(स्थळ: तळीरामाचे घर. पात्रे: शास्त्रीबुवा, तळीराम आजारी, व त्याचे मित्र वगैरे)
खुदाबक्ष - काय शास्त्रीबुवा, मिळाला का एखादा डॉक्टर-वैद्य?
शास्त्री - मिळालाय म्हणायचा. पण फार श्रम पडले शोधायचे! आधी तळीराम डॉक्टरचं किंवा वैद्याचं नावच काढू देत नव्हता मुळी; शेवटी सर्वांनी आग्रह केला, तेव्हा दारू पिणारा डॉक्टर किंवा वैद्य मिळाला तर आणा, म्हणून कबूल झाला! पुढं दारू पिणारा डॉक्टर किंवा वैद्य हुडकण्यासाठी आम्ही निघालो. सारा गाव डॉक्टरांनी आणि वैद्यांनी भरलेला, पण असा एखादा डॉक्टर वैद्य औषधापुरतासुध्दा मिळायची पंचाईत!
खुदाबक्ष - मग झालं काय शेवटी?
शास्त्री - दारू पिणारा डॉक्टर शोधून काढण्यासाठी आपल्या सोन्याबापू अजून फिरतो आहे. गावात मला दारू पिणारा वैद्य काही आढळला नाही; शेवटी एक इसम मिळाला.
खुदाबक्ष - वैद्य आहे ना पण तो?
शास्त्री - वैद्य नाही! एका वैद्याच्या घरी औषध खलायला नोकर होता तो पहिल्यानं! पुढं त्यानंच स्वत:चा कारखाना काढला आहे आता! म्हटलं चला, अगदी नाही त्यापेक्षा ठीक आहे झालं! आता एव्हानाच त्यानं यायचं कबूल आहे- (सोन्याबापू व डॉक्टर येतात.) काय सोन्याबापू, दारू पिणारे डॉक्टर मिळाले वाटतं हे?
सोन्याबापू - नाही. डॉक्टर नाहीत हे, नुसते दारू पिणारेच आहेत. पण डॉक्टरची थोडी माहिती आहे यांना. मी आणलंच यांना आग्रहानं! तुमचे ते वैद्य काही आपल्याला पसंत नाहीत!
शास्त्री - काय असेल ते असो! आपला आयुर्वेदावर अंमळ विश्वास विशेष आहे. वैद्याला कळत नाही- अन् डॉक्टरला कळतं- डॉक्टरसाहेब, क्षमा करा. हे माझं आपलं सर्रास बोलणं आहे- असं का तुम्हाला वाटतं?
सोन्याबापू - तसं नाही केवळ; पण या वैद्यांच्या जाहिरातींवरून मोठा वीट आला आहे! जो भेटतो त्याचं एक बोलणं! शास्त्रोक्त चिकित्सा, शास्त्रोक्त औषधं, अचूक गुणकारी औषधं, रामबाण औषधं, हटकून गुण, तीन दिवसांत गुण, गुण न आल्यास दुप्पट पैसे परत; अनुपानखर्डा सोबत, टपालखर्च निराळा-
डॉक्टर - शिवाय, सरतेशेवटी आगगाडीच्या डब्यातल्यासारखी धोक्याची सूचना!
सोन्याबापू - त्यामुळं खरा वैद्य आणखी खोटा वैद्य ओळखणं एखाद्या रोगाची परीक्षा करण्याइतकंच अवघड होऊन बसलं आहे! वैद्याविषयी आमचा अनादर नाही; आम्हाला एखादा का होईना, पण खरा वैद्य पाहिजे- (वैद्य प्रवेश करतो.)
वैद्य - आपली मनीषा पूर्ण झालीच म्हणून समजा. आपणाला एखादा खरा वैद्य पाहिजे ना? मग हा पाहा तो आपल्यापुढं उभा आहे. आमची औषधं अगदी शास्त्रोक्त असून रामबाण असतात; हटकून गुण, तीन दिवसांत गुण, गुण न आल्यास दुप्पट पैसे परत; अनुपानखर्डा सोबत, टपालखर्च निराळा- विशेष सूचना- सोन्याबापू - म्हणजे आपली धोक्याची सूचना! हे घ्या डॉक्टरसाहेब, ऐका आता! (डॉक्टर मोठयाने हसतो.)
वैद्य - काय हो, काय झालं असं एकदम हसायला?
डॉक्टर - (हसत) मूर्ख आहात झालं!
वैद्य - अल्पपरिचयानं दुसर्याला एकदम मूर्ख म्हणणारा स्वत:च मूर्ख असतो!
डॉक्टर - पण अल्पपरिचयांतच आपला सारा मूर्खपणा स्पष्टपणानं दाखविणारा त्यापेक्षाही मूर्ख असतो!
शास्त्री - ते राहू द्या तूर्त! तळीरामाला उठवायला काही हरकत नाही ना? तळीराम, अरे तळीराम, ऊठ बाबा! हे वैद्य आणखी डॉक्टर आले आहेत. (तळीराम उठून बसतो.)
डॉक्टर - काय हो सोन्याबापू, हे वैद्यबुवा इथं औषध देण्यासाठीच आले आहेत का?
वैद्य - अहो, हा प्रश्न विचारण्याचा अधिकार माझा आहे. (शास्त्रीबुवास) काय हो शास्त्रीबुवा, मी असताना आणखी यांना आणण्याची काय जरुरी होती?
मन्याबापू - हे पाहा वैद्यराज, तुम्हा दोघांचे पंथ अगदी निरनिराळे आहेत. म्हणून आम्ही मुद्दाम दोघांनाही आणलं आहे! हो, 'अधिकस्य अधिकं फलं'!
वैद्य - भलतंच काही तरी! नवर्या मुलीला एक नवर्याच्या ठिकाणी दोन नवरे, किंवा एखाद्याला एका बापाच्याऐवजी दोन बाप-
मन्याबापू - वैद्यराज, असे एकेरीवर येऊ नका. आता आलाच आहात, तेव्हा दोघेही सलोख्यानं तळीरामाला औषध द्या म्हणजे झालं!
तळीराम - शास्त्रीबुवा, एकटया वैद्यानं किंवा डॉक्टरानं मी मरण्यासारखा नव्हतो, म्हणून का तुम्ही या दोघांनाही आणलंत?
डॉक्टर - आपला असा समज या राजश्रींच्या औषधांमुळेच झालेला आहे! खरोखरीच यांच्या औषधात काही जीव नसतो!
तळीराम - औषधात जीव नसेना का! रोग्याचा जीव घेण्याची शक्ती असली म्हणजे झालं!
वैद्य - नाही. आमची औषधं तशी नाहीत! हे पाहा डोळयांचे औषध. एकाला दिसत नव्हतं त्याला हे दिलं. आता त्याला अंधारातसुध्दा दिसतं.
डॉक्टर - यांच्या तोंडाला कुलूप घालील अशी त्या औषधावरची कडी आहे आमच्याजवळ! आमचं डोळयांचं औषध एका जन्मांधाला दिलं त्याला अंधारात तर दिसतंच, पण डोळे मिटून घेतले तरी दिसतं!
तळीराम - (स्वगत) मला एकंदर सोळा-सतरा रोग आहेत. त्यापैकी जलोदर हा माझा जीव घेईल असं मला वाटत होतं; पण यांच्या या चढाओढीवरून या दोघांपैकीच कोणीतरी पैज जिंकणारसं वाटतं!
वैद्य - मग काय, काढू मी आपली औषधं?
डॉक्टर - अहो राहू द्या आपलं शहाणपण आपल्याजवळच! मी देणार आहे यांना औषध!
तळीराम - अहो वैद्यराज, डॉक्टरसाहेब, असे आपापसात भांडून तुम्ही जर एकमेकांचा जीव घेऊ लागलात, तर मग माझा जीव कोण घेईल? असे भांडू नका, मी आपल्या मरणाचं अर्धे अर्धे श्रेय तुम्हा दोघांनाही वाटून द्यायला तयार आहे? हं, काढा वैद्यराज, तुमची औषधं.
वैद्य - या पाहा मात्रा. याच पाहून तुमचा वैद्यांबद्दलचा सारा विकल्प दूर होईल.
जनूभाऊ - अबब! काय या मात्रा! एखाद्या नवशिक्या कवीच्या पदांतूनसुध्दा मात्रांचा इतका सुकाळ नसेल!
वैद्य - ही पाहा चूर्ण, ही सत्त्वं, ही भस्मं! हे सुवर्णभस्म, हे मौक्तिकभस्म, हे लोहभस्म-
तळीराम - प्राण घेण्याच्या शास्त्रातसुध्दा काय दगदग आहे ही! रोगाला नि:सत्त्व करण्यासाठी आधी इतक्या पदार्थांची सत्त्वं काढायची तयारी! एका देहाचं भस्म करण्यासाठी इतकी भस्मं करण्याची तालीम!
जनूभाऊ - एकूण वैद्याच्या हाती सापडलेला रोगी जिवंत सुटणं कठीणच! हो, प्रत्यक्ष लोखंडाचंही भस्मकरण्याची ज्याची तयारी, त्याच्यापुढं रोगी शरीराची काय कथा?
वैद्य - हं, या औषधांची अशी थट्टा करणं पाप आहे. प्राणापेक्षाही अमूल्य आहेत ही औषधं!
जनूभाऊ - तरीच, रोग्याचा प्राण घेऊन शिवाय पैसेही घेता औषधांबद्दल!
वैद्य - उगीच शब्दच्छल नका करू असा. अशी तशी औषधे नाहीत ही! खुशाल डोळे मिटून ही औषधे घ्यावीत!
तळीराम - आणि औषध घेऊन पुन्हा डोळे मिटावेत!
जनूभाऊ - ते मात्र कायमचे! खरंच, राजासाठी तयार केलेली पक्वान्नं स्वयंपाक्याला अगोदरच खावी लागतात, त्याप्रमाणे रोग्याबरोबर वैद्यांनाही औषध घेण्याची वहिवाट असायला हवी होती! मग मात्र हा घातुक मालमसाला तयार करताना वैद्यांनी जरा विचार केला असता!
तळीराम - खरंच, काय ही औषधांची गर्दी! काय हो डॉक्टर, वैद्यांवर नाही का औषध?
वैद्य - असं म्हणू नये. वैद्याबद्दल असा अविश्वास दाखवू नये. वैद्य हाच रोग्याचा खरा जिवलग मित्र असतो.
तळीराम - रास्त आहे! एरवी रोग्याच्या जिवाशी इतकी लगट कोण करणार?
डॉक्टर - अहो सोन्याबापू, उगीच काय पोरखेळ मांडला आहे हा! वैद्याच्या औषधानं कुठं रोग बरे व्हायचे आहेत का? बापानं औषध घ्यावं तेव्हा मुलाच्या पिढीला गुण यायचा!
वैद्य - अस्तु. तरी पुष्कळ आहे. वैद्याच्या औषधानं मुलगा जिवंत तरी राहतो; डॉक्टरच्या बाबतीत मात्र बाप औषधानं मरायचा आणि मुलगा बिलाच्या हबक्यानं मरायचा!
डॉक्टर - कुचेष्टेने सर्वत्र प्रतिष्ठा वाढतेच असे नाही, बरं का! देशी औषधांचा गुण सावकाशीनं येतो, हे तुमचे लोकच कबूल करतील. तेच विलायती औषधांचं पाहा. औषध घेण्यापूर्वीच्या आणि औषध घेतल्यानंतरच्या रोग्याच्या स्थितीत तीन दिवसांत जमीन-अस्मानाचं अंतर!
वैद्य - सत्य आहे. म्हणजे जो रोगी जमिनीवर असायचा तो तीन दिवसांत अस्मानात जायचा!
डॉक्टर - डॉक्टरी विद्येचा अपमान होतो आहे हा!
वैद्य - आणि आयुर्वेदाची आपण हेटाळणी केलीत तेव्हा? मी आयुर्वेदाचा एक आधारस्तंभ आहे!
डॉक्टर - तू आयुर्वेदाचा आधारस्तंभ? अरे, औषधी कारखान्यात रोजावर खल चालवायला मजूर म्हणून तू होतास, एवढाच आयुर्वेदाच्या नावाला तुझा विटाळ! तू एखादा वैद्य का आहेस?
वैद्य - हात दाखवून अवलक्षण करून घेतलंस खरं! मग तू तरी डॉक्टर आहेस वाटतं! खलतांना देशी औषधं माझ्या हाताला तरी लागली होती. आणि तू डॉक्टर तर नाहीसच; पण नुसता कंपाउंडरसुध्दा नाहीस. एका डॉक्टरच्या दवाखान्यात थकलेली बिलं वसूल करण्याचं तुझं मूळचं काम! इतक्या हलक्या वशिल्यानं डॉक्टरी विद्येशी नातं जोडून आयुर्वेदाचा अपमान करीत आहेस!
मन्याबापू - अहो गृहस्थहो, तुमच्या बोलाचालीत आयुर्वेद, वैद्य, डॉक्टरी विद्या, डॉक्टर, असली मोठाली नावं कशाला हवीत? तुम्ही एकमेकांच्या नालस्त्या केल्यानं त्या मोठाल्या नावांना काही धक्का पोहोचत नाही. तुम्हा नामधारकांचा त्या पवित्र नावाशी काय संबंध आहे? वार्यानं नकाशा फडफडला म्हणून काही देशात धरणीकंप होत नाही! आता आलाच आहात, तेव्हा एकोप्यानं नीट तळीरामाची प्रकृती पाहा, आणि सुखाच्या पावली आपापल्या घरी परत जा. हं, तळीराम, हो पुढं. वैद्यराज, डॉक्टर, आता वादंग नको उगीच! डॉक्टर, तुम्ही याची उजवी बाजू तपासा आणि वैद्यबुवा, तुम्ही याची डावी बाजू सांभाळा. (दोघे तळीरामला तपासू लागतात.)
वैद्य - काय करावं, शास्त्रात उजव्या हाताची नाडी पाहावी असं आहे. इथं आमच्या नाडया आखडल्या! याच्या डाव्या बाजूलाही नाडीपुरताच एक छोटासा उजवा हात असता तर काय बहार झाली असती!
डॉक्टर - नाडी झाली. आता जीभ काढा पाहू!
वैद्य - हं शास्त्रीबुवा; यांना आवरा! जीभ कोणाची? यांची का आमची? जीभ कोणालाच बघता यायची नाही. रोग्याला दोन तोंडं असती तर गोष्ट निराळी! तूर्तास जीभ लढयात पडली आहे! नुसता हात पाहण्यावरच भागवलं पाहिजे!
तळीराम - (स्वगत) काय करू! चांगला असतो तर एकेकाला असा हात दाखविला असता की, एका तोंडाची दोन तोंडं झाली असती!
डॉक्टर - नाडी फार मंद चालते!
वैद्य - नाडी फार जलद चालते!
डॉक्टर - थंडीनं हातपाय गार पडले आहेत.
वैद्य - तापानं अंगाला हात लाववत नाही!
डॉक्टर - झोप लागत नाही!
वैद्य - सुस्ती उडत नाही!
डॉक्टर - रक्तसंचय कमी झाला आहे!
वैद्य - रक्तसंचय फाजील झाला आहे!
डॉक्टर - पौष्टिक पदार्थांनी रक्ताचा पुरवठा केला पाहिजे!
वैद्य - फासण्या टाकून रक्तस्राव करविला पाहिजे!
डॉक्टर - नाही तर क्षयावर जाईल!
वैद्य - नाही तर मेदवृध्दी होईल!
तळीराम - काय हो, ही परीक्षा आहे का थट्टा आहे? दोघांच्या सांगण्यात जमीन अस्मानाचं अंतर! शास्त्रीबुवा, यापैकी एकटयानं मी मरण्याजोगा नव्हतो म्हणून या दोघांनाही आणलंत वाटतं?
डॉक्टर - असं कसं म्हणता? शरीरात डावं-उजवं हे असायचंच! अर्धशिशीच्या वेळी नाही का अर्धच डोकं दुखत? एकीकडे एक डोळा येतो तर एक डोळा जातो!
वैद्य - शिवाय, यांच्या-आमच्या पध्दतीचा विरोध लक्षात घेतला पाहिजे. यांच्या-आमच्या शब्दांत कुठं जमत असेल तर एकमेकांशी न जमण्यांत! त्या मानानं हा फरक असायचाच!
तळीराम - हं, मग ठीक आहे. आता माझ्या शरीराची वाटेल तशी दुर्दशा करा. एक बाजू क्षयानं रोडावली असून दुसरी बाजू मेदानं फुगून दिसते, असं सांगितलंत तर पहिलवान बाजूच्या वतीनं काडीपहिलवान बाजूला मी हसून दाखवितो! इतकंच नाही तर एका बाजूने मेलो असलो तर जित्या बाजूनं मेल्या बाजूला खांदा द्यायलासुध्दा माझी तयारी आहे! चालू द्या परीक्षा पुढे!
डॉक्टर - तत्राप रोग प्रयत्नसाध्य आहे.
वैद्य - रोग अगदी असाध्य आहे!
डॉक्टर - पथ्यपाणी केलं तर रोगी खडखडीत बरा होईल.
वैद्य - धन्वंतरी जरी कोळून पाजला तरी रोगी जगायचा नाही!
डॉक्टर - जीव गेला तरी रोगी मरायचा नाही!
वैद्य - तीन दिवसांत रोग्याचा मुडदा पाडून दाखवितो!
डॉक्टर - अहो, ही तुमची पैजहोड नको आहे. औषध काय द्यायचं ते द्या.
डॉक्टर - (स्वगत) आता या चोराला चांगलाच फसवितो. (उघड) ठीक आहे, माझ्याबरोबर मनुष्य द्या म्हणजे औषध पाठवितो. ते दिवसांतून तीन वेळा दारूतून द्यायचं! दारूचा सारखा मारा ठेवावा लागेल!
वैद्य - हे आमचं औषध. हे तीन दिवसांतून एकदा घ्यायचं, पथ्य दारू न पिण्याचं! दारूच्या थेंबाचा स्पर्श यांना होता कामा नये!
तळीराम - दारूचा स्पर्श नको? असं काय? शास्त्रीबुवा, उठवा या दोघांनाही! दारूचा स्पर्श नको काय? हं चला, उठा! डॉक्टर, तुमचं काय औषध आहे ते पाठवा आणि बाकीचा सारा दवाखाना त्या वैद्याला पाजा आणि वैद्यबुवा, तुम्ही आपला सारा आयुर्वेद या डॉक्टरच्या घशात कोंबा! चला निघा! (ते दोघे जातात.) काय नशिबाचा खेळ आहे पाहा! औषधासाठी दारू प्यायला सुरुवात केली तो दारूसाठी औषध पिण्यावर मजल येऊन ठेपली! खुदाबक्ष, काढा काही शिल्लक असेल तर! बस्स झाला हा पोरखेळ! (ते दारू आणतात; सर्वजण पिऊ लागतात.)
सुधाकर - थांबा, सगळी संपवू नका. असेल नसेल तेवढी दारू आता मला पाहिजे आहे. (एक खुर्ची, टेबल, दोन तीन शिसे वगैरे घेऊन पुढे येतो व पेला भरतो.)
शास्त्री - का, खुदाबक्ष? आमचं म्हणणं खरं झालं की नाही? सुधाकर, तुझ्या स्वभावाची परीक्षा बरोबर झाली होती ना? तुझी प्रतिज्ञा फुकट गेली.
सुधाकर - (पेला भरीत) माझ्या जोडीदार मूर्खांनो, तुम्हाला माझ्या स्वभावाची परीक्षा झाली असे नाही. पण मला माझ्या दुर्दैवाची परीक्षा झाली नाही! मित्रहो, बोलल्या न बोलल्याची एकदा मला माफी करा, पण या वेळी मला छेडू नका! जखमी झालेल्या सिंहाचं विव्हळणं ऐकूनसुध्दा भेकड सावजांना दूर व्हावं लागतं! मला हसायचं आहे? माझी कुचेष्टा करायची आहे? करा, खुशाल करा. पण एका बाजूला जाऊन करा! (सर्वजण मागे जातात. यानंतरचा प्रवेश शेवटच्या पडद्यावर.) सुधाकर ज्या रस्त्यानं जाणार आहे, तिथं संगतीसोबतीची त्याला जरुरी नाही. ये, मदिरे, ये. मदिरे, तू देवता नाहीस, हे सांगायला जगातल्या पंडितांचा तांडा कशाला हवा? तुझ्या जुलमी जादूनं जडावलेल्या जनावरालासुध्दा कळतं, की तू एक राक्षसी आहेस! तू घातकी राक्षसी आहेस! तू क्रूर राक्षसी आहेस! पण तू प्रामाणिक राक्षसी आहेस! गळा कापीन म्हणून म्हटल्यावर तू गळाच कापीत आली आहेस! घरादाराचा सत्यानाश करण्याचं वचन देऊन तू कधी अन्यथा कृती केली नाहीस! मृत्यूच्या दरवाज्यापर्यंत सोबत करण्याचं कबूल केल्यावर तू कधी माघार घेत नाहीस! सुंदर चेहेर्याचं तुझ्यामुळं भेसूर सोंग झालं तरी त्या चेहेर्याची तुला चटकन ओळख पटते! तू एखाद्याचं नाव बुडविलंस तरी अनोळखी पाजीपणानं तू त्याचं नाव टाकीत नाहीस! चल, मदिरे! आपल्या अघोर, घातुक शक्तीनं, सुधाकराच्या गळयाला मगरमिठी मार! मग या कंठालिंगानं सुधाकराचे प्राण कंठाशी आले तरी बेहत्तर! (भराभर पेले पितो. रामलाल येतो व सुधाकराच्या हातातला पेला घ्यावयास जातो.) बेअकली नादान! दूर हो- खबरदार एक पाऊल पुढं टाकशील तर! जा रामलाल, कोवळया पाडाचाच अघोर घास ओढून काढण्यासाठी आधी वाघाच्या उपाशी जबडयात हात घाल; आणि मग माझ्या समोरचा हा प्याला उचलण्यासाठी आपला तो हात पुढं कर!
रामलाल - अरेरे, सुधा, तुझ्या निश्चयाबद्दल सिंधूताईचा निरोप ऐकून मी मोठया आशेनं रे इथं आलो आणि तू हा प्रकार दाखविलास?
सुधाकर - त्यापेक्षाही मोठया आशेनं मी तो निश्चय केला होता; पण-
रामलाल - पण, पण-पण काय कपाळ? सोड, सुधा, अजून तरी ही दारू सोड रे-
सुधाकर - आता सोड? इतके दिवस दारू प्याल्यावर- वेडया, इतके दिवस कशाला? एकदाच प्याल्यावर दारू सोड? वेडया, दारू ही अशीतशी गोष्ट नाही की, जी या कानानं ऐकून या कानानं सोडून देता येईल! दारू ही एखादी चैनीची चीज नव्हे, की शोकाखातर तिची सवय आज जोडता येईल आणि उद्या सोडता येईल! दारू हे एखादे खेळणे नव्हे, की खेळता खेळता कंटाळून ते उशापायथ्याशी टाकून देऊन बिनधोक झोप घेता येईल! अजाण मुला, दारू ही एक शक्ती आहे, दारू हे काळाच्या भात्यातलं अस्त्र आहे. दारू ही जगाच्या चालत्या गाडयाला घातलेली खीळ आहे. दारू ही पोरखेळ करता येण्यासारखी क्षुद्र, क्षुल्लक वस्तू असती, तर तिच्याबद्दल एवढा गवगवा जगात केव्हाच झाला नसता! हजारो परोपकारी पुरुषांनी आपल्या देहाची धरणं बांधली तरीसुध्दा जिचा अखंड ओघ चारी खंडांत महापुरानं वाहत राहिला, वेदवेदांची पानं जिच्या ओघावर तरंगत गेली, कठोर शक्तीचे मोठाले राजदंड जिच्या गळयात रुतून बसले, ती दारू म्हणजे काही सामान्य वस्तू नव्हे! दारूची विनाशक शक्ती तुला माहीत नाही! मुसळधार कोसळणार्या पावसात टिकाव धरून राहणारी इमारत दारूच्या शिंतोडयांनी मातीला मिळेल! दारूगोळयांच्या तुफानी मार्यासमोर छाती धरणारे बुरुज, या दारूच्या स्पर्शानं गारद होऊन जमीनदोस्त पडतील! फार कशाला, पूर्वीचे जादूगार मंतरलेले पाणी शिंपडून माणसाला कुत्र्या-मांजर्याची रूपं देत असत. ही गोष्ट तुझ्यासारख्या शिकल्या-सवरलेल्या आजच्या पंडिताला केवळ थट्टेची वाटेल; पण रामलाल, दारूची जादू तुला पाहायची असेल, तर तुला वाटेल तो बत्तीसलक्षणी आणि सर्व सद्गुणी पुरुष पुढं उभा कर आणि त्याच्यावर दारूचे चार थेंब टाक; डोळयाचं पातं लवतं न लवतं तोच तुला त्या मनुष्याचा अगदी पशू झालेला दिसू लागेल! अशी ही दारू आहे, समजलास?
रामलाल - तुझ्या मनोनिग्रहानं, तुझ्या विचारशक्तीनं,- सुधा, सुधा, तू मनात आणल्यावर तुला काय करता येणार नाही? दारू कितीही अचाट शक्तीची असली तरी तिच्या पकडीतून तुला खात्रीनं सुटता येईल- आपल्या निश्चयाची नीट आठवण कर!
सुधाकर - कसला कपाळाचा तो निश्चय! दारूच्या बेशुध्दीत घोंगडीवर घरघरत पडलेल्या आसन्नमरणानं, शेवटच्या नजरेनं, एखाद्याला सावधपणानं ओळखल्यासारखं केलं, तर जीवनकलेच्या तशा तुटल्या आधारावर विवेकी पुरुषानं भरवसा ठेवून भागत नाही. आजपर्यंत मलासुध्दा असंच वाटत होतं; पण भाई, आता माझी पुरी खात्री झाली आहे की, दारूच्या पेचातून मनुष्याची कधीही सुटका व्हायची नाही! रामलाल, नदीच्या महापुरात वाहताना गारठयानं हातपाय आखडल्यावर, नदीत खात्रीनं आपला जीव जाणार, अशी जाणीव झाली तर बुडत्याला त्या पांगळया हातापायांनी ओघाच्या उलट पोहून नदीतून बाहेर येता येईल का? भडकलेल्या गावहोळीच्या फोफोटयात भाजून निघताना, जीव जाण्याची धास्ती वाटली तरी जळत्याला त्या जात्या जिवाच्या शेवटच्या श्वासांचे फुंकर मारून ती भोवतालची आग विझविता येईल का? मग या दोन्ही महाभूतांच्या ओढत्या-जळत्या शक्ती जिच्यांत एकवटल्या आहेत, त्या दारूच्या कबज्यात गळयापर्यंत बुडाल्यावर प्रत्यक्ष ईश्वरी शक्ती लाभली तरी मरत्याला बाहेर कसं येता येईल? रामलाल, दारूची सवय सुटण्याची एकच वेळ असते आणि ती वेळ म्हणजे प्रथम दारू पिण्यापूर्वीचीच! पहिला एकच प्याला-- मग तो कोणत्या का निमित्तानं असेना- ज्यानं एकदा घेतला तो दारूचा कायमचा गुलाम झाला! निव्वळ हौसेनं जरी दारूशी खेळून पाहिलं तरी दिवाळीचा दिवा भडकून होळीचा हलकल्लोळ भडकल्यावाचून राहायचा नाही! रामलाल, दारूची कुळकथा एकदाच नीटपणानं ऐकून घे! दम खा! मला एकदा- (पेला भरून पितो. रामलाल तोंड खाली करतो.) बस्स, ऐक आता नीट! प्रत्येक व्यसनी मनुष्याच्या दारूबाज आयुष्याच्या संमोहावस्था, उन्मादावस्था व प्रलयावस्था अशा तीन अवस्था हटकून होतात. या प्रत्येक अवस्थेची क्रमाक्रमानं सुरुवात एकच प्याला नेहमी करीत असतो. प्रत्येक दारूबाजाची दारूशी पहिली ओळख नेहमी एकच प्यालानं होत असते! थकवा घालविण्यासाठी, तंदुरुस्तीसाठी, कुठल्याही कारणामुळं का होईना, शिष्टाचाराचा गुरुपदेश म्हणून म्हण किंवा दोस्तीच्या पोटी आग्रह म्हणून म्हण, हा एकच प्याला नेहमी नवशिक्याचा पहिला धडा असतो! एखादा अक्षरशत्रू हमाल असो; किंवा कवींचा कवी, आणि संजीवनी विद्येचा धनी एखादा शुक्राचार्य असो; दोघांचाही या शास्त्रातला श्रीगणेशा एकच- हा एकच प्याला! दारूच्या गुंगीनं मनाची विचारशक्ती धुंदकारल्यामुळं मनुष्याला मानसिक त्रासाची किंवा देहाच्या कष्टाची जाणीव तीव्रपणानं होत नाही, आणि म्हणून या अवस्थेत दारूबाजाला दारू नेहमी उपकारी वाटत असते. जनलज्जेमुळं आणि धुंद उन्मादाच्या भीतीमुळं- समजत्या उमजत्या माणसाला घटकेपुरतीसुध्दा बेशुध्दपणाची कल्पना अजाणपणामुळं फारच भयंकर वाटत असते आणि म्हणून सुरुवातीला जनलज्जेइतकीच नवशिक्या दारूबाजाला गैरशुध्दीची भीती वाटत असते! अशा दुहेरी भीतीमुळं या अवस्थेत मनुष्य, दुष्परिणाम होण्याइतका अतिरेक तर करीत नाहीच; पण आपल्याला पाहिजे त्या बेताची गुंगी येईल इतक्या प्रमाणातच नेहमी दारू पीत असतो. आणि म्हणून संमोहावस्थेत दारूबाजाला प्रमाणशीर घेतलेली दारू हितकारक आणि मोहकच वाटते! दारूच्या दुसर्या आणखी तिसर्या परिस्थितीतले दुष्परिणाम त्याच्या इष्टमित्रांनी या वेळी दाखविले म्हणजे ते त्याला अजिबात खोटे, अतिशयोक्तीचे किंवा निदान दुसर्याच्या बाबतीत खरे असणारे, वाटू लागतात. सुरुवातीच्या प्रमाणशीरपणामुळं स्वत:चं व्यसन त्याला शहाण्या सावधपणाचं वाटतं आणि अवेळी दाखविलेली ही चित्रं पाहून, आपले इष्टमित्र भ्याले असतील किंवा आपल्याला फाजील भिवविण्यासाठी ती दाखविली जातात, अशी तरी स्वत:ची मोहक फसवणूक करून घेऊन दारूबाज आपल्या उपदेशकांना मनातून हसत असतो. याच अवस्थेतून न कळत आणि नाइलाजानं पुढच्या अवस्था उत्पन्न झाल्यावाचून राहात नाहीत. हे दुर्दैवी सत्य या वेळी मनुष्याला पटत नाही, आणि तो आपलं व्यसन चालू ठेवतो! परंतु मनुष्याच्या मनावर आणि शरीरावर सवयीचा जो परिणाम होतो तोच तितक्यामुळे उद्या होत नाही आणि म्हणून दारूबाजाला रोजच्याइतकी गुंगी आणण्यासाठी कालच्यापेक्षा आज आणि आजच्यापेक्षा उद्या अधिक दारू पिण्याचं प्रमाण अधिक वाढवीत न्यावं लागतं! या संमोहावस्थेच्या शेवटच्या दिवसांत तर हे प्रमाण वाढत वाढत इतक्या नाजूक मर्यादेवर जाऊन ठेपलेलं असतं, की बैठक संपल्यानंतर एकच प्याला अधिक घेतला तर तो अतिरेकाचा झाल्यावाचून राहू नये! या सावधपणाच्या अवस्थेची मुख्य खूण हीच असते, की अगदी झोप लागण्याच्या वेळी मनुष्य पूर्ण सावध असतो. निशेचा थोडासा तरी अंमल असेल अशा स्थितीत त्याला झोप घेण्याचा धीर होत नाही. अशा स्थितीत एखाद्या दिवशी कुठल्या तरी कारणामुळे विशेष रंग येऊन मित्रमंडळी एकमेकांना आग्रह करू लागतात. आपण होऊन आपल्या प्रमाणाच्या शुध्दीत राहण्याच्या कडेलोट सीमेवर जाऊन बसलेल्या दारूबाजाला त्या बैठकीचा शेवटचा म्हणून आणखी एकच प्याला देण्यात येतो. संमोहावस्था संपून उन्मादावस्था पहिल्यानं सुरू करणारा असा हा एकच प्याला! बरळणं, तोल सोडणं, ताल सोडणं, कुठं तरी पडणं, काहीतरी करणं या गोष्टी या अतिरेकामुळे त्याच्याकडून घडू लागतात. रामलाल, ही भाकडकथा ऐकून कंटाळू नकोस. या पुढच्या अवस्थांत जितक्या जलदीनं दारू मनुष्याचं आख्यान आटोपतं घेत जाते, तितक्याच जलदीनं मी दारूचं आख्यान आटोपतं घेतो. या उन्मादावस्थेत दररोज मनुष्याला भरपूर उन्माद येईपर्यंत दारू घेतल्याखेरीज चैन पडत नाही आणि समाधान वाटत नाही. इतक्या दिवसांच्या सरावामुळे शरीर आणि मन यांना जगण्यासाठी दारू ही अन्नापेक्षा अधिक आवश्यक होऊन बसते. या उन्मादावस्थेत निशेच्या अतिरेकामुळे वेळोवेळी अनाचार आणि अत्याचार घडतात. सावधपणाच्या काळी पश्चात्तापामुळे तो हजारो वेळा दारू सोडण्याची प्रतिज्ञा करतो, आणि कमकुवत शरीराच्या गरजेमुळे तितक्याच वेळा त्या प्रतिज्ञा मोडतो. कंगाल गरिबी आणि जाहीर बेअब्रू यांच्या कैचीत सापडून तो दारू सोडण्याचा प्रयत्न करतो आणि निर्जीव शरीर आणि दुबळे मन यांच्या पकडीत सापडून तो अधिकाधिक पिऊ लागतो. पहिल्या अवस्थेत मनुष्य दारूला सोडीत नाही; आणि या अवस्थेत दारू मनुष्याला सोडीत नाही. मद्यपानाचे भयंकर दुष्परिणाम भावी काळी आपल्याही ठिकाणी शक्य आहेत अशी दूरदृष्टीने भाग्यशाली जाणीव झाली तर एखादा नवशिका दारूबाज अतिशय करारीपणानं, पोलादी निश्चयानं आणि अनिवार विचारशक्तीनं पहिल्या अवस्थेत असताना एखादे वेळी तरी दारूचं व्यसन सोडायला समर्थ होईल. पण या दुसर्या अवस्थेत काही दिवस घालविल्यानंतरही दारूच्या पकडीतून अजिबात सुटणारा मनुष्य मात्र अवतारी ताकदीचा, ईश्वर शक्तीचा, आणि लोकोत्तर निग्रहाचाच असला पाहिजे. उत्तरोत्तर अनाचार वाढत जातात आणि त्यानंतरचे पश्चात्तापाचे क्षण मनाला सहन होईनासे होतात. अशा वेळी जगात तोंड दाखवायला वाटणारी लाज कोळून पिण्यासाठी निर्लज्जपणानं दारू कधीही सुटणार नाही. आणि पश्चात्तापामुळे पिळून काढणारा सावधपणाचा एकही क्षण आपल्याजवळ न येऊ देण्याच्या निश्चयानं अष्टौप्रहर आणखी अखंड गुंगीत पडून राहण्यासाठी म्हणून तो एकच प्याला घेतो; दारू न पिण्याची प्रतिज्ञा मोडतो; आणि पुन्हा तशी प्रतिज्ञा करीत नाही. हा एकच प्याला म्हणजे तिसर्या प्रलयावस्थेची सुरुवात! भाई, आज सकाळी सिंधूजवळ प्रतिज्ञा करताना मला मूर्खाला कल्पनासुध्दा झाली नाही, की आजच्या दिवशीच माझ्या आयुष्याची प्रलयावस्था सुरू होणार आहे! सकाळची सिंधूची आनंदी मुद्रा, तो आनंदाश्रू, मिटत चाललेल्या माझ्या डोळयांतली अखेरच्या आशेची ती निस्तेज लकाकी, वेडया आशेच्या भरात, आम्ही दोघांनी चुंबन घेतल्यामुळं बाळाच्या कोवळया गालावर आलेली लाली- भाई, आमच्या चिमुकल्या जगातला तो शेवटचा आनंद- तो आनंद - जाऊ दे या एकच प्याल्यात! (दारू पितो.) वेडया, आता वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही. इतका वेळ मी ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या म्हणून अजाण जिवा, तुला थोडीशी आशा का वाटू लागली आहे? माझं हे ब्रह्मज्ञान पश्चात्तापाचं नाही; ते विषारी निराशेचं आहे. माझ्या दारूबाज आयुष्यातली ही तिसरी प्रलयावस्था आहे. पहिल्या अवस्थेत मनुष्य दारूला सोडीत नाही. दुसर्या अवस्थेत दारू मनुष्याला सोडत नाही, आणि तिसर्या अवस्थेत दोघेही एकमेकांला सोडीत नाहीत. या अवस्थेत दारू आणि मनुष्य यांचा इतका एकजीव झालेला असतो की, जीव जाईपर्यंत त्यांचा वियोग होत नाही. अष्टौप्रहर दारूच्या धुंदीत पडला असता त्या धुंदीच्या गुंगीतच एखादा रोग बळावल्यामुळं म्हण, एखाद्या मानसिक आघातामुळं म्हण किंवा आकस्मिक अपघातामुळं म्हण; त्याचा एकदाचा निकाल लागतो. आणि तो निकाल जवळ आणण्यासाठी अशी भराभर दारू घेत बसणं, एवढंच या जगात माझं काम आहे. हा एक- आणखी एक- बस्स, आणखी एकच प्याला! (पुन्हा भराभर पितो.)
रामलाल - सुधा, सुधा, काय करतो आहेस हे तू?
सुधाकर - काय करतो आहे मी? ऐक, रामलाल! तू माझा जिवलग मित्र, निस्सीम हितकर्ता आहेस; पण तुझ्याहूनही माझा एक अधिक निस्सीम हितकर्ता- माझाच नाही, एकंदर जगाचा- जीवमात्राचा एक जिवलग मित्र, निस्सीम हितकर्ता आहे. त्याच्या सन्मानाचा मी प्रयत्न करीत आहे. ज्याच्यापुढं धन्वन्तरीनंसुध्दा हात टेकले आहेत; अशा रोग्याच्या यातनांनी तळमळणार्या जिवाला अखेर कोण हात देतो? मृत्यू! दुष्काळाच्या उपासमारीमुळं तडफडून केविलवाण्या नाइलाजानं एकमेकांकडे पाहणार्या मायलेकरांच्या दु:खाचा शेवट कशानं होतो? मृत्यूनं! आपल्या जुलमी जोरानं जीवकोटीला त्राही त्राही करून सोडणार्या नराधमाच्या नाशासाठी निराश मनुष्यजाती अखेर कोणाच्या तोंडाकडे पाहते? मृत्यूच्या! तो मृत्यू तुला आणि मला भेटण्यासाठी यायचाच! अशा परोपकारी काळपुरुषाला दोन पावलं आणायला गेलं तर त्यात आपली माणुसकी दिसून येऊन त्याचे तेवढे कष्ट वाचतील. अशा रीतीनं यमाला सामोरा जाण्यासाठी या दुबळया देहात मी दारूनं थकवा आणीत आहे. रामलाल, दुसर्याचा नाश केल्यामुळं आपल्याला खून चढतो खरा; पण मी ही आत्महत्या करीत आहे, तिचाच मला खून चढत चालला आहे! भल्या मनुष्या, खुनी इसमासमोर उभं राहणं धोक्याचं असतं! (पुन्हा पितो.)
रामलाल - पण असा जिवाचा त्रागा करायचं काय कारण आहे?
सुधाकर - काय कारण? एकच कारण- आणि तेही हा एकच प्याला!
रामलाल - एकच प्याला- एकच प्याला- या एकच प्याल्यात आहे तरी काय एवढं?
सुधाकर - या एकच प्याल्यात काय आहे म्हणून विचारतोस? भाई, अगदी वेडा आहेस! या एकच प्याल्यात काय काय नाही म्हणून तुला वाटतं? (प्याला भरून) हा पाहा एकच प्याला! हा भरलेला आहे खरा! यात काय दिसतं आहे तुला? रामलाल, मनुष्याच्या आयुष्यात निराशेचा शेवटचा असा काल येतो, की ज्या वेळी जीविताची आठवण मोहानं त्याला फसवू शकत नाही आणि मरणाच्या खात्रीमुळं तो स्वत:च्या देहावर मृत्यूच्या दरबाराची सत्ता कबूल करायला लागतो- मृत्यूच्या भयानक स्वरूपाशी मनुष्याशी दृष्टी परिचयानं एकरूप होताच, तो क्षणभंगुर जगाकडे काळाच्या क्रूरपणानं पाहू लागतो. मनुष्यहृदयातल्या सहज काव्यस्फूर्तीतही हा दृष्टीतला क्रूरपणा खेळू लागतो. अशा वेळी तीव्र निराशेनं कडवटलेल्या मृत्यूच्या क्रूर काव्यदृष्टीनं पाहताना सुंदर वस्तूंबद्दलसुध्दा भयाण कल्पना आठवतात. त्या दृष्टीनं पाहताना, आईच्या मांडीवर समाधानानं स्तनपान करणारं मूल दिसलं, की ते तिथल्या तिथे मेलं तर त्या आईला काय दु:ख होईल, असं चित्र अशा क्रूर कल्पनेपुढं उभं राहतं! हळदीनं भरलेली नवी नवरी पाहताच वपनानंतर ती कशी दिसेल याबद्दल कल्पना विचार करू लागते! रामलाल, मी हल्ली त्या अवस्थेत आहे आणि माझ्या कल्पनेला मद्यपानाच्या ज्योतीची ज्वाला प्रदीप्त करीत आहे. अशा वेळी मी उचंबळून बोलत आहे! आता माझ्या दृष्टीनं या एकच प्याल्यात काय भरलेलं आहे ते पाहा! पृथ्वीनं आपल्या उदरीच्या रत्नांचा अभिलाष केल्यामुळे खवळलेल्या सप्तसमुद्रांनी आपल्या अवाढव्य विस्तारानं पृथ्वीला पालाण घालण्याचा विचार केला; त्या जलप्रलयाच्या वेळी कूर्मपृष्ठाच्या आधारावर पृथ्वीनं आपला उध्दार केला! पुढे विश्वाला जाळण्याच्या अभिमानानं आदित्यानं बारा डोळे उघडले! त्या अग्निप्रलयात एका वटपत्रावर चित्स्वरूप अलिप्त राहून त्यानं सारी सृष्टी पुन्हा शृंगारली! उभयतांच्या या अपमानामुळं अग्नि आणि पाणी यांनी आपापलं नैसर्गिक वैर विसरून सजीव सृष्टीच्या संहाराचा विचार केला! परीक्षितीचा प्राण घेण्यासाठी मत्सराच्या त्वेषानं तक्षकानं बोरातल्या आळीचं रूप घेतलं, त्याप्रमाणे खवळलेले सप्तसमुद्र सुडाच्या बुध्दीनं या इवल्याशा टीचभर प्याल्यात सामावून बसले; आणि आदित्यानं आपली जाळण्याची आग त्यांच्या मदतीला दिली! मनुष्याच्या दृष्टीला भूल पाडणारा मोहकपणा आणण्यासाठी, तरण्याताठया विधवांच्या कपाळाचं कुंकू कालवून या बुडत्या आगीला लाल तजेला आणला! या एकाच प्याल्यात इतकी कडू अवलादीची दारू भरली आहे! नीट बघितलीस ही दारू? (प्याला पितो.) आता या रिकाम्या प्याल्यात काय दिसतं तुला? काही नाही? नीट पाहा, म्हणजे श्रीकृष्णाच्या तोंडात विश्वरूपदर्शनप्रसंगी यशोदेला जे चमत्कार दिसले नसतील, ते या रिकाम्या प्याल्यात तुझ्या दृष्टीला दिसतील! काबाडकष्ट उपसून आलेला थकवा घालविण्याच्या आशेनं दारू पिणार्या मजुरांच्या या पाहा झोपडया! निरुद्योगाचा वेळ घालविण्यासाठी म्हणून दारू पिणार्या श्रीमंतांच्या या हवेल्या! केवळ प्रतिष्ठितपणाचं लक्षण म्हणून चोचल्यानं दारू प्यायला शिकलेल्या, शिकलेल्या पढतमूर्खाचा हा तांडा! अकलेच्या मार्गानं न साधणारी गोष्ट मजलशीत एखाद्याजवळून साधून घेण्यासाठी धूर्ततेनं त्याच्याबरोबर म्हणून थोडीशी घ्यायला लागून पिता पिता शेवटी स्वत:ही बुडालेल्या व्यवहारपंडितांची ही पागा! उद्योगी, गरीब, आळशी श्रीमंत, साक्षर पढतमूर्ख, निरक्षर व्यवहारी सर्वांना सरसकट जलसमाधी देणारा हा पाहा एकच प्याला! दारूबाज नवर्याच्या बायकांची ही पाहा पांढरी फटफटीत कपाळं! दारूबाजांच्या पोरक्या पोरांच्या या उपासमारीच्या किंकाळया, कर्त्यासवरत्या मुलांच्या अकाली मरणानं तळमळणार्या वृध्द मातापितरांचं विव्हळणं! चोरीस गेलेल्या चौदा रत्नांच्या मोबदल्यासाठी या एकच प्याल्यात सामावलेल्या सप्तसमुद्रांनी दारूच्या रूपानं भूमातेची कैक नररत्न अकाळी पचनी पाडली! स्त्रीजातीला नटविण्यासाठी समुद्राच्या उदरातून जितकी मोती बाहेर निघाली त्याच्या दसपट आसवांची मोती दारूमुळं स्त्रीजातीनं या एकच प्याल्यात टाकली आहेत! बेवारशी बायकांची बेअब्रू, बेशरम बाजारबसव्यांची बदचाल, बेकार बेरडांची बदमाषी! बेचिराख बादशहाती, जिवलग मित्रांच्या मारामार्या, दंगलबाजी, खून- रामलाल, हा पाहा, जगावर अंमल चालविणारा बादशाहा सिकंदर, दारूच्या अमलाखाली केवळ मारेकरी बनून आपल्या जिवलग मित्राचा खून करीत आहे! तो पाहा, मेलेल्याला सजीव करणारा दैत्यगुरू शुक्राचार्य, आपल्या त्या संजीवनीसह या एकच प्याल्यात बुडून अध:पात भोगीत आहेत! (पेल्यात दारू भरू लागतो; रामलाल त्याचा हात धरू लागतो.) हट्टी मूर्खा, अजून माझा हात धरतोस! आता माझा हात धरून काय फायदा होणार? अजून तुला हा एकच प्याला थट्टेचा वाटतो का? रामलाल, अनादिकालापासून समुद्रात बुडालेली जहाजं; मनुष्यसंसाराचा अफाट पसारा, ही सारी एकवटून लक्षात आणली म्हणजे सामान्य मनुष्यबुध्दीला त्या सर्वांनी गजबजलेला समुद्राचा तळ भयानक वाटू लागतो. भाई, तू बुध्दिवान आहेस आणि कल्पकही आहेस. माझ्या हातातला हा लहानसा एकच प्याला तुझ्या कल्पनेच्या विश्वात इतका मोठा होऊ दे, की या सुंदर जगाचा जितका भाग त्या पेल्याच्या तळाशी रुतून बसला आहे, तो तुझ्या डोळयांसमोर नाचू लागेल. तुझी दृष्टी भेदरू लागली, तरळू लागली! रामलाल, हाच तो विराट्स्वरूप एकच प्याला! रामलाल, हे उग्र आणि भयानक चित्र नीट पाहून ठेव. माझ्या हातचा पेला काढून घेण्याच्या भलत्या भरीला पडू नकोस. परोपकारी मनुष्या, इतका वेळ घसा फोडून तुझ्या कल्पनेपुढं हा विराट्स्वरूप एकच प्याला मूर्तिमंत उभा केला, तो या सुधाकरासाठी नव्हे. जा, सार्या जगात तुझ्या वैभवशाली वाणीनं हे मूर्तिमंत चित्र हा विराट्स्वरूप एकच प्याला- अशा उग्र स्वरूपात प्राणिमात्राच्या डोळयांपुढं उभा कर! चारचौघांच्या आग्रहानं, किंवा कुठल्याही मोहानं फसलेला एखादा तरुण पहिला एकच प्याला ओठाशी लावतो आहे तोच हा विराट्स्वरूप एकच प्याला त्याच्या डोळयांपुढं उभा राहून त्याच्या भेदरलेल्या हातांतून तो पहिला एकच प्याला गळून पडला आणि खाली पडून असा खळ्कन भंगून गेला, तरच या सुधाकराचा दारूत बुडालेला जीव सप्तपाताळाच्या खाली असला तरी समाधानाचा एक नि:श्वास टाकील! रामलाल, यापुढं हे तुझं काम आणि हे माझं काम! (पितो.)
रामलाल - सुधाकर, डोळयांनी पाप पाहावत नाही म्हणतात, पण आता यापुढं मात्र-
सुधाकर - प्रतिज्ञा पुढं बोलूच नकोस; म्हणजे ती मोडल्याचं पाप लागणार नाही. भाई, माझं दारूचं व्यसन एक वेळ सुटेल, पण माझं व्यसन सोडविण्याचं वेड तुझ्या डोक्यातून मात्र जाण्याचं कठीण दिसतं. रामलाल, एकच प्याला, एकच अनुभव- केवळ दारूपुरताच हा सिध्दांत मी तुला सांगितला नाही. मोहाची जी जी वस्तू असेल, त्या प्रत्येकीच्या बाबतीत हाच सिध्दांत आहे. स्त्रियांची गोष्ट घे; एखाद्या स्त्रीकडे कित्येक वेळा पाहिलं- दयेनं पाहा, ममतेनं पाहा- जाऊ दे- रामलाल, तू शहाणा आहेस, आणि शरद- माझी ती बहिणच आहे- तू तिला मनापासून मुलगी मानलीच आहेस. चांडाळाच्या मनातसुध्दा इथं पापाची कल्पना येणार नाही ना? लाख वेळा तू तिच्याकडे निर्दोष दृष्टीनं पाहिलं आहेस ना? - जा, बोलण्याच्या भरात बेसावधपणानं तिच्या अंगाला एकदा नुसता स्पर्श कर! भाई, एकच स्पर्श- पण तेवढयानं माणुसकीचं मातेरं होऊन, तू जन्माचा पशू होशील!
रामलाल - (स्वगत) एकच प्याला! एकच स्पर्श! शब्दाचं शहाणपण शिकवायला म्हणून मी इथं आलो! आणि शहाणपणाचे शब्द शिकून परत चाललो! एकच प्याला! एकच स्पर्श! एकच कटाक्ष! मोहाच्या कोणत्याही वस्तूचा पहिला प्रसंग पहिला प्रसंगच टाळला पाहिजे- नंतर सावधपणानं वागणं म्हणजे जन्माचा पशू! शरदचा एकच स्पर्श! पशू! (उघड) सुधा, आधी घरी चल. (जातात.)