श्रीआनंद - अध्याय दहावा
श्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.
श्रीगणेशायनम: ॥ बापू दिनकराचे पायीं । नृसिंह भेटे ठेवोनि डोई ॥
म्हणे प्रसादें पाहीं । कृतार्थ आज जाहलों ॥१॥
श्रवणेंद्रिय पाहुणें । आप्तज सर्व यावरी करणें ॥
जेंवि समर्थ सायरिया घरीं जाण । तृप्त होती दुर्बळ ॥२॥
अगा साबडे उपनाम वंशीं । आनंदमूर्तीं गुणैकराशी ॥
जन्मोनी सकळ गोत्रजांशीं । तारक जहाले या लोकीं ॥३॥
अनत लीला सत्पुरुषांची । ऐकतां धणी न पुरे आमुची ॥
पुढें रसाळ कथेची । गोडी चाखवी बापाजी ॥४॥
तुमचे ऐकोनिया बोल । श्रवणेंद्रिया येतसे डोल ॥
वाङमाधुर्यें अमोल । रंग भरवी कथेसी ॥५॥
देखोनि आवड श्रोतियांची ॥ प्रसन्न मर्जी बापाजीची ॥
चरितामृत - रसाची । पूर्तता करील यथेष्ट ॥६॥
कोणे एके वेळीं । माध्यान्ह पूजेचे काळीं ॥
ब्रम्हानंदीं लागूनि टाळी । आरंभिली मानस पूजा ॥७॥
तुरे गजरे पुष्पहार । अळंकार एकसर ॥
कंठीं पदक आणि पवित्र । करांगुली सुप्रभा ॥८॥
हार पदकीं हिरा । मणी मुगुट शिरपेंच तुरा ॥
कटकें वलयादि एकसराम । कुंडलादिकें कल्पिलीं ॥९॥
धूपदीप परिमळ द्रव्य । नैवेद्यादि कल्पलें सर्व ॥
एकाग्रता मानसभाव । घ्यान देखिलें ह्रत्कमळीं ॥१०॥
प्रमुख दैवत श्रीगुरुमाय । दृढतर ह्रदयीं समपाय ॥
गुरुभक्तास न्यून काय । कल्पिलें तें होतसें ॥११॥
श्रीगुरुची मानस पूजा । सांग करोनिया वोजा ॥
गंधाक्षता अर्पुनी श्रीगुरुराजा । भालीं तिलक लाविला ॥१२॥
पुष्पादि सर्व अलंकार । लेवविले परिकर ॥
तयांमाजि विसर । पडिला कर - मुद्रिकेचा ॥१३॥
धूपदीप पंचखाद्य । समर्पिला नैवेद्य ॥
उत्तरपूजादि उपचार विविध । मनोमय सर्व कल्पिले ॥१४॥
पूजा - विधान समाप्त जाहलें । शेवटीं ध्यान विसर्जिलें ।
नेत्रा उदक लाविलें । श्रीरघुनार्थ स्मरोनिया ॥१५॥
पुढें पाहिलें तबकांत । अंगठया दोन दिसों येत ॥
मणिमय सुवर्ण लखलखित । अमौल्य आणि सुतेज ॥१६॥
विस्मय केला आपुल्या मनीं । कच्या अंगठ्या आणिल्या कोणी ॥
आश्चर्य केलें सर्वत्रांनीं । कौतुक कांहीं नेणवे ॥१७॥
आनंदमूर्तींस जाहली स्मृती । अंगठयांची पडली विस्मृती ॥
पुढतीं ध्यान आणोनि चित्तीं । मुद्रा करीं लेवविल्या ॥१८॥
इतुक्यांत जाहला चमत्कार । गुप्त मुद्रांचा आकार ॥
धन्य धन्य साक्षात्कार । असाध्यही साध्य होतसे ॥१९॥
कौतुक पाहिलें सर्व जनीं । विस्मित जाहले आपुले मनीं ॥
धन्य निज - निष्ठा म्हणोनी । स्तुतिवाद बहु गर्जिले ॥२०॥
एके वेळीं श्रीरामदास । भेटावया आनंदमूर्तींस ॥
मुजरद आले सांगलीस । जयराम होते तेथेंचि ॥२१॥
रामदास स्वामींचे चित्तीं । मिरजेमाजि करावी वस्ती ॥
मठ साधोन सांप्रती । सांप्रदायही स्थापावा ॥२२॥
ऐसा अभिप्राय धरोन । सवें आनंदमूर्तींस घेऊन ॥
जयरामस्वामी गुणनिधान । तेही संगें घेतले ॥२३॥
तिघे येवोन मिरजेमाजी । भेटले ब्राम्हाण समाजीं ॥
बोलले येणें झालें सहजीं । तुम्हां सर्वां भेटावया ॥२४॥
प्रत्यहीं श्रीकृष्णेचें स्नान । प्रात:काळीं यावें करोन ॥
रात्नौ करावें कीर्तन । ऐसें कांहीं दिवस गेले ॥२५॥
गांवांत हे साधु पुरुष । आलें जाणों सर्वत्रांस ॥
जन लागले भक्तीस । कीर्तन - समारंभ करविती ॥२६॥
एके दिनीं पेठेमाजि । कीर्तना उभे होते सहजीं ॥
सुभेदार यवन काजी । दिलेलखान ज्या नांव ॥२७॥
किल्यांतून बाहेर आला । पेठेंत रस्त्यानें चालला ॥
कीर्तन शब्द ऐकिला । हयारूढ आला जवळिके ॥२८॥
रामदास स्वामी कीर्तनीं उभे । श्रोते समाज बैसला सभे ॥
गजर कीर्तनीं समारंभें । यवन ऐकोन उभा तेथें ॥२९॥
चित्त उल्हासे कथेंत । अनुभवी गोष्टी बोलले तेथ ॥
सत्समागमें एक घटिकेंत । राम येवोन भेटतो ॥३०॥
यवन ऐकोन ते गोष्टी । बळकट धरी ह्रदय - संपुटीं ॥
संतोष संशय येवोनि पोटीं । मग निघाला तेथोनी ॥३१॥
दुसरे दिनीं रामदास । पहाटे कृष्णा स्नानास ॥
गेले होते नदीस । उभयतां बिराडीं राहिले ॥३२॥
किल्लेदार दिलेलखान । बोलावणेस कारकून ॥
सवें पालखी देवोन । धाडिलें त्यांचिया बिर्हाडा ॥३३॥
सरिसेच दोघे किल्लयांत । जावोनि भेटले यवनातें ॥
ताजिमत होवोनि तेथें । कचेरींत बैसले ॥३४॥
सुख समाचार यांला । दिलेलखान पुसों लागला ॥
ऐसें बोलतां काळ लोटला । चार घटिकांचा तेथेंची ॥३५॥
दिलेलखानें काढिली गोष्ट । काल कीर्तनीं बोलिलां स्पष्ट ॥
सत्संगतीनें राम भेटे । दोन घटिकेंत निश्चित ॥३६॥
येथें तुम्हांस चार घटिका । पूर्ण येवोनि जाहल्या देखा ॥
तथापि आमुतें श्रीराम कां । भेटला नाहीं अजुनी ॥३७॥
राम - दर्शन आम्हां व्हावें । न होतां आम्ही यवन स्वभावें ॥
तुम्ही वैष्णव महानुभाव । विपरीत गोष्त घडेल ॥३८॥
अप्रमाण गोष्ट तुम्ही संत । कैसे बोलाल कीर्तनांत ॥
असो आतां तेचि सत्य । करून दाविलें पाहिजे ॥३९॥
मग बोलिले आनंदमूर्ती । रामदास कृष्णेस गेले असती ॥
आलिया नंतर आपणांप्रती । उत्तर याचे निवेदूं ॥४०॥
ऐसी गोष्ट परिसून । निरोप नेदीच तो यवन ॥
मग नदीस शिष्य पाठवून । आणिलें रामदासांस ॥४१॥
येतांच त्यांतें पुसिलें । काल आपण जें बोलिलें ॥
साच करून दावा वहिलें । सत्यंगें राम भेटतो ॥४२॥
रामदासें तयाप्रती । सांगितल्या अनेक युक्ती ॥
तें न मानेचि तयाप्रती । रामदास तेव्हां वदे ॥४३॥
असाध्य देखोनिया गद । जेंवि वैद्य योजी दिव्य औषध ॥
तेंवि साधवें करोनी । बोलले तया यवनातें ॥४४॥
साधु जातील त्या मार्गें । तुम्ही जावें तयांसंगें ॥
अनवधी राम अंगें । दर्शन देती तुम्हांसी ॥४५॥
येरू बोलला क्रोधांतरीं । तो मार्ग दावा झडकरी ॥
तैसें गेलिया मग तरी । दर्शन व्हावें निश्चयें ॥४६॥
हें न होतां पहा हो । तुमची स्थिती न देच राहों ॥
भ्रष्ट करीन तुमचा देहो । आचार तुमचा बुडवीन ॥४७॥
संकटीं पडले बहु सज्जन । ह्रदयीं स्मरिला रघुनंदन ॥
उठा म्हणोनि तिघे जण । कचेरींतून उतरले ॥४८॥
मग किल्याच्या तटावर । त्निवर्ग चढले अति सत्वर ॥
या संकटास परिहार । आन कांहीं दिसेना ॥४९॥
कांहीं तरी अलौकिक । यासी दावावें कौतुक ॥
तयाविना दुष्ट देख । कुंथित न होय सर्वथा ॥५०॥
किल्ले - तटाच्या जंग्यांतून । जावें तिघेहि निघोन ॥
संकट - हर्ता रघुनंदन । उडी घालील निश्चयें ॥५१॥
ऐसें बोलोन रामदासांनी । अतिसूक्ष्म रूप धरोनी ॥
जंगी - छिद्रांतून निघोनि । पक्ष्या ऐसे उडाले ॥५२॥
मागें राहिले उभयवर्ग । त्यांहीं करोनी सूक्ष्म अंग ॥
जंगींतून निघोन वेगें । खंदका बाहेर पातले ॥५३॥
पहा केवढी दुर्धर ख्याती । काय न होय तें साधू करिती ॥
यवन विस्मय पावोनी चित्तीं । तोबा तोबा ऐसे वदे ॥५४॥
तिघे जाऊन रेवणी वरुते । हांकारिलें त्या यवनातें ॥
यावें जंगींतून त्वरित । वेळ आतां न लावणें ॥५५॥
पश्चात्ताप पावला यवन । किल्या बाहेर येवोन ॥
साधुचरणीं लोटांगण । घालून गडबडा लोळे तो ॥५६॥
महाराज तुम्ही साधु सिद्ध । अज्ञान दुष्ट मी अविंध ॥
क्षमा करावा अपराध । छळिलें तुम्हां वैष्णवां ॥५७॥
बद्धांजुळी उभा पुढें । आर्तमुख पाहे मुखाकडे ॥
आपुलें दीण मी बापुडें । क्रोध न करावा मजवरी ॥५८॥
पापिष्ठ मी अतिदुष्ट । गवाशन हिंसक नष्ट ॥
दयावंत साधुश्रेष्ठ । अन्याय पोटीं घालावा ॥५९॥
पादचारी स्वामीसंगें । बिराडा घालवीत आला अंगें ॥
हरिभक्ताचें वक्र रोमाग्र । सृष्टींत कोण करूं शके ॥६०॥
यवन बोले जोडून हात । मठ करोन राहावें येध ॥
देववितों करोनि स्वस्थ । वास्तव्य कीजे स्वैच्छा ॥६१॥
स्थळ दिधलें करून । चित्तानुरूप स्वामींच्या ॥६२॥
अप्पाजीपंत ढालगांवींचे । गुरुबंधु आनंदमूर्तींचे ॥
प्रथमाध्यायीं कथानक त्यांचें । लिहिलें असें सविस्तर ॥६३॥
वेणूबाई त्यांची भगिनी । रामदासस्वामींची शिष्यिणी ॥
मिरजेंत मठाधिकारिणी । तिजलागोन पैं केलें ॥६४॥
आपुल्या पूजेच्या मूर्ती । सौमित्र - राम - सीतापती ॥
भरतशत्रुन्घ मारुती । रामदासें तीतें दिल्या ॥६५॥
श्रीरामलिंगा सन्निधानीं । राममठ आहे अजूनि ॥
वेणूबाई मठाधिकारिणी । केली श्रीमूर्तींनें ॥६६॥
त्यामूर्ती अद्यापपर्यंत । असती तया मठांत ॥
रामदास - सांप्रदाय तेथ । चालविती अद्यापि ॥६७॥
सुभेदार दिलेलखान । मदरहित झाला त्यापासोन ॥
न करी संतांचें हेळण । नम्रपणें वर्ततसे ॥६८॥
एक वेळां सांगली ग्रामीं । असतां आनंदमूर्ती स्वधामीं ॥
रंगनाथ गोपाळस्वामी । सांगली मार्गीं निघाले ॥६९॥
सांगली - समीप भागा आल । एकमेकां बोलते झाले ॥
कधींही आम्ही आलिया वेळे । दर्शना आनंदमूर्तींच्या ॥७०॥
आमुच्या आधीं नमस्कार । साष्टांग पडती भूमावर ॥
आमुची संधी त्यांचियावर । नमस्काराची साधेना ॥७१॥
आजि तयां नाहीं कळलें । तोंचि नमस्कार घालूं वहिले ॥
घोडिया खालीं उतरले । साष्टंग पडल भूमीवर ॥७२॥
सांगलीमाजि आनंदमूर्ती । म्हणींत गेले स्नानार्थीं ॥
बाहेर संत नमस्कारिती । कळलें अंतरीं श्रीलागी ॥७३॥
तात्काळ अळवाच्या वाफ्यांत । घातला साष्टांग प्रणिपात ॥
जोडोनिया चरण हस्त । साधूंचा मार्ग लक्षिती ॥७४॥
इतुक्यांत दरवाजा जवळीं । सर्वत्र येवोनि तये वेळीं ॥
पोंचली संत - मंडळी । श्रुत केला वृत्तांत ॥७५॥
कांहीं न बोलतां कोणातें । मौन्य पडले वाफियांत ॥
साधूंस कळतां वृत्त । खूण पोंचली अंतरीं ॥७६॥
न कळोन रानीं नमस्कारिलें । अंतरज्ञानें त्यांसी कळलें ॥
यास्तव वाफिया माजि पडले । नमस्कारार्थ आळवाच्या ॥७७॥
सत्वर येवोनि झाल्या भेटी । प्रेमलिंगनीं पडली मिठी ॥
ते वेळीं आल्हाद पोटीं । जाहला तो न वर्णवे ॥७८॥
संतचरित्र अगम्य । वाणतां कंठीं दाटे प्रेम ॥
गोपाळसुताचे पूर्ण काम । श्रीगुरुस्मरणें हों सरले ॥७९॥
आनंदचरितामृत ग्रंथ । बापानंद - विरचित ॥
श्रवण करोत प्रेमळ संत । दशमोध्याय रसाळ हा ॥८०॥
॥ श्रीरघुनाथार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP