स्मरणालंकार - लक्षण ६

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


आतां ह्या स्मरणालंकाराचा ध्वनि:-
( स्मरणालंकाराच्या ध्वनीचें उदाहरण ) :-
“ अहाहा ! ह्या वनाचा आंतला भाग पुष्पगुच्छांनीं वाकलेल्या लतांच्या योगानें फारच मनोहर दिसत आहे. आणि म्हणून तो नेहमीं सेवन करण्यास योग्य झाला असता; पण स्तनभारांनीं युक्त तरुणीम, जर, हदय हरण करीत नसत्या तरच ( तो सेवन करण्यास योग्य झाला असता. ) ”
ह्या श्लोकांत पुष्पगुच्छांनीं वाकलेल्या लतांच्यामुळें तत्सदृश स्तन-भारयुक्त युवतींचें स्मरण झालें आहे. परंतु तें स्मरण कोणत्याहि प्रधान अर्थाचें उपस्कारक होत नसल्यानें, तें गौण झालें नाहीं. ( आणि म्हणूनच तें प्रधान आहे. ) ह्या श्लोकां, स्तन व पुष्पगुच्च हा बिंबप्रतिबिंबभावामुळें तयार झालेला साधारणधर्म आहे व तो श्लोकांत वाच्य झाला असला तरी, त्या धर्मानें उत्पन्न झालेलें जें सादृश्य तत्‍मूलक जें स्मरण, तें या श्लोकांत शब्दानें सांगितलें नसल्यामुळें, व्यंग्य आहे. ह्या श्लोकांतील दीर्घ इकारान्त युवती शब्द, ‘ सर्वतोऽक्तिन्नर्थात्‍ ’ ह्या वार्तिकाप्रमाणें, युवन्‍ शब्दाला डीष्‍ हा प्रत्यय लावून सिद्ध झाला आहे.
अथवा ह्या अलंकाराच्या ध्वनीचें दुसरें उदाहरण :-
“ कमळांनीं झाकलेलें हें अप्रतिम सरोवर पहा. मित्रा, ( जास्त ) बोलूं नकोस. स्त्रियांचे डोळे मला जाळीत आहेत. ”
ह्या श्लोकांतहि कमळाच्या ज्ञानावर अवलंबून असलेलें, कमळा-प्रमाणें असलेल्या डोळ्यांचें जें स्मरण, तें, प्रधान असून व्यंग्य झालें आहे. ( आणि म्हणूनच हा स्मरणालंकारध्वनि. )
आतां, ह्या स्मरणालंकारांत उपमेचे जेवढे म्हणून दोष सांगितले आहेत ते, बहुतेक, संभवतात. विशेषत: ज्या ठिकाणीं ह्या अलंकारांतील सादृश्य निश्चितपणें व्यंग्यच असलें पाहिजे, त्या स्थळीं, तें सादृश्यवाचक शब्दानें वाच्य केलें गेल्यास, दोष होतो. उदाहरणार्थ-
“ ह्या सज्जन मेघाचे उपकार मी कधींच विसरणार नाहीं. कारण, हा, दृष्टीस पडला असतां, नूतन मेघाप्रमाणें श्यामवर्ण असलेल्या श्रीकृष्णाला एकदम जाहीर करतो. ”
ह्या श्लोकांत, केवळ स्मरणानेंच मेघ व श्रीकृष्ण ह्या दोहोंमधील सादृश्य सूचित झालें आहे. तरीसुद्धां, तें सादृश्य शब्दानें सांगितलें असल्यानें, बिघडून गेलें आहे. म्हणून ह्या श्लोकांतील नवघनश्याम हा शब्द बदलून, ‘ निवेद्यते देवकीतनय: ’ असें म्हटल्यास योग्य होईल. ह्या अलंकारांत, सादृश्याला कारण असलेला साधारणधर्म प्रत्यक्ष शब्दानें कुठें सांगावा व कुठें सांगूं नये, ह्या विषयीची व्यवस्था उपमा-लंकाराप्रमाणेंच समजावी. कशी ती पहा-
उपमेमध्यें असा एखादा धर्म असतो कीं, तो नेहमीं सूचित असावा लागतो आणि म्हणून तो प्रत्यक्ष शब्दानें सांगूं नये. उदाहरणार्थ ‘ शंखवत्‍ पांडुरच्छवि: ’ ( हा शंखाप्रमाणें शुभ्र वर्णाचा आहे. ) ह्या वाक्यांत पांडुरत्व हा धर्म नेहमींच सूचित असल्यानें, तो शब्दानें सांगूं नये ( हें कबूल ) ; पण, ‘ शंखवत्‍ पांडुरोयं ’ ह्या वाक्यांत, पांडुरत्व हा धर्म शब्दांनीं सांगावा लागला आहे. कारण कीं, शंखाचें जे अनेक सामान्य धर्म त्यांपैकीं, प्रस्तुत पदर्थाशीं शंखाचें कोणत्या धर्मानें सादृश्य आहे हें कळणें कठीण आहे. उपमान व उपमेय ह्या दोहोंमध्ये सादृश्य साधणारा श्लिष्टशब्दरूप धर्महि असूं शकतो अथवा वक्त्याला सांगण्यास इष्ट नसलेला, असा दुसरा कोणताहि धर्म साधारण धर्म होऊं शकतो; व तशा धर्माने-सुद्धां उपमा तयार होऊं शकते. म्हणून आपल्याला इष्ट असलेल्या साधारण धर्माहून इतर अशा साधारण धर्मांचे निवारण करण्याकरितां, वरील वाक्यांत बोलणाराला इष्ट असा पांडुर हा साधारणधर्म शब्दानें सांगितला आहे. ( आणि तो धर्म ह्या वाक्यांत शब्दानें सांगणेंच योग्य होतें. ) अथवा ‘ अरविन्दं इव सुंदरं मुखम्‍ ’ ह्या वाक्यांत, सुंदरत्व हा साधारणधर्म वक्त्याला अभिप्रेत असल्यानें, मुद्दाम शब्दानें
सांगितला आहे. पण ज्या ठिकाणीं वक्त्याच्या मनांत कोणत्याहि दुसर्‍या साधारण धर्माची उपस्थिति होत नसेल, व ज्या ठिकाणीं अमुक साधारण धर्म अत्यंत प्रसिद्ध असेल तेथें तो, वरील दोन कारणांमुळें, वाक्यांत शब्दानें सांगितला जात नाहीं. उदाहरणार्थ-‘ अरविन्दमिव मुखं’ ह्या वाक्यांतील साधारणधर्म वरील कारणास्तव शब्दानें सांगितलेला नाहीं. पण ज्या ठिकाणीं साधारणधर्म अप्रसिद्ध असेल त्या ठिकाणीं मात्र, तो धर्म प्रत्यक्ष शब्दांनी अवश्य सांगावा. नाहींतर, तो ( चटकन्‍ ) लक्षांत न आल्यास, त्यामुळें होणरी उपमा तयार करण्याचा खटाटोप व्यर्थ होण्याचा प्रसंग येईल. उदाहरणार्थ-‘ नीरदा इव ते भांति बलाकाराजिता भटा: ’ हे योद्धे मेघांप्रमाणें बलाकाराजित [ ( १ ) मेघाकडे-बगळयांनीं शोभणारे ( २ ) योद्धयाकडे-बल व आकार यांच्या योगानें अजिंक्य असलेले.  ] ह्या वाक्यांत श्लिष्टाशब्दरूप साधारणधर्म असल्यानें, तो शब्दांनें सांगणें आवश्यक आहे. एवंच, एखादा साधारण धर्म कुठें कुठें प्रत्यक्ष शब्दानें सांगितलेला नसावा; तर कुठें तो शब्दानें सांगितलेला अथवा न सांगितलेलाही चालतो; व कुठें कुठें तो शब्दानें सांगावाच लागतो; असा ह्या बाबतींत सह्लदयांना मान्य होणारा नियम आहे. अशा रितीनें, उपमेच्या बाबतींतील वरील नियम उपमेवर जगणार्‍या ह्या स्मरणालंकाराच्या बाबतींतही योग्य समजावा.
अशा ह्या साधारणधर्माच्या प्रकारांपैकीं अनुगामी साधारणधर्म ज्यांत आहे, अशा ‘ स्मृत्यारूढं भवति० ’ इत्यादि श्लोकांत असलेला स्मरणालंकार वर सांगितलाच आहे. आतां बिंबप्रतिबिंबभावरूप साधारणधर्मानें युक्त
असलेला स्मरणालंकार ‘ भुजभ्रमितपट्टिश ० ’ इत्यादि पूर्वी आलेल्या श्लोकां सांगितलाच आहे. ह्या श्लोकांत, कुलिश आणि पट्टिश  ह्या जोडींत, आणि भूधर व दंतावल ह्या जोडींत बिंबप्रतिबिंबभाव आहे.
आतां उपचरित साधारणधर्म असलेल्या स्मरणालंकाराचें उदाहरण हें:-
“ कांहीं कार्यामध्यें मृदुल व कांहीं कार्यामध्यें कठीण असें तुझें ह्लदय पाहून हे राजा, लोणी आणि वज्र ह्या दोघांचें ( अनुक्तमानें ) कोणाला स्मरण होणार नाहीं ? ”
अथवा ह्या उपचरित साधारण धर्माचें हें दुसरें उदाहरण-
“ अगाध व चोहोंकडून पाण्यानें तुडुंब भरलेल्या त्या महासागराला पाहून, हनुमानाला, राजा रामचंद्राच्या ह्लदयाचें स्मरण झालें. ”
ह्या दोन्ही श्लोकांतील मृदुलत्व वगैरे धर्म उपचरित म्हणजे लक्षणेच्या योगानें तयार झालेले आहेत. पण ह्या दोन्हीही श्लोकांतील उपचरितधर्मामध्यें फरक आहे तो असा -
ह्यांपैकीं पहिल्या श्लोकंत, प्रत्यक्ष अनुभूत असलेल्या ह्लदयाच्या ठिकाणीं, स्मरणांत आलेल्या नवनीताच्या सांदृश्यांची सिद्धी झालेली आहे. तर, दुसर्‍या श्लोकांत, स्मरणांत आलेल्या ह्लदयाच्या ठिकाणीं, अनुभूत होणार्‍या महासागराच्या सादृश्याची सिद्धि झालेली आहे. सादृश्य हा धर्म, संबंधरूप असल्यानें, व संबंध दोन पदार्थांवर अवलंबून असल्यानें, वरील दोन्ही श्लोकांतील सादृश्य भिन्न प्रकाराचें आहे.
केवळ शब्दस्वरूप साधारणधर्म असलेल्या स्मरणालंकाराचें हें
उदाहरण-
“ भ्रमरांनीं युक्त असलेल्या ऋतुराज वसंताविषयीं जेव्हां जेव्हां मीं ऐकतों, तेव्हां तेव्हां, नियमानें भगवान व्यासमुनि, माझ्या स्मृतिपटलावर, आरूढ होतात ( म्हणजे व्यासांची मला आठवण होते ).
वरील श्लोकांतील, भ्रमरहित या शब्दाचे दोन अर्थ होतात; व त्यांपैकीं एकेक अर्थ व्यास आणि वसंत ह्या दोघांना लागू पडत असल्यानें, भ्रमरहित हा शब्द साधारणधर्म झाला आहे. ( भ्रमरहित=भ्रम + रहित म्हणजे भ्रमरहित हा अर्थ व्यासांना लागू; व भ्रमर + हित = भ्रमरांना हितकारक हा अर्थ वसंताला लागू. )
अशा रीतीनें, ह्या स्मरणालंकाराचे दुसरेही अनेक प्रकार विद्वानांनीं शोधून काढावें. आम्ही ह्या सर्व प्रकारांचें, फक्त दिग्दर्शन केलें आहे.
ह्या ठिकाणीं रसगंगाधरांतील स्मरणालंकाराचें निरूपण समाप्त झालें.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP