वेणू--[ यादहरावा भाई याहो,]
भीमवबाळा ती वेव्हाळा टाकुनि गोपाळा ॥
निश्चय केला बंधुवरानें द्यावी शिशुपाळा ॥
विवाहकाळीं खळ तो आला तंव राजस बाळा ॥
शोकमरानें विव्हळ झाली दोष लावि माळा ॥
“ अजुनि तरी या दासीसाठीं याहो गोपाळा ॥
जवळी आली काळवेळ ही संकट हें टाळा ॥
ऐन समायि कां निष्टुर झालां ? काय असें केलें ॥
दीनावरिचें प्रेम सदाचें आज कुठें गेलें ॥
कधिं वाहिन ही काया माझी देवा तव पायां ॥
कधिं पाहिनसें झालें मजला सांवळि ती काया ॥
कधीं सांठविन रूप मनोहर या नयनीं देवा ॥
मिळेल केव्हां अमागिनीला प्रेमाचा ठेवा ॥
नका करूं छळ याहुनि माझा अजुनी घननीळा ॥
वाट बघु किति घेउनि हातीं अश्रूंची माळा ॥
किती आळवूं परोपरीनें कंठ किं हो सकला ॥
तरिहि यावया अजुनी माझा माधव कां चुकला ॥
सर्वसाक्षि भगवंता आतां अंत नका पाहूं ॥
कीं विषयानीं प्राण तरी हा पदकमला वाहूं ॥
मीच अमागी, म्हणुनी आपण अनुनी नच आलां ॥
ब्रह्म सगुण जें दुर्लभ सकलां मिळे कसें मजला ॥
रडतां यापरि अश्रुजलानें पद भिजुनि जाई ॥
ऊर भरुनि ये, शब्द न चाले---
यमुना: हें हू काय वन्सं ? गाणें म्हणतां म्हणतां तुमची सुद्धां अगदीं तुमच्या गाण्यांतल्या भीमकबाळेसारखी स्थिति झाली !
वेणूः बहिनी, तुझें आपलें भलतेंच ! भीमकबाळेसारखी स्थिति व्हायला मला ग काय झालें आहे ! एकादें गाणें म्हणतांना मनुष्प तसें तद्रूप नाहीं का होत ?
यमुना : वेणू बन्सं ! पुरे झाली ही बतावणी: तुमच्यासारखी शिकलेली नसेन म्हणून काय झालें ! इतकें का मला कळत नसेल ? सांगा पाहूं तुमच्या मनांत काय असेल तें, वा: गडे, माझ्याजवळ सुद्धां आडपडदा ?
वेणूः बहिनी, रागावू नकोस अशी. बायकांच्या मनाला कुठें तोंड असतें का ? इतंक दिवस तुल मी माझें दुःख मुद्दाम सांगितलें नाहीं. तं तरी काय करणार बापडी ! रमाबहिनीचें दुःख आपल्याला पुष्कळ माहीत आहे. पण काय उपाय होतो आपल्या हातून तिथें तरीं ? तीच माझी गत. एरवीं आडपडदा कशाचा ? फार झालें तर डोळे निपटीत बसाचें हेंच बायकांचें समाधान,
यमुना: (पदरानें तिचे डोळे पुसून । नका रडूं, वन्सं. शपथ आहे तुम्हांला माझ्या गळ्याची. आजच तुम्हाला इतकें वाईट वाटायला काय झालें ? सांगा पाहूं मला ?
वेणू: सांगतें, पण वहिनी, ऐकून घेटल्यावर तूं माझी थट्टा नाहीं ना करणार ?
यमुना: काय बोलतां वन्सं ! चला. तुमचें बोलणें तुम्हांलच शोभतें. हीच का माझी परीक्षा केलीत आजवर ? आम्हीं नांवाच्या नणंद-भावजयी; पण सख्या बहिणीप्रमाणें आतांपयेंत वागत आलों आणि तुमचें हें बोलणें ? मग काय बोलायचें माणसानें पुढें !
यमुना :
(राग-देस. ताल-झापताल,)
असुनी भगिनि-भाव, कां हा दुजां भाव ? मळवा न तें नांव ॥धृ०॥
कथुनि कारण मला, करूं नका शोक हा, मी देत वचनाला ॥
ठेवा न त्या नांव कां हा दुजा भाव ? ॥
मळवा न तें नांव ॥१॥
वेणू: रागावलीस पुन्हां ! तसें नव्हे वहिनी, पण सुखांतल्या माणसाला दुःखी माणसाच्या दुःखाची चांगलीशी कल्पनाच करितां येत नाहीं. म्हणून मी तसें बोललें; तुला लावून बोलण्यासाठीं नव्हे ! वितीच्या यातना वितीलाच माहीत; दुसर्यांना तिचें दुःख हलकेंच आहे असेंच वाटायचें !
यमुनाः बरें, तसें का होईना ? मी मुळींच बोलत नाहीं आतां ! आधीं मला सांगा आणि मग पहा. मी थट्टा करतें का काय तें ? हातच्या कांकणाला आरसा कशाला हवा ? सांगा पाहूं तुम्हांला का वाईट वाटलें मघाशीं.
वेणूः सांगायलाच कशाला हवें ? तुंच सांग बरें वहिनी, माझी स्थितिसुद्धां त्या भीमकबाळेसारखीच नाहीं का ?
यमू : ती कशी काय?
वेणू: नीट आठवण कर म्हणजे तुझ्यासुद्धां तेव्हांच लक्षांत येईल.
यमू: (थोडा वेळ विचार करून) माझ्या नाहीं बाई कांहीं लक्षांत येत.
वेणू: असें वेड पांधरलेंतर कुठून येणार लक्षांत !
यमू: वेड नव्हे वन्सं, खरेंच नाहीं आठवत मला कांहीं.
वेणू: बरें, तुझ्या लग्नांतली तरी तुला चांगली आठवण आहे ना ?
यमूः अगदीं चांगली आठवण आहे ! पण तिच्यावरून काय सरजायचें इथें !
वेणूः बोहल्यावर तू आणि मधुदादा होता ? मागें मी मुहूर्ताचा कर्हा घेऊन उभी होतें, आठवतें का तुला ?
य मूः हो, न आठवायला काय झालें ? डोल्यांदेखतच्या गोष्टी ! त्यावेळीं जाऊबाईंनीं तुमच्या नी आमच्या वसंतदादाच्या पदराला गांठ मारली, मुलींनीं तुम्हांला वसंतदादाचें नांव घ्यायचा आग्रह केला, अखेर तुम्ही लाजून अगदीं रडकुंडीला आलां तेव्हां मींच ती गांठ सोडली, तेव्हांचीच गोष्ट ना ?
वेणू: तेव्हांचीच कशाला, तीच गोष्ट ! आतां तरी आलें ना सारें लक्षांत ?
यमूः अस्सं ! अस्सं ! आतां लक्षांत ना यायला वेळी का आहें मी !
वेणू: वहिनी, कां बरें इतकी घाई केलीस, त्यावेळीं ती गांठ सोडायची ?
यमूः हें काय वन्सं ?[तिच डोळे पुसते] या गोष्टी कुणाच्या हातच्या का असतात ! झालीं, पांच वर्षें होऊन गेलीं त्या गोष्टीला !
वेणूः पांच वर्षें झालीं का ग वहिनी तुझ्या लग्नाल ?
यमूः हो यंदाच्या श्रावणांतली माझी पांचती मंगळागौर ना ? वर्षोंना काय लागतें व्हायला ! आलीं-गेलीं वर्षें.
वेणूं: मला ही गोष्ट अगदीं काल झाल्यासारखी वाटते. वहिनी, त्या दिवसापासून मला एवढया एकाच गोष्टीचा सारखा निदिघ्यास लागला आहे. वहिनी, पुन्हां येईल का ग तशी वेळ कवीं ?
यमू: हो, देवाच्या मनांत आलें तर तसें सूद्धां घडून येईल.
वेणू: मला तुझे असे भोवम आशीवदि नकोत. तूं घेशील का मनावर माझें एवढें काम ? तुझी अगदीं जन्माची उतराई होईन.
यमूः हात्तिच्या, त्याला एवढी काकळूत कशाला करायला पाहिजे, मला नको का आहे असें झालें तर, एकदां मीं गोष्ट काढली सुद्धां होती जवळ ! आज पुन्हां काढीन,
वेणूः “ पुन्हां काढीन” नाहीं ! एवढयाणें नाहीं व्हायचें माझें समाधान, उन्हाच्या धापेंत उडत्या पांखराच्या सावलीनें काय विसांवा मिळणार ? तूं मधुदादाला अगदीं गळ घाल आणखी,
यमूः आणखी वसंतदादाला सुद्धां ना ?
वेणूः हो, दोहींकडे अगदीं आळ घेऊन बैस, कांहीं म्ह्टल्या कांहीं आपला हट्ट सोडूं नकोत. नाहीतर पहा, बाबा कांहीं करोत, माझ्या मनासारखं नाहीं झालें तर मी कांहीं माझ्या जिवाचे---
वेणू:
( राग-यमन. ताल-त्रिवट.)
सोसुनि दुःखा यापरि, ऐशी ॥
होऊं भार कां या जगतासी? ॥धृ०॥
प्रिय गोष्टींचा त्याग वरोनि, अप्रिय तेही प्रिय मानोनि. घालूं माळा कां दुःखासी ? ॥१॥
यमूः पुरे मेलें हें बोलणें. वन्सं, तुम्ही अगदीं बिनघोर रहा. मी काय पाहिजे तें करीन. पण तुमच्या मनासारखें घडवून आणीन, आतां तर झालें ना !
वेणू: तुझ्या तोंडांत साखर पडो म्हणजे झालें.
यमूः बरें, पण वन्सं, आजच तुम्हांला इतकें वाईट वाटून घ्यायला काय झालें ?
वेणूः आज दुपारीं जेवणावर बाबा काय म्हणाले तें सांगितलें नाहीं वाटतें मधुदादानें तुला ?
यमूः कुठून सांगणें होणार, तुमचें तरी काय विचारणें.
वेणूः हो. खरेंच, राजाराणीची गांठ पडायची ती मंचकावरच ! झालें. मुरडलेंस नाक ! पोर व्हायची वेळ आली तरी आमच्या वहिनींचें पोरपण कांहीं गेलें नाहीं अजून.
यमूः बरें, काय म्हणत होते मामंजी ?
वेणूः बाबांनीं मधुदादाला सांगितलें कीं ते-ते हे आहेतना त्यांना म्हणावें उद्यां येऊन मुलीला शास्त्रोक्त पाहून जा एकदां म्हणून ! म्हणजे उद्यांच्या वैशाखांत घेऊं उरकून कार्य झालें !
यमूः कुणाला, आपल्या वैद्यबुवांच्या बाळाभाऊंना वाटतें ?
वेणू: हो.
यमूः मग त्यांच्या नांवाची लाज वाटायला लागली वाटतें इतक्यांत !
वेणूः बघ केलीस खरी भलतीच थट्टा, अग अग लाज कशाची ? जें नांव ऐकायलासुद्धां नको तें कशाला तोंडावाटें काढूं उगीच ?
यमूः आणि उद्यांच बाळाभाऊ तुम्हाला पहायला येणार वाटतें ?
वेणूः हो. अन् हें ऐकल्यापासून माझा जीव कसा खालींवर होत आहे सारखा ! सांगशील ना तू मधूदादाला आजच ?
यमूः सांगेन, सांगेन; अगदीं खचित सांगेन, तुम्ही कांहीं काळजी करूं नका.
[सदाशिव येतो.]
वेणूः या सदुभाऊ, इतक्या उन्हाचे कुणिकडे ?
सदाः ताईनें तुम्हांला बोलविलें आहे घरीं !
वेणूः कुणी ! रमावहिनीनें का ?
सदा: हो, तिला करमत नाहीं म्हणून तुम्हांला बोलविलें आहे घटकाभर बसायला.
वेणू: खरेंच, किती दिवसांत रमावहिनीकडे गेलें नाहीं. शनवार शनवार आठ, आदितवार नऊ आणि आजचा सोमवार दहा. चल वहिनी तूं पण.
यमू: अशा उन्हाच्या; अंमळशानें
वेणू: गाडी आणिवतें हवी तर, मग तर झालें ना ?
सदूः आणावयाला नकोच. मी आणलीच आहे आमची गाडी.
वेणूः झालें तर मग. गाडींत नाहींना झोंप लागणार उन्हाची आमच्या दादाच्या नाजुक राणीला ? चल.
यमूः दमा जरा. सदुभाऊ, चहा करतें आणि मग.
सदूः नको, आतां तुमच्या घरीं करा चहा. चला लौकर. यमू-बरें चला. (जातात.)