हा सर्व अभिप्राय मनांत धरूनच मम्मटभट्टांनीं, ‘स्वस्वहेत्वन्वयस्योक्ति: क्रिययैव च सापरा’ (स्वत: कर्त्याची एखादी क्रिया व त्या क्रियेचा हेतु म्ह० कारण यांचा संबंध क्रियेनेंच म्ह० अमुक एक प्रकारची प्रत्यक्ष क्रिया करूनच, सांगणें ही दुसर्या प्रकारची म्ह० संभवद्वस्तुसंबंधमूला निदर्शना) असें दुसर्या निदर्शनेचें लक्षण करून, तिचें खालीलप्रमाणें उदाहरण दिलें आहे :---
“जो हलका (हकलट) असतो, तो सहजासहजीं उच्चपदाला पोंचला कीं, निश्चितपणें खालीं पडायचाच, असें (सगळ्या जगाला) सांगत, पर्वताच्या शिखरावर असलेला दगडाचा कण, वार्याच्या झुळुकेने हालविल्यामुळें खालीं पडतो.”
या पद्यांत, मुळांतील ‘इति’ याच्यापुढें बोधयन् किंवा बोधयितुं (सांगणारा अथवा सांगण्याकरतां) असा शब्द नसल्यानें, येथें उत्प्रेक्शा संभवतच नाहीं. तेव्हां, येथें बोध करणें यावर, म्हणजे संभवणार्या वस्तुसंबंधावर, आधारलेली निदर्शनाच (मानणें) योग्य आहे.
आतां हें मालानिदर्शनेचें उदाहरण :---
“जो मनुष्य दुष्ट माणसाला ताब्यांत आणण्याची (वश करण्याची) इच्छा करतो, त्या मनुष्याला, कुतूहलानें हालाहल विश प्यावेंसें वाटतें. कल्पांताग्नि तोंडाला लावावासा वाटतो, व खरोखरीच मोठया सर्पाला आलिंगण्याचा यत्न करावासा वाटतो.”
अथवा (मालनिदर्शनेचें) हें दुसरें उदाहरण :---
“जो दुष्ट माणसाचा सत्कार करतो, तो आकाशांत बी टाकून नांगरतो; वार्यावर सुंदर चित्र काढतो व पाण्याव्र रेघा काढतो.”
मुळांतील बीजाकुरुते याचा अर्थ :--- बी टाकून नांगरणें, येथें हें आणकी ध्यानांत ठेवावें कीं :---
“वडील माणसांबरोबर चाललेल्या तिनें आपलें कमळासारखें तोंड हंसरें करून जें माझ्याकडे मान वळवून (तिरप्या नजरेनें) पाहिले, त्यानें जग घायाळ होऊन गेलें.”
वरील तिन्हीही श्लोकांत, ‘भावप्रधानमाख्यातम्’ (क्रिया ही ज्यांत मुख्य असते ते आख्यात) या यास्काच्या पूर्वीं सांगितलेल्या पद्धतीनें, क्रियामुख्यविशेष्यक शाब्दबोध मानणारांच्या मतें (म्ह० वैय्याकरणांच्या मतें) उपमेयभूत व उपमानभूत या दोन्ही वाक्यांतील क्रियांचा अभेदारोप शब्दानें सांगितला असल्यानें, ‘मुखं चंद्र:’ याप्रमाणें रूपक मानणें योग्य आहे. पण प्रथमान्तमुख्यविशेष्यक शाब्दबोध मानणार्या नैय्यायिकांच्या मतें, वरील श्लोकांत कर्त्यांचा (इच्छिणारा, पिऊं पाहणारा इ० चा) अभेद शाब्द असला तरी, त्यांच्या (इच्छिणें, पिऊं पाहणें इ०) क्रियांच अभेद आर्थ असल्यामुळें येथें निदर्शना (अवश्य) आहे. मुळांतील निष्पत्राक्रणम - म्ह० पिसांचा बाण दुसर्या बाजूनें बाहेर पडल्यामुळें त्याला पिसें नसलेला करणें - (म्ह० मनुष्याला घायाळ करणें,) हा अर्थ आहे.
येथें रसगंगाधरांतील निदर्शनाप्रकरण संपलें.