व्याघात अलंकार - लक्षण २
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
ह्या ठिकाणीं शब्दानें सांगितलेल्या वचनरूपी एक धर्माच्या आधारावर कठोर व मधुर या दोन तर्हेच्या भाषणांना अभेदाध्यवसानानें एकच मानल्यामुळें, प्रथम विरोध स्फुरू लागला. परंतु नंतर, आपआपल्या कठोर व मधुर अशा भाषणांनीं दुष्ट व सज्जन हे आपापलें कार्य करतात, असा विचार येतांच तो विरोध नाहींसा होतो. तेव्हां या अलंकाराच्या मुळाशीं विरोध खराच. व्याघात अलंकाराचें म्हणून हें पुढील उदाहरण मात्र देऊ नये :---
‘ज्या प्रचंड पांडित्याच्या योगानें दुष्ट माणसें माजतात, त्याच पांडित्यानें स्थिर बुद्धीचे सज्जन उत्कृष्ट शांति पावतात.’
ह्या ठिकाणीं दुर्जन व सज्जन ह्यांचेकडे (अनुक्रमें) मद व शम यांचें कर्तृत्व येत असलें तरी, मदाच्या व शमाच्या उद्देशानें त्या दोघांचीही प्रवृत्ति होत नाहीं. (कारण त्यांच्यांत स्वभावत:च मद आणि शम असतो.) म्हणून लक्षणांत सांगितलेल्या कर्तृत्वाच्या, (म्ह० ‘कार्योद्देशेन प्रवर्तमानत्वं’ या विशेषणाच्या) द्दष्टीनें पाहतां हा श्लोका व्याघातांत बसत नाही. (कारण येथील कर्तृत्व व लक्षणांत सांगितलेले कर्तृत्व हीं निराळीं आहेत.) ‘याला व्याघाताचें उदाहरण मानलें तर काय बिघडेल ?’ असें म्हणूं नये; कारण पांडित्याचे आश्रय जे दुर्जन व सज्जन त्यांच्या (मद व शांति उत्पन्न करणार्या) स्वभावाच्या साहाय्यानें, (म्ह० स्वभावत:च) एकच पांडित्य या साधनानें, विरुद्ध अशीं दोन कार्ये उत्पन्न होणें, यांत बाधक असें कांहीं नाहीं. म्हणून ह्या ठिकाणीं व्याघात म्ह० कार्यविघात होत नसल्यामुळें, हें व्याघाताचें उदाहरणा देणें जुळत नाहीं. शिवाय, लोकांमध्यें प्रसिद्ध असलेला पदार्थ काव्यांत अलंकार म्हणून येणें योग्य नाहीं.
व्याघाताच्या दुसर्या म्ह० विरुद्ध कार्य करण्याच्या इच्छेनें पहिल्या कार्यांत विघ्न उत्पन्न करणें, या प्रकाराचें उदाहरण हें :---
“हे प्रियकरा ! मी तुमची अत्यंत लाडकी आहे म्हणून तुम्ही मला घरीं ठिवून जात असाल तर, मी म्हणते माझ्या प्रेमाच्या प्रभावानें जखडून टाकलेले तुम्ही मला आपल्याबरोबर न्याच. आतां मी जात्याच भित्री आहे म्हणून तुम्ही आपल्याबरोबर मला (अरण्यांत) नेत नसाल तर, मी म्हणतें, सर्वांची भीति दूर करण्याला समर्थ अशा या तुमच्या बाहूंच्या बाहेर (दूर), माझी काळजी करणारे तुम्हीं, मला मुळींच ठेवूं नका.”
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP