आदिपर्व - बकासुरवध पूर्वार्ध

मयूर भरत्सार काव्यात महाभारतातील प्रसंगांचे अति सुंदर वर्णन केलेले आहे.


स्कंधी पृथेसि वाहूनि लंघुनि मत्स्यादि देश दूरवर ।
गेले तापसवेश स्वीकारुनि पांडुपुत्र शूरवर ॥१॥
त्या व्यसनांत निवविला दर्शन देवूनि तापह व्यासें ।
जो चिंती साधुजनी संपत्तिसदा, न ताप, हव्यासें ॥२॥
चिंतामणि अघना जें, धन्वंतरि जें गदाकुंळा देतो ।
भेटोनि अकस्मात् सुख तें त्या कुरुच्या तदा कुळा देतो ॥३॥
पौत्रांसि ह्नणे, ' मज हें कळलें होतें परंतु जळधीते ।
मिळतां बळें नदीतें फिरविल कोणी बळी न खळधीतें ॥४॥
प्रार्थावें नलगे मज, जें तुमचें हित करीन आधी तें ।
भेटेन एकचक्रानगरीत रहा, हरीन आधीतें ' ॥५॥
जातां देवूनि अभय निजजनकाचा पिता, महा ज्ञाते ।
त्याचि नगरी द्विजगृही होते पाळुनि पितामहाज्ञा ते ॥६॥
सिद्धान्न मातृहस्ती देती ते वरुनि वृत्ति माधुकरी ।
भीमासि अर्घ देती; अर्धाचे पांच भाग साधु करी ॥७॥
होते कांही काळ स्वीकारुनि भैक्ष्यवृत्तिला मुदित ।
तों कुती परिसे त्या आश्रयदब्राह्मंणालयी रुदित ॥८॥
भीमासि ह्नणे, ' रडतो दुःखें सकुटुंब विप्र बापा ! हें ।
मज बहु दुःसह झालें; आलें नेत्रासि अश्रु बा ! पाहें ॥९॥
आह्मी पक्षी, हें गृहनीड, धरादेव आश्रयागम हा ।
दुःख हरुनि करावी प्रत्युपकृति होय हाचि याग महा ' ॥१०॥
भीम ह्नणे, ' शोध करी जा, स्वमुखें विप्रनायका पूस ।
वारीन दुःख सर्वहि, दहना अतिभार काय कापूस ? ॥११॥
जाय द्विजाकडे ती गाय जसी वासराकडे मोहें ।
करितां विलाप, बोलत होता निजदुःख, तेधवां तो हें ॥१२॥
' जाये ! वदलीस परस्थळगमन विचार सर्वथा राहो ।
माहेर येथ आहे, वोळखिती लोक सर्व, थारा हो ॥१३॥
गेलों असतों तरि कां पडतें हें प्राणसंकट प्रमदे ! ।
स्वकुटुंबव्यसन जसें देतें न तसें बुधा विष भ्रम दे ॥१४॥
जरि दान तुझें द्यावें कांते ! मज भासतें तसें तरि तें ।
सिधूदरीं विकावें स्वहितार्थ तितीर्षुनें जसें तरितें ॥१५॥
पुत्रचि अधिक, न कन्या, अन्यास गमे, मला न लोभ्याला ।
नयनयुगांतुनि एकहि द्याया स्वप्नी न कोण तो भ्याला ? ॥१६॥
देतों निजर्वपु परि तूं भीरु ! कसी साहसील विरहातें ? ।
स्वर्गीहि दुःसहचि जें ह्नणसील मज स्मरोनि चिर ' हा ' तें ॥१७॥
प्राणांचा त्याग बरा, तुमचा न बरा, कसा न तो पापी ? ।
कूपांत बळें अवळा घालुनि ठकवूनि दोर जो कापी ' ॥१८॥
तों ब्राह्मणी ह्नणे, ' हो ! कवि साधु तुह्मी करुं नका शोक
यन्मूल ' आपदथे ' तो शंकरसाचि आठवा श्लोक ॥१९॥
अजि ' आत्मानं सततं रक्षेद्दारैर्धनैरपि ' श्लोकी ।
तैंचि करा हो ! न बुडों द्या हो ! मज निजमतीसही शोकी ॥२०॥
पतिपूर्वी स्त्रीस मरण, तें लग्नाहूनि काय होऊन ? ।
न रहावेंचि सतीनें पळभरिहि विरुपकाय होऊन ॥२१॥
रक्षाल तुह्मीच मुलें, अबळा वाहील भार जीवा हे ।
रक्षील कशी आल्या नवपूरी भीरु फार जी वाहे ? ॥२२॥
जाईन मीच, राक्षस जरि करकर सर्व मानवां चावे ।
दैवें स्त्री ह्नणुनि, दया येतां, मत्प्राण कां न वांचावे ? ॥२३॥
मज भक्षीलचि तो तरि विधुरपणें सर्वथा नका राहूं ।
ती स्त्री मीच, ह्नणा जी ! मागें सारुनियां नकारा हूं ॥२४॥
ऐसें ह्नणतां स्त्रीच्या कंठी घालुनि मिठी ह्नणे, ' अयि ते ।
कथमेवमुक्तमदयं तदयं किमनुष्ठितिक्षमो दयिते ! ' ॥२५॥
परिसे असें पृथा जों तोचि ह्नणे त्यासि कन्यका, ' मातें ।
द्या, द्यायाचीच सुता, हे किमपि नयेचि अन्यकामातें ॥२६॥
आत्मा पुत्र, सखा स्त्री, कन्या चिंताचि सर्वकाळ, जिला ।
प्रसवोनि वाहति मनी श्रीमंतहि पितर सर्व काळजिला ॥२७॥
कन्या रक्ष्य तिघांतुनि एका तुज हो ह्नणेल कां टाकी ? ।
बापा ! कांट्यानेंचि प्राज्ञ सुखें काढिताति कांटा की ' ॥२८॥
ऐसें वदोनि कन्या रडवूनि रडे, तशांत जवळून ।
खवळूनि उठे बाळक बोले हस्तें तृणासि कवळून ॥२९॥
समजावुनि त्यांसि ह्नणे, ' ऐसें लाल्लिचलासि मालीन ।
कां ललतां आललतां पलेतां मी सागलांत तालीन ' ॥३०॥
हांसविली हर्षविली व्यसनार्त तिघेंहि बाळशब्दानें ।
अब्दानें ग्रीष्मदवाकुळ बहिकुळें जसीच अब्दानें ॥३१॥

N/A

References : N/A
Last Updated : May 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP