अभंग ज्ञानेश्वरी - गुरु-परंपरा
स्वामी स्वरूपानंद ह्या थोर सत्पुरूषाने ‘ अभंग ज्ञानेश्वरी ‘ नामक अत्यंत सुबोध, नितांत सुंदर आणि परम रसाळ असा अभंगात्मक ग्रंथ लिहीला.
आदिनाथ सिद्ध आदिगुरु थोर ।
त्यासी नमस्कार भक्तिभावें ॥१॥
तया चि पासोनि शिव-शक्ति-बीज ।
लाधलें सहज मत्स्येंद्रातें ॥२॥
मत्स्येंद्रानें दिलें गोरक्षालागोनि ।
गोरक्षें गहिनी धन्य केला ॥३॥
गहिनीनाथें बोध केला निवृत्तीसी ।
निवृत्ति उपदेशी ज्ञानदेवा ॥४॥
ज्ञानदेव-शिष्य देवचूडामणि ।
पुढें झाले मुनि गुंडाख्यादि ॥५॥
रामचंद्र महा-देव रामचंद्र ।
प्रसिद्ध मुनींद्र विश्वनाथ ॥६॥
योग-सार ऐसें परंपराप्राप्त ।
सद्गुरु गणनाथ देई मज ॥७॥
स्वामी म्हणे झालें कृतार्थ जीवन ।
सद्गुरु-चरण उपासितां ॥८॥
अपूर्व नवलाव अनुभवावा !
(फलश्रुति)
श्रीज्ञानेश्वरी ग्रंथ गहन ।
गुरुपुत्रांसी सुगम सोपान ।
भावें घडतां श्रवणमनन ।
लाभे समाधान अखंडित ॥१॥
उपासनामार्ग सांपडे ।
योगसार हाता चढे ।
उघडती ज्ञानाचीं कवाडें ।
सहज घडे निष्कामकर्म ॥२॥
होवोनि अंतरंग अधिकारी ।
भावें अवलोकितां ज्ञानेश्वरी ।
साक्षात् प्रकटे भगवान् श्रीहरि ।
स्वयें उद्धरी निजभक्तां ॥३॥
नित्य अंतरीं ज्ञानदेव ।
सर्वा भूतीं भगवद्भाव ।
देव-भक्तां एक चि ठाव ।
अपूर्व नवलाव अनुभवावा ॥४॥
। हरिः ॐ तत् सत् सोऽहं हंसः ।
N/A
References : N/A
Last Updated : February 13, 2012
TOP