ह्याळसेन कथा - अभंग ५१ ते ७५
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
मग लेटिला रहंवरु । जैसा तृणावरी वैश्वानरु । कीं तमावरी दिनकरु । उदय करी ॥५१॥
कीं महाभूतावरी रुद्नु । कीं प्रळयकाळीं समुद्नु । कीं दैत्यसैन्यावरी इंद्रु । वज्रघातें ॥५२॥
तैसा रथ घडघडितु । जैस काळावरी कृतांतु । कीं राक्षससैन्यावरी जैसा हनुमंतु । तैसियापंरी ॥५३॥
वर्षताती खडतर बाणीं । सैन्य घाय-वटलें थोर रणीं । वीरासी झाली भंगणी । क्षणामाजी ॥५४॥
करीं घेऊनियां गदा । रथ घोडे करी चेंदा । केला महा वीरासी धोदा । रणामाजी ॥५५॥
सारथी आणि महारथी । थोर घाईं पाडिले क्षितीं । रथ सैरा धांवती । रणामाजी ॥५६॥
कर्णाचा मनोरथु । पुर-विला मोडुनी रथु । कर्णु करूनि विरथु । चरणीं चाले ॥५७॥
दु:शासनु गदें हाणितला । तो मूर्च्छागत पाडिला । सकळ देखोनी पळाला । सांडुनी रथू ॥५८॥
मग घेउनी रथ बाण । खडतर करितसे संधान । तें सापिच्छी खडतरोन । विसंसर होती ॥५९॥
सैन्य पळालें गेले भंगीं । आपण उभा रणरंगीं । जैसा माया त्यजुगी योगी । निर्वि-कारू ॥६०॥
तें न साहत तेणें । मग घातले खडतर बाण । व्यापुनी ठेविले रवी किरण । अभ्रामाजीं ॥६१॥
आणिक सोडिले शर । अति तिखट अनिवार । जैसे उलथले डोंगर । कल्पांतसमयीं ॥६२॥
तें देखोन ह्याळसेन । केले शंखाचें स्फुरण । मग पाचारिला द्रोण । समरंगणीं ॥६३॥
म्हणे कालच्या दिवशीं गुरू । सांडुनी पळालेती रहंवरू । मागुता घेतला विचारू । झुंजावयासी ॥६४॥
तंव द्रोणु आवेशला । अग्निशस्त्रेंकरुनी हाणितला । जैसा त्रिनेत्रु उघडिला । महारुद्रें ॥६५॥
अग्नि प्रजळला अंबरीं । जे प्रळय काळची लहरी । ह्याळसेन सैन्यावरी । झेंपावला ॥६६॥
तें देखिलें ह्याळसेनें । शस्त्रें सोडिलें पर्जन्यें । चार्ही मेघ अव्हानुन । एकेठायीं ॥६७॥
धन्य पावन पांगुळला । गगनीं चहूं मेघांचा मेळा । उदक वाहताहे खळाळा । रणाभाजी ॥६८॥
सैन्यक वीर पुरीं वाहत । मेघ मुसळधारी वर्षत । ऐसें वर्तलें झूंजात । कौरव सैन्यीं ॥६९॥
तंव द्रोणें काय केलें । वायो अस्त्र मोकलीलें । मेघमंडळ विध्वंसिलें । क्षणामाजीं ॥७०॥
उडताती गिरिकंदर । पाषाण गोटी तरुवरें । जेवीं प्रळयकाळीं वसुंधरें । कंपु होय ॥७१॥
उडती रथचिया मो-डुनी । भ्रमतसें अंतराळीं । जेवी गिधाची हाऊळीं । तैसें दिसे ॥७२॥
ध्वजस्तंभ मोडले । रथचि साटे सोडले । पताकाचे सडे झाले । भूमंडळीं ॥७३॥
तें देखोन ह्माळसेन । काढिला नवनी सीतुबाण । पन्नग अस्त्र अभिमंत्रून । लविलें गुणीं ॥७४॥
सर्प चालिले लक्ष कोटी । फणिया उभारिल्या अंबरीं । गरळ वमिताती त्रिकुटीं । जैशा अग्निज्वाळा ॥७५॥
N/A
References : N/A
Last Updated : December 22, 2014
TOP