पंचकोशविवेक प्रकरणम् - आरंभ

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते.


हरि ॐ
श्रीगुरु कृपाचंद्रोदयेसीं ॥ मतिउदधी भरती उल्हासी ॥
ओव्या लाटा उसळल्या सरसी ॥ एकचढी एक ॥१॥
मायिका पंचभूतांचे बेटा ॥ लोटल्या पंचाशतत्रय लाटा ॥
सदद्वयजळें पाडिला पिठा ॥ ठाव ना ठिकाणा ॥२॥
तेथ अक्षयवटपत्रावरुती ॥ सान रूपें गोविंद खेळती ॥
तें म्यां पूर्वीपार्जित पुण्य अगणिती ॥ देखीयलें ॥३॥
तेणें आनंदलों भारी ॥ स्वपत्रपक्षें मारिली भरारी ॥
लोटावें प्रभु चरणावरी ॥ म्हणोनियां ॥४॥
पुराण पुरुष बहु भोळे ॥ कधींच न देखती द्वैत डोळे ॥
काय काय म्हणोनि दचकले ॥ लव मात्र् ॥५॥
विचार उपनेत्र लाऊनी ॥ जव पाहती निरुखोनी ॥
तव आपुलीच देखियली वाणी ॥ आपणा पुढती ॥६॥
प्रेमें अंतराय काढिती ॥ शब्द ठाईंच्या ठाईं लोपती ॥
अर्थ आपुला आपण स्वयंजोती ॥ प्रकटचि असे ॥७॥
नवल वर्षाऋतु हे होती ॥ कैसे चंद्र चकोर एकवटती ॥
पूर्ण पोर्णिमेच्या तिथि ॥ स्वानंद भरें ॥८॥
नेत्रीं सुदितांणि आंजन ॥ डोळां देखतसें निधान ॥
तेथ भूमीचें आवरण ॥ बाधूं न शके ॥९॥
तैसेच मुनि विद्यारण्य ॥ करुनी पंचक्कोश विवरण ॥
दाखवती स्वात्म निधान ॥ श्लोक मात्रें ॥१०॥
“योवेदनिहितं गुहायां” इति ॥ बोलली तैत्तिर्य उपनिषधी श्रुति ॥
तेंचि प्रमाण धरूनी वदती ॥ मुनिवर्य ॥११॥
येर्‍हवी पहातां निकें ॥ कोणवस्तु आवरण करूं शके ॥
सूर्य आंधकारीं झांके ॥ हें कैं घडे ? ॥१२॥
परि अज्ञान तमें बुद्धि डोळे ॥ देखापणी झाले आंधळे ॥
म्हणोनी श्रुति माता बोलें ॥ ज्ञान मंत्र हे ॥१३॥
तोचि घेउनी मतितार्थ ॥ श्लोकें पंचकोश विवरित ॥
तयाचेचि आम्ही प्राकृत ॥ बोल बोलिलों ॥१४॥
भाषाभेदें अर्थ नाहीं भेदला ॥ नाना नामें परि पुरुष जैसा एकला ॥
तैसाचि अर्थ पाहिजे घेतला ॥ सुजाण श्रोतीं ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 02, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP