या शंकेवर प्राचीन असें उत्तर देतात :---
‘सुप्तोपि प्रबुद्ध:’ ‘त्रयोपि अत्रय: ।’ इत्यादि विरोधाच्या उदाहरणांत, सुप्त व प्रबुद्ध या दोन शब्दांनीं अनुक्रमें निजणें व जागें होणें, (वगैरे) या दोन धर्मांची प्रथम उपस्थिति होऊन नंतर, त्या धर्मांचे जे धर्मी त्यांचें ज्ञान होतें; व त्या ज्ञानाला ‘अपि’ शब्दाच्या अर्थाची जोड मिळून, त्या धर्मींमधील विरोधाचें स्मरण होतें. नंतर वरील दोन धर्म एकत्र येणें ही गोष्ट गैर आहे,’ हें ज्ञान (म्ह० प्रतिबंधकज्ञान) अतिशय जोराने झाल्यामुळें, वरील दोन धर्म विरुद्ध आहेत, असा या दोन धर्मांतील, मानसिक अथवा व्यंजनेनें होणारा विरोधाचा बोध जाग्रत होतो; व त्यानें वरील दोन धर्म एकत्र येण्याला प्रतिबंध केल्यामुळें वरील दोन धर्माच्यामध्यें (म्ह० सुप्तत्व व प्रबुद्धत्व यामध्यें) सामानाधिकरण्याने होणारी (म्ह० प्रबुद्धाभिन्नसुप्त अशी) अभेदबुद्धि उत्पन्न होतच नाहीं; व नंतर वरील प्रबुद्ध शब्दाच्या दुसर्या शक्तीनें प्रकट होणारा जो दुसरा अर्थ (ज्ञानयुक्त असणें हा प्रबुद्ध याचा अर्थ) तो घेऊन अन्वयबोध होतो. व मग त्यामध्यें मात्र विरोध भासत नाहीं. प्रथम उत्पन्न होणार्या विरोधाचें जें ज्ञान त्याचे मूळ दुसरा अर्थ मनात आल्यामुळें शिथिल होतें व नाहींसें होऊ लागतें. तरीसुद्धां (तें विरोधाचें ज्ञान नाहींसें होत असतांही) तें, कवीनें हेतुपुर :--- सर केलेल्या शब्दयोजनेचा विषय झालें असल्यानें, चमत्कार उत्पन्न करण्यास कारण होतें, असा प्राचीनांचा याबाबतींत निष्कर्ष आहे.
या बाबतींत नवीनांचें म्हणणें असें :---
दोन परस्परविरुद्ध अर्थ प्रकट झाल्यावांचून विरोधाभास संभवतच नाहीं. पैकीं पहिला अर्थ विरोधाला खुलवितो; व दुसरा र्थ पदार्थांच्या अन्वयबोधाला विषय होतो. (म्हणजे वाक्यांतील शेवटच्या अर्थाला उपयोगी पडतो.) हें प्राचीनांचें म्हणणें खरें आहे. तरीपण या अन्वयबोधाला विषय होणार्या दुसर्या अर्थांतही विरोधाला खुलविणारा जो पहिला अर्थ, तो भिन्न असूनही श्लेषाच्या बळावर होणार्या अभेदाच्या योगानें, दुसर्या अर्थाशीं अभिन्न असा भासतो. एवंच, विरुद्ध नसणारा असा दुसरा अर्थ घेऊन, अशा वाक्यांत अन्वयबोध होत असला तरी, स्वत:ला बैठक म्हणून असणारा जो पहिला विरुद्ध अर्थ, तो अजिबात नाहींसा होत नाहीं. त्यामुळें एखाद्या अर्धंमेल्या, परंतु श्वास टाकणार्या, प्राण्याप्रमाणें, तो विरोध शेवटीं होणार्या मानसबोधांत शिरतो व म्हणूनच त्याला चमत्कार करणारा असें म्हणतात. पहिला, विरुद्धार्थाची प्रतीति करणारा अर्थ अजिबात नाहींसा झाला तर, तो चमत्कार उत्पन्न करूंच शकणार नाहीं; व जो चमत्कार उत्पन्न करीत नसेल त्याला अलंकारही म्हणतां येणार नाहीं. म्हणून प्रथम होणारी विरोधाची बुद्धि फारशी शिथिलही होत नाहीं, किंवा ती अजिबात नाहींशीही होत नाहीं. हें झालें नवीनांचें म्हणणें.
या ठिकाणीं कित्येक अशी शंका घेतात की, अपि वगैरे शब्दांचा या अलंकारांत प्रयोग झाला असतां, शाब्दविरोध भासतो असें म्हणतात खरें, पण तें म्हणणें जुळत नाहीं. कारण वैय्याकरणांच्या मतीं (अपि वगैरे) निपातांमध्यें अभिधाशाक्ति मानलेली नाहीं. (म्ह० त्यांना द्योतक मानलें आहे.) या शंकेवर उत्तर असें :---
निरूढलक्षणा ही ज्याप्रमाणें शब्दाच्या अभिधाशक्तीच्या तोडीची मानली जाते, त्याप्रमाणें निरूढद्योतना ही सुद्धां शक्तीच्या तोडीची म्हणून प्रसिद्ध आहे.