दमयंतीचा महाल . दमयंती मंचकावर गाणे गात बसलेली आहे . तिची सखी केशिनी वीणेवर तिला साथ करीत आहे .
पद १ -
जिल्हा खमाज , ताल पंजाबी .
मधुमधुरा तव प्रतिमा स्नेहला
भासे शिवाची मूर्ति मला ॥ध्रु . ॥
लोकपालजित् म्हणूनि विश्वी ख्याति
वसुपति हाचि खरा ही कीर्ती ॥१॥
पुण्यश्लोक परि दुसराच विश्वीं
पावला हे नवल होई भुवीं ॥२॥
गाणे संपल्यावर दमयंती सखीला वीणा ठेवून देण्यास सांगते . सखी गेल्यावर दमयंती एकटीच विचार करीत बसते . इतक्यात नलराजा येतो .
नलराज - राणी सरकारांचा जयजयकार असो .
दमयंती - ( उठून उभी रहात ) इश्श्य ही काय थट्टा ? म्हणावं तरी काय माणसांना ?
नल - काय वाटेल ते म्हण . सख्या , प्रियकरा , नाथा , - नला म्हटलंस तरी चालेल . - बरं ते जाऊ दे . पण राणी सरकार येवढ्या कसल्या विचारात पडल्या होत्या ?
ते आम्हाला सांगण्याची कृपा होईल कां ? ( स्वतः मंचकावर बसत ) हे काय ?
उभ्या कां ? बसा ना सरकार !
दमयंती - इश्श्यं ! त्यात कसली कृपा ? सांगू कां ? आत्ता किनई मला एक सुंदर स्वप्न पडत होतं .
( बसत )
नल - असं ? मला तर तूं झोंपलेली दिसत नव्हतीस आणि मला वाटतं स्वप्न केवळ झोंपेतच पडतात .
दमयंती - हो , हो ! मला पण ते माहितीय . पण हे स्वप्न जागेपणीच पडलं होतं . लग्न व्हायच्या आधी आपल्यालाहि अशीच
( खिजवून ) जागेपणची स्वप्नं पडत होती हे मला कळलंय बरं कां ! चांगली भर दिवसा स्वप्नं पडायची .
नल - अगं , पण तेव्हा मी दुपारी झोपत असे , म्हणून पडत असतील कदाचित् ! बरं , राहूं दे ते . पण कसलं स्वप्न पडलं ते तर सांग .
दमयंती - सांगूं ? खरंच ? पण थट्टा नाही करायची गडे .
नल - ते पाहूं पुढे .
दमयंती - अंहं , मग आम्ही नाही सांगत जा .
नल - बरं राहिलं . नाही करणार थट्टा ; मग तर सांगशील ?
दमयंती - हो ऽऽ सांगते . स्वयंवराच्या वेळचा सगळा देखावा मला आता दिसत होता . इंद्र , अग्नि , वरुण आणि यमराज या चार दिक्पालांचे दूत होऊन आपण माझं मन वळवण्याचा प्रयत्न करुन गेला होतात . त्यामुळे विषण्णतेचं एक दाट पटल माझ्या मनाभोवती पसरलं होतं -
नल - एकूण आपण आता भूतकाळात वावरत होतात तर .
दमयंती - हं ! आणि त्या शून्य मनः स्थितीतच स्वयंवर मंडपाच्या जवळच्या महालात आपल्या वाटेकडे डोळे लावून बसले होते मी . आधीच्या त्या प्रसंगामुळे आपण स्वयंवराला याल कि नाही याचीच मला खात्री होत नव्हती . त्यामुळे अनेक शंका कुशंकांनी मला पछाडलं . एकदा वाटलं आपल्याला त्या लोकपालांनी आडवलं तर नसेल ? पण आपणाला या त्रिभुवनात कुणीच प्रतिबंध करु शकणार नाही असाहि मला विश्वास होता . त्यामुळे दुसरंच एक संशयपिशाच्च माझ्या मनात घर करु लागलं .
नल - कोणतं बरं हे नवीन पिशाच्च ?
दमयंती - मला वाटलं की आपलं मनच तर माझ्यावरुन उडालं नसेल ? -
नल - वेडे , असं वाटलं तरी कसं ?
दमयंती - कसं न् काय ? वाटलं खरं . पण ती कल्पनाच मला सहन होईना , आणि तिचं निराकरणहि होईना .
नल - मग अगदी हवालदिल झाल्या असतील बाईसाहेब .
दमयंती - हो ना . स्वयंवराची वेळ झाली तरी आपला पत्ता नाही . माझ्या सख्यांनाहि आपण कोठे दिसला नाही . त्यामुळे आपलं मन खरोखरीच माझ्यावरुन उडालं ; म्हणूनच आपण आला नाहीत ; असं मला नक्की वाटू लागलं . त्या निराशेच्या झटक्यात स्वयंवरच स्थगित करा असं मी बाबांना सांगणार होते .
नल - मग सांगितलं कां नाही ?
दमयंती - हे हो काय मधेच ? अशानं मी काही सांगणार नाही हं .
नल - बरं बुवा ! गप्प बसतो . पुढे काय झालं ?
दमयंती - नंतर आईबाबांनी आणि सखीनं मन वळवलं . म्हणून स्वयंवरमाला घेऊन मंडपात आले कशीबशी मी ! आणि बघते तों काय आश्चर्य ? एक सोडून पांच नल मला दिसले तिथं . दिक्पालांचा कावा माझ्या ध्यानीं आला . आता तुम्हालाच बरोबर कसं ओळखायचं ? मी तर अगदी गोंधळून गेले .
नल - अगं पण देव आणि मनुष्य यातला फरक तुला कळत नव्हता कां ? देवांचे गुण -
दमयंती - हो ऽ , मी निरखून पाहिलं ; पण देवांचा एकहि गुण मला त्यांच्यात दिसेना . त्यांची आसनं भूमीला टेकलेली होती , कपडयांवर धूळ होती , डोळे मिचकत होते , गळयातल्या पुष्पमाला किंचित् कोमेजलेल्या होत्या , इतकंच नव्हे तर घामसुद्धा त्यांना आलेला दिसला . माझी मति अगदी गुंग होऊन गेली . काय करावं काही सुचेचना .
नल - अग पण देवी सरस्वती स्वतः तुला माहिती सांगत होती ना ?
दमयंती - हो ऽ पण देवीनं केलेली वर्णनं तुम्हाला आणि त्या देवांपैकी एकाला अशी दोघांनाहि लागू पडत होती .
नल - असं ? मग केलंस तरी काय शेवटी ? ओळखलंस कसं मला ?
दमयंती - मग मी देवांचाच धांवा केला . त्यांनीहि प्रसन्न होऊन आपापली रुपं प्रकट केली . आणि - आणि
नल - आणि काय ?
दमयंती - काही नाही .
नल - तरी पण ?
दमयंती - पुरे हं ! तर काय सांगत होते मी ? हं . हे सगळे प्रसंग मी आत्ताच जणु काही अनुभवत होते . आलं कां लक्ष्यात माझं जागेपणचं स्वप्न ?
नल - हो हो . न यायला काय झालं ? पण आता एका नवीनच गोष्टीचा अनुभव आला . खरोखरच आपण मनानं अगदी एकरुप आहोत .
दमयंती - हे आज कळलं वाटतं ?
नल - तसं नाही गं ; पण आता मीहि तीच स्मृतिचित्रं पाहात होतो . भूतकाळात अगदी तल्लीन होऊन गेलो होतो . त्या ब्रह्मानंदातून बाहेर येताच तसाच तुझ्याकडे आलों , तर तूंहि त्याच आनंदात निमग्न ! काय योगायोग पहा !
दमयंती - यात योगायोग कसला ? आपली मनं एकरुप आहेतच मुळी .
नल : खरोखर , दमयंती , तुला कल्पना नसेल ; पण लोकपालांचं ते काम बजावतांना मी अगदी मेल्याहून मेल्यासारखा झालों होतो सार्या त्रैलोक्यात निर्भीडपणे संचार करण्याचं सामर्थ्य मला असतांना त्या दिवशी एखाद्या चोराप्रमाणे मी तुझ्या मंदिरात शिरलो . -
दमयंती - खरंच ! कोणालाहि न कळत , इतके पहारे चुकवून तुम्ही माझ्यापर्यन्त कसे आलात याचा मला अजून उलगडा झालेला नाही .
नल : आपलं काम यशस्वी व्हावं म्हणून इंद्रानंच मला अदृश्य होण्याचं सामर्थ्य दिलं होतं . त्यामुळेच मी तुझ्याजवळ येऊ शकलो . तुझ्याजवळ येऊन पोचेपर्यन्त मी मनाचा कोंडमारा केला . पण तुझं ते निष्पाप , निरागस मुखकमल पाहिल्याबरोबर मला ते असह्य झालं . तसंच मागे फिरावं असं वाटलं ; पण ते शक्य नव्हतं .
दमयंती - कां ? कां ? शक्य कां नव्हतं ? तुमच्यावर कोण बळजोरी करु शकणार होता ?
नल : लोकापवाद ! लोकापवाद माझ्यावर जुलूम करीत होता . देवांनी आधी माझ्याकडून सहकार्याचं वचन घेतलं होतं आणि मग कामगिरी सांगितली होती .
दमयंती - पण तुम्ही ती मान्यच कशी केलीत ? खरंच कां तुमचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं होतं ?
नल : नाही , नाही , दमयंती असं कसं म्हणतेस तूं ? ती कामगिरी ऐकल्याबरोबर मी तत्काळ नकार दिला . तेव्हा त्या चौघांनीहि आपापलं सामर्थ्य दाखवायला सुरवात केली . दमयंती , तुझ्या प्रीतिखातर मी त्या चौघांशीहि युद्ध करण्यास तयार झालों .
दमयंती - मग खरोखरंच युद्ध झालं कां ?
नल : मी धनुष्यावर प्रत्यंचा चढवून टणत्कार केल्याबरोबर चौघेहि घाबरले . मग त्यांनी लोकापवाद पुढे केला .
दमयंती - काय म्हणाले ते ?
नल : ‘ नलराजा आपलं वचन पाळत नाही असं आम्ही त्रिभुवनात ओरडून सांगू ’ असं ते म्हणाले . ‘ वचनभंग करुन आपल्या घराण्याला तूं काळिमा लावत आहेस ’ असं माझ्या कानी - कपाळी ओरडून ते सांगू लागले . सहन होईना मला ते .
दमयंती - म्हणून असली दृष्ट कामगिरी शिरावर घेतलीत कां ?
नल : होय . मन अत्यंत कठोर केलं आणि तुझ्या निकट येऊन मी उभा राहिलो . माझ्यावर विश्वास ठेवूनच तूं स्वयंवराला उभी राहिली आहेस हे मला पक्क माहीत होतं . त्यामुळे मीच तुझं मन लोकपालांकडे वळवूं लागल्यावर तुझी काय अवस्था होईल या विचारानीच माझं मस्तक सुन्न होऊन गेलं . पण , पण दुसरा मार्गच नव्हता . म्हणून मनाचा हिय्या करुन मी तुझ्यासमोर प्रकट झालो .
दमयंती - त्यामुळे मला किती आश्चर्य वाटलं म्हणून सांगू ? --
पद २
यमन कल्याण , ताल त्रिताल . मात्रा १६
दमयंती - कशि मदनमूर्ति अवतरली ।
मन्मंदिरी अवचित त्यावेळी ॥ध्रु . ॥
मुखचंद्र शोभे शशिहुनि सुंदर ।
पूर्णतेजयुत प्रसन्न सुखकर ।
निरखुनि मोहक पुरुषोत्तम ते ।
ओळखिले मी तत्क्षणीं ॥१॥
नल : मला अचानक तिथं आलेला पाहून अगदी देव पावल्यासारखं तुला वाटलं असेल नाही ?
दमयंती - हो ना ! पण तो तर देवदूतच निघाला .
नल : आणि तो सुद्धा कुकर्माला प्रवृत्त झालेला ! मी भेटल्यामुळे तुला झालेला तो परमानंद पाहून मला काहीच बोलवेना . एका बाजूला प्रेम , तर दुसरीकडे कर्तव्य अशी विलक्षण झुंज जुंपली माझ्या मनात . त्या दोघांच्या झटापटीत माझ्या काळजाची कुतरओढ होऊ लागली . पण थोडयाच वेळात कर्तव्याचा विजय झाला . मन खंबीर करुन बोलायला सुरवात केली मी . प्रथम तुला वाटलं मी विनोदानंच बोलतोय .
दमयंती - कां वाटू नये तसं ? त्या राजहंसाकडून इतकं स्पष्टपणे मला कळवलंत आणि मग असं बोलू लागलात , तर कां तशी कल्पना होऊ नये माझी ?
नल : पण तुझी तशी समजूत होऊ लागल्यानं माझ्या जिवाची किती उलघाल होऊ लागली ! काय करावं काही सुचेना . मी विनोद करत नाही , खरंच बोलतोय हे मी तुला पटविण्याचा प्रयत्न करु लागलो --
दमयंती - पण ते मला पटलं त्यावेळी माझी काय अवस्था झाली असेल याची आपल्याला कल्पना --
नल : पूर्णपणे आली होती . म्हणूनच माझ्या अन्तः करणाला घरे पडले . पण वचनपूर्ति करणं भाग होतं . मी त्या देवांची स्तुति करु लागलो . एरवी तुला माझे शब्द हिर्या मोत्यांप्रमाणे मूल्यवान् वाटत असले , तरी मी त्यावेळी उधळलेल्या त्या
मुक्ताफळांनी मात्र तुझं अन्तः करण चरचरा चिरलं गेलं . बरोबरंच आहे . एरवी हिरा अलंकार म्हणून अंगावर घलायला कितीहि चांगला वाटला , तरी तोंडातून पोटात जाऊ लागल्यावर तो आंतडी कापतच जाणार . त्या वेदनांनी तू कळवळलेली पाहून माझ्या मनाला असह्य क्लेश होऊ लागले . पण न थांबता मी एकसारखा बोलतच सुटलो .
दमयंती - आणि नको ते त्या दिक्पालांचं ऐश्वर्य अन् सामर्थ्य यांचं भारुड वर्णन मला ऐकावं लागलं .
नल : ते ऐकतांना तुला होणारा अनावर संताप पाहून मला एकीकडे समाधान होत होतं तर दुसरीकडे ते निष्ठूर , कठोर कर्तव्य करतांना अलोट दुःखानं माझं ह्रदय विदीर्ण होत होतं . माझं कर्तव्य संपलं तेव्हा प्रेमानं लगेच त्याची जागा घेतली . आणि मी तुला सगळी माहिती सांगितली .
दमयंती - होय . आणि त्या पेंचातून सुटायचा मार्ग तुमच्या कर्तव्याने नाही , तर माझ्या प्रेमानंच सुचवला . नाही कां ?
नल : खरं आहे . आम्ही पांचहि जणांनी स्वयंवराला यावं असं तूं सुचवलंस आणि त्यावेळी असं काही स्मित केलंस की तूं नक्की मलाच वरणार याची मला खात्री वाटली . आणि नंतर जेव्हा तूं माझ्या गळयात स्वयंवरमाला घातलीस त्यावेळी मृणालिनीप्रमाणे कोमल असे तुझे बाहुपाशच तूं माझ्या गळयात टाकले आहेस असं मला वाटलं . हेच सगळे प्रसंग मघाशी मी अन्तः चक्षूंनी पाहात होतो , आनंदाची लयलूट करत होतो तर दुःखाने भग्नह्रदय होत होतो .
( इतकं बोलून नल थांबतो . दमयंती काहीच बोलत नाही . थोडा वेळ वाट पाहून नलच बोलू लागतो . )
नल : कां ? गप्प कां बसलीस ? वाईट वाटतंय वाटतं ? पण तसं वाटण्याचं काहीच कारण नाही . कारण शेवट गोड झाला आहे . शिवाय हे काही आता घडत नाही आहे . पांच सहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही .
दमयंती - बरं बरं , मलाहि वाईट वाटत होतं हे आताच कबूल करायचं झालं .
नल : अग , ते मघाशी . पण आत्ता मी तुझ्याकडे आलोय ते आनंदात डुंबण्यासाठी ! आता दुःखाचा स्पर्शहि होता कामा नये . हांस पाहूं एकदा , खुळी कुठली .
पद ३
कमलाक्षी कोमल कान्ते
कां मुख मलूल तव हें झाले ॥ध्रु . ॥
सदा इंदुसम , प्रफुल्लस्मितयुत , यदा करीत श्रम ॥
फुलू दे पुन्हा स्मित , प्रसन्न , ह्रदयंगम ।
तेवी सुखवि मन्मन ॥१॥
नल : खरंच , अशी सुंदर , सर्वगुणसंपन्न पत्नी मिळवून दिल्याबद्दल मला त्या राजहंसाचे फार आभार मानायला हवेत . त्याच्या उपकारांची फेड कशी करावी ते मला सुचतच नाही . माझं दैवच फार चांगलं दिसतंय् म्हणूनच तो राजहंस मला भेटला . खरं सांगू , दमयंती , सार्या विश्वात तुझ्या तोडीची लावण्यवती स्त्री नाही बघ . अप्सरासुद्धा तुझ्या सौंदर्यापुढे फिक्या पडतील .
पद ४ रंभा उर्वशी तिलोत्तमा । सौंदर्यरसाच्या प्रतिमा ॥
खाली घालती माना । कारण तुझा सौंदर्य महिमा ॥
पाहुनि तव लावण्यराशी । मनी लाजतसे गगनशशी ॥
लपवी अपुला वदनशशी । देवेन्द्राची सुंदर शचि ॥
नल - मला तर वाटतं की जगातलं - नव्हे विश्वातलं सगळं उत्तम सौंदर्य आणि नाजुकपणा एकत्र केला तर दिसेल तरी कसं हे बघण्यासाठीच ब्रह्मदेवानं तुला निर्माण केलं असावं . या प्रयोगासाठी चंद्राचं थोडं सौंदर्य त्यानं काढून घेतलं . त्यामुळे त्या बिचार्याच्या मुखावर मात्र काळा डाग पडला .
दमयंती - वा वा , खरंच जसं काही ! चढवा मला हरबर्याचा झाडावर .
नल : हरबर्याच्या कां ? चांगला आम्रवृक्षावर चढवतोय . माझं म्हणणं खोटं असतं , तर ते दिक्पाल कशाला धडपडले असते तुझ्या प्राप्तीसाठी ? स्वर्गात अप्सरा काय कमी आहेत ?
दमयंती - पुरे झालं मेलं ! सारखी काय बायकोची स्तुती करायची ?
नल : बरं , राहिलं . पुन्हा केव्हाहि तुझी स्तुति करणार नाही . झालं ?
दमयंती - हो ! मलाहि त्या सुवर्णहंसाचे आभार मानायला पाहिजेत , आणि दैवाचेहि ! मागल्या जन्मी माझ्या हातून फार मोठं पुण्यकर्म घडलं असावं म्हणूनच आपल्यासारखा पुण्यश्लोक , महापराक्रमी , उदार आणि सुंदर पति मला मिळाला .
नल : पुरे , पुरे , ‘ अहो रुपं , अहो ध्वनिः ’ अशासारखंच हे चाललं आहे .
दमयंती - मुळीच नाही . खरं तेंच बोलते आहे मी . आपलं सौंदर्य आणि पराक्रम अद्वितीय आहे , म्हणूनच तर आपणहि माझ्या स्वयंवराला चालला आहात हे पाहून इंद्रादि देव हतप्रभ झाले . आपल्यासारखा मदनाच्या मूर्तीला आणि पराक्रमाच्या प्रतिबिंबाला सोडून मी दुसर्या कुणालाहि वरणार नाही अशी त्यांची खात्री झाली म्हणूनच तुम्ही माझ्या स्वयंवराला येऊच नये यासाठी त्यांनी तुम्हाला वचनात गुंतवून फसवलं . इंद्राचा पराक्रम अन् सौंदर्य आपल्यापुढे फिकं पडलं . यावरुनच आपलं अलौकिकत्व सिद्ध होतं . शिवाय ‘ पुण्यश्लोक ’ ही पदवी श्री विष्णुनंतर आपल्यालाच मिळालेली आहे . यातच आपलं श्रेष्ठत्व दिसून येत . मी खोटी स्तुति करत नाही . ( नल हंसतो ). हंसायला काय झालं ?
नल : लोक काय म्हणतील अशा विचारानं हंसू आलं . लोक म्हणतील दुसरं कुणीच स्तुति करत नाही म्हणून नवराबायको एकमेकांची स्तुति करत बसतात .
दमयंती - पुरे बाई , लोक काही म्हणत नाहीत .
दासी - एकान्तात आले त्याबद्दल क्षमा असावी .
( प्रवेशून )
दमयंती - हं , काय आहे ?
दासी - पुष्कर महाराज बाहेर आले आहेत . नल महाराजांना भेटायचं आहे असं म्हणत आहेत .
नल : असं ? दे पाठवून त्यांना आंत .
( पुष्कर प्रवेशतो . दमयंती उठून उभी राहते .)
नल - ये , ये , पुष्करा !
दमयंती - या , भाऊजी !
नल : ( आसनाकडे बोट दाखवत ) बैस असा इथं .
पुष्कर - नल दादा , तुझं कुशल आहे ना ? वहिनी तुम्हीहि आनंदात आहात ना ?
नल - हो हो , आम्ही पूर्ण आनंदात आहोत .
( पुष्कर छद्मी हास्य करतो )
नल - पुष्करा , तुझी प्रकृति ठीक आहे ना ?
पुष्कर - हो हो मला काय झालंय ? तुझ्यासारख्या सम्राट भावाच्या घरी असल्यावर मला कसलं दुःख होणार ?
( उपरोधाने )
नल - पुष्करा , तूं काहीहि म्हण . पण तूं हल्ली सुकलेला दिसतोस खरा . आणि सदैव विचारात गढून गेलेला दिसतोस .
दमयंती - खरंच हं ! नाही तर भाऊजी पूर्वी कसे अगदी आनंदी असत एखाद्या पांखराप्रमाणे .
पुष्कर - पाळलेल्या पांखराप्रमाणे जिणं जगतोय खरंच ! ( उघड ) तसं काही विशेष नाही , पण हल्ली मनाला विरंगुळा वाटत
( स्वगत ) नाही येवढं मात्र खरं . मन कशातच रमत नाही .
नल - मग शिकारीला जा . नाही तर स्वारीवर जा .
पुष्कर - छान म्हणजे स्वार्या करुन राज्य वाढवावं आम्ही आणि सम्राट म्हणून मोठेपणा मिळवावा यानी . ( उघड ) छे छे ,
( स्वगत ) त्यातहि आनंद , उत्साह वाटत नाही . खरं सांगू कां ? मला फांसे , द्यूत खेळावंस वाटतंय . येतोस तूं खेळायला ?
नल - द्यूत पुष्करा , द्यूत ? नाही . ते शक्य नाही . मी कदापि फांसे खेळणार नाही आणि तूंहि खेळू नकोस हे मी तुला बजावून सांगतो . द्यूताइतका वाईट खेळ दुसरा नाही . द्यूत , गणिका आणि मद्य यांचेपासून शहाण्या माणसानं नेहमी अलिप्त राहायला हवं . द्यूत खेळू नये असं वेदात स्पष्ट सांगितलेलं आहे .
पुष्कर - या म्हणण्यात काय अर्थ आहे ? असं वागलं तर उपभोगासाठी असलेलं आपलं आयुष्य उपभोगशून्य , बेचव ठरेल . त्या तत्त्वज्ञानामागे अन्तः करणाची दुर्बलता लपलेली असते .
नल - असं कसं म्हणतोस , पुष्करा ?
पुष्कर - नाही कसं ? याला भीरुता म्हणतात , भीरुता . असल्या भीरुतेपेक्षा द्यूताची गंमत , मद्याची रंगत आणि गणिकेची संगत सहस्र पटीने बरी !
नल - पण पुष्करा -
पुष्कर - पुरे , पुरे . मला तत्त्वज्ञान नको शिकवूंस ! इतका भ्याड असशील असं वाटलं नव्हतं मला कधी .
( पुष्कर ताडकन् उठून जाऊ लागतो )
नल - ( जाणार्या पुष्करकडे पहात ) मला भ्याड म्हण , नाही तर आणखी काही म्हण ; मी काही द्यूत खेळणार नाही . इतकंच नव्हे तर शेवटपर्यन्त तुझ्या कानीं कपाळीं ओरडून सांगेन की द्यूत खेळू नकोस ! पुष्करा , द्यूत खेळू नकोस !! पुष्करा , द्यूत कधी खेळू नकोस !!!
( नलाकडे ढुंकूनहि न बघता , मोठयाने खदखदा हंसत पुष्कर निघून जातो .)
( पडदा पडतो )
( प्रवेश पहिला समाप्त )