आतां स्मरणालंकार-
“ सादृश्यज्ञानाच्या योगानें जाग्रत झालेला जो संस्कार, त्या संस्कारानें उत्पन्न झालेल्या स्मरणाला स्मरणालंकार म्हणावें. ”
उदाहरणार्थ:-
“ ज्याच्या दोन बलिष्ठ बाहूंनीं वाकविलेल्या तेजस्वी धनुष्याच्या केवळ प्रचंद ध्वनीनेंच, माजलेल्या शत्रुसमूहाला नष्ट करून टाकलें आहे, अशा तुला, हे राजा, रणामध्यें पाहून, हातांत नाचणार्या धनुष्यांतून सोडलेल्या बाणांच्या समूहांतून निघालेल्या अग्नीच्या ज्वाळांच्या तांडवानें जळणारें जें खांडववन, त्याच्यावर क्तुद्ध झालेल्या अर्जुनाचें कोणाला स्मरण होणार नाहीं बरें ? ”
“ हे शत्रुसमूहाचा विध्वंस करणार्या राजा, ज्याच्या हातांत फिरणार्या पट्टिश अस्त्रानें मोठमोथया मत्त हत्तींना चेचून टाकलें आहे, अशा तुला, रणांगणामध्यें पाहाणार्या कोणत्या मनुष्याच्या ह्लदयामध्यें, आपल्या वज्राच्या भयंकर प्रहारानें ज्यानें विंध्य पर्वताचे तुकडे तुकडे करून टाकले आहेत असा इंद्र एकदम प्रकट होणार नाहीं बरें ? ”
वरील दोन्हीहि श्लोकांमध्यें राजाविषयीं कवीच्या मनांत असलेली भक्ति ही मुख्य आहे. व श्लोकांत सांगितलेलें स्मरण त्या भक्तीचा उत्कर्ष करीत असल्यानें, तें ( स्मरण ) येथें अलंकार झालें आहे. ह्या दोन श्लोकां-पैकीं पहिल्या श्लोकांतलें स्मरण शब्दानें सांगितलें असल्यानें, वाच्य आहे व दुसरें स्मरण लक्ष्य आहे, हा या दोन स्मरणांत फरक. ह्या दोन्हीहि श्लोकांत असलेला वीररस पण, श्लोकांतील प्रधान असलेल्या रतिभावाचा उत्कर्ष करीत असल्यानें, अलंकार झाला आहे.
“ प्रलयकालीं, एकांत एक मिसळून जाणार्या समुद्राप्रमाणें, रणांगणांतील ( एकत्र झालेलें ) कौरवांचें सैन्य पाहून, भगवान श्रीकृष्णाला, शेषाच्या शरीराची केलेली सुंदर शय्या व त्यावर स्वत: पडून घेतलेली योग-निद्रा ह्या दोहोंचें स्मरण झालें. ”
ह्या श्लोकांत, शय्या व निद्रा ह्या दोहोंचें झालेलें स्मरण हें, त्या दोन वस्तूंशीं सदृश असलेल्या पदार्थाच्या दर्शनानें जाग्रत झालेल्या संस्कारा-मुळें झालेलें नसलें तरी, सैन्याशीं सदृश असलेल्या समुद्राचें दर्शन झाल्यामुळें, समुद्राविषयींचा जो संस्कार जाग्रत झाला, त्या संस्कारामुळें पयोधीचें स्मरण प्रथम झालें व त्यामुळें त्या स्मरणावर अवलंबून असलेल्या शेषशय्या व योगनिद्रा ह्या दोहोंचें स्मरण, नंतर झालें. अर्थात् समुद्र ह्या सदृश वस्तूच्या प्रत्यक्ष दर्शनानें जाग्रत होणार्या संस्कारामुळेंच शेषशय्या व योगनिद्रा ह्यांचें स्मरण झालें असल्यामुळें, तें ( स्मरण ) कसल्यातरी सादृश्याला पाहून उद्बुद्ध झालेल्या संस्कारानेंच उत्पन्न झालें आहे, असें म्हणतां येईल.