मग वरुण घनद पितृपति सुरपति हे लोकपाळवर आले, ।
इंद्रेतर सर्वहि ते स्वास्त्रें पार्थासि अर्पिते झाले ॥१॥
शक्र म्हणे, ' स्वर्गी ये, रथ तुज आणावयासि धाडीन, ।
अस्त्रें देउनि पुत्रा ! तुजकरवी स्वाहितासि नाडीन ' ॥२॥
ते लोकपाल गेले मग रथ घेऊनि मातली आला, ।
नमुनि ह्नणे, ' अर्जुनजी ! तात बहातो, बसा रथी, चाला ' ॥३॥
शुचि होउनि मातलिला दिव्य रथी बैसवूनि मग चढला ।
सदतिक्रम करिल कसा जो धर्म न्याय गुरुमुखें पढला ॥४॥
अमरावतीस जाउनि गहिंवरवी तो गुणाढ्य मघव्याला ।
व्याला न साधुला जो लाजो तो बाप मूर्त अर्घ व्याला ॥५॥
जातांचि पार्थ मोही स्वगुणें तत्काळ त्या सुरसभेला, ।
न पिपीलिकसेनेसहि सुसितेचाही तसा सुरस भेला ॥६॥
बसवुनि निजासनी हरि करि पुत्रस्नेह जें जसें करवी, ।
शिर हुंगी आलिंगी फिरवी तनुवरि सुधेसि जो कर वी ॥७॥
देवाकरवी बरवी करवी नरवीरसूनुची अर्चा ।
शोभे तसा स्वतेजें देवेंद्र तसाचि तो महावर्चा ॥८॥
प्रेमें वज्राद्यस्त्रें हरि देता जाहला स्वतनयातें,
पात्नचि पितृसर्वस्वाप्रति जो जाणे भलासुत नयातें ॥९॥
मग पार्थ चित्रसेनापासुनि अत्यंत आदरें सकळा, ।
इंद्राज्ञेनें शिकला निरुपमवादित्ननृत्यगीतकळा ॥१०॥
जरि पार्थ पांच वर्षे वसला स्वर्गी पित्याचिया भवनी, ।
भ्रात्यांला न विसरला, खिन्नचि होता तसा तदा, न वनीं ॥११॥
एकांती इंद्र ह्नणे त्या गंधर्वेद्रचित्रसेनातें, ।
' स्वर्गीहि खिन्न सुत जरि हें वैभव काय ? काय हें नातें ?
गुणवत्कलत्रविरहज्वरिता सुखहेतु शुचिरतापचिती, ।
स्पष्ट तदन्यां जी जी पूजा देणार सुचिर तापचि ती ॥१३॥
स्पर्शो शृंगारसुधानिधिची धृतमूर्ति उर्वशी लहरी, ।
सुतविकळत्वं हरो, जसि सत्संगति सर्व उर्वशील हरी ॥१४॥
देखत होता सादर सुत, जैं स्मितपूर्व साभिनय नाचे, ।
प्रकटी विलास नटतां बहु ती गंभीरनाभि नयनाचे. ' ॥१५॥
तो तीस ह्नणे ' सुंदरि ! जो तुज मागोनि दत्त सुख नेतो ।
माझ्या वदनें कांहीं प्रार्थितसे सुगुणरत्नसुखने ! तो ॥१६॥
या स्वर्गी मूर्तिमती तूंचि सुधा, जी प्रसिद्ध असुधा ती, ।
न तिच्या पानें जैसे त्वदधरपानें क्षणांत असु धाती ॥१७॥
यास्तव या स्वर्गी हा पुरुषोत्तम पार्थ पात्र सुरसा, हो ! ।
परि तृप्त येथ येउनि सेवुनियां याचि मात्र सुरसा हो ' ॥१८॥
देवी स्मित करुनि ह्नणे, ' गंधर्वपते उदंड आजवर ।
प्रभुनें काम पुरविले, परि मज दिधला अनर्घ्य आज वर ॥१९॥
येऊं देईल मुखी कां प्रवरप्रेमकाम मन्मथ न ? ।
कोपें करील सोडुनि पांचहि शिलीमुखांसि मन्मथन ॥२०॥
गंधर्वपते ! जा तूं, हा जन बहु आजि सुखविला साचा ।
भेटेन त्या प्रिया मी पाहुनियां समय सुखविलासाचा ' ॥२१॥
जीच्या सुरसर्वपुपुढें खालें वदनासि अमृतसर घाली ।
ती जाय त्याकडे, जसि सुमधुकडे वेग करुनि सरघाली ॥२२॥
श्रृंगारमानसींच्या पाहुनि तो पार्थ त्या मरालीला ।
उठला, तशीच पूज्या ती स्त्री शतमखमुखामरालीला ॥२३॥
स्वकरें आसन देउनि नमुनि करी पार्थ तत्सभाजन हो ।
' मज आज्ञा काय ? ' ह्नणे परिसा साधुत्व सत्सभाजन , हो ॥२४॥
ती उर्वशी ह्नणे, ' गा ! कीर्तिश्रीच्या नृमूर्तिकरवीरा ! ।
शक्रोक्तें स्वरसेंही आल्यें, मत्कामपूर्ति कर वीरा ! ॥२५॥
करितां नृत्य मजकडे पाहत होतासि, त्या पहाण्यानें ।
सूचविलें त्वदभिलषित हरिला मजलाहि त्या शहाण्यानें ॥२६॥
जाणोनि त्वद्गुरुचें प्रिय हें त्वन्मित्रचित्रसेनमुखें ।
अनुसरल्यें तुज, सुजना ! नीरजनयना ! करी विलास सुखें ' ॥२७॥
कर्णावरि कर ठेवुनि ' शिव ! शिव ! हर ! हर ! ' असें ह्नणे नर तो ।
' माते ! हा पुत्र रतो भजनी, परि म्हणसि तूं तसें न रतो ॥२८॥
माद्री पृथा शची तूं मज तुल्या, योग्य हे नसे तूतें, ।
परि रक्षिति प्रयत्नें गुरुजन तों भंगिनी न सेतूतें ॥२९॥
ऐसें पाहत होतों की हे नारायणोरुजा आर्या ।
पूर्वज पुरुरव्याची श्रीपतिची श्री जसी तसी भार्या ' ॥३०॥
हांसोनि ह्नणे देवी, ' आह्मां देवसिं अघ असेना तें ।
जाणत नव्हते रमले पौरव, तें काय तुज असे नातें ? ॥३१॥
लावूं नयेचि सुज्ञें भुक्तोर्च्छिष्टत्व अघ नव सुधेतें, ।
स्वजनकभुक्ता माता ह्नणुनि त्यजिती सुधी न वसुधेतें ॥३२॥
आल्यें स्वयें तुजकडे कामार्ता स्त्री, ह्नणोन कोमळ हो, ।
मद्भोगासि सुकृतफळ ह्नणति सकळ, तूं ह्नणो नको मळ हो ' ॥३३॥
पावे न शुकापासुनि कर जोडुन शरण जाय परि रंभा, ।
तद्वत् नारायणसखमुनिपासुनि उर्वशीहि परिरंभी ॥३४॥
पार्थ ह्नणे, ' तूं माता, मी सुत, धर्मज्ञ नर, न वानर कीं ।
पडतां गळांहि गुरुनी द्यावा जाया न वर नवा नरकी ॥३५॥
हो सुप्रसन्नमति, हा जननि ! जन निज न निमग्न नरकी हो ।
अमर नव्हें, पशुहि नव्हें, मी त्वदुरजान्वयोत्थ नर कीं हो ' ॥३६॥
क्षोभे, प्रसन्न व्हावें, परि मन कामासि तें वश स्त्रीचें, ।
' हो क्लीब ' असें शापी, उग्रत्व तिचें तसे न शस्त्रीचें ॥३७॥
शक्र म्हणे, ' बा साधो ! करितां तूं एक शुद्ध तप शुकसा ।
तूंचि नर, इतर वानर, इंद्रियविषयैकनिष्ठ न पशु कसा ?
दिव्य विषयार्णवी तूं बोधनलस्पृष्ट साधु पर्वत रे ! ।
छायाग्रहासि कपिसा, या विषया विरल जन, न सर्व तरे
अज्ञातवासकाळी हा बहु येईल शाप कामाला, ।
मातेचा अस्त्रेहहि होय यशोहेतु साधुरामाला ' ॥४०॥