आतां यापुढें विरोधमूलक अलंकार सांगतों (प्रथम विरोधरूपी दोषाची व्याख्या सांगतो.)
“एका जागेवर दोघांनीं राहणें या संबंधानें (कवीनें काव्यांत) सांगितलेल्या दोन अर्थांचें वरवर पाहतां एका जागेवर राहणें जुळत नसेल तर, त्याला निरोध म्हणावें. अथवा, समानाधिकरण म्हणून एका जागेवर राहण्याचा संबंध या दोन पदार्थांत जुळत नाहीं असें भान होणें, यालाही विरोध म्हणावें; किंवा वरील व्याख्या अजिबात टाकून देऊन असें म्हणावें कीं, (ही विरोधाची दुसरी व्याख्या) एका जागेवर राहण्याचा हा दोहोंत संबंध नाहीं अशी लोकांत प्रसिद्धी असलेल्या दोन पदार्थांत, एका जागेवर राहाण्याचा संबंध झाला आहे. असें सांगणें म्हणजे विरोध.”
हा विरोध कुठें द्दढ (पक्का) असतो, तर कुठें द्दढ (पक्का) झालेला नसतो. विरोध पक्का असणें म्हणजें, ‘याचा बाध होणार आहे अशी जी बुद्धि तिनें आक्रांत न होणें (म्ह० अमुक एक विधान योग्य नाहीं, तें बाधित आहे अशी बुद्धि मनामध्यें कधींही उत्पन्न न होणें म्हणजेच विरोध पक्का असणें हें होय), याचें विरुद्धा, विरोध पक्का नसणें म्ह० तो विरोध पुढें बाधित होणें, पैकीं पक्का विरोध (असणें) म्हणजे जो विरोध शेवटपर्यंत विरोध म्हणूनच दिसतो तो. असा हा पक्का विरोध खराखुरा दोषाचाच विषय. पण, पक्का नसणारा विरोध म्हणजे वर वर भासणारा विरोध, हाच अलंकाराचा विषय होतो. म्हणूनच कांहीं लोक या अलंकाराला विरोध हें नांव न देतों, विरोधाभास (अलंकार) असें नांव देतात. ‘आभासते’ या शब्दांतील ‘आ’ याचा अर्थ किंचित् व भासते म्हणजे भासतो तो; अर्थात आभास म्हणजे किंचित् भासतो तो. विरोधाभास हा समास विरोधश्च असौ आभासश्च असा सोडवावा (म्हणजे विरोध तर आहे, पण तो सुरवातीसच ओझरता भासतो; हा विरोध शेवटपर्यंत टिकत नाहीं, असा या कर्मधारय समासाचा अर्थ). सुरवातीसच फक्त प्रतीत होणारा, पण लगेच येथें निरोध नाहीं अशी उत्पन्न होणारी जी बुद्धि (म्ह० बाधबुद्धि) तिनें झाकला जाणारा, असा, विरोधाभास याचा सरळ अर्थ. वरील विरोधापैकीं कार्यकारणसंबंधाविषयींची जी बुद्धि (म्ह० ज्ञान) तिचा स्पर्श नसलेला जो विरोधाभास, त्याला विरोध अलंकार म्हणतात. कार्यकारणभावाच्या बुद्धीचा स्पर्श असलेल्या विरोधाला, पुढें सांगितली जाणारी विभावना वगैरे (अलंकार) म्हणावें.
या विरोधाचे एकंदर (अगदीं) निरनिराळे व नवीन स्वरुपाचे असे दहा प्रकार होतात. ते असे :---
या विरोधाचे जाति, गुण क्रिया, व द्रव्य (म्हणजे विशेशनम) या स्वरूपाच्या धर्मरूपी पदार्थांच्या मध्यें, जातीचा, जाति गुण, क्रिया व द्रव्य या चौघाशीं होणारा विरोध चार प्रकारचा; गुणाचा, गुण, क्रिया व द्रव्य या तिघांशीं होणारा विरोध तीन प्रकारचा; क्रियेचा, क्रिया व द्रव्य यांच्याशीं यांच्याशीं होणारा विरोध दोन प्रकारचा; व द्रव्याचा द्रव्याशीं होणारा विरोध एक प्रकारचा; मिळून निरनिराळे एकंदर दहा प्रकार झाले. वर क्रिया हा शब्द वैय्याकरणांच्या मताप्रमाणें शुद्ध भावना म्हणजे फलानुकूल व्यपार, या अर्थीं वापरलेला नाहीं; तसेंच नैय्यायिकांच्या मताप्रमाणें क्रिया म्हणजे एकप्रकारचा स्पंद (म्ह० हालचाल) या अर्थीं पण क्रियाशब्द वापरलेला नाहीं; तर त्या त्या धातूनें सांगितलेला फलविशिष्ट व्यापार हा क्रियेचा अर्थ आम्ही येथें घेतला आहे.