राज्यपालाचा सभागृहास किंवा सभागृहांना संबोधून अभिभाषण करण्याचा आणि संदेश पाठवण्याचा हक्क . १७५ .
( १ ) राज्यपाल विधानसभेस किंवा . विधानपरिषद असणार्या राज्याच्या बाबतीत , त्या राज्याच्या विधानमंडळाच्या कोणत्याही सभागृहास , किंवा एकत्र जमलेल्या दोन्ही सभागृहांना संबोधून अभिभाषण करु शकेल . आणि त्या प्रयोजनाकरता सदस्यांना उपस्थित राहणे आवश्यक करु शकेल .
( २ ) राज्यपाल राज्य विधानमंडळाच्या कोणत्याही सभागृहाला संदेश पाठवू शकेल - मग ते विधानमंडळामध्ये त्यावेळी असलेल्या एखाद्या विधेयकाबाबत असोत किंवा अन्य प्रकारचे असोत - आणि ज्याला याप्रमाणे कोणताही संदेश पाठवण्यात आला आहे ते सभागृह त्या संदेशानुसार जी बाब विचारात घेणे आवश्यक असेल अशी कोणतीही बाब सोईनुसार शक्य तितक्या त्वरेने विचारात घेईल .
राज्यपालाचे विशेष अभिभाषण . १७६ .
( १ ) [ विधानसभेच्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या सत्राच्या प्रारंभी आणि प्रत्येक वर्षाच्या पहिल्या सत्राच्या ] प्रारंभी . विधानसभेत किंवा विधानपरिषद असलेल्या राज्याच्या बाबतीत . एकत्र जमलेल्या दोन्ही सभागृहांना संबोधून राज्यपाल अभिभाषण करील आणि विधानमंडळास . त्याला अभिनिमंत्रित करण्याची कारणे सांगेल .
( २ ) अशा अभिभाषणात निर्देशिलेल्या बाबींच्या चर्चेकरता वेळ वाटून देण्यासाठी सभागृहाच्या किंवा दोहोंपैकी कोणत्याही सभागृहाच्या कार्यपद्धतीचे विनियमन करणार्या नियमांद्वारे तरतूद केली जाईल .
मंत्री व महा अधिवक्त्ता यांचे सभागृहांबाबत हक्क . १७७ .
प्रत्येक मंत्र्यास व राज्याच्या महा अधिवक्त्यास राज्याच्या विधानसभेत किंवा विधानपरिषद असलेल्या राज्याच्या बाबतीत . दोन्ही सभागृहात भाषण करण्याचा आणि अन्यथा त्यांच्या कामकाजात भाग घेण्याचा हक्क असेल , आणि विधानमंडळाच्या ज्या समितीत त्याचे नाव सदस्य म्हणून घातलेले असेल अशा कोणत्याही समितीत भाषण करण्याचा आणि अन्यथा त्यांच्या कामकाजात भाग घेण्याचा हक्क असेल . पण या अनुच्छेदाच्या आधारे मतदान करण्यास तो हक्कदार असणार नाही .