आतां कारणानें कार्याचें व कार्यानें कारणाचें समर्थन असे, अर्थान्तरन्यासाचे दोन प्रकार अलंकारसर्वस्वकारांनीं सांगितले आहेत, (खरें) पण तें बरोबर नाहीं, कारण ते प्रकार काव्यलिंगाचे विषय आहेत. तसें नसतें तर, ‘वपु:प्रादुर्भावात०’ ह्या सर्व आलंकारिकांमध्यें प्रसिद्ध असलेल्या काव्यलिंगाच्या उदाहरणाची संगति लावतां आली नसती. कारण ह्या ठिकाणीं उत्तरार्धांत आलेल्या (कार्यरूप) अपराधद्वय या विधानाला पूर्वर्धांतील दोन वाक्यें कारणरूप असल्यानें, हें अर्थान्तरन्यासाचें उदाहरण होण्याचा प्रसंग येईल, [तुमच्या या नव्या (कार्यकारणभावरूप) अर्थान्तरन्यासाच्या प्रकाराच्या द्दष्टीनें.] आतां विमर्शिनीकार जें म्हणतात कीं, “विशेषानें सामान्याचें समर्थन होत असतां, ज्या ठिकाणीं सामान्य वाक्यार्थाचें उपपादन करण्याची अपेक्षा असते, (म्ह० समर्थनाची जरूर भासते,) त्या ठिकाणीं अर्थान्तरन्यास समजावा; पण ज्या ठिकाणीं स्वत:सिद्धच असणार्या अर्थाच्या स्पष्टीकरणाकरतां त्या अर्थाचा एक भाग होणारा विशेष अर्थ, वाक्यांत सांगितला जातो, त्या ठिकाणीं, उदाहरणलंकार समजावा; उदाहरणर्थ :--- “निमज्जतीन्दो: किरणेष्विवाङ्क: ।” तेंही त्याचें (म्ह० विमर्शिनीकाराचें) म्हणणें बरोबर नाहीं, (कारण)
“स्वत:च्या दोषांनीं ज्यांचीम मनें व्यापून टाकलीं आहेत अशा लोकांना, अति सुंदर अशी वस्तूही उलटी (वाईट) भासते. पित्तानें पिडलेल्या मनुष्याला चंद्राप्रमाणें पांढरा असलेला शंखही पिवळा दिसतो.
या प्राचीनांना अर्थान्तरन्यासाचें उदाहरण म्हणून मान्य असलेल्या श्लोकांतील सामान्य वाक्यार्थांत कोणत्याही तर्हेचा संशय नसल्यानें, त्याच्या समर्थनाची बिलकूल जरूर नाहीं. (मग त्याचें समर्थन करणार्या अर्थान्तरन्यासाची तरी जरून काय ?) ‘दोषामुळें भ्रम होतो,’ या विषयीं सामान्य मनुष्यालाही शंका येत नाहीं; मग अशा अर्थाच्या समर्थनाची जरूरच काय ? तुम्ही म्हणाल कीं, तर्काची जरूर नसणार्या स्थळींसुद्धां मनुष्य (केव्हां केव्हां) जाणूनबुजून संशय होतो व तर्क करू
लागतो, तसें, सिद्ध वस्तूचे बाबतीम्त सुद्धां बुद्धया (आहार्य) संशय घेऊन समर्थन करतां येईल.” पण यावर उत्तर हें कीं, तुम्ही सांगितलेल्या उदहारणालंकारांतही, त्या बुद्धया मानलेल्या संशयाला भरपूर जागा आहे. (मग त्याला अर्थान्तरन्यास म्हणायला हरकत काय ?) म्हणून आम्ही सुचविलेली व्यवस्था मानणेंच योग्य आहे.
पण कुवलयानंदकारांनीं म्हटलें आहे कीं, ज्या “ठिकाणीं प्रथम विशेषार्थ, त्यानंतर सामान्यार्थ, व नंतर त्याचें समर्थन करण्याकरतां पुन्हां विशेषार्थ, असें असेल त्या ठिकाणीं, विकस्वर नांवाचा अलंकार समजावा. उदा० :--- ‘अनन्तरत्नप्रभवस्य०’ हा श्लोक.