अन्वयव्यतिरेक - एकादश: समास:
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.
॥श्रीराम समर्थ ॥
स्थूळ सूक्ष्म कारण । आणि अविद्यात्मक अज्ञान । सत्यत्व तोंवरी महाकारण । चवथें ज्ञान साक्षी ॥१॥
विपरीत ज्ञान अज्ञान । निरसितां हें मिथ्या भान । चवथें तेंचि निर्गुण । अनिर्वाच्य ॥२॥
विराट हिरण्य महत्तत्त्व । तोंवरी मूळ प्रकृति साक्षित्व । अविद्यात्मक निरसीत । अनिर्वाच्य ॥३॥
जागृति स्वप्र सुषुप्ती । अविद्यामय असती । निर-सितां देहत्रय प्रचीति । तुया अनिर्वाच्य ॥४॥
सत्यत्वें सर्वसाक्षी निरंतर । निरसितां त्रय अविद्याव्यवहार । चवथें अनिर्वाच्य ॥५॥
विश्व तैजस प्राज्ञ । प्रत्य- गात्मा सत्यत्वें अभिधान । त्रय निरसितां अज्ञान । चवथें अनिर्वाच्य ॥६॥
रज सत्व तमो-गुण । चवथा शुद्धसत्व जाण । निरसितां तेथींचें भाषण । चतुर्थ अनिर्वाच्य ॥७॥
अकार उकार मकार । अर्धमात्रा ॐकार । निरसितां तिन्ही प्रकार । पुढें अनिर्वाच्य ॥८॥
जोंवरी अविद्यात्रयकर्तृत्व । तोंवरी माया ईश्वरत्व । निरसितां त्रयकर्तृत्व । ईश्वर अनिर्वाच्य ॥९॥
जेव्हां द्वैत नासलें । तेव्हांच एकपण विरालें । उपरी बोलणें खुंटलें । निवांत होय ॥१०॥
पृथिवी आप तेज पवन । तोंवरी आत्मयास आकाशपण । जड चंचळ नासतां पूर्ण । अनिर्वाच्य ॥११॥
दृश्यभास आटलें । उर्वरित जें उरलें । त्यासि नांव नाहीं म्हणितलें । महापुरुषीं ॥१२॥
सकल आशंकानिवृत्ति । कल्पनामात्र नासती । तेथें नामरूपस्थिती । कोणें बोलावी ॥१३॥
निवृत्ति विज्ञान उन्मनी । हेचि मायेची करणी । ते मुळींच नसतां वदनीं । कसें वदावें ॥१४॥
आत्मनिवदन नववी भक्ति । हेहि मायेची उत्पत्ति । ते मुळीं जालीच नव्हती । तरी हेहि कैंची ॥१५॥
दुजेवीण अनुभव । अनुभवचि समूळ वाव । येथें नसे नास्तिक्यभाव । म्हणोनियां ॥१६॥
आस्तिक नास्तिक हे दोन्ही । न घडे मायानिरसनीं । तेथें शब्दाची कडसणी । निरसोनि गेली ॥१७॥
दिवस ना रजनी । संध्यारागहि नसोनी । ऐसिये निर्वाणीं । शब्द कैंचा ॥१८॥
वैखरी मध्यमा पश्यंती । म्हणोनि परा ऐसें म्हणती । उठती जेथें तिनी वृत्ती । तेथें काय म्हणावें ॥१९॥
शब्द मौन्य दोनी । उद्भवती जेथूनी । ते मुळींच नसतां वाणी । कैसें वदावें ॥२०॥
जें जें वाचें बोलावें । जें जें मनीं अनुभवावें । हीं दोनी स्वभावें । जेथूनि जालीं ॥२१॥
तें मुळीं जालेंचि नाहीं । म्हणूनि अनिर्वाच्य पाहीं । ऐसें सांगण तेंही । निवांत जालें ॥२२॥
असीं स्वामींचीं वचनें । ते ऐकोनि परम निर्वाणें । सच्छिष्य तियेचि खुणे । पावतां झाला ॥२३॥
काया वाचा मनोभावें । साष्टांगें नमिलें शिष्यदेवें । मग उचलेनि देवादिदेवें । आलिंगन दीधलें ॥२४॥
ऐसा अनुग्रहो केला । उभयतां आनंद जाला । तो मज मंदमतीला । बोलवेल कैंचा ॥२५॥
परी स्वामीचे कृपागुणें । वाटे ब्रह्मांड ठेंगणें । म्हणोनि हें वचनें । निरोपिलें ॥२६॥
आधीं अन्वय बोलिला । उपरी व्यतिरेक निरोपिला । येथींचा विचार पाहिला । पाहिजे संतीं ॥२७॥
जाणत नेणत बोलिलें । चुकत वाकत आठवलें । न्यू पूर्ण क्षमा केलें । पाहिजे श्रेष्ठीं ॥२८॥
स्वामी कृपा समर्थ सार । सीताराम हे अक्षर । वंदूनियां अत्यादरें । नमस्कार घाली ॥२९॥
इति श्रीव्यतिरेक । ज्ञानप्रळय निश्चयात्मक । स्वामी कृपा समर्थ एक । सेवकावरी ॥३०॥
इति एकादश: समास: ॥११॥
व्यतिरेक ओवीसंख्या ॥२४१॥ अन्वयव्यतिरेक ओवीसंख्या ॥३५९॥
N/A
References : N/A
Last Updated : April 12, 2014
TOP