अथवा याचेंच दुसरें उदाहरण :---
“सूर्य व चंद्र हें ज्याचें वस्त्र (आकाशरूपी वस्त्र) आपल्या किरणानीं रंगवितात, व ज्याच्या अंगाला लावायचें उटणें अग्नि तयार करतो [म्ह० विभूति (भ्स्म) तयार करतो] त्या परमेश्वराला (म्ह० शंकराला) मी नमस्कार करितों.” (शंकर दिंगबर असल्यानें आकाश हें त्याचें वस्त्र आहे असें म्हटलें आहे).
ह्या ठिकाणीं शंकर आकाशाचें वस्त्र धारण करतो, (म्हणजे तो दिगंबर आहे) हा अर्थ सांगायचा असून तो अर्थ, ‘ज्याचें वस्त्र चंद्र व सूर्य रंगवितात’ अशा रूपानें सांगितला गेला आहे; त्याचप्रमाणें जो अंगाला भस्म लावतो हा अर्थ सांगायचा असून, अग्नीनें ज्याचें उटणें तयार केलें आहे, या रूपानें तो (अर्थ) सांगितला गेला आहे.
“या अलंकारांत गम्याचें म्हणजे व्यंग्यार्थाचें ज्या रूपानें व्यंग्यत्व असेल त्याहून निराळ्या रूपानें वाच्यत्व होतें. म्हणूनच, पर्यायानें म्हणजे निराळ्या प्रकारानें सांगितलेलें आहे व्यंग्य ज्यामध्यें, असें जें या अलंकाराचें प्राचीनांनीं लक्षण निर्माण केलें आहे तें, वाच्यत्व आणि व्यंग्यत्व या दोहोंमध्यें विरोध असल्यामुळें असंगत आहे, अशी जी कित्येक शंका घेतात ती बरोबर नाहीं. कारण एकाच वस्तूचें, प्रकारभेदानें, वाच्यत्व आणि व्यंग्यत्व असणें यांत कांहीं एक विरोध नाहीं. ज्याप्रमाणें अळिता कुसुम्ब, डाळिंबाचें फूल जास्वंदीचें फूल इ० पदार्थाचें रूप तांबडें असतें असें शब्दानें सांगितलें असतांही, वरील प्रत्येक पदार्थामध्यें असणार्या तांबडया रंगांतही जो विशिष्ट निराळा तांबडेपणा असतो तो प्रत्यक्षाचाच विषय असतो, तो शब्दानें सांगतां येत नाहीं; त्याप्रमाणें येथेंही समजावें.” असें मम्मटभट्टांचें म्हणणें.
पण अलंकारसर्वस्वकारांचें याबाबतींत म्हणणें असें :---
“व्यंग्याचेंही निराळ्या प्रकारानें कथन होणें याचेंच नांव पर्यायोक्त (अलंकार). ‘अर्थ गम्य असूनही त्याचें कथन कसें होऊं शकेल ?’ असें म्हणाल तर, कार्य वगैरेंच्या द्वारानें कथन होऊ शकतें, हें यावार (आमचें) उत्तार.”
त्यांच्या (अलंकारसर्वस्वकारांच्या) म्हणण्याचा आशय असा :---
“ चक्राला प्रहाराची (म्ह० प्रहार करण्याची) जोराची आज्ञा करून, ज्यानें राहूंच्या बायकांचा सुरताचा उत्सव, आलिंगनाच्या बेफाम विलासानें रहित, आणि चुंबन हेंच मात्र ज्याच्यांत अशिल्लक आहे, असा केला.’
या प्राचीनांच्या श्लोकांत, वासुदेव हा राहूच्या मस्तकाचा छेद करणारा आहे. हें व्यंग्य; पण तें व्यंग्य ‘राहूच्या स्त्रियांचें चुंबनच केवळ अज्यांत बाकी राहिलें आहे अशा सुरतोत्सवाला निर्माण करणारा’ या निराळ्या प्रकारानें सांगितलें गेलें आहे.” ह्याचें विवेचन केल्यास,
‘राहूच्या मस्तकाचा छेद करणें हा जो व्यंग्य धर्म तो स्वत:च्या बरोबर त्याच ठिकाणीं राहणारा दुसरा धर्म (म्ह० रतोत्सवाला चुंबनशेष करणें हा जो दुसरा धर्म) त्या धर्माच्या रूपानें साक्षात् शब्दानें सूचित केला जातो.’ हाच शेवटीं अर्थ होतो. या ठिकाणीं पूर्वींच्या प्रकरणावरून चालत आल्यामुळें. व यत् या सर्वनामानें कथन झाल्यामुळें भगवान वासुदेवाचे व्यंग्यत्व नाहीं.