मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|
विरहिणी

विरहिणी

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१.
रूपें शाभसुंदर निलोल्पल गाभा । सखीये स्पप्नीं शोभा देखियेली ॥१॥
नेत्र विशाळ भाळ दंत हीरया ज्योती । बाइये मदनमूर्ती देखियेला ॥२॥
शंख चक्र गदा शोभती चहूं करीं । सखीये गरुडावरी देखियेला ॥३॥
शयन शेषापृष्ठीं नाभीं परमेष्ठी । गंगा वामांगुष्टीं देखियेला ॥४॥
पीतांबर कटीतटीं दिव्य चंदन उटी । सखीये जगजेठी देखियेला ॥५॥
विचारितां मानसीं नये जो व्यक्तीसी । नामा केशवेसी लुब्धोनी ठेला ॥६॥
२.
अव्यक्त परब्रह्मा कैसें आलें वो व्यक्तीं । अकळु न कळेचि तो हा अमुर्त मूर्ती । पुंडलिकाचे भक्ती य़ेऊनियां वाळवंटीं । उभा राहे विटेवरी कर ठेऊनि कटीं ॥१॥
जिवाचा जिवनु वो मज भेटवा हरी । लागलें प्रेम पिसें होऊनि दासी कामारी ॥ध्रु०॥
कसे कसिला पितांबर तयावरी मेखळा । अंगीं उटी चंदनाची शोभती वनमाळा ।
बाहू बाहुवटे तें रूप खुंतलें डोळां । मन माझें मोहिलें द्दष्टि देखतां घननिळा ॥२॥
अधर जें पोंवळियाचे दंत हिर्‍याची जोती । विशाल नयन वो भोंवया व्यंकटा अति ।
टिळक जो रेखिला मृगनाभीं लल्लाटीं । उपमा नये व्यक्ती चंद्रा पडियली तुटी ॥३॥
माथां मुगुट जो रत्नें जडियली वरी । त्याखालीं मयूपरत्रीं वेटी साजे मुरारी ।
माथां त्या विरगुंठी पुष्पें तुरंबिलीं वरी । तेणें मी भाळलियें भेटवावो झडकरी ॥४॥
इंद्ननीळ कीळ उभा घना श्यामु हा दिसे । पाहा तूं एक द्दष्टीं चकित केलें वो हांसे ।
तेचि ते कामबाण जिवा लागलें पिसें । नामया विष्णुदासा व्यापिलें ह्रषीकेशें ॥५॥
३.
संसार परजनीं । दूर दिधलें मज साजणी । द्वारकापुर पाटणीं । माझें माहियेर ॥१॥
थोर उत्कंठा मनीं । वाट पाहें प्रतिदिनीं । मज नेत कां न कोणी । तया माहियेरा ॥२॥
चित्तीं न लगती व्यापार । मनीं होंचे वारंवार । आड ठाकले गिरी डोंगर । तया माहियेरा ॥३॥
माझिये सासुये निष्ठुरें । दुरळ बोलिलीं उत्तरें । तंव तंव मी तूतें स्मरें । विठू बापु माहियेर ॥४॥
येथें कोणी नाहीं माझें एक । जें त्यासि बोलूं सुख दु:ख । हें मन उतावेळ देख । तया माहियेरासाठीं ॥५॥
कामक्रोध भावे दीर । बोलती अति निष्ठुर । तेवेळीं त्यजिजे संसार । ऐसें वाटतसे मना ॥६॥
या वो संसारीं नसिजे । संगु अवघाची सांडिजे । नि:संग होऊनि राहिजे । तया माहियेरा ॥७॥
या वो प्राणाचे संकटीं । आत्मा ठेवूनियां कंठीं । मग चालवीं घरराहटी । म्हणिजे काम रात्रंदिवस ॥८॥
याचे कूर बोल न होती । तेणें मी असें निर्बुज चित्तीं । निरोप धाडूं कवणा हातीं । तया माहियेरा ॥९॥
तंवचि वो शिणिजे । जंव यातें न वोळंगीजे । याचें बीज पाविजे । नामें एकें विठ्ठलें ॥१०॥
आतां बहु काय बोलिये । यासि सुवेळा न पुसिजे । पुण्यमार्में जाईजे । तया माहियेरा ॥११॥
माझी सखी जे कां भक्ति । मज तेचि संबोखितो । तिये लाविले शुद्धमती । साह्य ते मज चुकों नेदी ॥१२॥
सत्य भावो मज सांगाती । येर लटकिया व्युत्पत्ति । मी वो जाईन हरखें जतीं । तया माहियेरा ॥१३॥
कृष्ण माउली भेटेल । शीण अवघाचि हरेल । सुख आनंदुन मायेल । या या त्रिभुवनीं ॥१४॥
या बहु जन्माचा शीण वो जाईल । विठोदर्शनें दु:ख हरेल । नामा सुखिया होईल । केशव चरणीं ॥१५॥
४.
कृष्ण अनुसंगें रंगली कामिनी । कामधामें गेलीं गुणां विरोनी ॥१॥
होती बहुत जन्में वियोगें शिणली । आप नाठवे पर सुखें मिनली ॥२॥
मनें करूनियां ये विषयांचे संकल्प । तंव ते अवघे होय कृष्णरूप ॥३॥
द्दष्टीं देखणें जें जें आवडे । वेणू बाहे तेथें उभे देहुडे ॥४॥
सुखशयनीं स्वप्नीं देखे सांवळा । कंठीं कौस्तुभ रुळे वरी वनमाळा ॥५॥
जीवें धांवूनि आलिंगीं प्रीति । तंव ते आर्ती होय कृष्णमूर्ती ॥६॥
देह परतोनी मागुते सांभाळी । तंव स्वयें सिद्ध आपण वनमाळी ॥७॥
नामया स्वामी जीविंचा जिवलगू । कृष्णसुखाचा सुखबाध अंतरंगू ॥८॥
५.
भिन्न रात्रीं माध्यान्ही वो । सेजे सुदली नारी । आपआपणा विसरूनियां । सुशोभित अंधारीं ॥१॥
त्यामाजी चारी भुजा । शंख चक्र वो करीं । पद्म गदा हातीं शोभती । दिसे सर्व शृंगारीं ॥२॥
येऊनि हंस तुळीके । कैसें धरियलें करीं । देऊनि आलिंगन । वोरसलें वो दुरी ॥३॥
पालवीं धरितां धरितां । निघाला बाहेरी । त्यालागीं प्राण जातो । भेटवा झडकरी ॥४॥
कवण ते प्राण सखी । भेट करील विठोसी । सांडूनि वीरगुंठी । चरण झाडीन केशीं ॥५॥
कवण मी कैंचा नेणें । जाती कुळ तयाचें । कवणा पासाव झाला । तें मी नेणें वो साचें ॥६॥
इंद्र चंद्र नीळ कीळ । घन नभ रूप तयाचें । चरणीं तोडर रुळे । वरी नेपूरें साचे ॥७॥
नख चंद्रमंडीत वो । जन्मस्थान गंगेचें । जानु जघन नीट । पीतांबर वो कासे ॥८॥
त्यावरी नाग मुरडी । रत्न मेखळा साजे । माजू जो मुष्टी माय । त्या मन वेधलें माझें ॥९॥
नाभीं सरोवरीं वो । दिसे ब्रम्हकमळ । अनुपम्य उदर ज्याचें । विशाळ वक्षस्थळ ॥१०॥
कौस्तुभ वरी शोभे । करितो झळफळ । कुंडलांचेनि रत्नें । कैसेनि फांकताती कीळ ॥११॥
वदनीं मी काय वानूं । प्रसिद्ध निर्मळ । भाळीं तो अर्ध चन्द्र । मृगनाभींचा टिळ ॥१२॥
सरळ ज्या अंगोळिका । नवरत्नें जडीत । कंकणें मनगटीं । बाहुवटी सुशीभित ॥१३॥
त्यावरी कीर्ति मुखें । भुजादंड मिरवत । वैजयंती पदक हिरे । मुगुटीं झळकत ॥१४॥  
मयूरपत्रें शिरीं । शोभा दिसे अमित । चंद्र मंडळ लोपलीं वो । महातेज अद्‌भुत ॥१५॥
व्यापिलें वनमाळीय़े । लावण्य तेज अमित । तें रूप देखावया । माझा जीव उल्हासत ॥१६॥
ऐसी तापली विरहज्वरें । थोर होतो उवारा । चंदन पोळतसे । न घाला विंजण वारा ॥१७॥
चंद्रमा दाहतसे । उष्ण तो खडतरा । तंव येरी जाणितला । वेध नंदकुमरा ॥१८॥
होईल केशीराजा । पाहे द्वारकापुरा । भक्ति ही विरहा माता । तिणें आणिला घरा ॥१९॥
नामया विष्णुदासा । भेटी शारंगधरा । तनु मन जीवें त्याला । सुख झालें अंतरा ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : January 19, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP