“दुष्ट लोकांचीं बोलणीं खरोखरी कोमल व शीतल असूनही साधूंच्या ह्रदयांना तीं (अनुक्रमें) छेदून टाकतात व जाळून टाकतात.” येथें कोमलत्व व शीतलत्व या गुणांचा छेदणें व जाळणें या क्रियांशीं विरोध आहे.
“हे परमात्मन् ! तुझ्या नित्य व निर्मळ अशा मोठेपणाचा विचार केला असतां, आकाशही परमाणूचा आकार धारण करतें.” येथें आकाश ह्या द्रव्याशीं परमाणुत्व या गुणाचा विरोध.
“दुष्ट स्त्रिया, कामाच्या तडाक्यांत सांपडलेल्या तरुणांना घटकेंत आनंदवितात व घटकेंत जाळतात.” ह्या ठिकाणीं आनंदित करणें ह्या क्रियेचा, जाळणें ह्या क्रियेशीं विरोध आहे.
“अरण्यांत विलाप करणार्या तुझ्या शत्रूंच्या सुंदर स्त्रियांचा आक्रोश ऐकून दिशाशुद्धां क्षोभ पावल्या.” ह्या ठिकाणीं दिशा ह्या द्रव्याशीं क्षोभ पावणें ह्या क्रियेचा विरोध आहे.
अशीं दुसरीं उदाहरणेंही स्वत:च शोधून काढावीं.
या ठिकाणीं जाति वगैरे शब्दांनीं कोणतातरी धर्म, हा अर्थ सांगायचा आहे. [कारण जात्यादि हा शब्द या ठिकाणीं अभाव वगैरे इतर धर्मांचाही समावेश करणारा अथवा संग्राहक (उपलक्षण) म्हणून वापरलेला आहे] हा अर्थ आम्हाला येथें घ्यायाचा असल्यानें, ‘य: किल बालकोऽपि पुराणपुरुष: ।’ (जो लहान मूल असूनही वृद्ध पुरुष आहे हा एक अर्थ; व पुराणपुरुष म्हणजे अनादि ईश्वर हा दुसरा अर्थ येथें घ्यावा).; ‘विशुद्धमूर्तिरपि नीलाम्बुदनिभ: ।’ (त्याची मूर्ति पांढरी असूनही निळ्या मेघांप्रमाणें आहे, हा एक अर्थ; व विशुद्ध मूर्ति म्ह० पवित्रमूर्ति हा दुसरा अर्थ). ‘जगद्धितकृदपि जगदहितकृत ।’ (जो जगाचा हितकर्ता असूनही जगाचा अहित करणारा आहे हा एक अर्थ; व जगाच्या शत्रूंचा नाशा करणारा, हा ‘जगदहितकृत’ याचा दुसरा अर्थ); व जगाच्या शत्रूंचा नाश करणारा, हा ‘जगदहितकृत्’ याचा दुसरा अर्थ). ‘अगोद्धारकोऽपि नागोद्धारक: ।’ [हा गोवर्धन पर्वताचा उद्धारक असूनही पर्वताचा (न + अग) उद्धारक नाहीं हा एक (विरोधी) अर्थ; व नागोद्धारक म्ह० गजेंद्राचा उद्धार करणारा हा दुसरा अर्थ] इत्यादि वाक्यांत धर्म या शब्दानें (सखंडोपाधि म्हणजे ज्या धर्माचें वर्णन अनेक शब्दानेंच करतां येतें अशा) सखण्डोपाधीचा, व अभावाचाही (म्ह० अभावरूपी धर्माचाही) समावेश, वरील विरोध दाखविणार्या धर्माच्या यादींत करावा.
खरें म्हणजे, वरील जाति वगैरे विरोध उत्पन्न करणार्या पदार्थांत कांहींच चमत्कार नाहीं. तेव्हां (आमचें मत असें कीं,) विरोधाचें दोनच प्रकार मानावें - एक शुद्ध विरोध व दुसरा श्लेषमूलक विरोध.
येथें कोणी अशी शंका घेतात कीं, “अगोद्धारकोऽपि नागोद्धारक: हितकृतदपि अहितकृत् ।” इत्यादि वाक्यांत विरोधाचा मात्र भास होतो. या वाक्यांत “श्लेषच (खरा) अलंकार आहे. कारण श्लेष आपल्या स्वत:च्या विषयांत झाला असतां, तो बाकीच्या बहुतेक अलंकारांचा बाध करतो.” यावर आमचें म्हणणें असें कीं, ‘हें तुमचें म्हणणें कवि ऐकत आहे’ (म्ह० आम्ही हें ऐकलें; पण या बोलण्यांतकांहीं राम नाहीं, असें आमचें मत.) पण येथें हें ध्यानांत ठेकाणीं शाब्द विरोध समजावा व ज्या ठिकाणीं विरोधाचे द्योतक अपि वगैरे शब्द नसतील त्या ठिकाणीं, आर्थ विरोध समजावा, असा प्राचीनांचा सिद्धांत आहे. पण येथील शाब्द याचा अर्थ, शब्दद्वारा होणार्या ज्ञानाचा विषय होणें, असा घेतला तर, विरोधाच्या बाबतींत शाब्द हें विशेष जुळतच नाहीं. (कारण अपिचा वाच्यार्थ विरोध हा होतच नाहीं). उदा० :--- ‘त्रयोऽपि अत्रय :।’ इत्यादि वाक्यांतील विशेषणविशेष्यभावरूप संबंध कोणत्यारकारचे असतात तें (व्युत्पत्तिशास्त्रांत) निश्चित ठरलेलें असतें; पण त्या प्रकारांत विरोध संबंधाचा समावेश कुठेंही केलेला नाहीं. यावर कुणी म्हणतील, “एकच अधिकरणावर तोच पदार्थ नसणें व असणें ह्यांत जसा विरोधसंबंध असतो, तसा त्या पदार्थाच्या अभावाचा व त्या पदार्थाचा प्रतियोगिसंबंध हाही (एक प्रकारचा) विरोधसंबंधच म्हणावा; आणि म्हणूनच प्रकृतस्थलीं (‘त्रयोऽपि अत्रय: ’ ह्या वाक्यांत) नञर्थ व त्याच्यानंतरचा पदार्थ (त्रय: हा) ह्या दोहोंमधील प्रतियोगिसंसर्गातच विरोधाचा (खुशाल) समावेश करावा.” पण असें म्हणतां येत नाहीं. कारण विरोधाचा, संबंध म्हणून, ‘सुप्तोऽपि प्रबुद्ध:’ इत्यादि वाक्यांत समावेस झालेला नाहीं. म्हणजे “सुप्तत्वाच्या विरुद्ध जी प्रबुद्धत्व (म्हणजे जागे होणें) ही अवस्था त्यानें युक्त असलेल्या पदार्थाशीं (म्ह० प्रबुद्धाशीं) अभिन्न (म्हणजेच) सुप्त” असा येथें शाब्दबोध होतो, असा अनुभव नाहीं. जर असता तर, लक्षणा वगैरे करण्याच्या भानगडींत आम्ही पडलों असतो.