व उन्माद हा व्यभिचारी भाव त्या विप्रलंभाचा परिपोष करीत आहे. ह्या श्लोकांतील स्मृति, त्या विप्रलंभशृंगाराचा उत्कर्ष करीत असल्यामुळें , तिला अलंकारच म्हणावें लागेल. म्हणून, ह्या स्मृतीची व्यावृत्ति करण्याकरतां लक्षणांत अव्यंग्य हें विशेषण देणें अत्यंत अनुचित आहे. व्यंग्य असणें आणि त्याच वेळीं अलंकार असणें, ह्या दोहोंत विरोध असतो असें म्हणतां येणार नाहीं. कारण कीं, नेहमी व्यंग्य असलेले रस अथवा भाव दुसर्याचें अंग झाले असतां अलंकार होतात, हा सिद्धांत सर्वांनीं स्वीकारलेला आहे. आतां, ( अलंकार प्रधान व्यंग्य होऊं नये म्हणून, ) प्रधान व्यंग्याच्या व्यावृत्तीकरतां, सर्व अलंकारांच्या लक्षणांत, उपस्कारकत्व हें विशेषण द्यावें, असें आम्ही पूर्वींच म्हटलें आहे. याशिवाय , “ अत्युच्चा: परित: स्फुरन्ति गिरय: ’ इत्यादि श्लोकांत, स्मृति हा संचारी भाव राजविषयक रतिभावाचा अंग झाल्यामुळें, ह्या श्लोकांत प्तेयस् अलंकार आहे. ” असें जें दीक्षितांनी म्हटलें आहे तेंहि योग्य नाहीं. ‘ एका भावाला दुसरा भाव अंग झाला असतां, प्रेयस् अलंकार होतो’ , हें कबूल; पण ह्या श्लोकांत स्मृति हा मुळीं भावच नाहीं. कारण स्मृ ह्या धातुवाचक शब्दानें तो भाव वाच्य झाला आहे. ब्यभिचारी वाच्य झाला असतां, त्याला भाव म्हणतां येत नाहीं; कारण, ( तसें म्हटलें तर, ) ‘ व्यभिचारी व्यंग्य असेल तरच तो भाव होतो’ , ह्या आलंकारिकांच्या सिद्धांताशीं विरोध येईल. ह्या बाबतींत अलंकारसर्वस्वकारांनीं खालीलप्रमाणें म्हटलें आहे:-
“ प्रेयस् अलंकाराचा विषय होणारी जी स्मृति ती, सादृश्याहून निराळ्या अशा दुसर्या कारणानें, उत्पन्न झालेली असते. आणि ती भाव होणारी स्मृति, विभाव, अनुभाव वगैरेंनीं सूचित व्हावी लागते, उदाहरणार्थ:- ‘ अहो कोपेपि कान्तं मुखम् ’ ( का० प्र० ४ ) इत्यादि श्लोक ; स्मृति भाव होण्याकरतां ती, केव्हांहि स्वत:चा वाचकं शब्दानें वाच्य होता कामा नये.