अंक पहिला - प्रवेश चवथा

डॉ . पद्माकर विष्णु वर्तक यांनी प्रस्तुत संगीत नाटकात नल दमयंतीची उत्कट प्रेमकथा अतिशय छान फुलवली आहे


( पुष्करचा शृंगारलेला महाल . पुष्कर एका पलंगावर पहुडलेला आहे . चर्या विचारमग्न आहे . थोडया वेळाने उठून तो येरझारा घालू लागतो . )

पुष्कर : ( स्वगत ) आज माझ्या मनासारखं होणारसं दिसतंय . नल येण्याचीच खोटी , लगेच घेतोच त्याला फैलावर . नलाला फांसे खेळायला लावायचा आज शेवटला प्रयत्न करायचा . आज जर त्यानं मानलं नाही तर मात्र मोठीच फजिती होईल माझी . कपटनाटक तसंच विरुन जाईल माझं . आजची संधी हुकली की दोनच मार्ग रहाणार माझ्यापुढे . एक म्हणजे जगातून तोंड काळं करणं , नाही तर इथंच मरेपर्यन्त नलाच्या राजवाडयात एक बाळपणापासून पाळलेला पोर म्हणून खिचपत पडणं .

दमनक - ( प्रवेशून ) असं कसं म्हणता महाराज ? आपण पाळलेला पोर कसे ?

पुष्कर : पाळलेला पोरच नाही तर काय ? मला दुसरी काय किंमत आहे ? नलाची हांजी हांजी करत , तो जे म्हणेल त्याला मान तुकवत , त्याची थुंकी झेलत , त्याने केलेला अपमान निमूटपणे सहन करत आणि इतकं असूनहि वर वर आनंदी आहोत असं भासवत जीवन कंठायचं ! पाळीव पोपटाचं जिणं तरी याहून बरं असतं . मरण परवडलं त्यापेक्षा .

दमनक - इतकं वैतागता कां महाराज ? नलराजांनी आपणास किती सुखात ठेवलं आहे बरं ! असं बंधुप्रेम कुठेहि दिसणार नाही .

पुष्कर : नाहीच दिसणार कुठे ! असं मायावी बंधुप्रेम नाहीच दिसणार कुठे !

दमनक - मायावी प्रेम ? ते कसं काय ?

पुष्कर : वर वर तो प्रेम दाखवतो खरा , पण त्याच्या अन्तरंगात काय असेल कोण जाणे ! निव्वळ हालाहल ! निव्वळ हालाहल असेल त्याच्या मनात !

दमनक - असं कसं म्हणता ? त्यांचं आपल्यावर इतकं प्रेम -

पुष्कर : प्रेम ? तो माझ्यावर खरं प्रेम करतो असं म्हणायचंय तुला ? पण मग माझ्या हाती एक तरी अधिकार आहे कां ? मी नलाचा दास आहे दास ! बंधू नव्हे . तो कपट करतोय माझ्याशी .

दमनक - आपली खात्री आहे याविषयी ?

पुष्कर - होय , पुरेपुर खात्री आहे . पुरावेहि देता येतील मला .

दमनक - मग काही हरकत नाही . मलाहि तसंच वाटत असे . पण म्हटलं आपलं इतकं विलक्षण प्रेम असतांना असं कसं होईल ?

पुष्कर - बघ . म्हणजे तुझ्या सुद्धा ही गोष्ट लक्ष्यात आली होती ना ?

दमनक - होय . आणि मी केव्हाच सांगणार होतो तुम्हाला .

पुष्कर - मग कां नाही सांगितलंस लवकर ? मला आतापर्यन्त त्याचं कपट कळलं नाही . पण आता तरी मलाहि कपट करता येतं हे त्याला दाखवलं पाहीजे .

दमनक - आवश्य ! कारण जे कपटाला कपट लढवत नाहीत त्यांचा नेहमी पराभवच होतो .

पुष्कर - अगदी बरोबर ! मला काळया तोंडानं वावरायचं नाही या जगात ! कपटसामर्थ्यानं नलाचा पार धुव्वा उडवून त्याचं सर्व राज्य मी बळकावणार ! झाला इतका मेंगळटपणा बास झाला .

दमनक - आपण काही हालचाल करणार असाल तर आमची तुम्हाला पूर्ण मदत आहे . खात्री बाळगा . पण तत्पूर्वी लोक काय म्हणतील इकडे नको कां पहायला ?

पुष्कर - लोक मला शिव्याशाप देतील ना ? देऊ देत .

( पद ६ अलैया किंवा कांगडा )

जन सारे माझी करतील निंदा ॥ध्रु . ॥

मन माझे हे सडून गेले

म्हणूनि कर्म हे अनुचित केले

बंधुधर्म तो फेंकुनि दिधला

कलि जणूं मनात उतला

ऐसे म्हणतील काही बाही ।

खरा शहाणा लोकांच्या तोंडी लागत नसतो . लोक काय दोनहि बाजूंनी बोलतात . आज माझी काही तरी किंमत ठेवत आहेत कां लोक ? मुळीच नाही . केवळ नलाचा उदो उदो चालविला आहे .

दमनक - बरोबर आहे . पण उद्या तुम्ही गादीवर आलात की तुमचा उदो उदो सुरु होईल .

पुष्कर - लोक जास्त काय म्हणणार आहेत ? म्हणतील की आपल्या भावाचासुद्धा उत्कर्ष याला सहन झाला नाही . पण त्यांना हे कळत नाही की शत्रू असो कि मित्र असो किंवा अगदी सख्खा भाऊ असो , तो वरचढ झालेला खपू नये हा तर मुळी तेजस्वी लोकांचा स्वभावच असतो .

दमनक - थांबा थांबा ! नलराज आले वाटतं . मी जातो आता . ( दमनक जातो )

पुष्कर - आजार्‍याचं सोंग अजूनहि चालू ठेवलं पाहीजे .

( पुष्कर पलंगावर जाऊन निजतो . नल प्रवेश करतो )

नल - हं ! ठीक आहे ना प्रकृति ?

पुष्कर - ( तिरस्काराने ) आपल्या कृपेनं सारं काही ठीकच आहे .

नल - ( जवळ बसून , कपाळावर हात ठेवून ) बाळ , येवढं बोलावणं पाठवलंस तर प्रकृति फार बिघडलीय कां ?

पुष्कर - माझ्यावर तुझं फार प्रेम आहे तेव्हा म्हटलं येशील वारंवार भेटायला . तेवढाच मनाला विरंगुळा ! पण तूं कशाला फिरकतोयस इकडे ? राज्याची फार मोठी धुरा आहे ना तुझ्या स्कंधावर ! त्यात आणखी भर म्हणून वहिनी आहेतच . त्यामुळे फावला वेळ तिच्याच तैनातीत जात असेल . मग भावाकडे लक्ष्य कसं राहील तुझं ? शिवाय -

नल - असं बोलू नकोस बाळ , मी -

पुष्कर - नला , असं बाळ बिळ म्हणत जाऊ नकोस मला . आता लहान कां राहिलो आहे मी ? कुणाच्याहि देखत तूं ‘ बाळ ’ म्हणतोस मला . त्यामुळे मला किती शरमल्यासारखं होतं याची कल्पना तरी आहे कां तुला ? नाही तर , माझा अपमान करण्यासाठीच तूं मला असं वारंवार हिणवतोस असंच मी म्हणेन .

नल - बाळ -

पुष्कर - बघ , पुन्हा ‘ बाळ ’ म्हणलासच . यावरुन माझी खात्री होते की तूं माझा अपमानच करतोस जाणून बुजून .

नल - नाही रे नाही , पुष्करा , असं ह्रदयाला झोंबणारं काही तरी बोलू नकोस . अलोट प्रेमामुळेच मी तुला ‘ बाळ ’ म्हणतो . अगदी लहानपणापासूनच तुला ‘ बाळ ’ म्हणायचं माझ्या अंगवळणी पडून गेलंय . मी आठ नऊ वर्षाचा असल्यापासूनच तुला अंगाखांद्यावर खेळवलंय . नऊ दहा मासांचाच असशील तूं त्यावेळी . आईपेक्षा किंवा दासींपेक्षा माझ्याजवळच तूं जास्त वेळ रहात होतास . त्यामुळेच अजूनहि तुला ‘ बाळ ’ म्हणावसं वाटतं मला . त्यातच मला फार सुख मिळतं . पण तुला अपमानच वाटत असेल तर नाही म्हणणार पुन्हा ‘ बाळ ’.

( दोघेहि थोडा वेळ स्तब्ध राहतात )

नल - बरं पुष्करा , इतकी जर तुझी प्रकृति खालावलेली आहे तर राजवैद्यांना बोलावून काही औषधयोजना केलीस कां ?

पुष्कर - यावर औषध कसलं नला ? आजपर्यन्त तूं इतकी वर्षे या जगात काढलीस , पण तुला अजून हेहि कळलं नाही की असल्या रोगांवर कसलीच मात्रा चालत नाही . मला यावर एकच उपाय दिसतो आणि तो म्हणजे करमणूक . मन कशात तरी रमवलं पाहीजे . दोन तीन दिवसातच या उपायानं प्रकृति सुधारेल . पण -

नल : पण काय पुष्करा ? तुझं मन ज्यात रमेल ते तूं कर असं मागेच मी तुला सांगितलेलं नाही कां ? स्वारीशिकारीवर जा पाहीजे तर ! तेवढाच विरंगुळा महिनाभर !

पुष्कर - नाही नला , स्वारीशिकारीत नाही रमत माझं मन .

नल - मग कशात रमेल ते तरी सांग . तुला पाहीजे ते देतो .

पुष्कर - खरंच ? खरंच कां नला ? मला पाहीजे ते खरंच देशील ?

नल - हो हो , कां नाही देणार ? धाकटया भावाची इच्छा पुरवायची नाही तर कोणाची ? बोल . तुला पाहीजे ते माग . लगेच तशी व्यवस्था करुन देतो .

पुष्कर - खरं ? खरंच ना हे नला ? बघ . नाही तर नंतर ‘ नाही ’ म्हणशील . आधीच पूर्ण विचार कर .

नल - माझ्यावर विश्वास नाही कां तुझा , पुष्करा ? मी बोलणं फिरवीन असं वाटलं तरी कसं रे तुला ? आजपर्यन्त मी कधी कुणाला दिलेलं वचन मोडलेलं नाही , तर आजच मला तशी अवदसा कशी आठवेल ? तूं निर्धास्तपणे पाहीजे ते माग .

पुष्कर - बरं तर ! मला द्यूत खेळावेसे वाटताहेत . तेव्हा तूं मजबरोबर फांसे खेळायला आलं पाहीजेस .

नल - द्यूत ? पुष्करा , तूं मला द्यूत खेळायला बोलवतो आहेस ? पूर्ण शुद्धीवर आहेस कां तूं ? ही अवदसा कुठून आठवली तुला ? पुष्करा , आजपर्यन्त मी तुला कधी रागावलो नाही . पण आता मात्र रागावण्याची पाळी येणार . ही एक गोष्ट जाऊ दे ; पण तुझ्याविषयी इतरहि गोष्टी लक्ष्यात आल्या आहेत माझ्या . तूं दिवसेंदिवस नास्तिक बनत चालला आहेस .

पुष्कर - मग त्याला काय झालं ?

नल - तुझ्या डोक्यात कलि मातला की काय ? परमेश्वराविषयी अविश्वास दाखवणार्‍याचं कधीच चांगलं झालेलं नाही , होत नाही आणि होणारहि नाही . पुष्करा , आताच तुला सावधगिरीची सूचना देऊन ठेवतो . उगीच विस्तवाशी खेळ खेळू नकोस . जाणून बुजून आपल्याच हातांनी आपल्याच पायावर धोंडा पाडून घेऊ नकोस . आजपर्यन्त सर्व थोर लोक गेले त्याच मार्गाने , काही एक किन्तु मनात न आणता जा . त्यातच तुझं कल्याण आहे .

पुष्कर - पण मला नाही वाटत तसं . माझ्या कल्याणाचा मार्ग मला स्पष्ट दिसतो आहे . तो याहून भिन्न आहे . आणि त्याच मार्गाने मी जाणार आहे .

नल - असा अविचार करु नकोस . अनेक विद्वान ऋषिमुनींनी आचरलेला मार्ग सोडून त्या कलीच्या तत्त्वज्ञानाला चिकटू नकोस . परमेश्वराची शक्ति अपार आहे , अफाट आहे , अगाध आहे , अथांग आहे . तिच्याशी आपण क्षुद्र मानव टक्कर देऊ शकणार नाही . ते मुंगीनं प्रचण्ड ऐरावताशी टक्कर खेळण्यासारखं होईल . तेव्हा तूं त्या परमेश्वरी शक्तीशी विरोध न करता तिच्या सहकार्यानेच आपल्या आयुष्याचा मार्ग काढ .

पुष्कर - पुरे पुरे , तुझं तत्त्वज्ञान ऐकावं म्हणून मी तुला इथं बोलावलेलं नाही . मला अक्कल आहे , स्वतंत्र बुद्धि आहे . आणि ती तुमच्याच परमेश्वरानं दिलेली आहे . ती उपयोग करण्यासाठीच दिलेली आहे . तेव्हा तूं मला शिकवण्याची आवश्यकता नाही . मला सर्व गोष्टी कळतात . परमेश्वरानं कुणाचं चांगलं केलं आहे आजपर्यन्त ? एक तरी उदाहरण आहे तुझ्याजवळ ?

नल - तुला असा जगाचा कितीसा अनुभव आहे म्हणून तूं म्हणतोस की परमेश्वरानं कुणाचंहि चांगलं केलेलं नाही आजपर्यन्त ?

पुष्कर - परमेश्वराच्या हाती काही नाही . जे काही कपाळी लिहिलेलं असेल ते काही व्हायचं चुकत नाही . मग तो परमेश्वर असो की आणखी कुणी ! देव सुद्धा दैवाच्या हातातील बाहुली आहेत . एक तरी देव आजपर्यन्त आपली स्थिति बदलू शकला आहे कां ? येवढे ब्रह्मा - विष्णु - महेश , पण त्यांनाहि विधिलिखित बदलता येत नाही . असं जर आहे तर त्या परमेश्वराची भक्ति करण्यात काय अर्थ आहे ?

नल - त्याची भक्ति येवढयासाठी करायची की जे अजून आपल्या कपाळी लिहून व्हायचं असेल ते तरी चांगलं लिहिलं जावं . कारण कपाळी लिहिणारा परमेश्वरच आहे . या जन्मी नाही तर निदान पुढल्या जन्मी तरी त्या भक्तीचं चीज होईल , पुण्यकर्माचा लाभ मिळेल . परीक्षा पाहून परमेश्वर केव्हा ना केव्हा कृपा करतोच .

पुष्कर - परमेश्वरी कृपा म्हणजे इहलोकाचा त्याग ! देवाची कृपा झाली की कल्याण होत नाही तर माणूस आपल्या प्राणांना मात्र मुकतो .

नल - नाही , प्राणाला मुकत नाही , तो स्वर्गाला जातो .

पुष्कर - पण सदेह स्वर्गाला कुणीच जाऊ शकत नाही . म्हणजे परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी जो देह झिजला त्या देहाला मात्र त्या कष्टांचं फळ काहीच नाही .

नल - देह हा विनाशशीलच असतो . आत्मा अविनाशी असतो . तो आत्मा सुस्थितीत राहावा येवढयासाठी देहाने कष्ट घ्यायचे असतात .

पुष्कर - पण देहत्याग केल्यावर त्या आत्म्याचं काय होतं याची कुणाला कल्पना आहे ? मृत्यूनंतरची माणसाची स्थिति आजपर्यन्त कुणाला तरी कळली आहे कां ? मघाशी ज्या कोणा विद्वानांचं म्हणत होतास त्यांना तरी त्याचा पत्ता लागला आहे कां ?

नल - कां बरं ? तपोबलाच्या जोरावर त्यांनी सर्व ज्ञान मिळवलेले आहे आणि ते योग्य माणसांना ते सांगतातहि .

पुष्कर - मृत्युनंतर माणसाला काय स्थिति प्राप्त होते याचे खरेखुरे ज्ञान आजपर्यन्त कुणालाहि झालेले नाही , पुढेहि कुणाला कळणार नाही . ते कळत नाही म्हणूनच काही धूर्त लोकांनी स्वर्ग - नरकाविषयीच्या भ्रामक कल्पना पसरविल्या आणि त्या कल्पनाबळावरच तुम्ही आज नंगा नाच घालता आहात .

नल - अर्धवट ज्ञानावर तूं बोलतो आहेस , पुष्करा .

पुष्कर - मुळीच नाही . मी पूर्ण विचार केलेला आहे . जे ऋषीमुनी इकडे मरणानंतरच्या स्थितीची वर्णने करतात तेच तिकडे सांगतात की जनन मरणाविषयीचे ज्ञान मिळविण्याचा कोणीहि प्रयत्न करु नये . जर तसं कुणी मिळवलं तर त्याचा तत्काळ नाश होतो . कारण तो केवळ ईश्वराचा अधिकार आहे . असं दोन्ही बाजूंनी बोलणारे ऋषीमुनी मात्र श्रेष्ठ आणि मी अर्धवट हे कसं ?

नल - मला वाटतं तुला कुणीतरी चुकीची माहिती दिलेली आहे . म्हणून असं बोलतोयस .

पुष्कर - मला पटतं तेच मी बोलतो . मी व्यवहारी आहे . परलोकी सुखं मिळविण्याच्या भ्रामक समजुतीनं इहलोकांतील सुखांचा कां त्याग करायचा ? शहाण्या माणसाने नेहमी वर्तमानकाळात वावरावं . आत्ताच्या क्षणी जेवढी म्हणून सुख उपभोगता येतील तेवढी सर्व उपभोगायची . पुढच्या क्षणाचा भरंवसा कोणी द्यावा ? पळत्याच्या पाठीमागे लागून हातचं सोडण्यात काय अर्थ आहे ? तथाकथित परलोकी गेलेला एक तरी प्राणी परत या भूलोकी आला आहे कां ? मग तुम्ही असं कसं म्हणता की परलोकी अशी सुख असतात अन् ‍ तशी सुख असतात ? काही नाही . परलोक म्हणजे नुसते कल्पनेचे खेळ आहेत . त्या खेळात रममाण होऊन मूढ मानव इहलोकींच्या सुखाचा त्याग करतात . - परमेश्वरावर तुमचा विश्वास आहे ना ?

नल - अर्थात् ‍ ! पूर्ण विश्वास आहे . निदान माझा तरी .

पुष्कर - मग मी विचारतो की परमेश्वरानं इथं ही असंख्य सुख निर्माण कां केली ? या सुखांचा उपभोग माणसानं घेऊ नये अशीच कां इच्छा असेल त्याची ? ती सुखं निर्माण करण्याचं एकच कारण म्हणजे भूलोकाला स्वर्गाचं रुप देणं . या सर्व सुखांचा मनसोक्त उपभोग घेऊन मानवानं अगदी आनंदात जीवन कंठावं हाच ईश्वराचा हेतू दिसतो त्यात .

नल - मान्य आहे . ईश्वराचा तोच हेतु आहे यात वाद नाही .

पुष्कर - तरीहि काही मूढांनी नसत्या कल्पना समाजात पसरविल्या आणि लोकांना सुखांपासून परावृत्त केलं . याचा घातक परिणाम म्हणजे लोक सुखांपासून दूर तर गेले नाहीतच , पण पूर्णपणे त्यात रममाणहि होऊ शकले नाहीत . त्रिशंकूप्रमाणे मधेच लोंबकळत राहीले . त्यामुळे अनर्थ माजला , दुःखं निर्माण झाली . स्वतःच्या तत्त्वज्ञानामुळे निर्माण झालेल्या या दुःस्थितीचं समर्थन करण्यासाठी त्या धूर्तांनी कल्पना लढविली की ही सुखं म्हणजे माया आहे . सुखांमुळेच दुःख निर्माण होतात . मूढ अंधश्रद्ध लोकांनी त्यावरहि विश्वास ठेवला . किती मूर्ख कल्पना ? सुखांमुळे दुःख निर्माण होतात काय ?

नल - सुखांमुळे नव्हे , सुखांच्या अतिरेकामुळे दुःख होतात असं -

पुष्कर - सुखांच्या अतिरेकानं अतिशय सुख होईल , दुःख कसं होईल ?

नल - तसं नाही रे ! पक्वान्नांच्या सेवनाने सुख वाटते खरे , पण अतिसेवनाने दुःखच भोगण्याची पाळी येते . मद्य आणि गणिका यांचे बाबतीतहि तेच . -

पुष्कर - मला नाही पटत . असं सांगणारे लोक परलोकातील सुखांची मात्र महति गातात . स्वर्गात पूर्णतया सुखंच असतात , दुःखाचा लवलेशहि नसतो , म्हणे . कां हो , तिथे सुखांमुळे दुःखं कां नाही होते ? मुळातलीच कल्पना चुकीची तर त्यावरील तत्त्वज्ञानात किती तथ्य असणार ? पायाच कच्चा असेल तर त्यावरचा प्रासाद भक्कम होईलच कसा ?

नल - तुझी काही तरी भ्रामक समजूत आहे . आता माझं ऐक .

पुष्कर - काही नाही . तूंच आचरट , भ्रामक समजुतीवर मूर्ख विश्वास ठेवला आहेस आणि मलाहि अंधपणे संसारमार्गावरुन जायला सांगतो आहेस . मला सावध करण्याच्या नादात अंधाप्रमाणे तूंच खोल गर्तेत पडशील .

नल - मी पडता पडता सुद्धा तुला वांचविण्याचा प्रयत्न करीन . तूं म्हणतोस तसा मी गर्ते मधे पडेनहि कदाचित् ‍ ! नियतीच्या मनातलं कुणाला कळतं ? आणि कळलं तरी टाळता येत नाहीच . तरीहि प्रयत्न करणं आवश्यक असतं . हा प्रत्यत्न म्हणजे पुण्यसंचय ! पुण्याद्वारे आजपर्यन्त अनेकांनी आपला उद्धार साधला आहे . आज मी सुखात आहे तों आजवरच्या माझ्या आणि माझ्या प्रजेच्या पुण्यामुळे ! उद्या मी किंवा माझ्या प्रजेनं पातक केलं तर माझा अधःपात होईल .

पुष्कर - वा : ! खासा न्याय ! प्रजेच्या दुराचाराबद्द्ल पुण्यश्लोक राजाला शासन ? हीच कां तुमच्या ईश्वराची न्यायबुद्धि ?

नल - थांब , असं अविचारानं बोलू नकोस . प्रजेचं दायित्व राजावर असतं . प्रजा चुकली याचा अर्थ राजा तिला शिकवायला चुकला , कर्तव्यात चुकला . प्रजेला सांभाळता , शिकवता येत नाही तो राजा कसला ? यथा राजा तथा प्रजा . म्हणून प्रजा अधर्मी असेल तर राजा अधर्मी ठरतो . स्वतःस योग्य तो धर्म पाळल्याशिवाय सदगति मिळत नाही .

पुष्कर - धर्माला येवढं महत्त्व ?

नल - कां नाही ? धर्म म्हणजे जीवनाचं मार्गदर्शन करणारी एक प्रचण्ड शक्ति ! जीवनाकडे पहाण्याच्या दृष्टिकोनात ध्येय आणि एकरुपता पुरविणारा धर्मच असतो . अनेक लोकांना एकत्र बांधणारा धर्मच असतो . जीवनात नैतिकतेची पायाभरणी धर्मच करतो . सामान्य जनांना सर्व तत्त्वे धर्म सांगतो . जनतेला काही कळत नसते . सगळेच विद्वान तत्त्ववेत्ते नसतात . प्रत्येक जण आपल्या कोत्या कल्पनेप्रमाणे वागू लागला तर तो मानव समाज कसला ? ते पशूंपेक्षा हीन प्राणी ठरतील . कारण पशूसुद्धा एक धर्म पाळतच असतात . हंसून नकोस . सूक्ष्म दृष्टीने अवलोकन कर , म्हणजे दिसेल की एका जातीचे पशू एका विशिष्ट पद्धतीनेच वागत असतात . तोच त्यांचा धर्म ! पशूंना मानवाप्रमाणे बुद्धि नसते , म्हणून पशूंचा धर्म हीन मानला जातो . मानवाला ईश्वराने बुद्धीची देणगी दिली आहे ती उच्च , उदात्त , नैतिक पातळीवर जाण्याकरिता ! त्यासाठी धर्माची आवश्यकता ! राजाने प्रजेला सांभाळून धर्ममार्गाने न्यायचे असते . म्हणून प्रजेच्या अधर्मासाठी राजाला शासन झाले पाहीजे . प्रजा ही बालकाप्रमाणे तर राजा पित्याप्रमाणे असतो . बालकाच्या अपराधाचे शासन पित्याने घेतले पाहीजे , तर तो सह्रदय पिता . तसे प्रजेच्या अधर्माचे शासन राजाला होते .

पुष्कर - लहान मोठा भेद निसर्ग करीत नसतो . लहान पोरानं विस्तवात बोट घातलं तर भाजतं पोरालाच . त्याच्या बापाला नव्हे .

नल - हो . बाळाला भाजेल , पण खरा चटका मातापित्यांच्या अन्तः करणाला बसेल . बाळ थोडयाच वेळात दुःख विसरेल पण आपल्याच दुर्लक्ष्यामुळे बाळाला भाजलं हा विचार वडवानळाप्रमाणे रात्रंदिवस त्यांच्या ह्रदयसागरात जळत राहील .

पुष्कर - बस , पुरे कर , तुझे तत्त्वज्ञान मला नाही पटायचं .

नल - आता नाही पटणार , पण पुढे अनुभवानं पटल्याशिवाय राहणार नाही .

पुष्कर - मग पटेल तेव्हा विचार करीन .

नल - पण तेव्हा सुधारणेची वेळ टळून गेलेली असेल . म्हणून मी सांगतो तो अनुभवाचा मार्ग वापर . तो सर्व सज्जनांनी आचरलेला आहे . वरपांगी तो कंटकमय वाटेल , पण अंतिम हित तोच साधेल .

पुष्कर - मला कांटेरी मार्ग नको , सुखाचा हवा . पूर्ण सुख अनुभवणं हेच माझं ध्येय आहे .

नल - कुणी तरी चुकीच्या कल्पना तुझ्या मनात भरवून दिलेल्या दिसतात . सुख भोगू नका असं कुणीच सांगितलेलं नाही . सुखोपभोगात रमून पापपंकात रुतो नका असा उपदेश केलेला आहे . गृहस्थाश्रमी अन् ‍ संन्यासी यात फार फरक आहे . पण तूं तो जाणत नाहीस . गृहस्थाश्रमी ऐहिक सुखे भोगत असतांना पुण्यसंचय करतात . ईश्वरावर श्रद्धा मात्र पाहीजे . अंधश्रद्धा नव्हे , डोळस श्रद्धा हवी . दुर्दैवाने तीच तुझी नाहीशी झाली आहे . चार्वाकाचं तत्त्वज्ञान तुला पटू लागलं आहे . कलि तुझ्या मस्तकात भिनला कि काय ?

पुष्कर - पुरे , पुरे . माझ्याशी द्यूत खेळणार कि नाही तेवढं सांग . तू वचन दिलंच आहेस . आता तुझ्यापुढे दोनच मार्ग - द्यूत तरी खेळायचे किंवा वचनभंग करुन कुळाला कलंक लावायचा . मला वाटतं तुला स्वाभिमान आहे , पापपुण्याची चाड आहे , वचनाची पर्वा आहे . माझी समजूत खरी असेल , वीरसेन महाराजांचा खरा सुपुत्र असशील तर द्यूत खेळशील अन्यथा वचनभंग आणि लोकनिंदा दोन्ही जवळ करशील . पहा . विचार कर . मला वाटतं की वीरसेन महाराजांच्या पुत्राकडे , माझ्या थोरल्या भावाकडे हा कुलकलंक म्हणून लोकांनी बोट दाखवू नये .

नल - पुष्करा , मला तूं अजून पूर्ण ओळखलेलं नाहीस . अरे , जी दमयंती माझी जीव कि प्राण ती सुद्धा केवळ वचनाला जागण्यासाठी मी इंद्रादि देवांना द्यायला तयार झालो तर आता धाकटया भावाची , ज्याचेवर आईसारखी माया केली त्या लाडक्या बंधूची वेडी मनीषा नाही कां पुरवणार ? द्यूत खेळण्यासारख्या क्षुद्र गोष्टीत मी वचनभंग करीन असं वाटलं तरी कसं तुला ?

पुष्कर - मग इतके दिवस कां नाही म्हणत होतास ?

नल - द्यूतापायी अनेक घराणी धुळीला मिळाली आहेत , म्हणून तुला द्यूतापासून परावृत्त करु बघत होतो . फांश्यांना मी भितो असा अर्थ काढू नकोस . चल . द्यूत खेळायला आणि हारायलाहि मी तयार आहे . या क्षणापासूनच खेळ सुरु होऊ दे . जा . व्यवस्था कर . मी येतोच . आता तरी मनाला विरंगुळा वाटेल ना ?

पुष्कर - प्रश्नच नाही . आताच केवढा उत्साह वाटायला लागला आहे .

नल - झालं तर . त्यातच मला आनंद आहे . तयारी झाली की मला बोलव . मी जातो आता . ( नल जातो )

( जाणार्‍या नलाकडे समाधानाने बघत , छद्मीपणाने हंसत पुष्कर एकटाच उभा रहातो . )

पुष्कर - हुं ! उदारपणाचं आणि एकवचनीपणाचं पांघरुण घेऊन मला लाजवू बघत होता . पण अशा चांगुलपणानं शरमण्यासारखं माझं अन्तः करण नाही . माझ्यासारखं अन्तःकरण एका कलीचंच असू शकेल . चला , आता वेळ गमावून चालणार नाही . पुन्हा नलाचं मन फिरलं तर काय घ्या ! तो बहुतेक आता दमयंतीकडेच गेला असेल . ती काही तरी घोटाळा करेल . तेव्हा त्यांना बोलायलाहि अवसर देता कामा नये . आता थोडयाच वेळात माझ्या भविष्यात काय आहे ते दिसेल . नलाच्या गादीवर बसायचं कां त्याच्या पायाशी बसायचं ?

( पडदा )

प्रवेश चौथा समाप्त

अंक पहिला समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : December 20, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP