उपमन्यूचें चरित्र
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
ऐका श्रोते सावधानता । सांगेन उपमन्युची कथा । एक्या भावें परिसतां । सायुज्यता पाविजे ॥१॥
बाळ तो लडिवाळ तान्हा । वाढे मातेचिया स्तन पान्हा । परि ते असे दुर्बळपणा । उपमन्यु नांव तयेचें ॥२॥
उपमन्यें मागितलें । कृष्णें तयासी काय दिधलें । तें सांगेन वहिलें । चित्त देउनी परियेसा ॥३॥
ब्राम्हणासी एक पुत्र झाला । पितयानें संतोप मानिला । थोर कष्टें वाढविला । तयाचें पुत्रपण फिटलें ॥४॥
बाळ जाहला जाणता । पितयासी उपजली दूधाची चिंता । दूधच ऐकिलें बोलतां । तेंचि मातेसी मागत ॥५॥
मग कर्डी कांडोनी जनकजननी । त्याचें केलें शुभ्रपाणी । बाहेर दूध म्हणउनी । वाटींत भात कालविला ॥६॥
तंव शेजारी ब्राम्हणानें श्राद्ध केलें । त्यानें त्या वाळकास जेवावयास नेलें । षड्रस पक्कान्ना वाढिलें । दूध क्षीर नाना परीचे ॥७॥
तयासी वाढिली दूध क्षीरी । बाळक जेविलें पोटभरी । पुसोनियां तये घरीं । माते मागूं जेवावया ॥८॥
गेला आपुलिया घरा प्रती । बाळ तो निद्रा करी रातीं । प्रात:काळीं भूक लागे मागुती । मागे दूधभात जेवावया ॥९॥
पुढती कर्डी वाटूनि जननी । त्याचें काढिलें शुभ्र पाणी । येतें टाकिलें थुंकोनी । माते धूध कालचें नव्हे ॥१०॥
बारे त्या समर्थाचे घरीं । देवें दिधलें दूध क्षीरी । आम्हां दुर्बळाचे घरीं । तें दूध कोठूनि मिळेल ॥११॥
कोठें आहे तो श्रीहरी । तो मज दावीं वो झडकरी । दूध मागेन निर्धारी । क्षूधा अंतरीं बहु पीडी ॥१२॥
देव्हारां श्रीहरिची मूर्ती । नेउनी दाखविली बाळाप्रती । बारे हा लक्ष्मीपति । दूध या प्रती मागावें ॥१३॥
बाळ खळ घेउनी बैसला तेथें । देवा दूध पोटभर दे मातें । मी कोठें जाऊ जेदी तूतें । दूध घेतल्यावांचोनी ॥१४॥
ऐसे तिघां तीन उपवास पडती । माता पिता चिंता करिती । लोकीं मिळोनी बहुतीं । उठवूं पाहती बाळकातें ॥१५॥
बाळा तुजकारणें । एकगाय देतों आणुन । येरु न मानी त्यांचे वचन । म्हणे देईल लक्ष्मीरमण मजलागीं ॥१६॥
माता समजावी बहुता वचनीं । त्या ब्राम्हणाचें दूध देतें आणुनी । हें पाहें पांचाखोनी । दूध कालचें होय कीं नव्हे ॥१७॥
दूध आणिलें भीक मागुनी । संतोष न वाटे माझे मनीं । देव देईल मज लागुनी । तरी दूध सेवीन ॥१८॥
देवें धुरूसी अढळपद दिलें । तैसेंच दूध देईं मज संचलें । न देतां अव्हेरिलें । तरी प्राण देईन निर्धारी ॥१९॥
देवा दुधाची शिधोरी । कां मज न देसी श्रीहरी । आळ पुरवीं बा मुरारी । दूध पोटभरी मज देईं ॥२०॥
मज बहु लगलीसे क्षुधा । अझुनी कां न पावसी गोविंदा । तुज मागत नाहीं धनसंपदा । एका दूधा वांचोनी ॥२१॥
देवा नको पाहूं निर्वाण । देहकरवतीं घालीन । प्राण तुज समर्पीन । सत्य वचन पाहें माझें ॥२२॥
देखोनी बाळकाचें अंत:करण । कळवळिला नारायण । सांडोनी क्षीरसागर शेषशयन । येत धांवून बाळकाप्रती ॥२३॥
सुदर्शन घेऊनि हातीं । पावला उपमन्यु आकांतीं । प्रगट झाली विष्णूमूर्ती । निजरूप दाविलें ॥२४॥
बाळ येऊनि लागला चरणीं । देवें ह्रदयीं धरिला आलिंगुनी । वरदहस्तें कुरवाळुनी । कृपाद्दष्टी अवलोकी ॥२५॥
सांग बाळा प्रसन्न झालों तूंतें । काय संकल्प तो माग मातें । येरू म्हणे दूध द्यावें कृपावंतें । जें कल्पांतींही न सरेची ॥२६॥
हांसून बोले वैकुंठरमण । पहावो बाळ केवळ अज्ञान । म्हणे मी झालों आतां प्रसन्न । काय दूध तुवां मागावें ॥२७॥
देवा या दुधाचि कारणें । एवढें केलें म्यां निर्वाण । सहित मातापिता तिघेजण । क्षीर भोजन मज द्यावें ॥२८॥
माता पिता उपमन्य । निघे गरूड पृष्ठीं वाहवून । क्षीरसागरीं ठेवी नेऊन । दूध प्राशन सुखें करा ॥२९॥
राज्य देउनी क्षीरसागरीचें । अमर शरीर केलें त्यांचें । अखंड दर्शन श्रीहरीचें । सायुज्यपद त्या दीधलें ॥३०॥
यालागीं काया वाचा मनें । जावें विठोबासी शरण । आर्त मनोरथ पूर्ण । निजभक्ताचें करीतसे ॥३१॥
विष्णुदास नाम्याचा स्वामी । तो श्रीहरी वोळगा तुम्ही । जें जें इच्छिलें अंतर्यामीं । इच्छा दानीं पुरवील ॥३२॥
N/A
References : N/A
Last Updated : January 12, 2015
TOP