अनुमानांत प्रतिज्ञा व हेतु या दोन (अनुमानाच्या) अवयवांचा, आकांक्षेमुळें, क्रम ठरलेला असतो. (म्ह० प्रतिज्ञा वाक्य समर्थ्य म्हणून प्रथम, व हेतुवाक्य समर्थक म्हणून नंतर, असा पौर्वापर्याचा क्रम असतो.)’ तसाच अर्थान्तरन्यसांतही समर्थ्यवाक्य व समर्थक वाक्य यांच्या पौर्वापर्याचा क्रम असतो (म्ह० समर्थ्य वाक्य प्रथम व समर्थ्यवाक्य नंतर, असा क्रम ठरलेला असतो) असें मार समजूं नये, कारण अर्थान्तरन्यासांत, ‘समर्थ्यवाक्यांतील अर्थाची उपपत्ति लावतां येत नाहीं. म्हणून त्याकरतां समर्थक वाक्य सांगितलेंच पाहिजे, अशी आकांक्षा उत्पन्न झाल्यामुळें समर्थक वाक्य सांगितलें जातें, असा कांहीं नियम नाहीं. अनुपपत्ति नसतांही (म्ह० समर्थ्य वाक्याचा अर्थ समर्थक वाक्यावांचूनही सरळ लागत असूनही) केवळ अगाऊ समजलेला अर्थ जास्त स्पष्ट करण्याकरतांसुद्धा कवि समर्थकवाक्यांचा प्रयोग करतात. आणि म्हणूनच (प्रथम समर्थकवाक्य व नंतर समर्थ्यवाक्य असा) उलटा क्रम (अर्थान्तरन्यासात) केला, तरीसुद्धा तो दोष होत नाहीं. उदाहरणार्थ :---
“मेघ हा, गरिबांचीं सुकलेली पिकें डावलून हिमालयावरा आपलें औदार्य दाखवितो. हे राजा ! खूप उन्नत स्थिति प्राप्त झाल्यानें भारी मत्त झालेल्या तुमच्यासारख्यांचा हा विवेक आम्हांला (पूर्ण) समजाल.”
या ठिकाणीं, दानानें ज्याचा सत्कार केला गेला नाहीं, अशा एका पंडिताच्या, राजाला उद्देशून बोललेल्या क्रोधवचनांत, पूर्वार्धांतील विशेष (अप्रकृत) अर्थ, उत्तरार्धांतील प्रकृत अशा सामान्य अर्थाचा समर्थक झाला आहे. अशा रीतीनें अप्रकृतानें प्रकृताचें समर्थन ह्या प्रकाराचीं उदाहरणें देऊन झालीं. आतां प्रकृतानें केलेल्या प्रकृताच्या समर्थनाचें उदाहरण हें :---
‘हे सुंदरी ! रमणीय पदार्थांच्या बाबतींत कोणता रसिक मनुष्य तृप्त होईल ? तो बघ, भुंगा कमलिनीच्या जवळून हालतच नाहीं.’
जलक्रीडा चालली असतां, ‘दूर व्हा’ असें म्हणणार्या प्रियतमेला उद्देशून नायकाची ही उक्ति आहे. यांतील जलक्रीडेचा व भुंग्यांचा असे दोन्हीही वृत्तांत प्रकृत आहेत. कुठें कुठे, प्रकृतानें अप्रकृताचें समर्थन होणें संभवतें. परंतु अशा ठिकाणीं त्या अप्रकृताचें सुद्धां शेवटीं प्रकृतांतच पर्यवसान होतें. वर वर पाहतां तो अप्रकृतार्थ दिसतो खरा (पण त्याचा शेवट प्रकृतांतच होतो); कारण सर्वस्वी अप्रकृत अशाअ अर्थाचें समर्थन करण्याचा प्रसंग केव्हांही येत नाहीं. उदाहरण :---
‘हे सुंदरी ! (एखादा) सत्ताधीश असूनही, त्याला याचना करावीशी वाटल्यास, त्याच्याकडे एकदम कमीपणा येतो. आतां, हेंच बघ ना, तुझ्या अधरोष्ठाची याचना करणारा मी, तोंड फिरवणार्या तुझ्याकडून, एकदम निराश केलों गेलों आहे.’
ह्या ठिकाणीं दोन प्रेमी जनाच्या चालू असलेल्या वृत्तांतरूपी विशेष अर्थानें, अप्रस्तुत व सामान्यरूप अशा, दाता व याचक यांच्या वृत्तांताचें, समर्थन केलें गेलें आहे. (तरीही त्या अप्रस्तुत वृत्तांताचा शेवट - मला सत्ता असतांही, तुला वश झाल्यानें, मी तुझा याचक बनलों आहे अशा अर्थांत होत असल्यानें, तो प्रकृतार्थाचें स्वरूप धारण करतो.)