ध्रुवचरित्र - भाग ११ ते १५
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
११.
घरा येतां बाळ देखिलें मातेनें । दाटली दु:खानें बोलवेना ॥१॥
आक्रंदोनि पुढें मोकळोनि धाये । नेणों कैसें काय झालें यासी ॥२॥
घालोनियां कव घेतां कडेवरी । दोन्ही नेत्र करीं पुसीतसे ॥३॥
काय झालें बाळा सांग बा वृत्तांत । बा कोण तूंतें पाहों नेणे ॥४॥
नामा म्हणे असो प्रेमा तो अपार । पुढील विचार बोलीजेला ॥५॥
१२.
न कळतां मुलांसंगें मी खेळत । गेलों सभेआंत राजयाच्या ॥१॥
काय सांगों माये जाहला अपमान । तेणें माझें मन । दुखावलें ॥२॥
मातें प्रेमभावें रायें आळवीलें । मांडी बैसवीलें सन्मानेशीं ॥३॥
आली आकस्मात् दुर्धर कोपोन । लांस कीं ते कोण मी तो नेणें ॥४॥
ताडोनियां पायीं मज उठविलें । निघालों मी सहजें तत्क्षणीं ॥५॥
कोणी नुठवी ऐशाठायीं म्या बैसावें । तें कोणा मागावें सांग माये ॥६॥
नामा म्हणे दिसे पाहातां बाळक । ज्ञानची निष्टंक मुसावलें ॥७॥
१३.
ऐकोनियां वाणी पातली ते रमा । बोलिली विश्रामा जीवाचिया ॥१॥
दुर्जनाचा भाव ऐसाचि वोखटा । दर्प त्याचा मोठा आवरेना ॥२॥
दुसर्याचें बरें तें कैसें सोशिती । बळें निखंदिती साटोपानें ॥३॥
दीपाचा प्रकाश सोशीना पतंग । जळताही अंग झेंप घाली ॥४॥
चंद्रोदया आधीं फुटतील डोळे । ते काय कावळे पाहातील चंद्र ॥५॥
आधींच सावत्र संबंधी पापीण । राजाही आधीन जिच्या झाल्या ॥६॥
सिंहासनीं याच्या मांडीये बैससी । हें ते कैसें सोसी निसंगळ ॥७॥
दैवहीन आम्हीं देवचि कोपला । आपुला तो झाला परावा कीं ॥८॥
देवें द्यावें तेव्हां भोगावें सकळ । न चले कदा बळ दुसर्याचें ॥९॥
कासया तूं बाळा स्फुंदसी दु:खानें । देवाहून कोण सखें आम्हां ॥१०॥
नामा म्हणे हित ऐकतां मायेचें । चित त्या बाळाचें उठावलें ॥११॥
१४.
पूर्वजज्मीं त्यानें साधियेला योग । कांहींसा वियोग झाला होता ॥१॥
कैसा नेटेपाटे उन्मखे फुटला बालपणीं त्याला ज्ञाम झालें ॥२॥
विरक्ती वोळगे पाइक होउनी । शांती पुढारुनी माळ घाली ॥३॥
शमदम अंकित पुढारले बळें । योग तो अढळ सदा तेथें ॥४॥
मान गर्व मनाचा खुटला विचार । थिता अहंकार तोहि गेला ॥५॥
नामा म्हणे बाळ बोलिलें जाणोनीं । माउली हांसोनी काय बोले ॥६॥
१५.
संकल्पाचा मळु नेत्रीं नीडारला । त्यालागीं तो डोळा काय दिसे ॥१॥
जेथें देखों तेथें तोचि तो कोंदला । विश्वामाजी भरला विश्वंभर ॥२॥
मोठे थोर थोर तापसी नाडीले । कामानें वोढिले माघौतेची ॥३॥
वेदाचें पुनीत यज्ञशीळ सारें । झकवती बारे वास नेणे ॥४॥
दांभीक मगरीं गीळिलें सर्वांसीही । त्यालागीं तो नाहीं ऐसा भासे ॥५॥
नामा म्हणे ऐसी बोलली जननी । बाळ मोठा ज्ञानी जाणवला ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP