आतां एक गोष्ट बाकी राहिली. ती ही :--
‘वापीं स्नातुमितो गतासि न पुनस्तस्याधमस्यान्तिकम ।’ (हा श्लोक व त्याचा अर्थ प्रथम आननाच्या प्रारंभींच दिला आहे) या सर्व आलंकारिकांत प्रसिद्ध असलेल्या ध्वनीच्या उदाहरणांत अधमाच्याजवळ जाण्याचा जो निषेध त्या रूपानें, त्याच्याजवळ जाणें (म्ह० त्या हलकटाकडे तूं रममाण होण्याकरतां गेली होतीस) ह्या धर्मानें विशिष्त असलेल्या दूतीचें अभिधान, अथवा अधमत्व या रूपानें दुतीसंभोग करणारा जो नायक त्याचें अभिधान असल्यानें, पर्यायोक्त होण्याचा प्रसंग पूर्वींच्या (म्ह० मम्मटांच्या) पक्षाप्रमाणें ह्या (अभिव्नवगुप्तांच्या) पक्षांतही येतो. त्याचें निरसन, विशिष्ट व्यंग्य घेऊन मम्मटांप्रमाणें, अभिनवगुप्तांनींही करावें. पण मध्यस्त पक्षावर (म्ह० अलंकारसर्वस्वकार यांच्या पक्षावर) हें दुषण (म्ह० ‘वापीं स्नातुमितो गतसि’ या श्लोकांतील उत्तम ध्वनि पर्यायोक्त होण्याचा प्रसंग येणें हें दूषण) येत नाहीं.
अशा रीतीनें या तिन्ही पक्षांचा निष्कर्ष निघत असल्याने ह्या पयोयोक्ताच्या प्रकारणांत, कुवलयानंदकारांनीं जे म्हटलें आहे त्यावर विचार करू लागताच तेम चुकीचें वाटतें (विचार करीपर्यंतच तें सुंदर वाटतें;) त्यांचें म्हणणें असें :---
“ ‘नमस्तस्मै कृतौ येन मुधा राहुवधूस्तनौ ।’ (ज्यानें राहूच्या स्त्रियांचीं स्तनें निरुपयोगी करून टाकलीं त्याला आम्ही नमस्कार करतो) ह्या ठिकाणी, भगवान वासुदेव वासुदेवत्व या असाधारण रूपानें व्यंग्य आहेत पण राहुस्त्रियांच्या स्तनांना निरूपयोगी करून टाकणारा या दुसर्या धर्मानें तेच भगवान सांगितले गेले आहेत.” हे त्यांचें म्हणणें चुकीचें आहे. या ठिकाणीं “राहुस्त्रियांचें स्तन ज्यानें व्यर्थ करून टाकले.” असें म्हटल्यानें राहूवधूंच्या स्तनांना व्यर्थ करणारा या वाच्यावरून, राहूच्या मस्तकाला कापून टाकणारा’ हें व्यंग्य सूचित होतें, याविषयीं वाद नाही. पण भगवान वासुदेव हा (विशेष्य) अर्थ, राहुशिरश्छेद करणारा’ ह्या विशेषणाच्या बळाव्र हाती येत असल्यानें, केवळ काव्यमार्गातच आढणारा व्यंग्याच्या प्रांतांत तो (वासुदेव हा अर्थ) प्रविष्ट होऊं शकत नाहीं. (केवळ विशेषणावरूनही वासुदेवत्व हा अर्थ सूचित होतो असे म्हणत असाल तर,) नमो राहुशिरश्छेदकारिणे दु:खहारिणे ।’ (राहूचा शिरश्छेद करणार्याला व दु:ख हरण करणार्याला नमस्कार असो.) ह्या वाक्यांतही भगवान वासुदेवाचें वासुदेवत्वरूपी जें व्यंग्य तानें प्रयुक्त पर्यायोक्त अलंकार होऊं लागले. पण खरी गोष्ट अशी आहे कीं विशेषणाच्या मर्यादेनें होतीं येणारा जो धर्मीरूप अर्थ त्याला व्यंग्यतेचा थोडा स्पर्श होत असला तरी, काव्यमार्गांत व्यंग्य त्याची गणना करतां येत नाहीं. कारण त्याच्यामधें (म्ह० अशा व्यंग्यामध्यें) कांहींच सौंदर्य नसतें. ज्याप्रमाणें अन्विताभिधानवादी लोकांच्या मताप्रमाणें अतिविशेषभूत पदार्थाचा, वाक्यांतील सामान्यरूप पदार्थांच्या अन्वयाला, थोडासा स्पर्श होत असला तरी (शाब्दबोधांत) त्याचा परामर्श घेतला जात नाहीं; (कारण तोअतिविशेषभूत पदार्थ विशेषार्थाच्याही पलीकडे असल्यानें विशेष पदार्थांच्या अन्वयांत तो पूर्णपणें बसतही नाहीं व शोभतही नाहीं.) त्याप्रमाणें येथेंही समजावें.
शिवाय, राहुस्त्रीकुचनैष्फल्यकारिणे हरये नम:’ (राहुस्त्रियांच्या स्तनांना निष्फळ करणार्या श्रीहरीला नमस्कार असो) या ठिकाणीं भगवंतांचें स्वशब्दानें (हरि या शब्दानें) कथन झालें असल्यामुळें, व स्वत:च्या असाधारण रूपानें (म्ह० हरित्वधर्मानें) त्याचें सूचन झालें नसल्यामुळें (म्ह० तें वाच्य झालें असल्यानें) राहुशिरच्छेदकारी ह्या रुपानेंच तें व्यंग्य असणें इष्ट आहे. ह्या ठिकाणीं पर्यायोक्त नाहीं सें कुणीच मानीत नाहीं. शिवाय त्यांनीं (कुवलयानंदकारांनी) असेंही म्हटलें आहे कीं, ‘सर्वस्वकार व लोचनकार या सर्वांची ही धडपड कशाकरतां चालली आहे, तें आम्हांला कांहीं कळत नाहीं.” त्यावर आमचें म्हणणें हें कीं, त्यांची ही धडपड कशाकरतां, हें वर त्यांच्या मतांचा निष्कर्ष सांगण्य़ाच्या वेळीं, आम्ही सांगितलें आहेच. आणखी पुढें त्यांनीं (म्ह० कुवलयानंदकारांनीं) असेंही म्हटलें आहे कीं :--- “चक्राभिघातप्रसभाज्ञया०’ या प्राचीनांच्या उदाहरणांत राहुशिरश्छेदरुपी व्यंग्याचें जे सूचन झालें आहे, त्याठिकाणीं पूर्वीं आम्ही सांगितलेल्या पद्धतीनें प्रस्तुतांकुर अलंकारच मानावा, पण ज्या ठिकाणीं राहूचें मस्तकच केवळ बाकी राहणें या प्रस्तुत अर्थानें आलिंगनाचा अभाव निर्माण करणारा, या रूपानें भगवंतांचें दुसरें रूप ही वाच्य झालें असेल तेथें भगवत्त्व या रूपानें सूचन होणें, हा मात्र पर्यायोक्ताचा विषय आहे,” पण हेंही त्यांचें म्हणणें बरोबर नाहीं; (कारण) जर राहूशिरश्छेदाचें तुम्ही सांगितल्याप्रमाणें अवगमन म्ह० व्यंजन होणें हा प्रस्तुतांकुराचा विषय असेल तर, पर्यायोक्त अलंकाराची जरूरच काय ? आतां, भगवद्रूपानें (म्हणजे वासुदेवत्व रूपानें) होणारें ज्ञान विशेषणमर्यादेनें होणारें असल्यानें त्यांत कांहीं सौंदर्य नाहीं; तेव्हां ‘नमोराहुशिरश्छेदकारिणे०’ या वाक्यात ज्याप्रमाणें वासुदेवत्वाचें सूचन कोणत्याही अलंकाराचा विषय होत नाहीं, त्याप्रमाणें ‘चक्राभिघात’ या श्लोकांतही वासुदेवत्वाचें व्यंग्यत्व हें कोणत्याही अलंकाराचा विषय होत नाहीं, असें आम्ही पूर्वीं सांगितलें आहे. आणि प्रस्तुतांकुराचा (या अलंकाराचा) प्राचीनांनीं मुळींच स्वीकार केलेला नाहीं; अथवा स्वीकार केला आहे असें मानलें तरी, ज्या ठिकाणीं प्रस्तुतानें, स्वत:सारखाच दुसरा एखादा प्रस्तुत वाक्यार्थ सूचित केला जातो, तो प्रस्तुतांकुराचा विषय माना; पण प्रस्तुत कार्यानें प्रस्तुत कारणाचें सूचन होणें हा प्रस्तुतांकुराचा विषय मानूं नका, नाहींतर, “अप्रस्तुत कार्यानें प्रस्तुत कारणाचें सूचन झालें असतां अप्रस्तुतप्रशंसाच; व प्रस्तुत कार्यानें प्रस्तुतकार्याचेंच सूचन करणें हा पर्यायोक्ताचा विषय,” असा जो अलंकारसर्वस्वकार वगैरे प्राचीन आलंकारिकांनीं अप्रस्तुतप्रशंसा व पर्यायोक्त यांच्या विषयाचा विभाग केला आहे, त्याचा उच्छेदच होण्याची पाळी येईल. शिवाय, “ राहुस्त्रियांच्या बाबतींतला जो विशिष्ट रतोत्सव त्यानें राहुशिरश्छेदरूपी कारण सूचित होऊन पर्यायोक्त होतो, याप्रमाणें दुसरीकडेही पर्यायोक्त आहे असें समजावें.” या तुम्हाला प्रमाणभूत असलेल्या ग्रंथाशीं (म्ह० अलंकारसर्वस्व या ग्रंथाशीं) तुमचा विरोध येतो हें आणखी वर, म्हणून या ठिकाणीं राहुशिरश्छेदकारी या रूपानें वासुदेवाचें ज्ञान होणें हाच पयोयोक्ताचा विषय आहे; वासुदेवाचें वासुदेवत्व या रूपानें ज्ञान होणें, हा पर्यायोक्ताचा विषय नाहीं, हें सह्रदयांच्या ध्यानांत येईच.
या अलंकारांत व्यंग्य वाच्याकरतां असतें; पण अप्रस्तुतप्रशंसेंत वाच्य व्यंग्याकरतां असतें; म्हणून हा पर्यायोक्त अलंकार वाच्यसिद्धयंग ह्या गुणीभूतव्यंग्याचा प्रकार आहे, असें ध्वनिकारांच्या अनुयायांचें मत आहे.