आतां त्यांनींच (म्ह० अलंकारसर्वस्वकारांनीं) निदर्शनेचें जें, ‘शक्य अथवा अशक्य अशा वस्तूच्या संबंधानें सूचित झालेलें साद्दश्य म्हणजे निदर्शना,” असें लक्षण केलें आहे, तेंही बरोबर नाहीं; कारण त्या लक्षणाची रूपक व अतिशयोक्ति वगैरे अलंकारांत अतिव्याप्ति होऊं लागेल.
आतां अलंकारसर्वस्वकारांना अनुसरणार्या कुवलयानंदकारांनीं,
“सद्दश अशा दोन वाक्यार्थांपैकीं एका वाक्यार्थाचा दुसर्या वाक्यार्थावर अभेदारोप म्हणजे निदर्शना. उदा० :--- “दात्याचा जो भलेपणा तीच पूर्णचंद्राची निष्कलंकता.” असें जें निदर्शनेचें लक्षण व उदाहरण दिलें आहे, त्याचें, सर्वस्वकारांच्या मतांत आम्ही जो दोष वर दाखविला आहे त्यावरून, बिंग बाहेर पाडल्यासारखेंच आहे; तेव्हां पुन्हां आम्ही तें बाहेर पाडण्याच्या भानगडींत पडत नाहीं.
(आतां ‘त्वत्पाद०’ या ठिकाणीं निदर्शना पाहिजे असले तर :---)
“त्वत्पादनखरत्नानि यो रञ्जयति यावकै: । इन्दुं चन्दनलेपेन पाण्डुरीकुरुते हि स:,” (तुझ्या पायाच्या न्खरूपी रत्नांना जो आळित्याच्या रंगानें रंगवितो, तो चंदनाच्या लेपानें चंद्राला पांढरे करतो.) असें जर पद्य (शब्द बदलून) केलें तर मग, या ठिकाणीं निदर्शना आहे हें म्हणणें योग्य होईल. तुम्ही म्हणाल, “आम्ही दिलेल्या उदाहरणांत (त्वत्पाद० या पहिल्या श्लोकांत) निदर्शना वाच्य आहे, पण या तुमच्या नव्या उदाहरणांत गम्य अथवा व्यंग्य निदर्शना आहे;” पण तसेंही नाहीं; कारण तसें म्हणाल तर, ‘मुखं चंद्र इव’ ही वाच्य उपमा आहे व मुखं चंद्र: ही व्यंग्य उपमा आहे, असेंही म्हणणें सोपें आहे. एवंच काय कीं, आरोप (रूपकाप्रमाणें) अथवा अध्यवसान (अतिसयोक्तीप्रमाणें) या दोन्ही मार्गांहून निराळा असा आर्थ अभेद हाच निदर्शनेचा प्राण आहे. व तो आर्थ अभेद, कर्ता वगैरेंच्या अभेदाचें प्रतिपादन करण्याचे द्वाराम, वाक्यार्थनिदर्शनेंत सांगितला जातो. हेंच मनांत धरून मम्मटभट्टांनीं (काव्य० १०।४३५ यांत) :---
“कुठें सूर्यवंश व कुठेंही माझी तोकडी (छोटे विषय समजणारी) बुद्धि ? वेडेपणानें मी ओलांडण्याला कठीण असा समुद्र होडीनें ओलांडू पहात आहे.” हें निदर्शानेचें उदाहरण दिलें आहे. कुणी म्हणतील, हें निदर्शनेचें उदाहरण जुळत नाहीं; (वसत नाहीं); कारण येथें विषयी (समुद्र ओलांडू पाहणारा) शब्दानें सांगितला असला तरी, विषय (रघुवंश वर्नन करू पाहाणारा कवि) शब्दानें सांगितलेला नाहीं; आणि (तुमच्याच म्हणण्याप्रमाणें) निदर्शनेंत विषय व विषयी दोन्हीही शब्दानें सांगितले असले पाहिजेत. तेव्हां येथें ललितालंकार आहे असें म्हणणेंच योग्य आहे” यावर उत्तर हें कीं, ललितालंकाराचें खंडन करायच्या वेळीं आम्ही याचें तेथें स्पष्ट विवेचन करणारच आहों. (म्हणून आतां याबद्दल कांहींच सांगत नाहीं.)
दुसर्या कांहींचें म्हणणें असें कीं, ‘त्वत्पादनख०’ ह्या ठिकाणीं द्दष्टांतालंकार आहे.’ पण हें म्हणणेंही चूक आहे; बिंबप्रतिबिंबभावानें युक्त अशा पदार्थांनीं विशिष्ट व एकमेकांची अपेक्षा न बाळनणारे (म्ह० स्वतंत्र असे) दोन वाक्यार्थ द्दष्टांतांत असतात तर, निदर्शनेंत दोन वाक्यार्थांत आर्थ अभेद असल्यानें, त्यांच्यांत परस्परापेक्षा असते.) तेव्हां ‘त्वत्पाद०’ या वाक्यांत वाक्यार्थरूपक मानणेंच योग्य आहे, निदर्शना मानणें योग्य नाहीं, हे ठरलें. आणि अशा रीतीनें असभवित अशा दोन वस्तूंच्या संबंधावर आधारलेल्या वाक्यार्थनिदर्शना व पदार्थनिदर्शना - या दोन्हीही सांगून झाल्या.