आतां “स्वत:च्या सिद्धीकरतां दुसर्या अर्थाचा आक्षेप करणें, व दुसर्या अर्थाकरतां स्वत:चें समर्पण करणें असें उपादान व लक्षण हे जे दोन प्रकार आहेत; त्या दोन्हीही प्रकारांना सुद्धा लक्षणा म्हणावी.”
ह्या मम्मटानें सांगितलेल्या युक्तीनें, दोन लक्षणांचा, हे दोन्हीही, (म्ह० पर्यायोक्त व अप्रस्तुतप्रशंसा हे) अलंकार आश्रय करीत असल्यामुळें, ह्या दोन अलंकारांत विषयांचे बाबतींतही अवांतर फरक आहे. असें, आपल्याल मूळ असलेल्या (म्ह० अलंकारसर्वस्व या) ग्रंथाचा आशय वर्णन करतांना विमर्शिनीकारांनीं जें म्हटलें आहे, तें बरोबर नाहीं. ‘चक्राभिघात०’ या श्लोकांत, स्त्रियांचा, चुंबन ज्यांत शेष (म्ह० बाकी) उरलें आहे असा, रतोत्सव केला,’ या अर्थाचा बाध होण्यासारखें कांहींच नाहीं; मग (मुख्यार्थबाध नसतांना) येथें लक्षणा कशी होईल ? त्याचप्रमाणें अप्रस्तुतप्रशंसेंतही अप्रस्तुताची प्रस्तुतार्थावर लक्षणा नसून व्यंजनाच आहे, हें सर्वांना मान्य आहे. हें मान्य केलें नाहीं तर पर्यायोक्तांत वाच्याचें प्राधान्य असतें व अप्रस्तुतप्रशंसेंत गम्यार्थाचें प्राधान्य असतें या सिद्धांताचा भंग होऊ लागले; (कारण) लक्षणेंत लक्ष्यार्थाचेंच प्राधान्य असतें व्याच्याचें नसतें. “वाच्यार्थ स्वत:ला उपस्कारक अशा स्वरूपानेम जेथें दुसर्या अर्थाला (म्ह० व्यंग्यार्थाला) व्यक्त करतो तेथें पर्यायोक्त; व ज्या ठिकाणीं वाच्यार्थ स्वत: अप्रस्तुत असल्यामुळें प्रस्तुत अशा दुसर्या अर्थाची प्रतीति व्हावी म्हणून स्वत:ला समर्पण करतो, त्या ठिकाणीं अप्रस्तुतप्रशंसा.” असें जें वरील विमर्शिनीकारांच्या टीकेला मूळ असणारा ग्रंथ (अलंकारसर्वस्व), म्हणतो, त्याच्याशीं (त्याच्यांतील मतांशीं) विमर्शिनीकारांचा विरोढ होऊ लागेल. लक्षणा ही केव्हांही व्यंजना होऊ शकत नाहीं. म्हणून पर्यायोक्तांत वाच्याचें प्राधान्य असतें व अप्रस्तुतप्रशंसेंत वाच्याला प्राधान्य नसतें (म्ह० व्यंग्याला प्राधान्य असतें) असें विमर्शिनीकाराला मूळ असलेल्या ग्रंथाचें तात्पर्य समजलें पाहिजे.
येथें हें ध्यानांत ठेवावें कीं, ध्वनिकाराहून प्राचीन असलेल्या भामह उदभट वगैरे आलंकारिकांनीं स्वत:च्या ग्रंथांत कुठेंही ध्वनि, गुणीभूतव्यंग्य इत्यादि शब्द योजिले नाहींत; एवढयावरूनच, वरील आलंकारिकांनीं ध्वनि वगैरेचा स्वीकार केलेला नाहीं, अशी जी आधुनिकांची बोलण्याची मखलाशी, ती योग्य नाहीं. कारण समासोक्ति, व्याजस्तुति, अप्रस्तुतप्रशंसा वगैरे अलंकारांच्या निरूपणांत गुणीभूतव्यंग्याचे कितीतरी प्रकार त्यांनीं सांगितले आहेत, आणि शाशिवायचा बाकीचा सर्व व्यंग्याचा विस्तार त्यांनीं सांगितले आहेत, आणि याशिवायचा बाकीचा सर्व व्यंग्याचा विस्तार त्यांनीं पर्यायोक्ताच्या पोटांत टाकून दिला आहे. अनुभवसिद्ध असा हा व्यंग्यार्थ लहान मुलानासुद्धां लपवतां येणार नाहीं. आतां हें खरें आहे कीं, त्यांनीं (म्ह० वरील आलंकारिकांनी) ध्वनि वगैरे शब्दांचा व्यवहार (उपयोग) केला नाहीं; पण एवढयानेंच त्यांना ध्वनि मान्य नव्हता, असें मुळींच म्हणतां येणार नाहीं. आतां प्रधान असल्यामुळें अलंकर्य होणारा जो ध्वनि तो पर्यायोक्त ह्या अलंकाराच्या पोटांत कसा सामावेला हा एक विचाराचा निराळाच मुद्दा आहे.
कुठें वाच्य कारणानें कार्य गम्य म्हणजे व्यक्त असतां, तर कुठें कार्यानें कारण व्यक्त झालें असतां, तर कुठें हे दोन्हीही प्रकार दूर ठेवून केवळ एका संबंधी पदार्थानें दुसर्या संबंधी पदार्थालाच व्यक्त करणें अशारीतीनें, ह्या पर्यायोकत अलंकाराचा विषयविस्तार फार मोठा आहे. पैकीं, ‘त्वां सुंदरीनिवह०’ या श्लोकांत पातिव्रत्याचा भंग होणें या कारणानें राजाला शत्रुसंपत्ति प्राप्त झाली, ह्या कार्याचें सूचन झालें आहे. या श्लोकांत पर्यायोक्ताचें समासोक्तीनें उत्थापन केलें आहे. अशी वस्तुस्थिति असल्यामुळें, “कार्यानें कारणाची प्रतीति होणें या पयोयोक्ताच्या प्रकाराप्रमाणें, कारणानें कार्याची प्रतीति होणें या पर्यायोक्ताच्या प्रकारांत वैचित्र्य नाहीं,” हें टीकाकाकारांचें म्हणणें खंडित झालें. अशा तर्हेच्या (पर्यायोक्ताचें उदाहरण :---)
“हे धृतराष्ट्रा ! रात्रंदिवस (पांडवांना) अपकार करणार्या तुझ्या पुत्रांनीं, पाडवांच्या ठिकाणीं मृत्यूचीम बीजें लावलीं आहेत (पेरलीं आहेत) हे निश्चित आहे.”
ह्या ठिकाणीं बीज पेरणें या कारणानें कुलक्षयरूपी कार्य सूचित केलें आहे.
कार्यानें कारण सूचित झाल्याचें हे उदाहरण :---
“तुझे शत्रुपक्षीय रजे आपल्या तीक्ष्ण व भयंकर अशा दातांच्या व्रणांनीं स्वर्गांतील बालिकांच्या कोमल अधरांना अत्यंत पीडा करीत आहेत.” या ठिकाणीं वैरी राजे सुरस्त्रियांचा संभोग घेतात, या कार्यानें, त्यांचें (प्रस्तुत राजाच्या हातून) मरण हें कारण सूचित झालें आहे. वरील उभयप्रकारचा कार्यकारणभाव नसतांनाही होणारा पर्यायोक्ताचा प्रकार, “सूर्याचंद्रमसौ यस्य०” ह्या, पूर्वी पर्यायोक्ताचें उदाहरण म्हूणून दिलेल्या श्लोकांत आहे. या ठिकाणं सूर्यचंद्रानीं वस्त्र रंगविणें हें, कार्यही नाहीं व कारणही नाहीं; केवळ सहचरित पदार्थानें म्हणजे संबंधी पदार्थानें आकाशाला वस्त्र करणें हा (दुसरा) प्रकार सूचित केला आहे. अशाच रीतीनें :---
“ज्यांनीं ब्रम्हालोक (स्वर्ग लोक) व नागलोक (पाताळ) ह्या दोन लोकांचा आपल्या पायाला आधार घेतला (म्ह० त्यांचा जोडयासारखा उपयोग केला.) व ब्रम्हांडाला ज्यांनीं आपलें सर्व अंग झाकणार्या वस्त्रासारखें (म्ह० झग्यासारखें) बनविलें त्या वामनाचा उत्कर्ष आहे.”
==
ह्या श्लोकांत त्राणीकृत व पटीकृत यांतील च्वि प्रत्ययांनीं ब्रम्हालोक व पाताळ या विषयरूप दोहोंचा चरणत्राण या विषयीहून भेद, स्पष्ट होत असल्यानें, रूपकाचा येथें संभव नाहीं; त्यामुळें येथें पर्यायोक्त होणेंच योग्य आहे.
ह्या ठिकाणीं स्वर्ग व पाताळ या दोहोंत वामनाचें पाऊल व्यापून राहिलें व ब्रह्मांडांतही वामनाचें अंग व्यपून राहिलें आहे, हा व्यंग्यार्थ आहे. अशारीतीनें हा अलंकार संक्षेपानें तीन प्रकारचा आहे.
पण बोलण्याचे निरनिराळे प्रकार विचारांत घेतले तर, एकाच विषयाचे अनंत प्रकार होऊं शकतात. मग विषय निराळे असतांना ते प्रकार अनंत होतील, हें काय सांगावें ? उदा० :---
“आपण इकडे यावें,” या एकाच विषयाचे, ‘आपण या देशाला अलंकृत करावें’, ‘ह्या देशाला पवित्र करावें’, ‘ह्या देशाचा जन्म सफल करावा,’ ‘ह्या देशाल प्रकाशित करावें,’ ह्या देशाच्या ‘भाग्याचेम पुनरुज्जीवन करावें’, ‘ह्या देशातील अंधकार दूर कराव,’ ‘आमच्या डोळ्यांचा संताप दूर कराव,’ ‘आमचा मनोरथ पूर्ण करावा,’ असें एकच विषय सांगण्याचे अनेक प्रकार होऊं शकतात. कार्य वगैरेचा कारण वगैरेवर आरोप करून होणारा पर्यायोक्ताचा प्रकार, स्वत:च (वाचकांनीं) शोधून काढावा.
अशा रीतीनें कार्यानें कारणाचें सूचन करणार्या पर्यायोक्ताच्या विषयाचा कार्यरूप अप्रस्तुतप्रशंसेनें अपहार होईल अशी शंका आल्यानें, (म्हणजे कार्यरूप अप्रस्तुतप्रशंसेनें पर्यायोक्ता विषय आक्रांत करून ट्काला जाईल, अशी शंकारा आल्यानें), कार्यकरण ही दोन्ही प्रस्तुत असतील तेव्हां पर्यायोक्त; व कार्य अप्रस्तुत असून कारण ज्या वेळीं प्रस्तुत असेल त्या वेळे कार्यरूप अप्रस्तुतसप्रशां असा या दोन अलंकारांच्या विष्ययांत, सर्वस्वकारानें फरक केला आहे. पण तसें तसें करण्यांत छोटा विषय सलेल्या कार्यरूप अप्रस्तुतप्रशंसनेनें विशालविषय असलेल्या पर्यायोक्ताच्या विषयाचा अपहार होत असल्यानें, त्याचें हें म्हणणें जुळत नाहीं. उलट, पर्यायोक्तानें, अप्रस्तुतप्रशंसेच्या विषयाचा, अपहार होईल अशी शंका घेऊन, वरील दोन अलंकारांच्या विषयांचा विभाग करणें उचित होईल.
येथें रसगंगाधरांतील पर्यायोक्त प्रकरण संपलें.