वनपर्व - द्रौपदीविलाप

मयूर भरत्सार काव्यात महाभारतातील प्रसंगांचे अति सुंदर वर्णन केलेले आहे.


म्यां श्रीमयूरकवि परि न परिसिला सकल कवि महीवरता, ।
साजेना कां तैशा त्या कविला सकलकविमहीवरता ? ॥

द्रौपदीविलाप

' दुष्टांनी नागविला कपटद्यूतांत धर्म ' हे वार्ता ।
जातां झाल्या यादवपांचाळमती महाधिनें आर्ता ॥१॥
यादव पांचाळ वनी आले भेटावयासि धर्मातें ।
निंदिति धृतराष्ट्राच्या तत्तनयांच्याहि दुष्ट कर्मातें ॥२॥
पाहोनि पांडवांची रुपें तो विश्वभावन वनी तीं ।
पावे त्या भावातें जो तापें होय भाव नवनीती ॥३॥
कृष्ण ह्नणे, ' बा ! साधो ! स्वकृतकुकृत आठवूनि रडतील, ।
छळ करिते छळक रिते धनें यशें जीवनेंहि पडतील ' ॥४॥
जिष्णु ह्नणे,' कृष्णा ! तूं भगवान् विश्वेश विष्णु मज कळलें;
तत्त्व व्यासें कथिलें, की हें सद्भाग्य सत्फळी फळलें ॥५॥
सत्य तुझा संकल्प प्रभुजी ! जें कार्य तेंचि करिशील,
स्वपदाश्रितजनतापत्नयतम तूं तरणि तूर्ण हरिशील ' ॥६॥
कृष्ण ह्नणे, ' त्वत्प्रिय ते मत्प्रिय, भवदंहित तेचि मदहित रे
तुज मज जो न अनुसरे तो न भवाब्धींत एक पदहि तरे '
श्रीकृष्णा श्रीकृष्णा दावुनि खळपाणिकृष्टकेश वदे,
उक्तिकडे मन दे, परि नयन तदास्यांकडे न केशव दे ॥८॥
' हे केश धरुनि वोढुनि नेलें दुःशासनें सभेंत, सख्या ! ।
तेव्हां मज आठवली त्वत्पदयुगुली सखी, न इतर सख्या ॥९॥
ईणेंचि राखिली बा ! लज्जा, उघडी पडों दिली न सती; ।
यदुकुरुकीर्ति न उरती, जर मज हे ठाउओकी किली नसती ॥१०॥
होते समीप पांचहि पति, अतिमति हे, मनें उदासीनें; ।
म्यां व्यसन साहिलें तें न असेल विलोकिलें कुदासीनें ॥११॥
सोडी पुनः पुन्हा खळ, न धरुन्हि लज्जा भया दया, लुगड्या
उघडें पडतें वपु तरि तूं अंतरतासि बा ! दयालुगड्या ! ॥१२॥
गुरु तात बंधु सुत हित कोणीच मला नसे; जिला असती ।
तीस घडेल असें का ? हंसतील सतीजनव्रता असती ॥१३॥
स्त्रीलंघन करित्यातें प्राकृतहि न साहती, पहा, लावा ।
हा ! लावावा कर मज ? वातेंहि न, पदरही न हालावा ॥१४॥
यांची शस्त्रें अस्त्रें दोर्दडबळें खळे वृथा केली, ।
धिक् कष्टम् ! सर्वयशें सुज्ञानें एकदां लया गेली ' ॥१५॥
ऐसें वदोनि रडतां कृष्ण ह्नणे, ' अंब ! तूं नकोचि रडों, ।
कळवळतें मन्मन सखि ! या शोकाचळभरें नको चिरडों ॥१६॥
सखि ! अखिलसतीपूज्ये ! मद्धैर्य तवाश्रुबिंदुसह गळतें, ।
केवळ तुझेंचि न वदन, अमृतद्युतिगौर मद्यशहि मळतें ॥१७॥
तुज गांजिलें जिही त्यां ज्यांत यशोनाश अंगनाश तशा ।
वरितील दशा, त्यांच्या शोकें रडतील अंगना शतशा ॥१८॥
अससी असीच धर्मी चित्ती माझा धरुनि बोल टिकें; ।
झालें कधींच न मृषा, होईल मदुक्त काय हो ! लटिकें ? ॥१९॥
होइल मद्वच न मृषा, केव्हां तरि वारिराशि आटेल ।
ग्रहगण गळेल, हिमगिरिराज खचेल, क्षितीहि फाटेल ' ॥२०॥
ऐसें ऐकुनि साध्वी मध्यमपतिच्या मुखाकडे पाहे; ।
जिष्णु ह्नणे, ' या प्रभुच्या वचनी विश्वास आमुचा आहे ' ॥२१॥
धृष्टद्युम्न ह्नणे, ' कुरुगुरुभीष्मप्रभु जसा तसा द्रोण ।
खळकाळ कां न झाले ? पाहेल कुकर्म सभ्य तें कोण ? ॥२२॥
वारावे मारावे खळ, तें केलें न कर्म दोघांनी,
नय सोडुनि, अघ जोडुनि, वद वांचावें कशास मोघानी ? ॥२३॥
कृष्ण ह्नणे, ' शिशुपाळप्रियसख यदुशत्रु शाल्व माराया ।
जरि गुंतलों न असतों, न श्रम हा पावताति गा ! राया ! ॥२४॥
समयी धांवत येतों, द्यूतातें कथुनि दोष राहवितों,  ।
जरि न वळते विशृंखळ खळ, खळखळ रक्तपूर वाहवितों ॥२५॥
पाहोनि राजसूयक्रतु जातां, शाल्वसंकटी शिरलों; ।
तें शमलें, तों द्यूतव्यसन परिसतां तसाचि मी फिरलों ॥२६॥
आतां काय उपाय ? व्यसन न तुमच्याचि हें गळां पडलें,
आह्मां सुहदांच्या ही; बा ! मत्पुर सर्व खळखळां रडलें ॥२७॥
सरतील क्षणलवसे लघु, केले अवधि अब्द तेरा जे ।
त्वत्सम साधु न लागों देती स्वयशासि शब्द ते राजे ॥२८॥

N/A

References : N/A
Last Updated : May 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP