सुकृत-योग
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.
( भुजंगप्रयात वृत्त. )
मनासारिखी सुंदरा ते अनन्या । मना सारिखे पुत्र जामात कन्या ॥ सदा सर्व दा बोलती रम्य वाचा । जनीं जाणिजे योग हा सुकृताचा ॥१॥
मनासासारिखे दीर भर्ता ( र ) भावे । मनासारिखे सासुरे ते असावे ॥ सुखें बोलती लेश नाहीं दुखाचा । जनीं जाणिजे योग हा सुकृताचा ॥२॥
भलीं मायबापें भले मैत्र बंधू । भले सोयरे राखिती स्नेहबंधू ॥ मुलें लेकुरें एक मेळा सुनेचा । जनीं जाणिजे योग हा सुकृताचा ॥३॥
भले धाकटे थोरले सर्व कांहीं । भले गोत्रजू भिन्न भावार्थ नाहीं ॥ अखंडीत हा काळ जातो सुखाचा । जनीं जाणिजे योग हा सुकृताचा ॥४॥
गुरें वांसूरें सींगर दास दासी । गुराखे सुनीं मार्जरें गुणराशी । सिमा चालतां लेश नाहीं तमाचा । जनीं जाणिजे योग हा सुकृताचा ॥५॥
धनें धान्यपात्रें अलंकार चीरें । वसारे घरें सुंदरें रम्य सारे ॥ देहे चालतो सर्व आरोग्य ज्याचा । जनीं जाणिजे योग हा सुकृताचा ॥६॥
येहि लेकिचे लोक तेहि गुणाचे । परित्रिक सदा सर्वहि लक्षणाचे ॥ समूहाय उच्छाय येक्या मनाचा । जनीं जाणिजे योग हा सुकृताचा ॥७॥
मनासारिखे ग्रामग्रामाधिकारी । मनासारिखे लोक शोकापहारी ॥ मनासारिखा संग साधूजनाचा । जनीं जाणिजे योग हा सुकृताचा ॥८॥
मनासारिखा चिंतिता देव पावे । मनासारिखे भक्तिभावें मिळावे ॥ सदा बोलती बोल सारांश वाचा । जनीं जाणिजे योग हा सुकृताचा ॥९॥
म्हणे दास सायास केल्या पडेना। विकल्पे जनीं येक तेही पडेना ॥ घडे योग हा तो .... विवेकाचा । जनीं जाणिजे योग हा सुकृताचा ॥१०॥
॥ इति सुकृत- योग समाप्त ॥ श्लोकसंख्या ॥ १० ॥
N/A
References : N/A
Last Updated : April 02, 2014
TOP