तत्तत्कर्मण: संकल्पवाक्यं प्राचीनैस्तत्तद्रंथे लिखितमस्ति चेत् तदेव ग्राहयम् - स्वरचितसंकल्पवाक्यापेक्षया मुनिप्रणीतस्याद्दष्टाधिक्यहेतुत्वादिति विदुषां मतम् । यदा व्रतोपवासाद्यनुष्ठाने संकल्प: कर्तुं इष्यते तहतोपवासांगभूतोपोषणीयतिथ्यभावेऽपि एकादशीव्रते गणेशचतुर्थीव्रतादौ च साकल्यवचनापादिततत्तत्सत्त्वमादाय व्रतादिनिमित्तीभूततिथ्यादेरेवोल्लेख:, एतदतिरिक्ते संध्यापूजादिकर्मणि, सत्यनारायणव्रतादौ च तात्कालिकतिथ्यादेरेवेति स्पष्टं व्रतराजादौ ।
इति संकल्पविचार: ॥
अर्थ :--- त्या त्या कर्माचें संकल्पवाक्य त्या त्या प्राचीन ग्रंथांत असेल तर तें तसेंच घेणें चांगलें. स्वत: नवीन संकल्पवाक्य तयार करण्यापेक्षां प्राचीन पुण्यवान पुरुषांच्या मुखांतील वाक्य उच्चारणें अधिक श्रेयस्कर होय असें विद्वानांचें मत आहे. आतां ज्या तिथि - योगांच्या निमित्तक उपोषणादि व्रत करणें असेल, ती तिथि वा नक्षत्रयोगादि संकल्पकालीं जरी नसली तथापि साकल्यवचनानें उपोषणीय तिथ्यादींचें तत्कालीं सत्त्व म्हणजे अस्तित्व आहे असें समजून त्याच उपोषणीय
तिथ्यादींचा संकत्पवाक्यांत ऊह करावा. तात्कालिक तिथीचा ऊह करूम नये. उदाहरणार्थ, ज्या वेळीं दोन एकादश्या येतात, तेव्हां क्वचित्प्रसंगीं भागवत एकादशी ज्या दिवशीं लिहिलेली असते त्या दिवशीं सरळ द्वादशी असते अथवा तिथिवृद्धि असतां दुसरे दिवशीं एकादशी अत्यल्प घटिकापलात्मक असते अशा वेळीं तिथि कोणती म्हणावी हा प्रश्न उद्भवतो. त्याचें निरसन असें - संकल्पसमयीं उपोषणीय एकादशी तिथि नसली तरी तन्निमित्तक व्रत उपोषण कर्तव्य असतां ‘एकादश्यां तिथौ’ असेंच म्हणावें. द्वादश्यां म्हणूं नये. दुसरें उदाहरण गणेशचतुर्थी ‘मध्यान्हे पूजयेन्नृप’ या वचनानुसार चतुर्थी प्रात:कालीं नाहीं पण मध्यान्हाला आहे, म्हणून त्याच दिवशीं शास्त्रत: गणेशपूजन प्राप्त असल्यानें सकाळीं संकल्पाचे वेळीं जरी चतुर्थी नसली, तरी साकल्यवचनानें ती आहे असें समजून ‘चतुर्थ्यां तिथौ’ असाच पूजनसमयीं संकल्पवाक्यांत उच्चार करावा. तिथ्यादि निमित्तीभूत नसलेलें सत्यनारायणादि व्रत कर्तव्य असतां तात्कालिक तिथ्यादि घ्यावी. इत्यादि विचार धर्मशास्त्रांत स्पष्ट आहे. याप्रमाणें संकल्पविचार झाला.