ॥१॥
मागोनियां म्हैसा नेवाशासी आले । प्राकृत पैं केली गीतादेवी ॥२॥
निवृत्ती म्हणती ऐकें ज्ञानदेवा । अनुभव करावा अमृता ऐसा ॥३॥
आदिशक्तिमाता वंदुनियां म्हाळसा । मग तेथुनी सरिसा चालियेले ॥४॥
क्रमिताती मार्ग अनुभव कुशळ । हरिनाम सकळ कवित्वकळा ॥५॥
येउनी उतरली आळाचिये वनीं । पशु तये स्थानीं शांत जाला ॥६॥
करुनी तया पूजन सेंदूर तेलें लेपून । आळंकावती निजस्थान प्रवेशली ॥७॥
साने थोर सकळ तेथील निवासी । निवृत्ति तयांसी नमस्कारिलें ॥८॥

२८
तिन्ही देव जैसे परब्रह्मींचे ठसे । जगीं सूर्य जैसे प्रकाशले ॥१॥
धन्य तो निवृत्ति धन्य तो सोपान । धन्य तो निधान ज्ञानदेव ॥२॥
उपजतांचि ज्ञानी हें वर्म जाणौनि । आले लोटांगणीं चांगदेव ॥३॥
प्रत्यक्ष पैठणीं भटीम केला वाद । बोलविला वेद म्हैसीपुत्रा ॥४॥
संस्कृताच्या सोडोनियां गांठी । केलीसे मराठी गीता देवी ॥५॥
नामा म्हणे सर्व सुख लाहिजे । एक वेळां जाईजे अळकावती ॥६॥

२९
गीता गीता गीता त्रिवार बोलतां । पाप जाय तत्त्वतां मोक्ष जोडे ॥१॥
गीतेचा महिमा बोलवेना वाचे । बंधने जीवाची दूर होती ॥२॥
येक येक अक्षर कोटी अश्वमेध । फळ हें प्रसिद्ध पुराणोक्त ॥३॥
येकचि तो श्लोक वाचिलिया नेमें । अंतीं परमधाम प्राप्त होय ॥४॥
नामा म्हणे गीता संपूर्ण वाचितां । लाभ त्याच्या हाता बोलवेना ॥५॥

३०
गीता गीता म्हणतां पाप होय नाश । कैवल्यही त्यास प्राप्त होय ॥१॥
गीतेचीं अक्षरें पडतां श्रवणीं । जाय तत्क्षणीं भवभय ॥२॥
येका येका श्लोकीं कोटी अश्वमेध । पुण्यही अगाध म्हणताम गीता ॥३॥
नामा म्हणे गीता नित्य जो वाचिता । तयाच्या सुकृता पार नाहीं ॥४॥

३१
ज्ञानराज माझी योग्यांची माउली । जेणें निगमवल्लि प्रगट केली ॥१॥
गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी । ब्रह्मानंदलहरी प्रगट केली ॥२॥
अध्यात्म विद्येचें दाविलेंसें रुप । चैतन्याचा दीप उजळिला ॥३॥
छपन्न भाषेचा केलासे गौरव । भवार्नवीं नाव उभारिली ॥४॥
श्रवनाचे मिषें बैसावें येउनी । सामराज्य भुवनीं सुखी नांदे ॥५॥
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओवी अनुभवावी ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP