अभंग ज्ञानेश्वरी - श्रीज्ञानेश्वरी नित्यपाठ
स्वामी स्वरूपानंद ह्या थोर सत्पुरूषाने ‘ अभंग ज्ञानेश्वरी ‘ नामक अत्यंत सुबोध, नितांत सुंदर आणि परम रसाळ असा अभंगात्मक ग्रंथ लिहीला.
। श्रीगणेशाय नमः ।
ॐ नमो जी आद्या । वेदप्रतिपाद्या ।
जय जय स्वसंवेद्या । आत्मरुपा ॥१॥
देवा तूं चि गणेश । सकलमतिप्रकाश ।
म्हणे निवृत्तिदास । अवधारिजो ॥२॥
आतां अभिनववाग्विलासिनी । जे चातुर्यार्थकलाकामिनी ।
ते श्रीशारदा विश्वमोहिनी । नमिली मियां ॥३॥
मज हृदयीं सद्गुरु । जेणें तारिलों हा संसारपूरु ।
म्हणौनि विशेषें अत्यादरु । विवेकावरी ॥४॥
या उपाधिमाजीं गुप्त । चैतन्य असे सर्वगत ।
तें तत्त्वज्ञ संत । स्वीकारिती ॥५॥
उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे ।
हें घटिकायंत्र तैसें । परिभ्रमे गा ॥६॥
जैसें मार्गे चि चालतां । अपावो न पवे सर्वथा ।
कां दीपाधारें वर्ततां । नाडळिजे ॥७॥
तयापरी पार्था । स्वधर्मे राहाटतां ।
सकळकामपूर्णता । सहजें होय ॥८॥
सुखीं संतोषा न यावें । दुःखीं विषादा न भजावें ।
आणि लाभालाभ न धरावे । मनामाजीं ॥९॥
आपणयां उचिता । स्वधर्मे राहाटतां ।
जें पावे तें निवांता । साहोनि जावें ॥१०॥
आम्ही समस्त हि विचारिलें । तंव ऐसें हें मना आलें ।
जे न सांडिजे तुवां आपुलें । विहित कर्म ॥११॥
परि कर्मफळीं असा न करावी । आणि कुकर्मी संगति न व्हावी ।
हे सत्क्रिया चि आचरावी । हेतुविण ॥१२॥
तूं योगयुक्त होउनि । फळाचा संग टाकुनि ।
मग अर्जुना चित्त देउनी । करीं कर्मे ॥१३॥
परि आदरिलें कर्म दैवें । जरी समाप्तीतें पावे ।
तरी विशेषें तेथ तोषावें । हें हि नको ॥१४॥
कीं निमित्तें कोणे एके । तें सिद्धी न वचतां ठाके ।
तरी तेथींचेनि अपरितोखें । क्षोभावें ना ॥१५॥
देखें जेतुलालें कर्म निपजे । तेतुलें आदिपुरुषीं अर्पिजे ।
तरी परिपूर्ण सहजें । जाहलें जाण ॥१६॥
म्हणोनि जें जें उचित । आणि अवसरेंकरुनि प्राप्त ।
तें कर्म हेतुरहित । आचरें तूं ॥१७॥
देखें अनुक्रमाधारें । स्वधर्म जो आचरे ।
तो मोक्ष तेणें व्यापारें । निश्चित पावे ॥१८॥
स्वधर्म जो बापा । तो नित्ययज्ञ जाण पां ।
म्हणोनि वर्ततां तेथ पापा । संचारु नाहीं ॥१९॥
हा निजधर्म जैं सांडे । आणि कुकर्मी रति घडे ।
तैं चि बंघ पडे । सांसारिक ॥२०॥
म्हणोनि स्वधर्मानुष्ठान । तें अखंड यज्ञयाजन ।
जो करी तया बंधन । कहीं चि न घडे ॥२१॥
अगा जया जें विहित । तें ईश्वराचें मनोगत ।
म्हणौनि केलिया निभ्रांत । सांपडे चि तो ॥२२॥
तें विहित कर्म पांडवा । आपुला अनन्यं वोलावा ।
आणि हें चि परम सेवा । मज सर्वात्मकाची ॥२३॥
तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्मकुसुमांची वीरा ।
पूजा केली होय अपारा । तोषालागीं ॥२४॥
तें क्रियाजात आघवें । जें जैसें निपजेल स्वभावें ।
तें भावना करोनि करावें । माझिया मोहरा ॥२५॥
आणि हें कर्म मी कर्ता । कां आचरेन या अर्था ।
ऐसा अभिमान झणें चित्ता । रिघों देसी ॥२६॥
तुवां शरीरपरा नोहावें । कामनाजात सांडावें ।
मग अवसरोचित भोगावे । भोग सकळ ॥२७॥
तूं मानसा नियम करीं । निश्चळु होय अंतरीं ।
मग कर्मेंद्रियें व्यापारीं । वर्ततु सुखें ॥२८॥
परिस पां सव्यसाची । मूर्ति लाहोनि देहाची ।
खंती करिती कर्माची । ते गांवढे गा ॥२९॥
देख पां जनकादिक । कर्मजात अशेख ।
न सांडितां, मोक्षसुख । पावते जाहले ॥३०॥
देखें प्राप्तार्थ जाहले । जे निष्कामता पावले ।
तयां हि कर्तव्य असे उरलें । लोकांलागीं ॥३१॥
मार्गी अंधासरिसा । पुढें देखणा हि चाले जैसा ।
अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा । आचरोनि ॥३२॥
एथ वडील जें जें करिती । तया नाम धर्म ठेविती ।
तें चि येर अनुष्ठिती । सामान्य सकळ ॥३३॥
हें ऐसें असे स्वभावें । म्हणोनि कर्म न संडावें ।
विशेषें आचरावें । लागे संतीं ॥३४॥
दीपाचेनि प्रकाशें । गृहींचे व्यापार जैसे ।
देहीं कर्मजात तैसें । योगयुक्ता ॥३५॥
तो कर्मे करी सकळें । परी कर्मबंधा नाकळे ।
जैसें न सिंपे जळीं जळें । पद्मपत्र ॥३६॥
तया हि देह एक कीर आथी । लौकिकीं सुखदुःखी तयातें म्हणती ।
परे आम्हातें ऐसी प्रतीति । परब्रह्म चि हा ॥३७॥
देह तरी वरिचिलीकडे । आपुलिया परी हिंडे ।
परि बैसका न मोडे । मानसींची ॥३८॥
अर्जुना समत्व चित्ताचें । तें चि सार जाण योगाचें ।
जेथ मन आणि बुद्धीचें । ऐक्य आथी ॥३९॥
देखें अखंडित प्रसन्नता । आथी जेथ चित्ता ।
तेथ रिघणें नाहीं समस्तां । संसारदुःखा ॥४०॥
जैसा अमृताचा निर्झरु । प्रसवे जयाचा जठरु ।
तया क्षुधेतृषेचा अडदरु । कहीं चि नाहीं ॥४१॥
तैसें हृदय प्रसन्न होये । तरी दुःख कैचें कें आहे ।
तेथ आपैसी बुद्धि राहे । परमात्मरुपीं ॥४२॥
जैसा निर्वातींचा दीपु । सर्वथा नेणे कंपु ।
तैसा स्थिरबुद्धि स्वस्वरुपु । योगयुक्त ॥४३॥
जया पुरुषाच्या ठायीं । कर्माचा तरी खेदु नाहीं ।
आणि फलापेक्षा कंहीं । संचरेना ॥४४॥
आणि हें कर्म मी करीन । अथवा आदरिलें सिद्धी नेईन ।
येणें संकल्पेंहि जयाचें मन । विटाळे ना ॥४५॥
ज्ञानाग्नीचेनि मुखें । जेणें जाळिलीं कर्मे अशेखें ।
तो परब्रह्मचि मनुष्यवेखें । वोळख तूं ॥४६॥
तें ज्ञान पैं गा बरवें । जरी मनीं आथी जाणावें ।
तरी संतां यां भजावे । सर्वस्वेसीं ॥४७॥
जे ज्ञानाचा कुरुठा । तेथ सेवा हा दारवंटा ।
तो स्वाधीन करीं सुभटा । वोळगोनि ॥४८॥
तरी तनुमनुजीवें । चरणासी लागावें ।
आणि अगर्वता करावें । दास्य सकळ ॥४९॥
मग अपेक्षित जें आपुलें । तेही सांगती पुसिलें ।
जेणें अंतःकरण बोधलें । संकल्पा न ये ॥५०॥
ते वेळीं आपणपेयां सहितें । इयें अशेषेंहि भूतें ।
माझ्या स्वरुपीं अखंडितें । देखसी तूं ॥५१॥
ऐसें ज्ञानप्रकाशें पाहेल । तैं मोहांधकारु जाईल ।
जैं गुरुकृपा होईल । पार्था गा ॥५२॥
जरी कल्मषाचा आगरु । तूं भ्रांतीचा सागरु ।
व्यामोहाचा डोंगरु । होऊनि अससी ॥५३॥
तरी ज्ञानशक्तिचेनि पाडें । हें आघवें चि गा थोकडें ।
ऐसें सामर्थ्य असे चोखडें । ज्ञानीं इये ॥५४॥
मोटकें गुरुमुखें उदैजत दिसे । हृदयीं स्वयंभचि असे ।
प्रत्यक्ष फावों लागे तैसें । आपैसयाचि ॥५५॥
सांगें अग्निस्तव धूम होये । तिये धूमीं काय अग्नि आहे ।
तैसा विकारु हा मी नोहें । जरि विकारला असे ॥५६॥
देह तंव पांचाचें जालें । हें कर्माचे गुणीं गुंथलें ।
भवंतसे चाकीं सूदलें । जन्ममृत्यूच्या ॥५७॥
हें काळानळाच्या तोंडीं । घातली लोणियाची उंडी ।
माशी पांख पाखडी । तंव हें सरे ॥५८॥
या देहाची हे दशा । आणि आत्मा तो एथ ऐसा ।
पैं नित्य सिद्ध आपैसा । अनादिपणें ॥५९॥
सकळ ना निष्कळु । अक्रिय ना क्रियाशीळु ।
कृश ना स्थूळु । निर्गुणपणें ॥६०॥
आनंद ना निरानंदु । एक ना विविधु ।
मुक्त ना बद्धु । आत्मपणें ॥६१॥
तें परम तत्त्व पार्था । होती ते सर्वथा ।
जे आत्मानात्मव्यवस्था । राजहंस ॥६२॥
ऐसेनि जे निजज्ञानी । खेळत सुखें त्रिभुवनीं ।
जगद्रूपा मनीं । सांठऊनि मातें ॥६३॥
हें विश्वचि माझें घर । ऐसी मति जयाची स्थिर ।
किंबहुना चराचर । आपण जाहला ॥६४॥
मग याहीवरी पार्था । माझिया भजनीं आस्था ।
तरी तयातें मी माथां । मुकुट करीं ॥६५॥
तो मी वैकुंठीं नसें । वेळु एक भानुबिंबीं दिसें ।
वरी योगियांचींही मानसें । उमरडोनि जाय ॥६६॥
परि तयांपाशीं पांडवा । मी हारपला गिंवसावा ।
जेथ नामघोषु बरवा । करिती माझा ॥६७॥
कृष्ण विष्णु हरि गोविंद । या नामाचे निखळ प्रबंध ।
माजीं आत्मचर्चा विशद । उदंड गाती ॥६८॥
जयांचिये वाचे माझे आलाप । दृष्टी भोगी माझें चि रुप ।
जयांचें मन संकल्प । माझा चि वाहे ॥६९॥
माझिया कीर्तीविण । जयांचे रिते नाहीं श्रवण ।
जयां सर्वागीं भूषण । माझी सेवा ॥७०॥
ते पापयोनी हि होतु का । ते श्रुताधीतहि न होतु का ।
परी मजसी तुकितां तुका । तुटी नाहीं ॥७१॥
तें चि भलतेणें भावें । मन मज आंतु येतें होआवें ।
आलें तरी आघवे । मागील वावो ॥७२॥
जैसें तंव चि वहाळ । जंव न पवती गंगाजळ ।
मग होऊन ठाकती केवळ । गंगारुप ॥७३॥
तैसें क्षत्री वैश्य स्त्रिया । कां शूद्र अंत्यजादि इया ।
जाती तंव चि वेगळालिया जंव । न पवती मातें ॥७४॥
यालागीं पापयोनीहि अर्जुना । का वैश्य शूद्र अंगना ।
मातें भजतां सदना । माझिया येती ॥७५॥
पैं भक्ति एकी मी जाणें । तेथ सानें थोर न म्हणें ।
आम्ही भावाचे पाहुणे । भलतेया ॥७६॥
येर पत्र पुष्प फळ । हें भजावया मिस केवळ ।
वांचूनि आमुचा लाग निष्कळ । भक्तितत्त्व ॥७७॥
मग भूतें हे भाष विसरला । जे दिठी मी चि आहें सूदला ।
म्हणौनि निर्वैर जाहला । सर्वत्र भजे ॥७८॥
हें समस्तही श्रीवासुदेव । ऐसा प्रतीतिरसाचा वोतला भाव ।
म्हणौनि भक्तांमाजीं राव । आणि ज्ञानिया तो चि ॥७९॥
तूं मन हें मीचि करीं । माझिया भजनीं प्रेम धरीं ।
सर्वत्र नमस्कारीं । मज एकातें ॥८०॥
माझेनि अनुसंधानें देख । संकल्पु जाळणें निःशेख ।
मद्याजी चोख । याचि नांव ॥८१॥
ऐसा मियां आथिला होसी । तेथ माझियाचि स्वरुपा पावसी ।
हें अंतःकरणीचें तुजपासीं । बोलिजत असें ॥८२॥
तूं मन बुद्धि साचेंसी । जरी माझिया स्वरुपीं अर्पिसी ।
तरी मातें चि गा पावसी । हे माझी भाक ॥८३॥
अथवा हें चित्त । मनबुद्धीसहित ।
माझ्या हातीं अचुंबित । न शकसी देवों ॥८४॥
तरी गा ऐसें करीं । यया आठां पहारांमाझारीं ।
मोटकें निमिषभरी । देतु जाय ॥८५॥
मग जें जें का निमिख । देखेल माझें सुख ।
तेतुलें अरोचक । विषयीं घेईल ॥८६॥
पुनवेहूनि जैसें । शशिबिंब दिसेंदिसें ।
हारपत अंवसे । नाहीं चि होय ॥८७॥
तैसें भोगाआंतूनि निगतां । चित्त मजमाजीं रिगतां ।
हळूहळू पंडुसुता । मीचि होईल ॥८८॥
म्हणौनि अभ्यासासी कांहीं । सर्वथा दुष्कर नाहीं ।
यालागिं माझ्या ठायीं । अभ्यासें मीळ ॥८९॥
कां जें यया मनाचें एक निकें । जें देखिले गोडीचिया ठाया सुके ।
म्हणौनि अनुभवसुखचि कवतिकें । दावीत जाइजे ॥९०॥
बळियें इंद्रियें येती मना । मन एकवटे पवना ।
पवन सहजें गगना । मिळोंचि लागे ॥९१॥
ऐसें नेणों काय आपैसें । तयातेंचि कीजे अभ्यासें ।
समाधि घर पुसे । मानसाचें ॥९२॥
ऐसा जो कामक्रोधलोभां । झाडी करुनि ठाके उभा ।
तो चि येवढिया लाभा । गोसावी होय ॥९३॥
पाहें पां ॐ सत्सत् ऐसें । हें बोलणें तेथ नेतसे ।
जेथूनि का हें प्रकाशे । दृश्यजात ॥९४॥
सुवर्णमणि सोनया । ये कल्लोळु जैसा पाणिया ।
तैसा मज धनंजया । शरण ये तूं ॥९५॥
म्हणौनि मी होऊनि मातें । सेवणें आहे आयितें ।
तें करीं हाता येतें । ज्ञानें येणें ॥९६॥
यालागीं सुमनु आणि शुद्धमति । जो अनिंदकु अनन्यगति ।
पैं गा गौप्यहि परी तयाप्रति । चावळिजे सुखें ॥९७॥
तरी प्रस्तुत आतां गुणीं इहीं । तूं वांचून आणिक नाहीं ।
म्हणौनि गुज तरी तुझ्या ठायीं । लपवूं नये ॥९८॥
ते हे मंत्ररहस्य गीता । मेळवी जो माझिया भक्ता ।
अनन्यजीवना माता । बाळका जैसी ॥९९॥
तैसी भक्तां गीतसी । भेटी करी जो आदरेंसी ।
तो देहापाठीं मजसीं । येकचि होय ॥१००॥
ऐसें सर्वरुपरुपसें । सर्वदृष्टिडोळसें ।
सर्वदेशनिवासें । बोलिलें श्रीकृष्णें ॥१०१॥
हें शब्देंविण संवादिजे । इंद्रियां नेणतां भोगिजे ।
बोलाआदि झोंबिजे । प्रेमेयासी ॥१०२॥
जें अपेक्षिजे विरक्तीं । सदा अनुभविजे संतीं ।
सोऽहंभावें पारंगतीं । रमिजे जेथ ॥१०३॥
हें गीतानाम विख्यात । सर्व वाङ्मयाचें मथित ।
आत्मा जेणें हस्तगत । रत्न होय ॥१०४॥
वत्साचेनि वोरसें । दुभतें होय घरोद्देशें ।
जालें पांडवाचेनि मिषें । जगदुद्धरण ॥१०५॥
आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनि मज द्यावें । पसायदान ॥१०६॥
जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मी रति वाढो ।
भूतां परस्परें पडो । मैत्र जीवाचें ॥१०७॥
तेथ म्हणे श्रीविश्वेशरावो । हा होईल दानपसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥१०८॥
भरोनि सद्भावाची अंजुळी । मियां वोवियाफुलें मोकळीं ।
अर्पिलीं अंघ्रियुगुलीं । विश्वरुपाच्या ॥१०९॥
इति श्री स्वामी स्वरुपानंदसंपादितं श्रीभावार्थदीपिका-सार-स्तोत्रं संपूर्णम् ।
हरये नमः । हरये नमः । हरये नमः । श्रीकृष्णार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : February 13, 2012
TOP