श्रीआनंद - अध्याय तेरावा

श्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.


श्रीगणेशायनम: ॥ पंतें आपला कारकून ॥ दिधला सांगलीस धाडून ॥
संगें पालखी देऊन । आनंदमूर्तींसी आणावया ॥१॥
प्रात:काळींचा वृत्तांत । आनंदमूर्तींतें हौनी श्रुत ॥
क्रोधे होवोनी अति संतप्त । निघाले सत्वर यावया ॥२॥
कोणी टवाळें प्रात: काळीं । येवोनि वृंदावनाचे जवळीं ॥
स्वामींस छळिलें अवकाळीं । डोल व्हावा यदर्थीं ॥३॥
भोपळे ठेविले वृंदावनीं । भाले लविले चोहोंकडोनी ॥
ऐसें छळिलें दुर्जनीं । स्वामी माझा दयाळु ॥४॥
तया दुष्टाचें कल्याण । कैसें करील नारायण ॥
राज्यभ्रष्ट होऊन । अध:पात होईल ॥५॥
होईल त्याचा सत्यनाश । अन्य परिहार नसे त्यास ॥
ऐसें संगिये ब्राम्हाणास । बोलते झाले मार्गांत ॥६॥
कारकुनासी हें वृत्त । कळों आलें वाटेंत ॥
आनंदमूर्तीं क्रोधें संतप्त । गुरूस छळिलें म्हणोनी ॥७॥
जरी मी जाईन त्यांचे पुढां । विन्घास होईन वरपडा ॥
मज शापोनी रोकडा । भस्म आतांच करतील ॥८॥
ऐसा तया बैसोनी धाक । तेथोनी मागें फिरला देख ॥
येवोनि पंतांच्या जवळिक ॥ घाबरेपणें सांगतसे ॥९॥
आपण कीर्तनाचे वेळे । ठेविले समाधीवर भोपळे ॥
डोल गोचर व्हावया भाले । कां टेकविले वृंदावना ॥१०॥
हेंचि परिसोन आनंदमूर्ती । अतिसंतप्त झाले असती ॥
कल्पना आणिली त्यांनीं चित्तीं । छळिला माझा श्रीगुरू ॥११॥
अंतर क्रोधानें दाटलें । शापोक्ती बोलूं लागले ॥
दुर्जनें श्रीगुरुस छळिलें । त्याचा हो कां विध्वंस ॥१२॥
हें ऐकून उपजली भीती । येवोन वदलों आपणांप्रती ॥
ब्राम्हाण - क्रोधाची शांती । होय ऐसें करावें ॥१३॥
ऐसें ऐकतां श्रीमंत । व्यग्र जाहले बहुत ॥
आतां त्यांचा क्रोध शांत । होता मार्ग कोणता ॥१४॥
नमस्कार - प्रिय बिप्र । ऐसें चित्तीं आणोनी क्षिप्र ॥
मग साष्टांग नमस्कार । घालीत पैं चालले ॥१५॥
द्वादश शत शिलेदार । तिहीं घातले नमस्कार ॥
निघाले खाशां बरोबर । सांगलीमार्गें तेधवां ॥१६॥
तिकडोन आनंदमहाराज । शांतिक्षमेचें केवळ जहाज ॥
सवें ब्राम्हाण समाज । चालिले संगमाप्रती ॥१७॥
न्याहार देवोन समोर । पाहती तों समुदाय फार ॥
घालीत येती नमस्कार । कोण कोठील कोणाचे ॥१८॥
धाऊन आला कारकून । मस्तक चरणावर ठेऊन ॥
करोन साष्टांग नमन । बद्धांजली विनवीतसे ॥१९॥
छत्रपतींचे प्रतिनिधी । श्रीपत - रावजी गुणनिधी ॥
यवन - भय पावोन आधीं । पळोन आले या ठाया ॥२०॥
छत्रपतींचे  राज्यास । यवनें दिधला फार त्रास ॥
महाराज गेले चंदीस । प्रळय शत्रूनें मांडिला ॥२१॥
त्यांचे हे मुख्य प्रधान । श्रीपतराव गुणनिधान ॥
त्यांनीं धरोन अवसान । लढाई केली यवनांसी ॥२२॥
फौज सामान त्यांचें सबळ । जमाती विषयीं हे दुर्बळ ॥
युद्ध करोन अति तुंबळ । शेवटीं झाला मोड यांचा ॥
मोंगील सरदार होऊनि शेर । चढला त्यांचें पाठीवर ॥
पळत सुटले महिनाभर । यवन मागें धांवती ॥२४॥
बाराशें एकांडयांसी । काल आलों तुंगापाशीं ॥
फौजेंत खावया खर्चासी । कांहीं न मिळे आजवर ॥२५॥
बाबाजी आणि शिवाजी डफळे । यांणीं श्रीचें महत्व कथिलें ॥
कीं तयांचें वृंदावन डोले । कीर्तन - गजर होतांचि ॥२६॥
यास्तव स्वारीनें येवोन । घेतलें वृंदावन - दशर्न ॥
केलें स्वत: कीर्तन । श्रीमंत पंतप्रतिनिधीयें ॥२७॥
डोल होतां श्रीपतराया । सत्वर न येतां प्रत्यया ॥
कांहीं परीक्षा पहावया । केली होती महाराज ॥२८॥
देव आणि ब्राम्हणांचें । अभीष्ट कल्याण व्हावें साचें ॥
दुष्ट उपद्रव मोंगलांचे । न लागावे स्वस्थाना ॥२९॥
ऐसी इच्छा श्रीमंतांची । प्रसन्नता श्रीस्वामींची ॥
संपादोन बारासेंची । टोळी झाली एकदिल ॥३०॥
श्रीचरणींची पुष्पें तुलसी । उचलोन एकमेकांसी ॥
देवोनि नमोन स्वामींसी । सिद्ध जाहले संग्रामा ॥३१॥
इतुक्यांत शत्रुचा वृत्तांत ऐकिला । भिलवडीचा मुक्काम जाला ॥
पंतें श्रीलागीं नवस केला । जय दाता आजि तूं होई ॥३२॥
मुखें करोन नामगजर । हयावर झाले स्वार ॥
अवघिया सैन्यावर । जावोनिया कोसळले ॥३३॥
श्रीरघुनाथ - कृपा प्रबळ । वाताहत शत्रुचें बळ ॥
होऊन सर्वां सुटला पळ । कोणी मागें न फिरती ॥३४॥
यवनांचा मुख्य सरदार । समागमें पंचवीस स्वार ॥
घेऊन पळाला न धरी धीर । दौलत सारी सोडून ॥३५॥
तोफा नगारे निशाण । डेरे दांडे बहुसाल धन ॥
श्रीमंतांनीं सर्व लुटून । यशस्वी जाहले श्रीकृपें ॥३६॥
फिरतां ब्रम्हानाळाचे मार्गीं । आज्ञा केली मजलागीं ।
भेटोनिया आनंदयोगी । घेवोन यावें वृंदावनीं ॥३७॥
पालखी आहे बरोबर । मार्गीं येतां सत्वर ॥
आपुलें शापोक्ती - अक्षर । ऐकोन बहुत घाबरलों ॥३८॥
पळोन गेलों मुक्कामास । वृत्तांत कथिला श्रीमंतांस ॥
ऐकोन त्यांचे चित्तास । अति व्यग्रता पावली ॥३९॥
आपुला क्रोध व्हावया शमन । उपाय न दिसे आन ।
नमस्कारावांचून । क्षमा न करिती सदवृंद ॥४०॥
ऐसें जाणोनि नमस्कार । घालीत निघाले सत्वर ॥
बाराशें लोक समग्र । तेहि निघाले सांगाती ॥४१॥
पंत परम भगवद्भक्त । देव - ब्राम्हाणांचे ठायीं बहुत ॥
उपकार करून केलें हित । त्यावर आपण कृपा करा ॥४२॥
ऐसें बोलोन कर जोडून । लोटला चरणांवर जाऊन ॥
बद्धांजळी ठाकोन । स्तुतिवाद तेणें केला बहू ॥४३॥
उत्तमाचा कोप एक क्षण । मध्यमाचा टिके प्रहर दोन ॥
कनिष्ठाचा तो दु:शमन । आठ प्रहरें सरेचिना ॥४४॥
चांडाळासि निरंतर । क्रोध भरला न पावे उतार ॥
एवं श्रीमूर्ति सुधाकर । कृपोदय करिजेल ॥४५॥
श्रीमूर्तीनें श्रवण केलें । अंतर कृपेनें कळवलें ॥
देव - ब्राम्हाण - भक्त । निष्ठावंत हे असती ॥४६॥
डोल वृंदावनाचा नकळे । भोपळे ठेऊनी प्रत्यया आणिलें ॥
ब्राम्हणें जिज्ञासेनें केले । अपराध क्षमा करावे ॥४७॥
हेंचि श्रींचे येऊन चित्तीं । झाली क्रोधाची निवृत्ती ॥
वेगें पातले संगमाप्रती । पंतही आले तिकडोन ॥४८॥
घातलें चरणीं लोटांगण । चरण हस्तकीं धरून ॥
विनंती करिती होऊनि लीन । स्वामी समर्था गुरुवर्या ॥४९॥
कल्याणकर आपुला हस्त । ठेवाल माझिया शिरावरुते ॥
तरीच उठेन निश्चित । दयावंत संत तुम्ही ॥५०॥
ऐसी ऐकोन विनवणी । कळवळले श्रीआनंदमुनी ॥
हस्त ठेविला त्यांच्या मूर्ध्नीं । उठवोनी दिधलें आलिंगन ॥५१॥
सहवर्तमन पंत संत । वृंदावना जवळीं येत ॥
नमस्कारोन श्रीचरणांतें । प्रदक्षिणा मग केल्या ॥५२॥
बैसले आनंदें एकासनीं । वृत्तांत कथिला मुळापासोनी ॥
आज श्रीगुरुकृपेंकरुनी । सुयश प्राप्त जाहलें ॥५३॥
आमचें सामर्थ्य तें किती । श्रीगुरु जाहले सांगाती ॥
ऐसें बोलून मनोवृत्ति । समाधान पावविली ॥५४॥
मग करोन संध्यास्नान । सारिलें पंक्ती भोजन ।
त्रिरात्र तेथें क्रमून । उत्सव केला दुसरे दिनीं ॥५५॥
ब्राम्हाण - भोजन - सामग्री । पंतें करविली वेगवक्रीं ॥
पत्नें पाठऊन क्षत्नोक्षेत्रीं । विप्र भोजना आणविले ॥५६॥
झालें प्रयोजन सुंदर । सांग केला कीर्तन - गरज ॥                   
दानधर्मही केला फार । अति आनंदें श्रीमंतें ॥५७॥
आनंदमूर्तींचे नांवाच्या । सनदा बारा गांवांच्या ॥
लिहून पंतें श्रीस्वामींच्या । पुढें ठेविल्या अतिमानें  ॥५८॥
करून श्रींतें नमस्कार । म्हणती करावा अंगीकार ॥
श्रीस्वामींचा उत्सव गजर । संतर्पणादि चालवावा ॥५९॥
धूप - दीप - नैवेद्य । वृंदावनीं उपचार विविध ॥
योगक्षेमही त्यांमध्यें । कुटुंबाचा करावा ॥६०॥
श्रीस्वामी पंतास बोललें । आपणांस बारा गांव दीधले ॥
यामध्यें ऐसें जाहलें । कारभार आम्हीं करावा ॥६१॥
श्रींचा सेवा राहिली । स्नान - संध्या मानसिक जाहली ॥
राज्यकारभारीं वृत्ती गुंतली । हानी दिसे सर्वस्वें ॥६२॥
यावीण आम्हां कारण नसे । आहे तेंचि बरवें दिसे ॥
येतुली प्रतिष्ठा आम्हांस । अंतराय करूं शके ॥६३॥
सनदा पत्नें आम्हां नसावीं । आपणा पाशीं ठेवोन घ्यावीं ॥
ऐसा  गुरु - भक्त गोसांवी । बोलला तैं श्रीमंतांतें ॥६४॥
पंत चित्तीं खिन्न जाहले । वदन परम कोमाइलें ॥
हें समजोन बोलले । श्रीस्वामी मग तयातें ॥६५॥
आपुले चित्तीं श्रींची भक्ती । स्वास्थ्य द्यावें आम्हांप्रती ॥
तरी स्वल्प सांगतों धरोन चित्तीं । चालवावें श्रीमंतें ॥६६॥
ब्रम्हानाळा स्वस्थान आहे । या गांवची सनद पाहे ॥
इतुकेंच पुरें स्वल्प नोहे । संतुष्ट असों इतुकेनी ॥६७॥
ब्रम्हानाळचीं पत्नें करून । दिधली स्वामीकारण ॥
चरणीं मस्तक ठेऊन । नमस्कारिलें साष्टांगीं ॥६८॥
शके सोळाशें षोडश । भावनाम संवत्सरास ॥
राजाराम या देशास । आले चंदावराहुनी ॥६९॥
त्या काळीं सनद करून । दिली ब्रम्हानाळा पाठवून ॥
राजमुद्रादि सर्व चिन्हें । त्या पत्रासी आहेत ॥७०॥
सिंहावलोकनें मागील गोष्टी । श्रवण कीजे संत - श्रेष्ठीं ॥
प्रतिनिधीयें सुखसंतुष्टी । सनद ब्रम्हानाळाची दीपली ॥७१॥
तेचि दिनीं प्रहररातीं । पंतासह आनंदमूर्तीं ॥
बोलत बैसले एकांतीं । राहुटीमाजि पंताचा ॥७२॥
ते समयीं अकस्मात । प्रगट जाहले श्रीरघुनाथ ॥
आजानुबाहू तेज अदभुत । येवोन उभे ठाकले ॥७३॥
आनंदमूर्तीं निरखितां ध्यान । केलें साष्टांग नमन ॥
द्वादश नमस्कार करून । बद्धांजली पुढें उभे ॥७४॥
पंतांसी बोलिले आनंदमूर्तीं । आपुलें जन्मांतर सुकृती ॥
यास्तव स्वामी आपणांप्रती । दर्शन देवोनी प्रगट झाले ॥७५॥
स्वामींस करोन प्रार्थना । मागावें अभय - वरदाना ॥
दयाळू स्वामी श्रीगुरुराणा । इच्छा पूर्ण करील ॥७६॥
हें ऐकून श्रीमंतराय । मस्तकीं वंदून श्रीगुरुपाय ॥
आनंद अंतरीं न समाय । बद्धांजली ठाकले ॥७७॥
नमस्ते गुरुनाथाय । अद्वयायाव्ययायच ॥
निर्द्वंद्वाय नि:संगाय । परात्पर नमोस्तुते ॥७८॥
प्रसादोन्मुख श्रीमूर्तीं । वरद व्हावें दीनाप्रती ॥
राजाराम ययाप्रती । अल्पकाळें प्रसाद व्हावा ॥७९॥
जेणें योगें महाराजा । सर्वसुखी होईल माझा ॥
गाई देव आणि प्रजा । कल्याणोदय कीजे प्रभू ॥८०॥
ऐसी परिसोन विनवणी । प्रसन्न हौनी रघुनाथ मुनी ॥
संबोखिलें अभय वचनीं । कल्याणार्थीं सकळ जनांच्या ॥८१॥
स्वमुखें श्रीरघुवीर । वदते झाले अमृत उत्तर ॥
राजाराम हे सत्वर । येतील देशी जाण पां ॥८२॥
यवनादिकांचा पराभव । राजा करील स्वयमेव ॥
गाई ब्राम्हाण संस्थापन देव । प्रवृद्धीतें पावतील ॥८३॥
येथून छत्रपतींचें राज्य । वेद - घोष करिती द्विज ॥
सिंहासनीं साम्राज्य । करोन सुखें नांदेल ॥८४॥
ऐसी वदोन वचनोक्ती । अदृश्य जाहले श्रीगुरुमूर्तीं ॥
पंतें आनंदोन चित्तीं । सुखी झाले अत्यंत ॥८५॥
सवेंचि जाहला प्रात:काळ । उदया आलें रविमंडळ ॥
पंतें नित्यकर्म प्रांजळ । कृष्णातीरीं सारिलें ॥८६॥
भोजन झालियानंतर । पंतें निजांगें कीर्तन गजर ॥
श्रींवृदावनासमोर । केला तदा आवडीं ॥८७॥
श्रवणीं आनंदमूर्ती साधु । बैसला बहु शिष्यवृंदु ॥
कीर्तन गजरीं ब्रम्हानंदु । श्रोत्या वक्त्या वोसरला ॥८८॥
तया काळीं श्लोक एका । पंतें निजांगें केला देख ॥
तोचि अवधान देवोनि ऐक । नृसिंह श्रोतया सुजाणा ॥८९॥

[श्लोक :--- अचेतना जो बहु डोलवीतो । सचेतना काय न बोलवी तो ॥
जो चिद्‌घनानंद आनंदमूर्ती । राहो तदाकार आनंदवृत्ती ॥१॥]

आनंदमूर्तींची घेवोनि आज्ञा । सर्व सरंजामा सहित सुज्ञ ॥
पन्हाळ्याप्रती अगा प्राज्ञा । जाते झाले संतोषें ॥९०॥
संत - चरित्र अतिगोड । श्रवणें पुरती सर्व कोड ॥
पुण्य - कीर्ति - यशजोड । अचुंबित ये हात ॥९१॥
संतपद आठवोनि चित्तीं । काळ क्रमावा दिवसराती ॥
गोपाळसुत ऐसें चिंती । सिद्धी नेतील सदवृंद ॥९२॥
इति श्रीआनंदचरितामृत ग्रंथ ॥ बापानंद - विरचित ॥
आदरें सेवोत संत । त्नयोदशाध्याय गोड हा ॥९३॥

॥ श्रीरघुनाथार्पणमस्तु ॥


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP