श्रीदत्त विजय - अध्याय सहावा

स्वामी दत्तावधूतांनी लिहिलेली ही पोथी म्हणजे श्रीदत्त प्रभूंजवळ जाण्याचा अतिसुलभ मार्ग होय.


श्रीगणेशाय नमः । ॐ गणेशदत्त गुरुभ्यो नमः । अरण्यात राहती श्रीदत्त । दुरदुरोनी लोक येत । मनोकामना पूर्ण होत । घेता दर्शन दत्ताचे ॥१॥

प्रभाकर मुळे मुंबईहून येत । सवे पत्नी प्रतिभा असत । पती - पत्नी स्वामीते सेवीत । मनोभावे करोनिया ॥२॥

त्यांसी अनुभव येई नित्य । सवे आहे श्रीदत्त । जेथे जाती तेथ । दत्त सवे राहातसे ॥३॥

एकदा असता हवन करीत । साडीवरी पेटता कापूर पडत । परी काहीही न होत । आश्चर्य वाटे प्रतिभाला ॥४॥

रस्त्यावरी उभी असत । पायावरुनी कार जात । परी काहीही न होत । दत्त रक्षी तयांना ॥५॥

ऐसे बहु अनुभव येत । उभयता राहती आनंदात । कृपा करिता जगन्नाथ । उणे कैसे पडतसे ॥६॥

सहज घरी बैसोनि असत । मनात चिंती श्रीदत्त । प्रकट होवोनी स्वामी पुसत । काय मातोश्री करितसा ॥७॥

ऐसे बोलोनी होती गुप्त । आश्चर्य तयांना वाटत । म्हणे स्वामी चराचरात । भरोनिया राहातसे ॥८॥

वनिता जयंत दीक्षित । येती स्वामींचे दर्शनार्थ । जयंत दीक्षितांसी स्वामी म्हणत । देवी असे पत्नी तुझी ॥९॥

ताई ऐसे म्हणती । श्रेष्ठ भगिनीचा मान देती । ही साक्षात दुर्गा म्हणती । ईश्वरी कार्यार्थ आली असे ॥१०॥

कधी म्हणती महालक्ष्मी । कधी म्हणती परमेश्वरी । षोडषी त्रिपुरसुंदरी । कधी म्हणती ताईंना ॥११॥

असंख्य देवतांची दर्शने । ताईंसी होती तेथे । दुर्गा उमा महालक्ष्मी । पहिल्या देवता ताईंनी ॥१२॥

विष्णू शिव हनुमान । दत्त आणि परशुराम । ध्यानी दर्शन देवोन । कृतार्थ केले ताईंना ॥१३॥

देवी सूक्ताचे पाठ करीत । ताई बैसल्या असत । कुंकुमाचा वर्षाव होत । तेव्हा पाहा ताईंवरी ॥१४॥

भक्त म्हणती स्वामींप्रत । कुंकुमाचा वर्षाव होत । तो फक्त ताईवर पडत । पाहोनी नवल वाटतसे ॥१५॥

स्वामी म्हणती भक्तांप्रत । ताई परमेश्वरी असत । तयांच्या सन्मानार्थ । देवता वर्षाव करिताती ॥१६॥

हा देवीचा आत्मा असत । आला असे मम कार्यार्थ । माझे कार्य पूर्णत्वास । नेतील पाहा ताई या ॥१७॥

ऐसा गौरव करिती । आपुले तेज ताईंसी देती । अनेक देवता प्रकट होती । देहात तेव्हा ताईंच्या ॥१८॥

साधना करवोनी घेती । निर्विकल्प समाधी लाविती । जीवन्मुक्त अवस्था देती । ऐसा अधिकार ताईंचा ॥१९॥

तेव्हा पासोन मुंबईत । स्वामी जेव्हा कधी जात । दीक्षितांचे घरी राहात । कार्य करिती तेथोनिया ॥२०॥

स्वामी दीक्षितांचे घरी असत । एकदा ताई पाहात । महालक्ष्मीचे रुपांत निद्रिस्थ । ताई पाहती स्वामींना ॥२१॥

आणखी एकदा पाहात । वेळ रात्रीची असत । प्रकाश किरणे बाहेर येत । देहातूनी श्रीस्वामींच्या ॥२२॥

जे राहाती ताईंच्या सहवासात । त्यांनाही होई देवत्व प्राप्त । एवढा अधिकार ताईंसी प्राप्त । होता पाहा झालेला ॥२३॥

ज्योत्स्ना ताईंची मोलकरीण । सेवा करी मनापासोन । देवता प्रकट होवोन । सहाय्य करती तिजलागी ॥२४॥

मेघल अल्पा ठक्कर । गुजराथी भगिनी असत । ताईंपाशी येती नित्य । घर दत्ताचे म्हणोनिया ॥२५॥

त्यांसी दिव्य अनुभव येत । देव - देवता दर्शन देत । गायत्रीदेवी बोलत । कधी कधी त्यांसवे ॥२६॥

एकदा मेघल पाहात । ताई बैसल्या ध्यानस्थ । रुप पालटे अकस्मात । महालक्ष्मी दिसतसे ॥२७॥

ऐसा ताईंचा अधिकार । गुरुकार्यासी तत्पर । स्वामींनी आपुले सर्वाधिकार । दिधले पाहा ताईंना ॥२८॥

मानसी नामे मुलगी असत । ताईंवरी श्रद्धा बहुत । ताई ध्यान शिकवीत । तैशापरी ती करितसे ॥२९॥

काही दिवस करिता ध्यान । होई देवतांचे दर्शन । गणेश आणि हनुमान । देती दर्शन तिजलागी ॥३०॥

दोन - तीन वेळा भेटत । नंतर जाई अमेरिकेत । तेथेही दर्शने होत । देवता आणि सिद्धांची ॥३१॥

देवाहून भक्त महान । ऐसे बोलती वेद पुराण । त्याचा प्रत्यय येथे पूर्ण । अनुभवा पाहा येतसे ॥३२॥

श्रीनाथजी दर्शनास । मेघल जाई गुजरातेत । निळारंग पूर्ण देहास । आपोआप चढतसे ॥३३॥

त्याच रात्री स्वप्नांत । येवोनी श्रीकृष्ण सांगत । मी ताई आणि दत्त । एकची असो साक्षीत्त्वे ॥३४॥

एकदा ताईंचे घरात । मेघल ताई आणि दत्त । बैसले असती बोलत । तेव्हा नवल वर्तले ॥३५॥

प्रकाशाचे प्रखर झोत । आकाशातून वेगाने पडत । व्यापूनी तिघांसी टाकीत । परब्रह्माचे तेज ते ॥३६॥

स्मिता मेघल सुजाता । ताईंच्या मानस कन्या असत । तिघींनाही ध्यानात । देवता दिसती गुरुकृपे ॥३७॥

दीक्षितताईंच्या घरात । असंख्य देवता दिसत । मुलींसवे बोलत । देती विविध ज्ञान ते ॥३८॥

दीक्षितांचे घरात । स्वामी येवोनी राहू लागत । एकदा असेच बैसले असत । गप्पागोष्टी करीत ते ॥३९॥

अचानक दीक्षितांसी म्हणत । बैसा टी. व्ही. पाहात । आज्ञेप्रमाणे टी. व्ही. पाहात । दीक्षित पाहा बैसले ॥४०॥

समाधी त्यांसी लागत । कोठे बैसलो हेही न कळत । दोन तासांनंतर उतरवीत । समाधी पाहा त्यांची ते ॥४१॥

सुरेन्द्र कल्पना पुण्यात । श्रीस्वामींचे भक्त असत । उपनाम रणदिवे असत । प्रसाद पुत्र तयांचा ॥४२॥

स्वामीवरी भक्ती बहुत । मोठी प्रतिमा गृही लावीत । त्या प्रतिमेतून बाहेर येत । कधी कधी श्रीस्वामी ॥४३॥

बाहेर येवोनी दर्शन देत । ऐसे त्यांना अनुभव येत । प्रसाद तीन वर्षाचा असत । त्यासी येती अनुभव ते ॥४४॥

भट नामे स्त्री असत । ध्यानात दर्शन देती सिद्ध । आणि मार्गदर्शन करीत । अधून मधून तिजलागी ॥४५॥

ती मनी विचार करीत । कोण असती हे सिद्ध । सदभक्तांते पुसत । कोण असतील हे बरे ॥४६॥

सदभक्त तिसी म्हणत । आकाशी फिरती अनेक सिद्ध । त्यातील कोणीतरी असावेत । दर्शन देती तुजलागी ॥४७॥

कल्पनासवे परिचय होत । येई कल्पनाचे गृहात । स्वामींचा फोटो असत । भिंतीवरी लावलेला ॥४८॥

होवोनिया विस्मय चकीत । म्हणे हे कोण सिद्ध । कल्पना म्हणे हे श्रीदत्त । गुरु असती आमुचे हे ॥४९॥

यावरी ती स्त्री म्हणत । मजला हे नेहमी भेटत । प्रकट होवोनी ध्यानात । दर्शन देती मजला हे ॥५०॥

ऐसा सदगुरु दत्त । भक्ता सदैव प्रतिपाळीत । राहोनिया चराचरात । सदैव रक्षी भक्तांना ॥५१॥

स्वामींचा जेष्ठ बंधू असत । भाई त्यासी म्हणत । तो म्हणे एकदा स्वामीप्रत । नृसिंहवाडीस जातो मी ॥५२॥

स्वामी तयासी म्हणत । जावे नृसिंहवाडी स्थानात । तेथील कृष्णा नदीत । टाकी वेणी मम नांवे ॥५३॥

भाई नृसिंहवाडीसी जात । वेणी कृष्णेत टाकीत । एक कन्या वर येत । जलातूनी कृष्णेच्या ॥५४॥

कृष्णानदीच्या जलातून । कन्या वर येवोन । वरचेवरी वेणी झेलोन । जलात गुप्त होतसे ॥५५॥

दाखवी हात भाईस । प्रसन्न वदने करी हास्य । मनी होवोनी विस्मयास । भाई पाहात राहतसे ॥५६॥

साक्षात ती कृष्णादेवी । श्रीस्वामींची वेणी घेई । ऐसे महात्म्य पाही । श्रीदत्ताचे हो असे ॥५७॥

ज्योति नामे एक भक्त । येई स्वामी दर्शनार्थ । कृष्णभक्ती करीत । येवोनी नमी स्वामींना ॥५८॥

एक कृष्णमूर्ती तिसी देत । ठेवी म्हणती पाण्यात । मूर्ती घेवोनी घरी जात । देई पाण्यात ठेवोनिया ॥५९॥

दुसरे दिनी जव पाहात । पाणी नसे ग्लासात । कृष्ण पाणी पीत । पाहोनी आश्चर्य वाटतसे ॥६०॥

रोज कृष्णमूर्ती पाणी पीत । स्वामींची लीला अदभुत । ज्योति म्हणे मनात । अदभुत सामर्थ्य स्वामींचे ॥६१॥

एक कन्या तिसी असत । नाम वंशी तिचे असत । वय वर्षे चार असत । एकुलती एक कन्या ती ॥६२॥

कन्येसी घेवोनी सांगात । लग्न समारंभासी जात । तेथे कन्या हरवत । बेशुद्ध पडे माता ती ॥६३॥

मनामाजी ज्योति म्हणत । स्वामी प्रत्यक्ष दत्त । आणावे माझे कन्येप्रत । ठाव दावावा कन्येचा ॥६४॥

ऐसे मनी प्रार्थित । तव अदभुत होई तेथ । एक रिक्षावाला येत । घेवोनी पाहा कन्येसी ॥६५॥

मातेसी आनंद होत । सर्वांसी आनंद होत । बक्षीस देऊ म्हणत । तया रिक्षावाल्यासी ॥६६॥

परी तो निघोन जात । कोठे गेला न कळत । सर्व म्हणती श्रीगुरुदत्त । आले त्याच्या रुपाने ॥६७॥

ऐसा स्वामी दत्त । भक्तावरी लक्ष ठेवीत । कोठेही असो भक्त । दत्त सांभाळी तयाते ॥६८॥

परी असावा भाव शुद्ध । मनी नसावा काही स्वार्थ । इतुके जरी साधन करीत । दत्त प्रसन्न होतसे ॥६९॥

या अध्यायाचे करिता पठण । दुर्गा देवी होई प्रसन्न । हरवले ते गवसेल जाण । पठण करिता ग्रंथाचे ॥७०॥

॥ अध्याय सहावा ॥ ॥ ओवी संख्या ७० ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP