गेले धन्य कराया पंडूचे नदन द्रुपदराजा ।
तो गुरुहि जाय, समुचित पसराया नदनद्रु पदरा ज्या ॥१॥
राजसुतांसि रहाया त्या द्रुपदपुरी कुलाल दे शालो ।
काळगति पहा बुध हो ! बा एखादे भुलाल देशाला ॥२॥
सेवुनि भिक्षान्न सुखें रर्तं होते देवविप्रभजनांत, ।
कोण्हीहि न ओळखिले, झाले दाटूनि विप्रभ जनांत ॥३॥
बहु विप्र, बहु क्षितिपति, बहु मागर्ध सूत बंदिर्जन आले ।
कृष्णास्वयंवरोत्सवदर्शनभाग्येच्छु देवही झाले ॥४॥
वरबुद्धि अर्जुनीच स्थिर होती सर्वदा, परि पुरा जे ।
आले, ते आदरिले द्रुपदें पहिले जरि स्वरिपु राजे ॥५॥
झालें जतुगृहदोंहश्रवण, परि मना न साच वाटे तें ।
वांछितसिद्ध्यर्थ घरी तो राजा युक्तिच्याच वाटेतें ॥६॥
करवी लक्ष्य ' व्योमी पार्थासचि शक्य भेद त्याचा की, ।
चळचक्र तळी भेदनसाधन, तैं सूक्ष्म रंघ्र त्या चाकी ॥७॥
शर पांच मात्र, धनुही त्र्यंबकंकोदंडमित्र कठिणपणें ।
करवुनि ऐसें भिववी बहुतांच्याही मनास कठिण पणें ॥८॥
घोषविलें की, ' चढवुनि धनुला पांचा शरांत लक्षातें ।
भेदील जो कृती त्या माझी कन्या वरील दक्षातें ' ॥९॥
सर्व मिळाले रंगी विप्रनृपांही सुमच शोभविले ।
रंगी ते लोक तसे कमळवनी जेंवि भृग लोभविले ॥१०॥
बसले होते पांडव विप्रांच्या शिवमयी समाजांत ।
कोण न होतील तदाश्रिते शांत दया सुधासमा ज्यांत ? ॥११॥
रंगी धृष्टद्युम्नें धरुनि करी आणिली स्वसा रमणी ।
जाणों भुजगें प्रेक्षकजननंयनमनोहर स्वसार मणी ॥१२॥
तद्रूपें मोहे सुरजनहि, धरिल धैर्य तो कसा रंग ? ।
मूर्तिमती गीति गमे ती, भुलले तेहि लोकसारंग ॥१३॥
कर वळविला अजें जें विष्णुध्रृतस्त्रीस्वरुप कित्ता तें ।
चित्र तसेंचि उतरिलें चतुरें, वाटे कवींद्रचित्तातें ॥१४॥
रंगी धृष्टद्युम्न स्वभुज उभारुनि ह्नणे, ' अहो ! परिसा ।
भेदील लक्ष तो या मद्भगिनीला वरुनि हो हरिसी ॥१५॥
कृष्णोसे ह्नणे, ' वत्से ! दे माळा लक्षभेद करित्यातें ।
कुळशीलरुप सद्गुण असतील स्वानुरुप जरि त्यातें ' ॥१६॥
दुर्योधनादिकांची कन्यारत्नींच वेधली दृष्टी ।
जसि वृष्टि चातकाला, त्याला तसि ती विरंचिची सृष्टी ॥१७॥
कृष्णेकडे जनाची तसि दृष्टि, श्रीकडे जशी सृष्टी ।
भक्ताकडेचि हरिची दृष्टि, जसी वांसुराकडे गृष्टी ॥१८॥
बळदेवासि ह्नणे प्रभु, ' आर्या ! त्या ब्राह्मणांत तो धर्म ।
तो भीम, तो धनंजय, ते यम, म्यां वळखिले, नव्हे नर्म ' ॥१९॥
देशोदेशींचे नृप झटले, परि परशुरामसें चाप ।
न वळे, लवे भुजबळें, तत्ताडित बहुत पावले ताप ॥२०॥
तेव्हां स्वात्युत्सोंह त्दृष्टमना तात उष्णकर करुनी ।
रविसमवर्णे कर्णे चाप चढविलें क्षणांत करकरुनी ॥२१॥
स्वमनी पांडव ह्नणती, ' हा ! हा ! या दुष्कुळप्रसूतानें ।
नेलेंचि लक्ष्य भेटुनि सहकन्यारत्न यशहि सूतानें ' ॥२२॥
जों कर्ण ह्नणे, ' न शिवों देईन इला दुज्या नवरया मी ' ।
तोंचि ह्नणे ती कृष्णा, ' सूतमहं जातुचिन्न वरयामि ' ॥२३॥
कर्ण विगुण धनु टाकुनि पाहुनि रविला, चुरुनि हातातें ।
चित्ती ह्नणे, ' कशाला केला निर्माण पुत्न हा तातें ? ' ॥२४॥
शिशुपाल यत्न करि, परि बोले खमनांत चापदैवत, ' मी
न कठिन, तुला बुडवितें आठवुनि तुझेंचि पाप दैव तमी ॥२५॥
मागधराजसुत ह्नणे, ' कृष्णा होईल आजि मज्जाया ' ।
त्यासि ह्नणे चाप - लता, ' लज्जापंकीं तुह्मीहि मज्जा या ' ॥२६॥
शल्यहि पडला, झडला मद, न प्रकटूनि शक्तिला जे तें ।
कौतुक पाहत होते सांपडले तेच कवि न लाजेतें ॥२७॥
' न बुडो क्षत्रयश ' ह्नणुनि उठवी उत्साहदायि मन पार्था; ।
धर्महि म्हणे, ' असो गुरुलब्धा शिक्षा सदैव अनपार्था ' ॥२८॥
जैं धनुकडे निघे द्विजवृंदांतुनि विप्र एकला जाया ।
साधूंसि तोचि शिकवी साधूत्साहातिरेक लाजाया ॥२९॥
कोणी ह्नणति, ' निवारा, आह्मां क्षत्रियकृतोपहासाचें ।
पात्रत्व नवें द्याया सुचपळ बटु जोडितो पहा ! साचें ॥३०॥
किति ह्नणती, ' जाऊं द्या, होवुं न देईल कर्म कुत्सा हें; ।
पूर्वी श्रीराम जसा, उठलासे हा तसाचि उत्साहें ॥३१॥
प्याला अगस्त्य नामा ब्राह्मण निः शेष नदनंदीपा तें ।
विस्मरलां रामातें कां त्या भृगुवंशसदनदीपातें ? ॥३२॥
ब्रह्मतपः केलिगृह ब्राह्मण न करील कायहो ! बोला ? ।
' विजयोऽस्तु ' ह्नणा, चढला विप्राशीनें न कोण तो मोला ? ॥३३॥
नमिला आधी पार्थे विश्वप्रियसुत्दृदकृत्निम पिनाकी, ।
ह्नणती, ' यद्यश सेवुनि अमृतीं गोडी नसे किमपि ' नाकी ॥३४॥
मग हदयीं आठविला कुशळकर कुशेशयाक्ष कसारी, ।
यत्स्मरणें शुचिमतियतिपतिगतिला योग्य होय संसारी ॥३५॥
करुनि प्रदक्षिणा, धनु उचलोनि, ख्याति तो करी मोटी, ।
चापाच्याचि न केवळ नरवीराच्याहि वांक्रवी कोटी ॥३६॥
यंत्रच्छिद्रद्वारें पांचहि शर एकदांचि सोडोनी ।
पाडी पळांत पृथ्वीवरि पुरुषप्रवर लक्ष तोडोनी ॥३७॥
प्रीति मुनिगणांच्याही, राजांच्या कीर्ति सोमवंशाच्या, ।
घाली कंठी माळा, कृष्णा त्या श्रीमरुत्वदंशाच्या ॥३८॥
आशीर्वादांच्या द्विज, पुष्पांच्या करिति सुरहि वृष्टीतें, ।
द्रुपदपुरी जनकपुरीसम सुखदा होय साधुदृष्टीतें ॥३९॥
ब्राह्मण नाचति रंगीं आंनदें उडविती खचैलातें ।
ते तोर्ये होय हो ! यश खळजननृपचित्ततप्ततैलातें ॥४०॥
सत्कांतलाभचिता उत्साहें उचलितांचि धनु सरली ।
सद्गुणरक्ता कृष्णा कृष्णा\जिनधारकाहि अनुसरली ॥४१॥
उपसंहार
ऐका सज्जन हो ! भर्वद्वच खरें, आश्चर्य म्यां पाहिले, ।
वाल्मीकिप्रभृति स्वबंदिनिकरी दीना मला बाहिलें ॥
केलें प्राकृत काव्य, ईश्वरपदी धत्तूरेसे वाहिलें, ।
सांगूं काय वरप्रसाद ? अजि तें व्यासें हि की साहिलें ॥१॥