ह्याळसेन कथा - अभंग २६ ते ५०
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
भाट जाऊनि वेगेसि । सांगती ह्याळसेनासी । कौख प्रवर्तले युद्धासी । आले वेगीं ॥२६॥
मग चालिले दळभार । चा-लिले पायाचे मोगर । तेथें तुंबळ झालें थोर । दोहीं दळीं ॥२७॥
महींद्र मंथनीचे हल्लाळ । तैसें उसळलें पायदळ । अशुद्धाचें खल्लाळ । रणामाजी ॥२८॥
मग उठावलें असिवार । तेंही भंगविलें पायाचे मोगर । रणकंदन केलें थोर । समरंगणीं ॥२९॥
मग कुंजर भार उठावले । तेही असिवारां भंगिले । रक्तमांस कालविलें । चिखलु झाला ॥३०॥
मग उठावले रहंवर । तेही पळविले कुंजर भार । शस्त्रीं न दिसे दिनकर । अभ्रामाजी ॥३१॥
तेथें सुटले शरजाळ । बाणीं व्यापिलें अंतराळ । उठती अग्नीचे कल्लोळ । दही दिशा ॥३२॥
तंव कर्णू उठावला । तेणें सबळ वाहानु पाचारिला । ह्मणे साहें साहें वहिला । जासी झणीं ॥३३॥
ह्मणे साहें साहें गा वीरा । झणीं सरसील माघारा । माझिया घायाचा दरारा । लागला तुज ॥३४॥
हें परिसोनियां उत्तर । कोपें खवळला महावीर । मग चा-लिला समोर । कर्णाउजु ॥३५॥
ह्मणे एक वेळां पडिलासी । रण-भूमि सांडूनि पळसी । मुख दाखवितां न लाजसी । निर्लज्जा तूं ॥३६॥
रणभूमि सांडूनि पळिजे । तेणें मुख केंवि दाखविजे । ह्लदय फुटोनि मरिजे । तरीचे भलें ॥३७॥
अपकीर्तीसी जिणें । तें अप्रयोजक मी म्हणें । मुख दाखवितां लजिरवाणें । वीरांमाजी ॥३८॥
ऐसें ह्मणोनियां गुणीं । विंधिला खडतर बाणीं । जैसा कोपला शूल-पाणी । महाभूतीं ॥३९॥
कर्णू तोडी वरिच्यावरी । परी कासावीस केला भारी । सारथी आणि वारू चारी । पाडिले भूमीं ॥४०॥
बाण घातीं विकळ केला । मूर्च्छागत भूमीं पडला । तंव अश्वत्थामा पावला । सांवरी वीरा ॥४१॥
मग संधानाच्या शरीं । अश्वत्थामा येतां दुरी । तो भेदिला शरधारीं । विकळ केला ॥४२॥
तंव पा-वला दु:शासन । तेणें खडतर घातले बाण । झाकुळले रविकिरण । आच्चदिलें दिसे ॥४३॥
तयाचे शर तोडुनी । मग विंधिला अनि-वार बाणीं । दु:शासन पळविला रणीं । रथेंसहित ॥४४॥
भूरि-श्रवा सोमदत्तु । तेही पाचारिला वीरनाथु । तुझा थोर पुरुषार्थु । देखिला आम्हीं ॥४५॥
कृतवर्मा आणि पौंडरिकू । भगदत्तू पिंगाक्षू । अनंत विजयो बाहाळिकू । उठावले ॥४६॥
तये वेळीं सबळ वाहानु । विरक्षत्रिया पंचाननु । तेणें तोडिलें बाणें बाणु । पाडिलें भूमीं ॥४७॥
मग तेही सकळ वीरीं । रघु घातला माझारीं । वर्षताती शरधारीं । मेघ जैसें ॥४८॥
प्रळयकाळीं जळधार । वर्षती अखंड धार । जैसा झाकोळला दिनकर । अभ्रामाजी ॥४९॥
बापु येकला वीर राणा । सावरिपु असे त्याचिया बाणा । ते न साहवेचि म्हाळसेना । महावीरा ॥५०॥
N/A
References : N/A
Last Updated : December 22, 2014
TOP