शिवरात्रमाहात्म्य - अभंग ६ ते १०
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
६.
ऐका सावधान कथा शिवरात्र । पावन पवित्र तिहीं लोकीं ॥१॥
भाव धरोनियां आचरती जरी । वास शिवपुरीं घडे त्यासी ॥२॥
उपवास आणि शिवाचें पूजन । रात्रीं जागरण विधि त्याचा ॥३॥
एक पसा पाणी एक बिल्वदळ । पूजन केवळ सोपें बहु ॥४॥
नामा ह्मेण करा नामाचा गजर । मुखीं हरहर शब्दमात्रें ॥५॥
७.
शिव ऐसा शब्द कल्याणदायक । जाणती भाविक साधुजन ॥१॥
तारक हें नाम भोळ्याभाविकांसी । नेणते जाणत्यांसी लाभ एक ॥२॥
उपमन्यु बाळक दूध मागों गेला । क्षीरांब्धि दिधला उचितासी ॥३॥
दुष्टदुराचारी पतित तारिले । नाही आव्हेरिलें दीनानाथें ॥४॥
नामा ह्मणे शिव विष्णु एकरूप । ताराया अमूप अवतार ॥५॥
८.
भेदवादी जन वदतसे भिन्न । नव्हे तें लक्षण भज-नाचें ॥१॥
विश्वीं विश्वंभर कोंदलासे एक । भेदाचें कौतुक कैसें सांगा ॥२॥
ब्रह्मीं नाहीं ठाव एकपणाचाही । तेथें दुजें कांहीं समावतें ॥३॥
आदि मध्यें अंतीं खेळूनियां खेळ । उरलें तें निखळ अविनाश ॥४॥
हेमीं जैसे केले तैसे होती नग । तरी ते अव्यंग सोनेपणीं ॥५॥
केली जैसी भक्ति शैव कां वैष्णव । पाहतां तो देव नाहीं दुजा ॥६॥
शिवविष्णु दोघे एकचि अवतार । वेदांनीं निर्धार हाचि केला ॥७॥
नामा ह्मणे येथें दुजा नको भाव । विष्णु तोचि शिव शिव विष्णु ॥८॥
९.
कांचीपुरीं राजा नामें सोमदत्ती । तयाचे संपत्ती पार नाहीं ॥१॥
पूर्वपुण्यबळें लाधलें तयासी । देतां उपमेसी उणा शक्र ॥२॥
पांचशतें तया कामिनी सुंदरा । करितां नाहीं पुरा झाला काम ॥३॥
रिद्धि सिद्धि घरीं कामारि हिंडती । धैर्य शौर्य कीर्ति ज्याची जगीं ॥४॥
नामा म्हणे जेथें उणें कांही नाहीं । ऐसें असो-निही न सुटे भोग ॥५॥
१०.
भोगाची नव्हाळी न सुटे कोणे काळीं । वासना वोंगळी तेचि करी ॥१॥
वासनेचि थोरी सांगवेना कांहीं । न सुटिजे कांहीं कोण्या काळीं ॥२॥
तारुण्याच्या भरें आवडी स्त्रियेची । वृद्धपण तेंचि पुढें होय ॥३॥
ह्मणतसे पोरें वांचतील कैसीं । हाचि अह-निंशी ध्यास करी ॥४॥
मेलियाही पुढें तेंचि उभें राहे । जन्मोजन्मीं पाहे लागलेंसे ॥५॥
मृगाचिया ध्यासें भरतां मृगपण । जन्मल्यावां-चून सोडीनातें ॥६॥
नामा ह्मणे जया जैसी जे वासना । जन्मकर्में जाणी जैसीं होतीं ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : December 22, 2014
TOP