दंडकारण्यांत प्रवेश करू पाहणार्या भगवान् रामचंद्राला उद्देशून देवी जानकीनें उच्चारलेलें हें वाक्य आहे. या दोन्हीही प्रकारच्या व्याघातांत दोन कर्त्यांपैकीं पहिल्या कर्त्याचें इष्ट सिद्ध होत नाहीं (बिघडतें), ही गोष्ट सारखीच आहे, असा प्राचीनांचा सिद्धांत आहे. याच द्दष्टीनें तें व्याघाताचें म्हणून खालील उदाहरण देतात.
“द्दष्टीनें जाळून टाकलेल्या मदनाला ज्या (स्त्रिया) आपल्या द्दष्टीनेंच जिवंत करतात, त्या, शंकरावरही, मात करणार्या सुंदर (सुंदर डोळ्यांच्या) स्त्रियांची मी स्तुति करतों.”
आतां या श्लोकावर विचार करू या. (आम्हाला वाटतें) ह्या ठिकाणीं व्याघात अलंकार नसून व्यतिरेक अलंकारच आहे. कारक शंकरावर मात करणार्या सुंदर स्त्रिया असें म्हटल्यानें येथें व्यतिरेकच स्पष्टपणें दिसत आहे. ‘ह्या ठिकाणीं व्यतिरेकाला उभा करणारा म्हणून व्याघात अलंकार आला आहे.’ असेंही म्हणता येत नाहीं. कारण असें (म्ह० व्यतिरेकाचा उत्थापक व्याघात असें) मानलें तरी सुद्धां तेवढयानें तो अलंकारच झाला पाहिजे, असें काहीं सिद्ध होत नाहीं. एखादें वाक्य दुसर्या एखाद्या अलंकाराचें उत्थापक आहे म्हणून त्यांत अलंकार असलाच पाहिजे, असा कांहीं नियम (सांगतां येणार) नाहीं. ‘आननेनाकलंकेनजयतीन्दुं कलंकिनम्’ ह्या श्लोकांतल्याप्रमाणें केवळ वस्तूनें सुद्धां व्यतिरेक अलंकाराचें उत्थापन होऊं शकतें. वर सांगितलेल्या प्रकारच्या (म्ह० एका कर्त्याहून दुसरा कर्ता वरचढ अशा स्वरूपाच्या) व्यतिरेकाहून निराळा असा व्याघाताला विषयच सांपडत नाहीं. सांपडला असता तर त्याला आम्ही स्वतंत्र अलंकार म्हटलें असतें. म्हणून, दुसर्या अलंकारांशीं नित्यसंबंध ठेवणार्या एखाद्या अलंकारांत ज्याप्रमाणें स्वत:चा असा निराळा चमत्कार असतो व तो चमत्कारविशेष त्या अलंकाराला त्या दुसर्या अलंकाराहून निराळा (अलंकार) करू शकतो, त्याचप्रमाणें येथेंही व्याघात अलंकाराचा (स्वत:चा) एक विशेष चमत्कार असल्यामुळें तो व्यतिरेकाहून निराळा पडतो, हें प्राचीनांचें म्हणणेच ह्या ठिकाणीं मान्य करणें भाग आहे.’
‘गरिबीच्या भीतीनें लोभी माणूस पैसा सोडीत नाहीं; पण दाता त्याच गरिबीच्या भीतीनें (जणुं कांहीं) पैसा सढळ हातानें देतो.’
हें जें कुवलयानंदकारांनीं व्याघाताचें म्हणून उदाहरण दिलें आहे, तेंही बरोबर नाहीं (कारण ह्या ठिकाणींही लोभी मनुष्याहूअ दात्याचा मोठेपणा अथवा निराळेपणा प्रतीत होत असल्यानें, येथेंही व्यतिरेक अलंकार मानणेंच योग्य आहे.)
अशा रीतीनें श्लेष, अतिशयोक्ति वगैरे उपायांनीं थोडयाशा अंशामध्यें होणार्या अभेदाध्यवसानानें प्रारंभींच प्रकट होणार्या विरोधाचाही एक विशेष चमत्कार आहे; पण विजेच्या चमकार्याप्रमाणें, तो फार वेळ टिकत नाहीं. तरी पण त्या अभेदाध्यवसायाच्या पायावर होणारे जे, विरोधाभासापासून व्याघातापर्यंतचे अलंकार, ते सर्व सांगून झाले. “त्या प्रत्येक अलंकारांत निरनिराळा चमत्कार असला तरी ते सर्व विरोधाभासाचें प्रकार आहेत, त्याहून निराळे नाहींत. ज्याप्रमणें, एका सोन्याचेंच, कंकण वगैरे निराळे अलंकार असले तरी, ते सोनेमं या द्दष्टीनें एकच. (त्याप्रमाणें येथेंही समजावें.)” असें (या वाबतींत) कांहींचें म्हणणें. “पण असें मानलें तर रूपक, दीपक इत्यादि अलंकारांच्या पोटांत साद्दश्य असल्यामुळें, ते सर्व एका उपमेचेच पोटभेद होऊ लागतील व मग सगळाच घोटाळा माजेल; म्हणून हे सर्व अलंकार जरी एकमेकांची थोडीशी शोभा घेत असले तरी, त्यांच्यांत (स्वतत:चा असा) निराळा चमत्कार असल्यामुळें, ते निराळेच अलंकार मानलें पाहिजेत,” असेमं दुसर्या कित्येकांचें म्हणणें.
येथें रसगंगाधरांतील व्याघात प्रकरण समाप्त झालें.