साम्राज्यवामनटीका - श्लोक २१ ते ४०
वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते
जो आकाशघटमठीं महदाकाश तो असे ।
आत्मा तसा स्वप्रकाश जणती दोहिं ठायिं त्या ॥२१॥
जो जेथें देखिला होता तेथें आतां दिसेच तो ।
ते देशकाळ टाकीतां असे पुरुष एकची ॥२२॥
उभयोपाधिनीराशें ब्रम्हानुभव होतसे ।
परि विद्या शुद्धसत्त्व ब्रम्हानुभव हा तिणें ॥२३॥
अविद्या उपाधि जसा घटदेह तसा मठ ।
विद्योपाधिही ब्रम्हांड निराशें ब्रम्हा जें महत् ॥२४॥
देहीं ब्रम्हांडिं त्या बाहय असे एकचि ब्रम्हा तें ।
तोचि कूठस्थ जो देहीं अभोक्ता बिंब आत्मता ॥२५॥
कूटस्थापासुनी होते वृत्ति सत्त्वजळींच त्या ।
तेंचि कूटस्थ चैतन्य प्रतिबिंबें तयासची ॥२६॥
जीवात्मा प्रतिबिंबात्मा भोक्ताही वदति श्रुती ।
वृत्तियोगें चेततौनी इंद्रियां विषयां भुतां ॥२७॥
एवं सर्वहि तें एक अनात्म तद्विलक्षण ।
वसे आत्मा वृत्ति ज्यांत साक्षित्वातीत देहिं जो ॥२८॥
कूट्स्थ वदती त्यातें ब्रम्हांडींहि मठस्थ तो ।
महत् जो त्याहि बाहेरी असे एकचि ब्रम्हा तें ॥२९॥
तत्त्वमस्यर्थश्रवणें अविद्याग्रंथिसूटतां ।
प्रकटे ब्रम्हा विद्या जों समाधि निर्विकल्प तो ॥३०॥
होतां ब्रम्हाकार चित्त तें ब्रम्हा जग पाहती ।
‘सवं खलु इदं ब्रम्हा’ अभिप्रायें श्रुतीचिया ॥३१॥
निराकारचि हें सर्व निश्चयें वाटतें परी ।
होतां अंगीं विकारित्व जाणती त्या गुरूक्तिनें ॥३२॥
ठसतां निश्चयो चित्ता देह ब्रम्हांडपासुनी ।
जें जें आठवतें तें तेम निराकारचि जाणता ॥३३॥
कीं जें भासे जगजळ से आत्माच कीरण ।
सत्यें भासे जें असत्य नसे तें सत्यची असे ॥३४॥
विनाचैतन्य हें विश्व न भासे जड कांहिंच ।
चित्स्फूर्तिनें जड स्फुरे ब्रम्हाद्वैत अखंड तें ॥३५॥
दोरची सर्प तंतूच पट मातीच तो घट ।
समुद्रलहरी हेम अलंकार असे परी ॥३६॥
आत्माच आपला ब्रम्हा तो सर्वात्मपणें असे ।
जाणती सर्व भूतांतें आत्मत्वेंच करूनियां ॥३७॥
बळें ब्रम्हा चित्प्रकाश प्रपंच पाहतां दिसे ।
ये हातासहि तें ब्रम्हा घट मातीबळें जसी ॥३८॥
माती हेमीं नग घट शुक्तीं रजत शब्दची ।
दोरीं सर्पनाम जसें ब्रम्हीं जीवत्वही तसें ॥३९॥
मन प्राण इंद्रियेंही सत्क्रिय ब्रम्हा सर्व तें ।
सात्वीक धारणें पाहे स्फुरे नगचि हेम तें ॥४०॥
N/A
References : N/A
Last Updated : November 29, 2014
TOP