अंक चवथा - प्रवेश दुसरा

मद्यपान व त्याचे दुष्परिणाम या ज्वलंत विषयावर असलेले हे नाटक गडकर्‍यांनी इ.स. १९१७ सालाच्या सुमारास लिहिले.


(स्थळ: सुधाकरचे घर. पात्रे: सिंधू कागदाच्या घडया पाडीत आहे, मागे सुधाकर उभा आहे. इतक्यात गीता येते.)

सिंधू - या गीताबाई, बसा अंमळ, एवढे चार कागद मोडायचे राहिले आहेत. जरा वेळ झाला तर चालेल ना?

गीता - सावकाश होऊ द्या! मी लागू कागद मोडायला?

सिंधू - नको. गीताबाई, माझी शपथ आहे! अगदी नको!

गीता - बाईसाहेब, का बरं नको म्हणता? नेहमी तुमचं असंच! मी जरा हात लावू लागले म्हणजे मोडता घालता लागलीच!

सिंधू - गीताबाई, तिकडच्या पायांवर हात ठेवून मी शपथ घेतली आहे ना, की, दुसर्‍याची काडी म्हणून घरात येणार नाही अशी! दुसर्‍याचे कष्ट आम्हाला अगदी वर्ज्य आहेत!

गीता - बाईसाहेब, काय म्हणू मी तुम्हाला? तुम्ही असे कष्ट करायचे आणि आम्ही धोंडयासारखं जवळ बसून ही डोळेफोड करायची! माझ्या जिवाला काय वाटत असेल बरं?

सिंधू - गीताबाई, आमच्यासाठी तुम्ही थोडं का करता आहात? उभा गाव पायाखाली घालून छापखान्यातून हे कागद मोडायचं काम घेऊन येता, हे तुमचे थोडे का उपकार आहेत? असं कोण कुणासाठी खपत असतं?

(राग- पहाडी- गज्जल; ताल- धुमाळी. चाल- दिलके तु हान.)
मज जन्म देइ माता । परि पोशिले तुम्ही॥ निजकन्यका गणोनी । न काही केले कमी ॥धृ०॥
उपकार जे जहाले । हिमाद्रितुंगसे । शत जन्म घेउनी ते । फेडीन काय मी ॥१॥
सदया मनासि ठेवा । अपुल्या असे सदा । उपकारबध्द तनया । तुमची पदे नमी ॥२॥

गीताबाई, असं काम रोज कुठून आणलंत म्हणजे किनई तुमचे डोंगराएवढे उपकार होतील आमच्यावर.

गीता - ते पण समाधान मेल्या देवानं ठेवलं नाही! आज काम आणण्यासाठी सारा गांव हिंडले; पण कुठल्याच कारखान्यात काम मिळालं नाही! कायसा म्हणजे लढाईमुळे कागदाचा तुटवडा पडला आहे, अन् म्हणून कामच निघत नाही मुळी!

सिंधू - आता कसं बरं करायचं पुढं?

गीता - त्याच विवंचनेत मी पडले आहे कालपासून! कुठ्ठं कुठ्ठं काम म्हणून कसं ते नाही! देव अगदी अंतच बघायला बसला आहे जसा!

सिंधू - गीताबाई, आपलं दैव खोटं; देवाला काय वाकडं लावायचं तिथं? बरं, छापखान्यातून नसू दे मेलं! दुसरं कसलं काम नाही का मिळण्यासारखं काही?

गीता - दुसरं कसलं बरं काम पाहावं?

सिंधू - कुठलं का असेना, आपलं घरातल्या घरात होण्याजोगं काही काढा म्हणजे झालं! काय बरं बघाल? हो गडे, दळण नाही का कुणाकडचं मिळायचं? ते आपलं बरं, घरच्या घरी करायला-

गीता - अगंबाई, दळण? बाईसाहेब, भलतंच काय सांगितलंत हे?

सिंधू - त्यात काय झालं एवढं चपापायला, अशा का बघता आहात?

सुधाकर - (स्वगत) सिंधू, सिंधू, कोणत्या देवानं तुला बोलायला शिकवलं हे?

गीता - मोलानं दळण्याचं काम का तुमच्यासारख्यांनी करायचं? नवकोटनारायण तुमचे वडील, लक्षुमीशी सारीपाट खेळण्यात तुमचा जन्म गेला; आणखी आता हे काम करायचं?

सिंधू - हं! अर्ध्या डावावरून लक्ष्मी उठून गेली आणि आपल्या हाती कवडया राहिल्या! आपला हातगुण, त्याला कोण काय करणार? दोनप्रहर टळायला तर पाहिजे! ज्यांचे ते बघायला समर्थ का नव्हते? पण देवाघरी चोरी केलेली; त्यानं असं मनी योजलं! एरवी हौस का होती कुणाला?

(राग- जोगी-मांड, ताल-दीपचंदी, चाल- पियाके मिलनेकी.)
कुणासि निंदू मी काय । प्राक्तनी जरी । घडिघडि रोदन माझ्या लिहीत विधाता ॥धृ०॥
संचितभागा । मनुजा भोगाया । ना टळते कधी हाय ॥१॥

गीता - अहो, दळायचं सोपं का आहे ते? कुळवाडयांच्या बायका चांगल्या धडधाकड, पण त्या देखील उरी फुटतात. अन् तुमच्यानं अर्धपोटी कसं व्हावं ते?

सिंधू - अहो, उरापोटी करीन कसं तरी झालं! अर्धपोटी, नाही अगदी रित्यापोटी कंबर कसून आला तो दिवस साजरा करायला हवा ना? माझं ऐका तुम्ही. खुशाल कुठं दळण मिळालं तर घेऊन या! अहो, दुसर्‍यासाठी का करायचं आहे हे? बघाल ना कुठं?

गीता - बघेन बापडी! इलाजच हटला, मग काय करायचं? बरं बाईसाहेब, आज दोन दिवस सांगेन सांगेन म्हणते, पण मेली आठवणच भारी धड! हे बघा, मी सांगेन तिथे याल का?

सिंधू - कुठं यायचं? सांगा ना तरी?

गीता - अमृतेश्वरी!

सिंधू - तिथं कशाला यायचं?

गीता - तिथं आज चार दिवस लक्षभोजनं चालली आहेत! चार दिवस तिकडं गेलो तर गोडाधोडाचे दोन घास तरी पोटभर मिळतील! तुम्हाला उपाशीतापाशी पाहिलं म्हणजे माझ्या किनई पोटात तटातट तुटतं अगदी! (सिंधू तोंड फिरवते व पदराने डोळयांतली आसवे पुसते.)

सुधाकर - (स्वगत) अरेरे, काय ऐकलं मी हे? या उदार मनाच्या पण गरीब कुळीच्या भोळया मुलीनं सहजासहजी सिंधूच्या हृदयाला केवढी जबर जखम केली ही! धनसंपन्नाची जी कन्या, ज्ञानसंपन्नाची जी पत्नी, तिच्या उपासमारीची दया येऊन या उदार मुलीनं तिला सदावर्ताचा उपदेश द्यावा? सुधाकरा, काय हा तुझा संसार! धिक्कार असो तुझ्या व्यसनाला आणि पुरुषार्थाला!

गीता - अगंबाई, तुमच्या डोळयांना पाणी आलं? माझ्या बोलण्यानं तुमच्या मनाला इतकं अवघड वाटलं? मला काय बरं ठाऊक? बाईसाहेब, मी आपली तुमची वेडीपिशी मुलगी आहे; चुकलेमाकले तर मनात आणू नका हो काही! मी भोळया भावानं बोलून गेले आपली! पण तुमच्या जिवाला ते लागलं!

सिंधू - (स्वगत) या बिचारीचं समाधान केलं पाहिजे. बापडी लागलीच गोरीमोरी झाली. (उघड) गीताबाई, नाही बरं वाईट वाटलं मला!

गीता - अशी नाही फसायची मी! मग डोळे भरून आले असे?

सिंधू - माझ्याही मनातून यायचं होतं. पण हे बघा, असं जुनेर आड करून चार लोकांत कसं बरं यायचं बाहेर? म्हणून मला वाईट वाटलं हो!

गीता - हात्तीच्या, एवढंच ना? मी आपली चरकले! म्हटलं, कुठं बोलायला गेले कुणाला ठाऊक! मग माझं पातळ आणून देऊ का?

सिंधू - वेडया तर नाही तुम्ही, गीताबाई? तुमचं पातळ मला थिटं नाही का व्हायचं? हे बघा, ते राहू द्या- त्याविणं काही अडलं नाही. दळणाचं पाहाल ना कुठं जमलं तर?

सुधाकर - (स्वगत) शाबास, सिंधू, शाबास! फाटक्या लुगडयाचं निमित्त पुढे करून माझ्या दारूबाज अब्रूवर पांघरूण घातलंस!

सिंधू - गीताबाई, तुम्ही पुन्हा गप्प बसला?

गीता - तुमच्या देवस्वभावाला काय म्हणावं, बाईसाहेब? साताजन्माच्या पुण्यवंतांनीसुध्दा तुमच्या चरणाचं तीर्थ घ्यावं; अन् आमच्या घरच्यासारख्यांनी तुमच्याबद्दल दारूसारखं अभद्र- तो देव मेला दडी मारून कुठे बसला आहे का दारूबिरूच प्यायला आहे?- एरव्ही यांच्या जिभा झडून कशा जात नाहीत त्या?

सिंधू - हं, गीताबाई, आपण बायकांनी असं बोलावं का? नवरा म्हणजे देवासारखा-

गीता - हे कसले हो असले देव! अहो, हे दारूबाज देव आज गटाराच्या गंगेत वाहायचे तर उद्या आणखी कुठे लोळायचे!

सिंधू - गीताबाई, गप्प बसा अगदी! असं तोंडाला येईल ते बोलू नये. देवा ब्राह्मणांनी दिलेला नवरा कसा का असेना-

(राग- पहाडी- गज्जल; ताल- कवाली. चाल- खडा कर.)
असे पती देवचि ललनांना । तयासि अन्य भावना ना॥
स्पर्शमणि वनितामन साचे । करित जे कांचन लोहाचे॥
खपतिच्या अंगिंच्या दोषा । गणिती गुण मधुर आर्ययोषा॥
तयासह नरकयातनांला । स्वर्गसुख मनि समजति अबला॥
असे जो प्रस्तर जननयनी । गणी त्या ईशचि तद्रमणी॥
वसुनि त्या या देवानिकटी । ईशपद लभति सपति अंती ॥१॥

गीता - देवानंच मुळी आताशा लाज सोडल्यासारखी दिसते! बाईसाहेब, तुमची लुगडी धुवायला सांगा- एकदा सोडून सात वेळा धुईन- पण एवढया गोष्टीत नका माझ्या तोंडाला हात देऊ! असले नवरे जाळायचे का आहेत? यांच्या अकला चुलीत का जातात? मेल्या एकाच्या अंगी वकूब नाही काडीचा अन् हे म्हणे देव! या देवांची नित्यनेमाने खेटरांनी पूजा करायला हवी! तो देव हाती सापडता किनई तर तुमच्यापुढं उभा करून, चांगला कान पिळून त्याला हडसून खडसून विचारलं असतं, की या माउलीकडे नीट एकदाचे डोळे फोडून पाहा अन् मग सांग, की पोराबाळांनी भरल्या घरात अशी ओतायला का दारू केली आहेस? बाईसाहेब, तुम्हाला येतो माझा राग; पण मी आहे आपली सरळ! तुम्ही अशा सीतासावित्रीसारख्या, तुमची काय ओज ठेविली आहे हो दादासाहेबांनी? चांगले शिकले सवरलेले! पण यांचं सारं शहाणपण बाटलीतून जन्माला यायचं, उकिरडयावरच्या अंमगलानं यांचं उष्टावण व्हायचं आणि तिसर्‍या कुठल्या मसणवटीत- जाऊ दे मेलं, माझ्या तोंडाला नाही सुमार! बाईसाहेब, तुमच्याकडे पाहिलं म्हणजे माझ्या जिभेला आपला फाटा फुटतो! सांगा बघू, काय केलं हो यांनी तुमच्यासाठी? कधी गोळाभर अन्न घातलं तुम्हाला वेळेवर, का बोटभर चिंधी आणली धडोतीसाठी? अष्टौप्रहर बाटलीत बुडया मारूनच बसल्या ना यांच्या मोठाल्या बुद्ध्या! हे हो कसले देव? अहो हे शेंदूरकमी देव, निव्वळ दगडधोंडे! आणि यांच्यावरचा शेंदूर पिऊन मुळूमुळू रडत बसायचं! राणीचं राज्य झालं आहे ना म्हणतात आताशा? मग राणीच्या या राज्यात बायकांचे का असे धिंडवडे निघतात हे?मला कुणी राज्य दिलं तर मी सार्‍या बायकांना सांगून ठेवीन की, नवरा दारू पिऊन घरी आला तर खुशाल त्याला दाव्यादोरखंडानं गोठयात नेऊन बांधीत जा! नवरा म्हणे देवासारखा! अशानं तर नवरेपणाचे देव्हारे माजले! दारू पितो तो कसला हो नवरा? माणसात देखील जिंमा व्हायची नाही त्यांची!

सिंधू - गीताबाई, आपण कशाला जीभ विटाळून आपला धर्म सोडायचा! हे बघा, बाळ भुकेला झाला असेल; थोडं दूध- (मागे पाहून स्वगत.) अगंबाई! इथं उभं असायचं? गीताबाईचं बोलणं सारं ऐकायचं झालं वाटतं? (उघड) गीताबाई, जा बरं. दूध घेऊन येता ना?(तिला खूण करते.)

गीता - (पाहून) अगंबाई! दादासाहेब इथंच होते वाटतं? आणखी माझ्या जिभेची सारखी टकळी चालली होती!

सिंधू - (हळूच) चला आत, भांडे देते दुधाला अन् तेवढं दळणाचं विसराल बरं का? चला. (त्या जातात. सुधाकर पुढे येतो.)

सुधाकर - (स्वगत) सिंधू, इतक्या थोरपणानं, गीतेला बोलती बंद का केलीस? दारूच्या धुंदीने बहिरून निजलेला माझा जीव तुझ्या नाजूक बोलाफुलांनी कसा जागा होणार? त्याच्यावर गीतेच्या तोंडचा दगडधोंडयांचा असा निष्ठुर माराच व्हायला पाहिजे! गीतेचा एक एक बोल जिवाला चाबकाच्या फटकार्‍याप्रमाणं लागत होता! सिंधू, नवर्‍याच्या पोटात दडी धरून बसलेल्या या दारूची तुम्ही कदर केलीत म्हणून सांबाच्या पिंडीवर बसलेल्या विंचवाच्या नांगीप्रमाणे ती तुम्हा सर्वांना अजून छेडते आहे! सुधाकरा, चांडाळा, दारूच्या दुष्ट नादानं केवळ पशू बनून या देवतेची काय विटंबना केलीस ही! तुझं सारं शहाणपण गेलं कुठं? ब्राह्मण जातीच्या उच्चत्वाला मी लाथ मारली, विधवेची जबाबदारी झुगारून दिली आणि एखाद्या पतिताप्रमाणं मी दारू प्यायला लागलो! अरेरे! ही पाहा सिंधू आली. ज्या तोंडानं मी दारू प्यालो ते हे तोंड या देवीला कसं दाखवू? (तोंड झाकून रडतो. सिंधू जवळ येऊन उभी राहते.)

सिंधू - काय बरं असं? गीताबाई आपल्या फटकळ तोंडाच्या आहेत! त्यांचं बोलणं असं मनावर घेऊ नये!

सुधाकर - सिंधू, मी आजपासून दारू पिणं सोडलं!

सिंधू - (आनंदाने) खरंच का हे?

सुधाकर - खरं, अगदी खरं! आजपासून दारू पिणं सोडलं; कायमचं सोडलं!

सिंधू - अहाहा! असं झालं तर देवच पावला!

(राग- भैरवी; ताल- केरवा. चाल- गा मोरी ननदी.)
प्रभू अजि गमला मनी तोषला ॥धृ०॥
कोपे बहु माझा । तो प्रभुराजा आता हासला ।
मनी तोषला । मृतचि हृदय होते नाथ, हे पूर्ण झाले ।
परि वचनसुधेने त्यासि जिवंत केले॥
अमृतमधुर शब्दा त्या पुन्हा ऐकण्याते ।
श्रवणि सकल माझी शक्ति एकत्र होते ॥१॥

हे पाहा, आपल्या पायांवर मस्तक ठेवून मागणं मागते की, शुभघडीचा हा निश्चय कधीकाळी विसरू नये. (त्याच्या पाया पडते. तो तिला उभी करतो.)

सुधाकर - सिंधू, सिंधू, काय करतेस तू हे? माझ्या पायांवर मस्तक ठेवतेस? या सुधाकराच्या? या दारूबाज सुधाकराच्या?- ज्यानं आपल्या विद्येला, ज्ञानाला, नावलौकिकाला, दारूच्या पेल्यात बुडविलं, त्या सुधाकराच्या? सिंधू, मी दारूच्या व्यसनानं काय करायचं ठेवलं आहे? वडिलांच्या पुण्याईला, ब्रह्मकुलींच्या पवित्रतेला, दारूनं तिलांजली दिली! तुझ्यासारख्या देवीची अशी विटंबना केली! ज्या तुझ्या बापाच्या घरी रोज सदावर्ते चालावी त्या तुला घासभर अन्नाला अशी महाग केली, की गीतेसारख्या मुलीनं तुझ्यावर दया करावी आणि तुला सहस्त्रभोजनाचा रस्ता दाखवावा! लहानपणी बाहुला-बाहुलीच्या लग्नात चिमुकला अंतरपाट धरण्यासाठी तू बेदरकारपणानं पैठणीच्या धांदोटया केल्या असशील; त्या तुला आज फाटक्या कपडयांमुळं बाहेर जाण्याची पंचाईत पडावी! तुझ्या बापाच्या घरी खेळताखेळता ओंजळीच्या वैरणीने तू जात्यात मोती भरडले असतेस तरी कुणाला त्याचं काही वाटलं नसतं; त्या तुझी मी अशी दशा करून टाकली, की, पोटासाठी आसवांची मोती वेरून तुला मोलाचं दळण करणं भाग पडावं! पंचपतिव्रतांनी पुण्यसंपादनासाठी प्रत्यही तुझी पूजा करावी अशी तुझी पवित्र योग्यता! त्या तुझ्या अंगाला तळीरामासारख्या नरपशूनं स्पर्श केला! ज्या दीनदुबळया परंतु पवित्र वैधव्याला पाहून देवांनीसुध्दा मार्गातून बाजूला सरून मार्ग द्यावा, त्या वैधव्यात पडलेल्या बिचार्‍या शरदचीही मी विटंबना करविली! तोच हा पातक्यांतला पातकी सुधाकर! त्या माझ्या पायांवर तू मस्तक ठेवतेस? त्यापेक्षा लाथेसरशी मला दूर नरकात का लोटून देत नाहीस? सिंधू, गीतेनं खोटं काय सांगितलं? भलत्या भावभक्तीनं माझ्यासारख्या दगडाची देवपूजा तू कशाला करीत बसलीस? तुझा नवरा होण्याला मी पात्र आहे का? बाबासाहेब, आपण सर्वस्वी फसून या रत्नाला दारूत बुडविलं! पण आपणाला तरी आधी काय ठाऊक, की ब्राह्मण कुलातला हा विद्यासंपन्न सुधाकर, पुढं असा दारूबाज दिवटा निघणार आहे म्हणून! तक्षकाला मारण्यासाठी अस्तिकानं त्याला पाठीशी घालणार्‍या इंद्रदेवतेलाही आगीत उडी टाकण्याला आमंत्रण केलं, त्याप्रमाणं या दारूच्या व्यसनाला घराबाहेर घालविण्यासाठी तुझ्यासारख्या साध्वींनीसुध्दा, या व्यसनाला पोटात थारा देणार्‍या पतिदेवतेला लाथेनं घराबाहेर हाकललं तरच आजच्या संभावित समाजातून हे दारूचं व्यसन हद्दपार होईल!

सिंधू - ऐकलं का? आता मी नाही असं वेडंबिद्रं बोलू द्यायची! सोडायची झाली ना आजपासून? मग आता गेल्या गोष्टींनी जीव कशाला कष्टी करून घ्यायचा? गेलं ते गंगेला मिळालं! एकदा मनाचा निग्रह करून टाकला तर आपल्याला काय बरं कमी आहे? अजून सारं सोन्यासारखं होईल! करायचा ना हा निश्चय कायम?

सुधाकर - कायम, कायम, अगदी कायम! आपल्या बाळाची शपथ घेऊन सांगतो, की आजपासून दारू अगदी वर्ज्य! वकिलीची सनद गेली तरी हरकत नाही; माझ्या चार वजनदार स्नेह्यांकडून कुठं नोकरीची सोय पाहतो. आता हा सुधाकर तुझ्या एका शब्दाबाहेर जाणार नाही!

सिंधू - अहाहा! असं झालं तर अमृतेश्वराला लक्ष वाती लावून- लक्ष वातीचशा काय- पण पंचप्राणांची पंचारती पाजळून ओवाळणी करीन! आपल्या एका शब्दासरशी माझ्या आनंदाला त्रिभूवन थोडं झालं आहे आणि आकाश ठेंगणं झालं आहे! ही सोन्याची अक्षरं कोणाला सांगू आणि कोणाला नको असं मला झालं आहे! आधी आपल्या बाळाच्या चिमुकल्या जिवालाच ही कानगोष्ट सांगते! (जाते.)

सुधाकर - (स्वगत) चिरकालीन निराशेत झालेला हा हिचा ब्रह्मानंद मला कोणता उत्साह देणार नाही?
(राग- खमाज; ताल- त्रिवट. चाल- दखोरी गइ गइ.)
देतसे बहु उत्साह मना विमल हिचा हर्षातिरेक नवचि जीवना ॥धृ०॥
निर्मल मंगल पावन पुण्यद । जे त्रिभुवनी । तद्भवन सतीमन ।
प्रसाद त्याचा जनि करि न काय ॥१॥
(सिंधू मुलाला घेऊन येते.)

सिंधू - बघितलं का या लबाडालासुध्दा हे ऐकून कसं हसं येतं आहे ते? बाळ, पुन्हा आपल्याला सोन्याचे दिवस लाभणार बरं!

(राग- पहाडी; ताल- कवाली. चाल-तारि विछेला.)
स्वस्थ कसा तू? ऊठ गडया । झणि टाक उडया ॥धृ०॥
नकळे का वर्षे । घन सुधेचा, छबडया? ॥१॥
सरले अजि सारे । कुदिन अपुले, बगडया!  ॥२॥

बाळ, अजून तू इतका लहान का बरं राहिलास? ही आनंदाची गुढी घेऊन बाबांकडे, भाईकडे, तुला दुडदुडा धावत जायला नको का? पुन्हा पुन्हा काय विचारतोस मलाच? तिकडे विचारीनास? ऐकलं का, याला एकदा आपल्याच तोंडानं सांगायचं बरं!

सुधाकर - बाळ, तुझी शपथ घेऊन सांगतो की, या सुधाकरानं आजपासून दारू कायमची सोडली, अगदी कायमची सोडली! (दोघेही मुलाचा मुका घेऊ लागतात. पडदा पडतो.)

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP