ध्रुवचरित्र - भाग ३१ ते ३३
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
३१.
स्तवीनसे वाचे जोडोनियां कर । वेदां अगोचर ऐसें कांहीं ॥१॥
धन्य धन्य आतां उद्धरलों स्वभावें । माझें मज ठावें झालें निज ॥२॥
विश्वाच्या विसांव्या जिवाचिया जिवा । देवाचिया देवा दिनानाथा ॥३॥
सूंचि सर्वां आदिमायची अवधी । तुजविण कधीं दुजें नाहीं ॥४॥
एक तूं अनेक अनेकीं तूं एक । येणेही सांशंक बोलवेना ॥५॥
दातृत्वाची आदी कल्याणाची निधी । चित्तमन बुद्धि सर्व तूंची ॥६॥
तुझीये कृपेनें गेले भावाभाव । आणिक मागावें ऐसें नाहीं ॥७॥
कधींही कोणता चळेना ढळेना । माते ऐशा स्थाना बैसवावें ॥८॥
नामा म्हणे ऐसी करीत प्रार्थना । घाली लोटांगणा पायांवरी ॥९॥
३२.
आश्वासोनी देव बोलिले ध्रुवासी । इच्छा तुझी जैशी तैसें करूं ॥१॥
सहज सत्येनें ऐसें कांहीं जहालें । अढळ दिधलें बैसावया ॥२॥
चंद्र सूर्य तारा शशि ऋषी भोर । हे ज्या आधारें हिंडताती ॥३॥
ब्रम्हलोक साचे परी ते न नासे । ऐशा परी त्यास बैसविले ॥४॥
क्षतेचा दिवस योजनें उन्नती । बेसवी श्रीपति ध्रुवालागीं ॥५॥
सवी सर्वत्नांच्या लोचना गोचर । रमणीये अपार वर्णवेना ॥६॥
नामा म्हणे दुजें वैकुंठ केवळ । भक्तालागीं केलें देवरायें ॥७॥
३३.
ऐसें झालें पूर्ण ध्रुवाचें आख्यान । ऐकती जर जन एका भावें ॥१॥
तयावरी कृपा देवाची होईल । केलें तें लाभेल सर्व काज ॥२॥
पुत्राभिष्ट पुत्र धनाभिष्ट श्वन । जैसें ज्याचें मन तैसें होय ॥३॥
नामा म्हणे तया कल्याण सर्वदा । चिंतितां गोविंदा काम पुरे ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP