(७१) “जाणीं मातें घन, अविधवे ! त्वत्प्रतीचा सखा, गे ! ।
आणी त्याचें कुशलवच, जें मन्मनीं पूर्ण जागें ॥
जो पांथांतें, पथिं विरमल्या स्वगृहा हांकवाया ।
गर्जे मंदध्वनि, रमणिंच्या वेणिमोक्षा कराया ॥”
(७२) हें ऐकोनीं, पवनतनया जानकी जेविं, तूतें ।
पाहे आशाभरित ह्रदयें, दावि ती आदरातें ॥
लावी सारा लय तव वचीं, सौम्य !; वार्ता प्रियाची ।
आली मित्राकडुनि, अबलां संगकल्पाचि साची ॥
(७३) तीतें माझी विनति गणुनी, तूं कृती व्हावयास ।
तैसा, सांगें :--- प्रियजन तुझा रामगिर्याश्रमास ॥
आहे, देहें कुशल, विरही; तो तुझें क्षेम बाहे ।
पृच्छा आधीं सुलभविपदां प्राणियां हीच आहे ॥
(७४) झाली त्याची वपु कृशतरा, तापवी पंचबाण ।
डोळे येती भरुनि, झुरतो नित्य सोत्कण्ठ जाण ॥
उष्णोश्वास प्रसरति, अशा व्याधिनीं व्याप्त - जीव ।
कल्पी त्या त्या दुरुनि तुज, जों रोधि मार्गा कुदैव ॥
(७५) जें सांगावें उघड तुजला मैत्रिणीच्या समीप ।
तेंही कानीं कथि, धरुन जो आननस्पर्शलोभ ॥
तो, गे ! द्दष्टिश्रवणविषयांपासुनी दूर होतां ।
धाडी प्रेमोत्कट मम मुखें या निरोपासि आतां ॥